Sunday, 6 March 2016

निमित्त वर्षपूर्तीचं...


लिहिणं... म्हणजे काय असतं?... फक्त एका शब्दापुढं दुसरा शब्द ठेवणं... की, मनातल्या विचारांचा अर्थ वाहणाऱ्या अचूक शब्दाची नस पकडून त्यांना बोलतं करणं?...
विचार... म्हणजे काय असतं?... मनातल्या असंख्य भावभावना की, भावनांच्या गर्दीतल्या नेमक्या काहींच्या कानाला धरून त्यांना चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करत सुसूत्र करणं?...
मन म्हणजे काय असतं?... बाप्पा होsss... आता हे गणित काही बॉsss कुणाला अजून ठोकपणं उलगडलेलं नाहीये... की मानवी तल्लख मेंदूचंच भावनिक रुपडं म्हणजे मन?...

कठीण आहे याबद्दल काही सांगणं... वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज म्हणजे  लिहिणं म्हणावं, तर तसंही नेहमीच होतं असंही नाही... खरंतर `लिहिणं` या प्रोसेसबद्दल लिहिणं, फारच गुंतागुंतीचं... त्याचंही शास्त्र असलं तरीही... त्यामुळं तो वैचारिक भाग शहाण्यासुरत्या लोकांसाठी ठेवून उरलेली शब्दवेडी, नादिष्ट किंवा ठार वेडी माणसं थेट लिहियलाच लागतात. यात मी कोणत्या कॅटॅगरीत बसतेय, ते तुम्हीच ठरवा...

खरंतर लिहिते आहेच अगदी दुसरी-तिसरीत असल्यापासून... लिखाणाच्या त्या त्या टप्प्यांवर, वयाच्या त्या त्या वळणांवर, कामाच्या त्या त्या स्वरुपांमुळं, माणसांच्या अनाकलनीय स्वभावामुळं, परिस्थितीच्या बदलत्या वाटांमुळं, कधी लिहिण्याची मिळालेली दैवी देणगी जोपासलेय म्हणून, कधी अहेतूक, कधी सहेतूक, कधी उर्मी, कधी उमासा, कधी फक्त सुचतंय म्हणून... लिहित राहिले... लिहित राहिले... येईल तसं... ते व्यक्त होत राहिलं कवितेतून, लेखांतून... कधी फक्त पाठोपाठ भरणाऱ्या वह्यांमध्ये... कधी प्रकाशित होणाऱ्या लेखांमधून... कधी फक्त विचारांचे तरंग... कधी अस्फुटसे रंग...

यापलिकडंही काहीतरी होतं, ज्याला व्यक्त व्हायचं होतं... फक्त मिळत नव्हता वाव... माध्यम माहित असलं तरी नव्हता प्रेरक भाव. `ब्लॉग` या माध्यमातून व्यक्त होण्याची प्रेरणादायी ठरले ते माझ्या मैत्रिणींचे ब्लॉग. त्यासाठी भक्ती तांबे, लीना दातार, मृणाल भगत यांना मोठ्ठं थँक्यू. त्यांनी या नवशिक्या ब्लॉगरला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी लीलया पार पाडली. पाठोपाठ ब्लॉगसंबंधित तांत्रिक गोष्टींसंदर्भातल्या बालिश वाटू शकणाऱ्या प्रश्नांना न थकता उत्तरं देण्याचं काम भाऊ अवधूत भागवत आणि सौरभ वैशंपायन यांनी केलं. ब्लॉग सुरु झाल्यावर काही महिन्यांत करायचं ठरलं, त्याचं फेसबुक पेज. त्यासाठी पुन्हा भक्ती तांबे आणि जुईली म्हात्रे या दोघींनी पुष्कळ मदत केली. कधी योग्य माहितीची पडताळणी करण्यासाठी त्या विषयातल्या माहितगारांना अनेकांना व्हॉटस् अँपच्या माध्यमातून त्रास दिला, त्या सगळ्यांची नावं लिहिणं शक्य नाही. मात्र या सगळ्यांची मी मनःपूर्वक आभारी आहे. लेख लिहिण्यात गुंतल्यावर बाकीची व्यवधानं सांभाळणाऱ्या घरच्या मंडळींबद्दल अधिक काय लिहू...

या व्यक्त होण्यातून काही नेहमीचेच, काही हटके असे लिखाणाचे फॉर्म्स गवसत गेले. कधी ललित लेखानं काव्याचं रुप धारण केलं. कधी कविता ललित लेख झाली. कधी काव्य चौकोनी, त्रिवेणी स्वरुपांत उमटलं. तर कधी लेखांना फोटोंची जोड अजोड ठरली. कधी चित्र, कधी रेखाटनांच्या माध्यमांतून शब्दांहून सरस असं काही हाती लागलं. कधी भूत, कधी भविष्य तर कधी वर्तमानातली सफारी... कधी गोष्ट, कधी खाष्ट, कधी स्वप्न, कधी सत्य, कधी कल्पना, कधी गूढ, कधी मिश्किल, कधी या सगळ्यांचीच पुसटशी सीमारेषा... अल्याड-पल्याड ठरणारं लिखाण हातून होत गेलं. कधी रात्री-बेरात्री, कधी प्रवासात सुचणं, तर कधी काही न सुचल्यानं कोसळलेला अस्वस्थतेचा पहाड... तो ओलांडताना झालेली दमछाक आणि मग झरझर समोरच्या स्क्रिनवर शब्द उमटू लागताच स्थिरावलेपण... खरंतर हे सगळं सगळं असं शब्दांत मांडणं कठिणए... पण शब्दफुलांचीच ओंजळ असल्यानं मी तुमच्या भरवशावर हा प्रयत्न करतेय...

शब्दफुलांची ओंजळ या ब्लॉगची आज वर्षपूर्ती.
वाचकहो, तुमच्याच प्रोत्साहानामुळं हा टप्पा गाठता आलाय.
वाचकहो, तुमचे मनःपूर्वक आभार.
आता आपण भेटणार आहोत, दर पंधरा दिवसांनी.
वाचत राहा, शब्दफुलांची ओंजळ...


8 comments:

  1. खूप छान ताई�� अभिनंदन वर्षपूर्तीबद्दल,अजून काही मदत लागल्यास नक्की विचार, I'll be happy to help you..

    ReplyDelete
  2. Shabdafula ashich nehami fulat rahot

    ReplyDelete