आकाश पेलताना...
खिडकीमधून दिसतं ना, तेवढंच आकाश नसतं. ते
निराळंच असतं. काही आगळंच भासतं. बऱ्याचदा पडतं का त्यात जणू आपल्या मनाचं
प्रतिबिंब... खरंतर पडतं, म्हणण्यापेक्षा दिसतं का, असं म्हणावं का बापडं... कधी
असतात, भारी भारी आशा-आकांक्षांचे इमले... कधी मग, त्या इमल्यांतून रुजून क्वचित वास्तावात
आलेली मनोरथांची रंगीबेरंगी फुले... कधी असतो, निराशेचे घोर गडद काळेकुट्ट ढग...
कधी असतो, हिरव्याकंच बहराच्या सोबत... कधी असतात, फक्त शेकडो विचारांसारखे
पांढरेच्या पांढरे ढगांचे पुंजके... कधी दिसतं, चैतन्याच्या अस्तित्वाचे सोनेरी
कडांचे प्रेरक क्षितिज... कधी भावते, उंचचउंच डोंगररांगांची दोस्ती... कधी खुपते, केबल्स
नि मोबाईल टॉवर्सची वस्ती... कधी वाटतं, झाडापानांतल्या एकाकी पक्षागत... तर कधी
नुसतं नुसतं निळसर निळसर... आकाशी... आकाशी... कधी सतत सतत किलबिलत्या पक्षांचे
थवे... तर कधी दूरवर पसलेली केवळ नि केवळ शांतावलेली निरभ्रता... कधी, रात्रीच्या निवांततेत
हात डोक्याशी बांधून, निरखित राहायचे वरचे अगणित तारे... अशा वेळी भोवतालून, वाहू
द्यावे सुखदुःखाचे हसरेबोचरे वारे... फक्त निरखित जावे रंगढंग... निश्चयाशी असावा
नेटका दृढबंध... तोंड द्यावे क्षणांना... क्षणाक्षणाला... आकाश पेलताना... आकाश
पेलताना...
सर्व छायाचित्रे – राधिका कुंटे.
No comments:
Post a Comment