आनंदी
आपल्या जाण्यायेण्याच्या परिसरातल्या काही
जागा, काही ठिकाणं, काही सिग्नल्स डोक्यात इतके फिट्टपणं बसलेले असतात की, त्यात
झालेला किंचितसा बदलही आपल्या लगेचच लक्षात येतो. तसंच माझंही झालं. हा एवढा ब्रिज
संपल्यावर एक मोठ्ठासा सिग्नल, मग तिरकस क्रॉसिंग आणि बस पुन्हा मार्गाला लागणार,
हे पक्कं ठरलेलंच. अजूनही तसंच होतं म्हणा. फक्त मधल्या काळात त्या सिग्नलच्या बाजूच्या
रस्त्यावर साचायला लागले हाsss एवढाला कचरा... ओला-सुका कचरा नव्हे.. पण चिंध्याच चिंध्या... ढीगभर...
आणि थोडाफार प्लॅस्टिकचा भस्मासूरही होताच सोबतीला. आपल्या मध्यममार्गी
शिरस्त्यानं मी कपाळी चार आठ्या घालून ते सगळं पाहिलं नि सोडून दिलं...
मग थोड्याच दिवसात तिथं प्लॅस्टिकचा आडोसा
आला, एकाचे दोन करत तीन-चार आडोसे बांधले गेले आणि त्यात संसार नांदू लागले. चार
आयाबायांच्या चुलीचा धूर हवेत कोंदू लागला. बाप्यांच्या पत्त्यांच्या आवाजानं
रस्ता जागा राहू लागला. आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे तिथल्या मुलाबाळांच्या
दंग्यानं-हसण्यानं त्या आडोशाला `त्यांचं घर` म्हणायला मला भाग पडलं. येता-जाता
दिसणाऱ्या अनेक घरांपैकीच हीदेखील, अशी मनात कुठंतरी नोंद झाली असावी...
मग त्या घरापेक्षा त्यातल्या मुलाबाळांवर लक्ष
केंद्रित व्हावं, असं काहीसं घडू लागलं. कधी ती मुलं कुतुहलानं बाबा लोकांच्या
पाठीवर ओणवून पत्त्यांकडं कुतुहलानं पाहात बसत. कधी आईजवळ चुलीशी बसून चहात बुडवून
बिस्किटं चोपत असत. कधी त्या चिंध्यांच्या ढीगाऱ्यात शिरून आपल्याला हव्या तेवढ्या
चिंध्या हुडकून त्यांनी खेळत. त्यांच्यातली चुणचुणीत मुलगी त्यांची टीमलीडर असावी.
तिचं सगळेजण ऐकत... तिच्या मोठाल्या काळ्याभोर डोळ्यांत खूपसारी स्वप्नं बागडत
असत... यांच्या शिक्षणाचं काय, असा शिक्षणमार्गी विचार माझ्या डोक्यात चार वेळा
डोकावून गेला. त्याचं उत्तर काही दिवसांनी मिळालं... ती मुलगी नि आणखी एक मुलगा
युनिफॉर्ममध्ये दिसत होते. हातात पुस्तकं नि दप्तर घेऊन शाळेला जायची तयारी... `स्कूल चले हम`सारखी...
मध्ये बऱ्यापैकी गॅप गेली त्या रस्त्यानं
जाण्यासाठी... बस थांबता थांबताच तिच्याकडं लक्ष गेलंच. ती आज काय करतेय बघायला.
आज तिचा बाबा कुणीतरी दिसेल्या सोफ्यावर एकदम ऐटीत बसला होता. आई त्याला चहा करून
देत होती. `ती` बाकीच्यांसोबत खेळत होती. एकाशी काहीतरी भांडण झाललं असावं, म्हणून तो
थोडा दूरच होता. तितक्यात एक गाडी पास झाली आणि `ती` ओरडली `एsssss...` पोटात धस्स झालं... म्हटलं काही कुणाला लागलं की काय... तर `ती` त्या दुरावलेल्या मुलाला ओरडून आनंदानं नि
भारावून विचारत होती, `देखी क्या गाडी... क्या भारी थी ना`... तोही नरमाईनं उत्तरला, `हां हां, बहोत ही भारी
थी`... दुसरा चिमुरडा म्हणाला, `क्या
ब्लॅक कलर था भाई... भारीवाली थी`... इकडं माझी ट्यूब लेट
पेटली. आठवलं की, आज तर जुन्या गाड्यांची रॅली होती, त्यातलीच असणार ही गाडी
असणार. मग `तिच्या`कडं पाहाता पाहाता
बस हलली... गाडीचा नाद सोडून, `ती`
चिंध्यांच्या कचऱ्यात मिळालेल्या आरशाच्या तुकड्याला मोठ्या कुतुहलानं नि
उत्सुकतेनं न्याहाळत होती... मग हळूच `ती` त्यात डोकावली नि नंतर माझ्या नजरेआड झाली... मनातल्या मनात तिचं बारसं केलं
`आनंदी`! आता, वाटतेय तिथून बसनं जायची
उत्सुकता... का ही उत्सुकताही `आनंदी`नंच
पासऑन केलेय?... कुणास ठाऊक?...
छायाचित्र सौजन्य – इंटरनेट.
आनंदी भावली!
ReplyDeletethank u.
ReplyDelete