Sunday, 28 February 2016

उमजलं समजलं

बऱ्याच दिवसांनी त्या भागात जात होते... तिथं ती एक लाकडी खिडकी... टिपिकल चौकोनी दारं-खिडक्यांची. म्हटलं तर जुन्या आठवणींच्या अदृश्य पडद्यांची... अधेमधे त्यातून पांढरेधोप केसांच्या, सुरुकुत्यांमुळं अधिकच सुरेख दिसणाऱ्या एक आज्जीबाई डोकवायच्या. कधी नुसत्याच रस्त्यावरची गंमत पाहात. कधी त्यांच्या वयाला न जुमानता पटापट सुया फिरवत लोकरकाम करणाऱ्या. त्यांच्या त्या हातांची लय पाहायला मिळावी म्हणून मीही रेंगाळत, रमतगमत जाते. मध्ये कधीतरी त्या आज्जींना ते जाणवलं की काय, कोण जाणे... त्या आपलं काम चालू ठेवत माझ्याकडं बघून अस्फुटपणं हसल्या. चालता चालता विचार करून लागले... काय होतं, त्या हसण्यात... त्या सातत्यानं लोकर विणण्यात... तो सुरुकुतलेला चेहरा, ते पांढरेधोप केस काय सांगू पाहात होते...
   
उमजलं समजलं...
`हो`ला हो, `नाही`ला नाही
उमजलं समजलं...
हे हे असं आहे, हो हो असं आहे
उमजलं समजलं...
हे हे असं नाही, हो हो असं नाही
उमजलं समजलं...
हे सत्य, ते असत्य
उमजलं समजलं...
जगण्याची रित, कधी विपरित
उमजलं समजलं...
कधी काळं, कधी पांढरं
उमजलं उमजलं...
आयुष्यातले सट्टे, सब घोडे बारा टक्के
उमजलं समजलं...
चौऱ्यांशीचा पट, हसे कान्हा नटखट
उमजलं समजलं...
तो आणि मी, मी आणि तो
उमजलं समजलं...
आत्मा-परमात्मा, सामान्यही हुतात्मा
उमजलं समजलं...
जाणिवेची नेणीव, नेणिवेची जाणीव
उमजलं समजलं...
खरंच का, असं घडलं?
उमजलं... समजलं...

...आत्ता असं वाटतंय की बहुधा मला काहीतरी कणभरसं हाती गवसतंय, त्या साऱ्यांमधलं... वाटलं, तेवढं तर तेवढं आपल्याला आकळलेलं आज्जींना सांगून बघूया तर खरं... मग बघू काय म्हणतात त्या... खरंतर ओळख ना पाळख... पण निव्वळ त्या खिडकीतल्या डोकावणं नि माझं त्यांच्याकडं पाहाणं हाच काय तो समान धागा... तोच का तो... त्यांच्या हाताल्या लोकरीचा... अर्धवट विणून झालेल्या वस्त्राचा... पुन्हा जाईन तेव्हा असेल का, ते लोकरकाम पूर्ण झालेलं... काय विणत असतील त्या, कुणासाठी, कशासाठी... हज्जार प्रश्नांचा भुंगा मनात गुणगुणू लागला... त्यातल्या त्यात हे एक बरं झालं की, तेवढं तरी मला उमजलं... समजलं...


  
प्रातिनिधिक छायाचित्र सौजन्य – संजय पटवर्धन.





No comments:

Post a Comment