बळी
त्या दिवशी दिवसभर कसं मळभ भरून राहिलं
होतं. धड काही सुचत नव्हतं. ना काम ना धाम... सारा कसा दिवस कंटाळवाणा गेला. एखादा
कागद चोळामेळा करून फेकून द्यावा तस्सा... पण संध्याकाळच्या सांजसावल्या पडू
लागल्यासरशी साऱ्यांच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारला होता. सगळा आळस नि अवघा
कंटाळा झटकून सगळे भैरोबाच्या देवळापाशी जमा होऊ लागले होते...
भैरोबाचं देऊळ तसं गावापासून जरा लांबच.
म्हटलं तर डोंगरावरच. देवळात लागलेले दिवे लुकलुकू लागले नि गावकऱ्यांची पावलं
भराभरा त्या दिशनं पडू लागली. गावातल्या जवळपास सगळ्याच घरांची दारं पटापटा बंद
झाली. अपवाद एकाच घराचा. त्या घरातला दिवा मात्र जळत होता. कदाचित कुठल्याशा
चिंतेनं... कुठल्याशा विवंचनेनं...
त्या घरात राहायचे नवरे गुरुजी. एरवी अख्ख्या
गावाला पुरून उरणारे गुरुजी आज अस्वस्थसे वाटत होते. तिकडं गावकऱ्यांच्या
उत्साहाला उधाण आलं होतं. ग्रामदैवत भैरोबाला बकऱ्याचा बळी दिला जाणार होता. तो
प्रसन्न होणार होता. त्याच्या नेवैद्याचा बेत सगळ्यांना पसंत होता...
नवरे गुरुजी म्हणजे एक सदा प्रसन्न
व्यक्तिमत्त्व. कनवाळू, हुशार, करड्या शिस्तीचे, कोमल हृदयाचे. त्यांचं शिकवणं
म्हणजे मुलांसाठी पर्वणीच. इतरांच्या शिकवण्याकडं दुर्लक्ष करत टिवल्याबावल्या करणारी
पोरंही त्यांच्या तासाला पुतळ्यासारखी स्तब्ध होऊन त्यांचं ओघवतं शिकवणं मुग्धपणं
ऐकत राहात. गावातल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये त्यांचा सल्ला घेतला
जाई.
गुरुजींना आठवू लागलं की, अखेर त्या दिवशी
गावकऱ्यांनी भैरोबाला बळी द्यायचं ठरवलं. त्यांनी निक्षून या गोष्टीला विरोध केला,
तरी त्यांना कुणी जुमानत नव्हतं. त्या वर्षी दुष्काळ पडला होता. पाण्याच्या थेंबा
थेंबासाठी सारेजण आसुसले होते. सतत आकाशाकडं लक्ष जाई प्रत्येकाचंच. नजर फिरवावी
तिथं नि तितक्याभर नुस्तेच आपले पांढऱ्या ढगांचे पुंजकेच्या पुंजके. श्रावण सरत
आला तरी काळ्या ढगांचा पत्ता नव्हता...
गावकऱ्यांच्या समजूतीप्रमाणं नवससायास,
प्रार्थना, जप सारे उपाय करून झाले. माणसं थकली, पण पावसाचं चिन्हं नाहीच. मग गेले
सगळे भोलू मांत्रिकाला शरण. शरण आलेल्याला देऊ नये मरण, अशा काहीशा प्रसिद्ध ओळी
फिल्मी स्टाईलनं पुटपुटत भोलूनं बळीचा उपाय सुचवला. नाईलाजानं लोकांनी तो मान्य
केला. गुरुजींनी या उपायाचा निषेध केला. ते म्हणाले होते, सांगत होतो, तेव्हा लक्ष
दिलं नाहीत. बेसुमार झाडं तोडलीत. नदीचं पाणी वाटेल तस्सं वापरलंत... सगळ्या
पर्यावरणाचे कसे तीनतेरा वाजवलेत... आणि आता म्हणजे बळी देणारेत, पावसासाठी...
त्यापेक्षा आता तरी जागं व्हा. अजूनही काही मार्ग काढता येईल... पण त्या मुक्या
जीवाचा बळी देऊ नका... ऐका माझं...
तरीही पाण्याच्या आशेपायी गावकऱ्यांचा
निश्चय कायम राहिला. बळी द्यायचंच ठरलं... आणि आज बळीचा दिवस उजाडलादेखील...
बकऱ्याला नटवलं-सजवलं होतं. गुलाल माखला होता. ओढून ओढून त्याला देवळाकडं नेलं जात
होतं. त्याची सुटकेची केविलवाणी धडपड व्यर्थ ठरत होती. त्याच्या ओरडण्याचा आवाज
वाद्यांच्या कल्लोळात हरवून टाकला जात होता. नीट बघणाऱ्याला त्याच्या डोळ्यांतले
भयचकित भाव व्यथित करणारे होते. अर्थात ते बघायची तसदी कुणीच घेतली नव्हती.
यशावकाश देवळाच्या आवारात जमाव पोहचला. देवाची
करुणा भाकली गेली. भगतानं भैरोबाला साकडं घातलं. भोलूही होताच. पोरंटोरं नि
आयाबायांच्या काळजाचा ठाव सुटत चालला होता. वातावरण एकदम गंभीर नि तणावाचं झालं
होतं... प्रार्थनेनंतर साऱ्यांनी डोळे उघडून भक्तीभावानं भैरोबाकडं पाहिलं.
त्याच्या मुद्रेवरचे खरे भाव कुणालाच दिसले नाहीत... एकजण पुढं झाला. त्यानं
बकऱ्याकडं पाहिलं न पाहिलंसं केलं नि सुरा चालवला. चमकदार पात्यावर रक्ताची
रांगोळी घातली गेली. भैरोबा की जय... एकच गलका झाला...
त्याच क्षणी योगायोग म्हणा की, आणखी
काही... इकडं गावात एकल्याच उरलेल्या गुरुजींना अधिकच अस्वस्थ वाटू लागलं...
त्यांचं भान हरपलं नि त्यांचे प्राण गेले... गावाला अतोनात दुःख झालं... बळी
देऊनही पाऊस पडलाच नाही... भैरोबाच्या चेहऱ्यावरचे विवश भाव कुणालाच दिसले
नव्हते... त्याला नको असतानाही बळी दिला गेला होता... तोही एक नव्हे दोन...
No comments:
Post a Comment