Sunday, 27 December 2015

शांताबाई नि सांताभाई...

हं हं हं... तुम्हांला असं वाटतंय का, की हे दोन्ही शब्द तुमच्या ओळखीचे आहेत...
म्हणजे बघा की, तुमचं फर्स्ट इम्प्रेशन असंच असणार की, ह्याsss, त्यात काय... `शांताबाई` म्हणजे तीच ती `फेमस शांताबाई`... नखरा-चखरावाली... किंवा फारतर गीतकार-संगीतकार-प्रेक्षकांना अभिप्रेत असणारी... किंवा फार तर `हवा येऊ द्या` म्हणत भाऊ कदमांनी उभी केलेली शांताबाई... आणि हो, `सांताभाई` म्हणजे तर या सीझनची ओळखच. आपला लाडका सांताक्लॉज! अर्थात सांताबाबा आणि यंदाच्या मोसमात त्याचं नव्यानं झालेलं बारसं नि तसं म्हटलं तर तोही `शांताबाई इफेक्ट`च... तर `सांताक्लॉज`चं आणखी एक नाव- `सांताभाई`... सो, आता तुम्ही म्हणाल की, आम्ही पण अपडेट ठेवतो बॉस... आपल्याला काय एवढी माहिती नाही काय?...

हं हं हं... तुम्हांला असं वाटतंय का, की हे दोन्ही शब्द तुमच्या ओळखीचे आहेत...
म्हणजे बघा की, आलं का कुणाच्या डोक्यात की, `शांताबाई` ही कोण असू शकेल... ती आपल्याकडं कामाला येणाऱ्या बाईंची आई असू शकते किंवा मग मोठी बहिण असू शकते. मग त्याच सुसंगतीनं पाहायचं तर तिनं कोणतेही नखरे न करता काबाडकष्ट करून आपल्या लेकीला किंवा बहिणीला वाढवलंय. कष्टांची मुळाक्षरं गिरवायला शिकवलंय आणि प्रामाणिकपणाचा वारसा तिला देऊ केलाय. आपल्या अडल्यानडल्याला उभ्या राहणाऱ्या किंवा स्वयंपाक करून आपल्याला पोटभर जेवू घालणाऱ्या आपल्या बाईंची नातलग. मग असू शकते का अशी `शांताबाई`...

हं हं हं... तुम्हांला असं वाटतंय का, की हे दोन्ही शब्द तुमच्या ओळखीचे आहेत...
म्हणजे बघा की, `सांताभाई` म्हणजे सांताक्लॉजच. लहान मुलांना किंवा फारतर कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये गिफ्ट वाटत फिरणारा घरातलाच किंवा मग पगारी माणूस! मग तुम्हांला असा काही अंदाज करता येतोय का की, कदाचित आपल्या परिसरातल्या माणसांपैकी तो कुणी असेल. अनेक सेवाभावींना आपण `देवमाणूस` मानतोय, तर ही मंडळी `सांताभाई` म्हणून ओळखता येतील का... खरंतर एवढं लांब जायचीही गरज नाहीये. आपल्याच कुटुंबातही `तो` असू शकेल. खरंतर `तो` ही संकल्पनाही मुळात कुणापुरती मर्यादित ठेवायला नकोच. `तो` किंवा `ती` कुणाही `सांताभाई` असू शकतं. म्हणजे बघा तुमचा मित्र किंवा मैत्रिण, आई-वडिल, आजी-आजोबा असं कुणीही ही भूमिका सहजगत्या निभावतंय आत्ता या क्षणालाही. त्यासाठी केवळ `नाताळा`चं निमित्त लागत नाही, त्यांना काय किंवा कुणालाच... मग असू शकतो का असा `सांताभाई`...

हं हं हं... तुम्हांला असं वाटतंय का, की हे दोन्ही शब्द तुमच्या ओळखीचे आहेत...
म्हणजे बघा की, हो, हे सगळेच विचार पटताहेत आपल्याला. मग आणखी एक असं की, भोवतालचा विचार करणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण आपण स्वतःतही डोकावून पाहायला शिकायला हवंच कधीतरी. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, या शिक्षणाला वयाची कोणतीही अट बिल्कुलच नाहीये. तर असं स्वतःच्या अंतरंगात डोकावताना, तुम्हांला काहीतरी जाणवतंय का, काही प्रतिबिंबित होतंय का... बघा, थोडंसं मन एकाग्र करा... श्रद्धाळू असाल तर देवाचं नाव घ्या किंवा मग सरळ आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यांसमोर आणा... चित्त स्थिर ठेवा... एक प्रकारची मनःशांती करताय का फिल... आणि होsss एक पुसटसा चेहरा साकारतोय का हळुहळु तुमच्या मिटलेल्या डोळांसमोर... येस्सsss... हेच फिलिंग पसरायला हवंय जगभर... शांतातेत सुखसमाधान लाभेल नि मदतीचा हात आपसूकच पुढं होईल. विंदांच्या नेमक्या शब्दांत सांगायचं झालं तर ``देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हातच घ्यावे``... मग असं `काही` होऊ शकतं का...

हं हं हं... तुम्हांला असं वाटतंय का, की हे दोन्ही शब्द तुमच्या ओळखीचे आहेत...
म्हणजे बघा की, आपल्या प्रत्येकातच दडलेली आहे `शांताबाई` नि `सांताभाई`... फक्त आपण त्यांना वेळच्या वेळीच हवंय ओळखायला... आता सरत्या वर्षात नाही तरी `शांताबाई` आणि `सांताभाई` हे शब्द `कॉईन` झालेच आहेत, मग त्यांना केवळ बोलण्यात किंवा लिहिण्यातच वापरण्यात काय हशील? त्यांचा खरा अर्थ जाणून घेऊया नि या दोन्ही शब्दांमुळं आपसूक साध्य होणारी `सकारात्मकता` नि `माणूसकी` आपण सगळ्यांनी पटकन `लाईक` करून झटकन `फॉलो` करायला हवी. मग अशी काही `माणूसकी` नावाची गोष्ट असू शकते का...

हं हं हं... आता तुम्हांला असं खरंच वाटतंय का, की हे दोन्ही शब्द तुमच्या ओळखीचे आहेत...




  

Sunday, 20 December 2015

`नट`खट बबड्या

``लाईटSSS साऊंडSSS कँमेराSSS अँक्शनSSS`` कॅमेऱ्यासमोर आलाय एक चुणचुणीत चिमुरडा. एकदम बोलके डोळे, अंगात चापल्य आणि कौशल्य असणारा. शॉट चालू होतो... कॅमेरा फिरत राहतो नि शॉट ओके होतो. हा मुलगा तुम्हीही पाहिला असाल... `डब्बा गुल`मध्ये, `माय डियर यश`मध्ये, मालिकांमध्येही... आणि सध्या तो वावरतोय `सोबतीने चालताना`... हा आहे अथर्व बेडेकर. माझा भाचा अर्थात अधूनमधून माझ्या लेखांत ज्याचा उल्लेख होतो तो `भाचेराव.`


अथर्व `बालमोहन विद्यामंदिर`मध्ये इंग्रजी माध्यमात चौथीत आहे. शाळेचे विश्वस्त गुरुप्रसाद रेगे आणि प्रिन्सिपॉल बबिता पेंटा यांच्यासह सगळेच शिक्षक अथर्वच्या पाठीशी असल्यानं तो अभ्यास नि कला या दोन्ही खिंडी एकाच वेळी लढवू शकतोय. मुळातच ही स्टेज परफॉर्मन्सची कला त्याच्यात आली कुठून? अँक्टिंगची मुळाक्षरं त्यानं बाबांच्या देखरेखीखाली गिरवलेत तर गाण्याचं प्राथमिक शिक्षण तो आईकडून घेतोय. तो तिसऱ्या वर्षापासून विद्याताई पटवर्धन यांच्याकडं अभिनयाचे धडे गिरवतोय. सगळ्याच सिनिअर कलावंतांकडून वेळोवेळी त्याला मार्गदर्शन लाभलंय.

अवघा साडेतीन वर्षांचा असतानाच `वनिता समाज बालक स्पर्धे`त एकपात्री स्पर्धेत त्याला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं आणि त्याच्या कलाप्रवासाला सुरूवात झाली. `मला शिकायचंय, मोठं व्हायचंय`, ही गरीब बुटपॉलिशवाल्या मुलाची तळमळ त्यानं अचूकपणं पोहचवली. मग त्यानं काम केलंन ते थेट `भूता`बरोबर. `मी मराठी`वरील `एक तास भूता`चा मालिकेतील `माझं घर` कथेत मानसी कुलकर्णीसोबत त्यानं काम केलं. `हे घर माझं आहे, मी भूत आहे`, हे भूताचे डायलॉग घरी म्हणत त्याच्या मते, तो सगळ्यांना घाबरवत होता. `अरविंद देशपांडे नाट्यमहोत्सवा`त विद्याताई पटवर्धन दिग्दर्शित `रापचिक छबुताई भिंगे` या एकांकिकेत त्यानं काम केलं.

मग त्याला संधी मिळाली ती `झी मराठी`च्या `डब्बा गुल`मध्ये. स्पर्धक निवडीचे नाना टप्पे पार करून तो या स्टॅण्डअप कॉमेडीच्या धम्माल टीममध्ये सामील झाला. निर्मिती सावंत यांनी त्याचं नाव ठेवलं होतं `बबड्या`. कार्यक्रमातला हा सर्वात लहान परफॉर्मर सलग तीन वेळा `परफॉरर्मर ऑफ द डे` ठरला होता. त्याच सुमारास `मधली सुट्टी`मध्ये सलील कुलकर्णी यांनी `डब्बा गुल`च्या टीमशी गप्पा मारताना अथर्वच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. पाठोपाठ याच टीमनं `आम्ही सारे खवय्ये` म्हणत प्रशांत दामले यांच्याशी काही रेसिपीज शेअर केल्या होत्या. लहान असल्यानं पदार्थ करता आला नाही, तरी अथर्वनं `सुख म्हणजे नक्की काय असतं`, हे गाणं गुणगुणून दामले यांची वाहवा मिळवली होती. बोलक्या चेहऱ्यामुळं अथर्वची `झी मराठी अवॉर्ड २०१२` आणि `सोनी टिव्ही`वरील `इंडियन आयडॉल ज्युनियर`च्या प्रोमोसाठी निवड होऊन ते त्या वेळी झळकले होते. या शुटिंग्जच्या दरम्यान केवळ अँक्टिंगपुरतं मर्यादित न राहता प्रॉडक्शनमधल्या बारीकसारीक गोष्टींविषयी त्याला कुतुहल वाटतं नि तो त्यासंबंधी जाणूनही घेतो, हे महत्त्वाचं.

एरवी एका जागी मुळीच स्वस्थ न बसणाऱ्या अथर्वनं शेखर सरतांडेल दिग्दर्शित `माय डियर यश`मध्ये ऑटिस्टिक मुलाची मुख्य भूमिका चांगली वठवली होती. त्यानंतर त्यानं केले अतुल काळे दिग्दर्शित `असा मी अशी ती` आणि मनवा नाईक दिग्दर्शित `पोरबाजार` हे चित्रपट. त्यानंतर `सुवर्ण सचिन` या कार्यक्रमात अनेक दिग्गजांसमोर अथर्वनं छोट्या सचिनची भूमिका साकारली होती. `कोटक महिंद्रा बँक-ज्युनियर अकाऊंट`च्या `यूट्यूब`वरील जाहिरातीत तो होता. एनएफडीसीच्या `आईसलँण्ड सिटी` या हिंदी चित्रपटात त्यानं उत्तरा बावकर आणि अमृता सुभाषसोबत काम केलं. `टाटा कॅपिटल लिमिडेट`च्या जाहिरातींमध्ये काम करायची संधी त्याला यंदा मिळाली. `खरकटं` या मराठी आणि `डाकिया डाक लाया` या हिंदी लघुपटांत त्यानं काम केलंय. अनेकांची त्याला मनःपूर्वक दाद मिळाली ती `एका लग्नाची तिसरी गोष्ट`, `अस्मिता` आणि `दिल दोस्ती दुनियादारी` या मालिकांतील भूमिकांसाठी. रवी अय्यर आणि के. सी. लॉय यांच्या `बुँदे` या म्युझिक व्हिडिओत आणि राज्य नाट्य स्पर्धेत `सायंटिस्ट` एकांकिकेतही त्यानं काम केलं. सध्या त्याच्या कुमार सोहनी दिग्दर्शित `सोबतीने चालताना` नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. त्याच्या वयाला साजेशा असणाऱ्या या भूमिकेची नस अचूक ओळखत त्यानं साकारलेला `तन्मय` प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो. या कॅरेक्टरच्या साऱ्या भावभावना करेक्टली अथर्वनं टिपल्यात. त्याच्या सगळ्याच प्रोजेक्टशी संबंधित कलाकारांसह अनेक दिग्गजांकडून त्याला वेळोवेळी शाबासकीचं टॉनिक मिळालंय, जे कोणत्याही वयाच्या कलाकारासाठी कायमच महत्त्वाचं असतं.

त्याला अँक्टिंग, कॉमेडी आणि टायमिंगचा अचूक सेन्स आहे. त्याचा प्रत्यय आम्हा घरच्यांना वेळोवेळी येतोच नि अर्थातच त्याच्या परफॉरमन्समध्येही. मग `तुझं काम खूप छान झालं`, असा समोरच्या प्रेक्षकांचा अभिप्राय त्याला मिळतो, तेव्हा तो अगदी मोठ्या माणसांसारखंच `थँक्यू` म्हणतो, तेव्हा त्याचं पुन्हा कौतुक वाटतं आणि पुढच्याच क्षणाला दिसतो, तो वयानुरूप मस्ती करणारा अथर्व! अजून मराठी-हिंदी स्क्रिप्ट वाचता येत नसल्यानं आईला ते वाचून-लिहून द्यावं लागतंय. डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफी आणि कार्टून चॅनल्स पाहाणं, गाणी गुणगुणणं, ताल धरणं, मोबाईल गेम्स खेळणं, वक्तृत्वकला, जिमनॅस्टिक, आर्ट अँण्ड क्राफ्ट, क्रिकेट-कबड्डी-फुटबॉलादी खेळांची इत्थूंभूत माहिती असणं नि ते खेळणं, हे त्याच्या वयाच्या मुलांचे गुण त्याच्याही अंगी आहेत. आत्ताशी कुठं अथर्वनं या सगळ्या गोष्टींचा `श्रीगणेशा` गिरवायला सुरूवात केल्येय. ये तो शुरूवात हैं, बहुत सारा पिक्चर अभी बाकी हैं, मेरे भाचेराव... ऑल दी बेस्ट...




Sunday, 13 December 2015

संवेदना

मिटून जातो आपण
आतल्या आत...
विणून घेत भोवताली
एअरटाईट कोष...
`नाही`च्या संवेदनेनं
लिंपतो जाणीवांची भिंत...
भोवतालचं दृश्य जग
उणावतं काहीसं...
पण मनाच्या अनाहत
अनादी कोलाहालात...
विचारांची चालू असते
खुडबुड सतत...
शिणतो मेंदू
थकतं शरीर...
तरी वाढतोच
विचारांचा परीघ...
ओघवता... चंचल...
नि देह होतो
अचल



छायाचित्र – इंटरनेटवरून साभार.






Sunday, 6 December 2015

सूपाचा सोल

ती जाहिरात आठवत्येय का ? मुलं म्हणतात की, `मम्मी, टम्मी कह रहा हैं, कुछ यम्मी चाहिए...` मम्मी मुलांच्या पोटावर हलकिशी थाप मारते नि सर्व्ह करते यम्मी सूप ! ते पिऊन टम्मी एकदम खूश होऊन जातं. काय आहे एवढं `सूपा`मध्ये ? खरंच ते एवढं भारी लागतं का ? त्यानं पोट भरतं का ? आरोग्यासाठी चांगलं असतं का ? कसा असतो `सूपाचा सोल`?

सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू होताहेत. हवेत मस्तसा गारवा वाटतोय. वाऱ्याची झुळूक जाणवत्येय. काहीतरी गरमागरम मिळालं तर बरं... असले विचार मनात येताहेत. तुम्ही कॉलजमध्ये असाल, क्लासमध्ये असाल, ऑफिसमध्ये असाल नाहीतर घरी असाल;  सारखी तीच ती चहा-कॉफी पिऊन कंटाळला असाल नाही का, हा कंटाळा घालवण्यासाठी सूप्स हा एक छान ऑप्शन आहे.
सूप भाज्या आणि मांसाचं करतात. सूप स्टॉक, ज्यूस आणि पाणी अशा द्रव पदार्थांत मिसळून तयार करतात. गरमागरम सूपाचा विशेष म्हणजे ते त्यातल्या पदार्थांची चव रसात उतरेपर्यंत ते उकळवलं जातं. सूपाचे क्लिअर म्हणजेच पातळसर आणि थिक म्हणजेच दाटसर असे प्रकार आहेत. थिक सूपामध्ये प्युरीचा वापर केला जातो. त्यातही भाज्यांचं सूप स्टार्च घालून दाट केलं जातं. शिवाय क्रीम, अंडी, लोणी, सॉसेस, तांदुळादी पदार्थांचा वापर केला जातो. सूप हे स्ट्यूच्याजवळ जाणारं असलं, तरी त्याच्यापेक्षा अधिक रसदार असतं.

सूपाच्या अस्तित्वाचे धागेदोरे इ.स. पूर्व ६०००वर्षांपासून आढळतात. `सूपे` या फ्रेंच भाषेतल्या शब्दावरून `सूप` शब्द प्रचलित झाला. एकेकाळी सूप गल्लोगल्ली फिरून विकलं जात असे. त्यामुळं थकवा नाहीसा होतो, असा त्याचा प्रचार केला जात असे. १७६५मध्ये पॅरिसला केवळ सूप्स विकण्याचं पहिलं दुकान उघडलं गेलं होतं. त्या सुमारास `रेस्तरॉं` हा शब्द वापरण्यात आला नि पुढं तो प्रचलित झाला. १७४२मध्ये अमेरिकेत प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात सूप्सच्या रेसिपीज देण्यात आल्या होत्या. पुढं १८व्या शतकात मसालेदार मांस दाट होईपर्यंत शिजवून त्याचं सूप तयार केलं गेलं आणि ते अधिक काळ टिकवण्यासाठी प्रयत्न केले गेले. नंतर १९व्या शतकात खाद्यपदार्थ कॅनमध्ये देण्याची सोय झाली. त्यामुळं अनेक सूप्स कॅन आणि पावडर स्वरुपात उपलब्ध झाली. त्याच्या विविध आवृत्त्यांपैकी `रेडी टू इट` सूप सध्या लोकप्रिय झालंय. ते फक्त पाणी घालून गॅस किंवा मायक्रोवेव्हवर तयार करता येतं. त्यात भाज्या, बटाटे, पास्ता, चीज, चिकन बेस आदी पदार्थ घालता येतात. अलीकडं आरोग्याकडं बघण्याची सजगता वाढली असल्यानं सूपमधल्या या घटकांचा सखोल विचार केला जातोय. उदाहरणार्थ, मीठाचा वापर कमी झालाय. ट्रान्स फॅटचं प्रमाणही कमी केलं जातंय.

सूप अँपेटाईझर म्हणून सर्व्ह केलं जातं. विशेषतः गारठ्यात बाऊलभर सूप असा काही दिलासा देऊन जातं की विचारू नका. गरमागरम वाफाळतं सूप पुढ्यात आलं की कुणाची टाप आहे का ते सटासट न पिण्याची? चांगलं सूप नेहमी चविष्ट आणि पौष्टिक असतं. ते पचनाच्यादृष्टीनं चांगलं असतं. त्यात कोणतेही पदार्थ अँड किंवा आऊट करता येतात. वजन कमी करणाऱ्यांसाठी `सूप पिणं` हा चांगला उपाय आहे. कारण त्यात पाण्याचं प्रमाण अधिक आणि इतर कॅलरीज कमी असतात. आजारी माणसाला चिकन सूप द्यावं, हा पूर्वापार समज आहेच.

फिटनेससाठी वजनाच्या काट्याकडं लक्ष ठेवून डाएट करणं अपरिहार्य झालंय  सध्या. डाएटसाठी एक चांगला पर्याय म्हणजे सूप. करायला सोपं नि चवीला मस्त. भाज्यांच्या सूपातून पोषकद्रव्यं मिळतात. इतर पदार्थांपेक्षा सूपामध्ये त्यातही क्लिअर सूपात कमी कॅलरीज असतात. सूप वॉटरबेस्ड असल्यानं पोट भरल्यासारखं वाटतं नि अँपेटाईझर असल्यानं भूक लागते. सूप तयार करून ते लगेच प्यायल्यास त्यातल्या अँण्टिअक्सिडण्टसचा फायदा हृदयरोगी, डायबेटिक पेशंटना होऊ शकतो. सारखी चहा-कॉफी पिऊन साखरेचं प्रमाण वाढणं डायबेटिक पेशंटसाठी चांगलं नसतं. त्याऐवजी सूप प्यायल्यास साखरेवर आपोआप नियंत्रण येतं. एरवी लहान मुलांना भाज्या आणि सलाडस् खायला घालणं, हे महाकठीण काम असतं. पण तुलनेनं चविष्ट सूप दिल्यास ते आनंदानं प्यायलं जातं. सूपमुळं फायबर पोटात जात असल्यानं पचनसंस्थेला मदत होते.


थंडीच्या मोसमाचा सूपमय माहोल आणि कल लक्षात घेऊन अनेक हॉटेल्समध्ये सूप फेस्टिव्हल्स भरवण्यात येतात. शिवाय घरी करता येण्याजोग्या सूप्सच्या रेसिपीज मासिकं-पुरवण्यांतून ढीगानं येत असतात. त्यातलीच एखादी रेसिपी असो, नेटवर सर्च करून केलेली रेसिपी असो किंवा आपणच केलंलं इनोव्हेशन असो, गरमागरम सुरबुरीत सूप प्यायची मजा काही औरच असते. आपल्या आवडीचं नि आपणच घरी केलेलं यम्मी सूप प्यायलाच हवं...




छायाचित्र - इंटरनेटवरून साभार.


Sunday, 29 November 2015

शब्द


शब्द... शब्द असतात कायमच आपल्या साथीला. आपल्या भावना व्यक्त करणारे. अडीनडीला धावून जाणारे. आपल्यासोबत सावलीसारखे सतत राहणारे. ते फक्त `आपले` असतात. म्हटलं तर आपापल्या प्रत्येकाचेच आणि तसं म्हटलं तर आपल्या सगळ्यांचेच. कुणीशी त्यांची दोस्ती आणखी गहिरी होते... अधिकच जानपहचान होते. मग त्यांची नि आपली रंगतात ती गप्पाष्टकं... शब्द... लिखित माध्यमं नि साहित्यिक पुस्तकांसह इतर कितीतरी सजीव-निर्जीव माध्यमांतून आपल्यापर्यंत पोहचतात... होते आपली गळाभेट... या मनीचे त्या मनी निःशब्दपणं अलगदपणं पोहचतं... त्यातून पुन्हा आकारतात शब्दच...


शब्द

शब्द घ्या शब्द...
देणार किती अब्ज ?
सणसणीत
खणखणीत
सडेतोड
भांडाफोड
शब्द घ्या शब्द...
देणार किती अब्ज ?
गुळमुळीत
सुळसुळीत
गोडगोड
लिंबाची फोड
शब्द घ्या शब्द...
देणार किती अब्ज ?
कांगावाखोर
हेकेखोर
चिडीचे
रडीचे
शब्द घ्या शब्द...
देणार किती अब्ज ?
पेटणारे
विझवणारे
शहारणारे
बिथरवणारे
शब्द घ्या शब्द...
देणार किती अब्ज ?
फसफसणारे
बुडबुडणारे
ओथंबणारे
ओरबाडणारे
शब्द घ्या शब्द...
देणार किती अब्ज ?
खरे-खरे
खोटे-खोटे
चांगले-चुंगले
वाईट-साईट
शब्द घ्या शब्द...
देणार किती अब्ज ?
अक्षरांचा बाजार
बाराखडीचा व्यापार
पांढऱ्यावर काळे
काळ्य़ावर पांढरे
शब्द घ्या शब्द...
देणार किती अब्ज ?
लवकर लावा बोली
नाहीतर मारा फुली
मनातल्या विचारांवर
स्वतःतल्या माणसावर
शब्द घ्या शब्द...
देणार किती अब्ज ?
संपला कोटा
जमल्या नोटा
मन मात्र उपाशी
कशी जिरली खाशी
शब्द घ्या शब्द...
देणार किती अब्ज ?

 

Sunday, 22 November 2015

फिरत्या चाकावरती...

दिवाळीच्या सुट्टीतली लांबलचक टळटळीत दुपार... खिडकीसमोरच्या एकुलत्या एक शिल्लक राहिलेल्या झाडावर कर्कश्शणारा कावळोबा... उन्हाच्या तलाखीनं हैराण झालेली आळसटलेपणानं अस्ताव्यस्त घरभर पसरलेली निरव शांतता... भाचवंडांचे आवाजही चिडीचूप झालेले... म्हणून त्यांच्या रुममध्ये डोकावले... तर भाच्या स्मार्टफोनवर तल्लीन झालेल्या... एकीच्या त्या झपाझप चालणाऱ्या बोटांनाही लय आली होती नि दुसरी तितक्याच तन्मयतेनं स्क्रिनवरच्या घडामोडी निरखत असावी. म्हणजे असं मला वाटलं बॉ... मी आल्या पावली परत फिरणार तो भाचेरावही तिथंच येऊन धडकले. डायरेक्ट फोनमध्येच डोकं नव्हे नाक खुपसते झाले... स्क्रिनवर चटाचटा फिरणारी बोटं थबकली. सेकंदाभरानं सहाही डोळे माझ्याच दिशेनं वळले. पाठोपाठ उत्तर येऊन थडकलं ``पॉटरी करतेय ग...`` माझा प्रश्नार्थक चेहरा त्याच्या पुढल्या सेकंदात वाचून (``हे अजाण बालिके,`` असे कीवचे भाव चेहऱ्यावर आणून) भाची म्हणाली, ``हे एक अँप आहे ग. तुला हवंय का... शेअर इट सुरू कर. देते.`` तिच्या या बोलांनी धन्य धन्य वाटून घेत मी आधी त्या अँपची सखोल चौकशी केली (की स्वतः अज्ञान त्यांच्यापुढं उघड केलं) की, बॉ, ते ऑफलाईनही खेळता येतं का, अमूक का नि तमूक का वगैरे वगैरे... त्या चौकशीसत्राला कंटाळून तिनं थेट अँप सुरू करून प्रात्यक्षिकच दाखवायला सुरूवात केली...

``हे बघ, इति भाची म्हणाली, हे आहे पॉटरी अँप. ते सुरू झाल्यावर येतात तीन ऑप्शन्स. क्रिएट. शॉप. इनबॉक्स. त्यात क्रिएट सिलेक्ट करायचं. समोर येतं ते फिरतं चाक नि होऊ घातलेल्या सुबक मातीच्या भांड्याचा किंवा मडक्याचा बेसिक आधार. तो आपल्या मनासारखा घडवला की येतो ऑप्शन फायरिंगचा. पुढं जस्ट टिक करायचं. फायर प्रोसेस रेडी झाली की मग येतातय कलर्स, ब्रशेशचे ऑप्शन्स. त्यासाठी आधी थोडी कमाई करायला लागते व्हर्च्युअली. ती केल्यावर शॉपमधून हे साहित्य घेता येतं. मडकं रंगवून झालं की पुन्हा रेडीची टीक टच करायची. मग येतो सेलचा ऑप्शन. तो टच केल्यावर मडकं होतं सोल्ड नि मिळते त्याची किंमत. ती वेळोवेळी तुझ्या खात्यात जमा होते नि त्यातून शॉपिंग करता येतं, रंगकामाच्या साहित्यासाठी... बघ हवंय का हे तुला?`` भाचेराव आणि मी एकदमच होकार दिला. मग `शेअर इट` अँप डाऊनलोड केल्यावर `पॉटरी अँप`ही मोबाईलवर अवतरलं एकदाचं. पर एक बात तो हो गई जनाब... मोबाईल थे दो और पॉटरी के चाहनेवाले थे चार... बहुत नाइन्साफी हैं भाय... असा डायलॉग न मारता आम्ही आलटून पालटून मोबाईल शेअर करायचं ठरवलं... आपसूकच एक क्रिएटव्ह कॉम्पिटिशन सुरू झाली. कोणाचं मातीकाम सरस होतंय याची... मारधाड आणि निव्वळ टाईमपास म्हणून खेळल्या जाणाऱ्या मोबाईलवरच्या गेम्सपेक्षा हे काहीतरी भारी गवसलं होतं...  
आयड्रिम्सनं डेव्हलप केलेल्या या अँपमागचा विचार आणि त्यांची कल्पनाशक्ती सॉलिड वाटली. भिंग घेऊन मातीचा नमुना शोधायला लागण्याच्या नि मुलांना चिखल-मातीत खेळायला बिल्कुल मनाई केली जाण्याच्या काळात हे व्हर्च्युअल मातीकामाचं जग घडवणं सोप्पं काम नव्हतं. म्हणूनच कदाचित मुलांना खिळवण्यासाठी त्यात व्हर्च्युअल पॉइंटचं अमीष ठेवलेलं असावं. ते फिरतं चाक, त्यावर घडत जाणारा तो घडा किंवा मडकं... त्याला हवा तो आकार देताना नि रंगवताना आपल्या कल्पनाशक्तीला मिळणारी चालना, मातीकाम करताना भोवताली निसर्ग असल्याचा फिल देणारे पक्ष्यांचे ते सुखावह आवाज, घडा पूर्ण झाल्यावर फायरिंग होताना भट्टीचा फिल देणारे रंग नि आवाज, घडा विकणं, विकताना येणारे कुजबुजत्या चर्चेचे आणि अखेरीस विक्री पूर्ण होऊन पॉइंटस् मिळाल्यावर होणाऱ्या टाळ्यांचा कडकडाट... तो सारा `फिल` थोडक्या वेळेसाठी बाकीच्या जगाचा विसर पाडणारा असतो. खरोखरची कलासाधना तरी यापेक्षा काही वेगळी असते का... कोणत्याही कलाप्रकारात स्वतःला झोकून देत त्या कलेच्या परिपूर्णतेसाठी, त्यात अव्वल ठरण्यासाठी करावे लागणारे परिश्रम, त्यातून तालावून-सुलाखून बाहेर पडणं, त्या कलेबद्दल स्तुतीच्या चांदण्यात न्हाऊन निघणं किंवा टीकेच्या झगझगीत उन्हाचा सामना करावा लागणं आणि त्यानंतरच्या कलाकृती करताना या सगळ्याच्या पलीकडं जाऊन कलाकर कलेशी एकतान पावणं नि त्यात त्याला स्वतःचाही विसर पडणं... या सगळ्या गोष्टी येतातच नाही का... ``अग, लक्ष कुठंए तुझं... आता माझी टर्न आहे...`` भाचेराव गरजले... मोबाईल निमूटपणं त्याच्या हातात दिला...

दिवाळीच्या सुट्टीतली लांबलचक टळटळीत दुपार... खिडकीसमोरच्या एकुलत्या एक शिल्लक राहिलेल्या झाडावर कर्कश्शणारा कावळोबा... उन्हाच्या तलाखीनं हैराण झालेली आळसटलेपणानं अस्ताव्यस्त घरभर पसरलेली निरव शांतता... भाचवंडांच्या झपाझप चालणाऱ्या बोटांनाही लय आली होती... व्हर्च्युअल मातीकाम आकारत होतं... शेजारच्या घरातल्या रेडिओतून गदिमांचे शब्द आणि बाबुजींचे संगीत-सूर कानावर आले... ``फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला, तू वेडा कुंभार! माती, पाणी, उजेड, वारा, तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळच मग ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार! घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्याविना ते कोणा नकळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार! तूच घडविसी, तूच फोडिसी, कुरवाळिसि तू, तूच ताडिसी. न कळे यातून काय जोडिसी? देसी डोळे, परि निर्मिसी तयांपुढे अंधार!...``



Sunday, 15 November 2015

दहशत...

जन्माला येते दहशत
करते सारी वाताहत
रक्ताचा थेंब नि थेंब
आशेचा नसतो कोंब
रक्ताळलेले चेहरे
राजकारणी मोहरे
सापशिडीचा खेळ
निघून जातो वेळ
जनतेची होई दुर्दशा
दहशतीतही असे का नशा?
सरणार कधी हे रण?
येणार कधी तो क्षण?
शांततेचा समाधानाचा...
सलोख्याचा, निवांततेचा...
की पुन्हा अवतरतील कृष्ण–बुध्द
थांबवण्यास अमानुषतेचं युध्द...

छायाचित्र – राधिका कुंटे.