Sunday, 22 November 2015

फिरत्या चाकावरती...

दिवाळीच्या सुट्टीतली लांबलचक टळटळीत दुपार... खिडकीसमोरच्या एकुलत्या एक शिल्लक राहिलेल्या झाडावर कर्कश्शणारा कावळोबा... उन्हाच्या तलाखीनं हैराण झालेली आळसटलेपणानं अस्ताव्यस्त घरभर पसरलेली निरव शांतता... भाचवंडांचे आवाजही चिडीचूप झालेले... म्हणून त्यांच्या रुममध्ये डोकावले... तर भाच्या स्मार्टफोनवर तल्लीन झालेल्या... एकीच्या त्या झपाझप चालणाऱ्या बोटांनाही लय आली होती नि दुसरी तितक्याच तन्मयतेनं स्क्रिनवरच्या घडामोडी निरखत असावी. म्हणजे असं मला वाटलं बॉ... मी आल्या पावली परत फिरणार तो भाचेरावही तिथंच येऊन धडकले. डायरेक्ट फोनमध्येच डोकं नव्हे नाक खुपसते झाले... स्क्रिनवर चटाचटा फिरणारी बोटं थबकली. सेकंदाभरानं सहाही डोळे माझ्याच दिशेनं वळले. पाठोपाठ उत्तर येऊन थडकलं ``पॉटरी करतेय ग...`` माझा प्रश्नार्थक चेहरा त्याच्या पुढल्या सेकंदात वाचून (``हे अजाण बालिके,`` असे कीवचे भाव चेहऱ्यावर आणून) भाची म्हणाली, ``हे एक अँप आहे ग. तुला हवंय का... शेअर इट सुरू कर. देते.`` तिच्या या बोलांनी धन्य धन्य वाटून घेत मी आधी त्या अँपची सखोल चौकशी केली (की स्वतः अज्ञान त्यांच्यापुढं उघड केलं) की, बॉ, ते ऑफलाईनही खेळता येतं का, अमूक का नि तमूक का वगैरे वगैरे... त्या चौकशीसत्राला कंटाळून तिनं थेट अँप सुरू करून प्रात्यक्षिकच दाखवायला सुरूवात केली...

``हे बघ, इति भाची म्हणाली, हे आहे पॉटरी अँप. ते सुरू झाल्यावर येतात तीन ऑप्शन्स. क्रिएट. शॉप. इनबॉक्स. त्यात क्रिएट सिलेक्ट करायचं. समोर येतं ते फिरतं चाक नि होऊ घातलेल्या सुबक मातीच्या भांड्याचा किंवा मडक्याचा बेसिक आधार. तो आपल्या मनासारखा घडवला की येतो ऑप्शन फायरिंगचा. पुढं जस्ट टिक करायचं. फायर प्रोसेस रेडी झाली की मग येतातय कलर्स, ब्रशेशचे ऑप्शन्स. त्यासाठी आधी थोडी कमाई करायला लागते व्हर्च्युअली. ती केल्यावर शॉपमधून हे साहित्य घेता येतं. मडकं रंगवून झालं की पुन्हा रेडीची टीक टच करायची. मग येतो सेलचा ऑप्शन. तो टच केल्यावर मडकं होतं सोल्ड नि मिळते त्याची किंमत. ती वेळोवेळी तुझ्या खात्यात जमा होते नि त्यातून शॉपिंग करता येतं, रंगकामाच्या साहित्यासाठी... बघ हवंय का हे तुला?`` भाचेराव आणि मी एकदमच होकार दिला. मग `शेअर इट` अँप डाऊनलोड केल्यावर `पॉटरी अँप`ही मोबाईलवर अवतरलं एकदाचं. पर एक बात तो हो गई जनाब... मोबाईल थे दो और पॉटरी के चाहनेवाले थे चार... बहुत नाइन्साफी हैं भाय... असा डायलॉग न मारता आम्ही आलटून पालटून मोबाईल शेअर करायचं ठरवलं... आपसूकच एक क्रिएटव्ह कॉम्पिटिशन सुरू झाली. कोणाचं मातीकाम सरस होतंय याची... मारधाड आणि निव्वळ टाईमपास म्हणून खेळल्या जाणाऱ्या मोबाईलवरच्या गेम्सपेक्षा हे काहीतरी भारी गवसलं होतं...  
आयड्रिम्सनं डेव्हलप केलेल्या या अँपमागचा विचार आणि त्यांची कल्पनाशक्ती सॉलिड वाटली. भिंग घेऊन मातीचा नमुना शोधायला लागण्याच्या नि मुलांना चिखल-मातीत खेळायला बिल्कुल मनाई केली जाण्याच्या काळात हे व्हर्च्युअल मातीकामाचं जग घडवणं सोप्पं काम नव्हतं. म्हणूनच कदाचित मुलांना खिळवण्यासाठी त्यात व्हर्च्युअल पॉइंटचं अमीष ठेवलेलं असावं. ते फिरतं चाक, त्यावर घडत जाणारा तो घडा किंवा मडकं... त्याला हवा तो आकार देताना नि रंगवताना आपल्या कल्पनाशक्तीला मिळणारी चालना, मातीकाम करताना भोवताली निसर्ग असल्याचा फिल देणारे पक्ष्यांचे ते सुखावह आवाज, घडा पूर्ण झाल्यावर फायरिंग होताना भट्टीचा फिल देणारे रंग नि आवाज, घडा विकणं, विकताना येणारे कुजबुजत्या चर्चेचे आणि अखेरीस विक्री पूर्ण होऊन पॉइंटस् मिळाल्यावर होणाऱ्या टाळ्यांचा कडकडाट... तो सारा `फिल` थोडक्या वेळेसाठी बाकीच्या जगाचा विसर पाडणारा असतो. खरोखरची कलासाधना तरी यापेक्षा काही वेगळी असते का... कोणत्याही कलाप्रकारात स्वतःला झोकून देत त्या कलेच्या परिपूर्णतेसाठी, त्यात अव्वल ठरण्यासाठी करावे लागणारे परिश्रम, त्यातून तालावून-सुलाखून बाहेर पडणं, त्या कलेबद्दल स्तुतीच्या चांदण्यात न्हाऊन निघणं किंवा टीकेच्या झगझगीत उन्हाचा सामना करावा लागणं आणि त्यानंतरच्या कलाकृती करताना या सगळ्याच्या पलीकडं जाऊन कलाकर कलेशी एकतान पावणं नि त्यात त्याला स्वतःचाही विसर पडणं... या सगळ्या गोष्टी येतातच नाही का... ``अग, लक्ष कुठंए तुझं... आता माझी टर्न आहे...`` भाचेराव गरजले... मोबाईल निमूटपणं त्याच्या हातात दिला...

दिवाळीच्या सुट्टीतली लांबलचक टळटळीत दुपार... खिडकीसमोरच्या एकुलत्या एक शिल्लक राहिलेल्या झाडावर कर्कश्शणारा कावळोबा... उन्हाच्या तलाखीनं हैराण झालेली आळसटलेपणानं अस्ताव्यस्त घरभर पसरलेली निरव शांतता... भाचवंडांच्या झपाझप चालणाऱ्या बोटांनाही लय आली होती... व्हर्च्युअल मातीकाम आकारत होतं... शेजारच्या घरातल्या रेडिओतून गदिमांचे शब्द आणि बाबुजींचे संगीत-सूर कानावर आले... ``फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला, तू वेडा कुंभार! माती, पाणी, उजेड, वारा, तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळच मग ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार! घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्याविना ते कोणा नकळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार! तूच घडविसी, तूच फोडिसी, कुरवाळिसि तू, तूच ताडिसी. न कळे यातून काय जोडिसी? देसी डोळे, परि निर्मिसी तयांपुढे अंधार!...``



No comments:

Post a Comment