Sunday, 7 February 2016

क्षण एक पुरे...

``एकदा काय झालं, एक फुलपाखरू उडत उडत आलं नि एका फुलावर बसलं. तितक्यात तिकडून आला``... बस्स... याच `आला`नंतर सुरू होतो कल्पनाशक्तीचा खेळ. तुम्हीही वाचताना सरसावून बसला असालच की, अं... `त्या फुलपाखरा`चं पुढं काय होतं?, ते वाचायला... खरंतर त्याचं काय होतं, हे सांगणारी गोष्ट मोजून चार वाक्यांत संपवता येईल. किंवा मग तिला मोठ्या नमुनेदार भावकाव्याचं रुपडं देता येईल. किंवा मग त्यावर रचता येईल एक लघुकथा किंवा अगदी कथाही. किंवा अधिक व्यापक पट घेऊन मांडता येईल कादंबरी... किंवा मग महाकादंबरीचा पटही... फक्त गोष्ट सांगणाऱ्यानं ठरवायचं की, गोष्ट कोणत्या फॉर्ममध्ये सांगायची ते...

थोडी पुस्तकी भाषा मांडायची, तर एका विशिष्ट अशा स्थलकालानुबद्ध परिस्थितीत, क्षणी निर्माण होणाऱ्या लेखकाच्या अनुभूतीला `साहित्य` असं म्हणता येईल. या साहित्यातून त्या त्या काळचा समाज, प्रवृत्ती, परिस्थिती, लेखकाच्या भावानुभवाचं प्रगटीकरण होत राहातं. त्यामुळंच समाजात घडणाऱ्या घडामोडी, घटनांचं प्रतिबिंब साहित्यात आवर्जून पडतं. अनेकदा अनेक संदर्भांत म्हटलं गेलेलं तुम्हांलाही आठवत असेल की, `साहित्य हे वास्तव आणि कल्पनेचा सुरेख संगम आहे`. हांsss हांsss बिल्कुल घाबरू नका... आपण `साहित्यशास्त्र` किंवा `साहित्य आणि समाज` या `मराठी`च्या विषयांचा अभ्यास करणार नाहीयोत. पण मराठीची विद्यार्थिनी असल्यानं त्या अभ्यासाची झलक दिसू शकतेही...

तर `त्या फुलपाखराचं काय झालं`, हेही लेखकाच्या मनात ठरलं असेल खरं... पण तरीही तो ते अनेक प्रकारे व्यक्त करू शकेल. एकदम सकारात्मक, अतिशय नकारार्थी, फिफ्टी-फिफ्टी, तटस्थ वगैरे वगैरे... कसं काय असतं बुवा हे व्यक्त होणं?... ते काही मशीन नव्हे झेरॉक्सचं, की टाकला आत पेपर नि पडली बाहेर झेरॉक्स.  कसंए की तो एक क्षण पुरतो, क्लिक होण्यासाठी... कधीकधी पटकन क्लिक होते `कल्पना` नि उतरवलं जातं सगळं कागदावर किंवा कॉप्युटरवर... कधी असं काही बदाबदा सुचायला लागलं की उडते तारांबळ. विचारामागून विचार सुरूच आपले... ती गजरेवाली नाही, का कशी गुंफते फुलामागून एकेक फुलं सराईतपणं... तस्संच... मग रफपेपर, बसचं तिकिट असं वाट्टेल ते चालतं कल्पना उतरवून घ्यायला. मात्र कुणाला लागतो अमूकच पेपर नि तमूकच पेन... कुणाला लागतो पिनड्रॉप सायलेन्स, तर कुणाला चालून जाते लोकलगर्दी... त्या तंद्रीत सुचतं ते भराभरा लिहून काढावंच लागतं. नाहीतर मग फार अस्वस्थता येते बुवा... कारण नाही, लिहिलं तर अनेकदा केवळ अर्धामुर्धा भाग आठवतो... त्यात घातलेली भर काही वेळा उतरते बेमालूम... कधी वाटू शकते विजोड ठिगळासारखी...

कधी मात्र `फुलपाखराचं काय करावं`?, हे कितीही आटापिटा केला तरी ढिम्म उमगतच नाही. त्या `फुलपाखराच्या कल्पने`ची `कोषातली अळी` होते जणू.... डाराडूर झोपी गेलेली... जीव कसा नुसता कासाविस होऊ लागतो... `सुचत नाही काही, म्हणून जीवाची होते लाहीलाही`, असले काहीतरी फुटकळ शब्द लुडबुडू लागतात डोक्यात... तितक्यात होतं काहीतरी एकदम क्लिक... `कल्पना`...

कल्पना
कल्पने रुसलीस का?
सांग रागावलीस का?
कुठं आहेस आत्ता?
काय तुझा पत्ता?
किती तुला ग शोधले
हाती काही न गवसले
मती सुन्न झाली
लेखणी ही थबकली
काव्यराजा अडला
कागदची गोंधळला
सांग की ठावठिकाणा?
किती हा आडमुठेपणा?
विचारांच्या गर्दीत हरवलीस
कुठे न तुझा मागमूस
उत्तर तूच देशील
भरारी मारत येशील...

आता सुचलं की `काहीतरी`... पण ते निघालं तिसरंच... काय तर म्हणे? `कल्पना`... `या फुलपाखराचं काय करायचं`?, हा प्रश्न `जैसे थे`... आपल्याभोवतालच्या अनेक प्रश्नांसारखा... कधीतरी, काहीतरी करायला हवं, `या फुलपाखराचं`... सुचेलही कदाचित पुढल्या कोणत्यातरी लेखात... `तो एक क्षण पुरे, क्लिक होण्यासाठी`... तोपर्यंत `कल्पने`चे पंख फडफडत राहणार... `फुलपाखरा`च्या अनाहत उडण्याइतकेच...
     
  
    (रेखाचित्रकार - जयंत कुंटे.)



(सलग सुवर्णमहोत्सवी (५०) पोस्ट.)

11 comments: