Sunday, 31 January 2016

बळी

त्या दिवशी दिवसभर कसं मळभ भरून राहिलं होतं. धड काही सुचत नव्हतं. ना काम ना धाम... सारा कसा दिवस कंटाळवाणा गेला. एखादा कागद चोळामेळा करून फेकून द्यावा तस्सा... पण संध्याकाळच्या सांजसावल्या पडू लागल्यासरशी साऱ्यांच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारला होता. सगळा आळस नि अवघा कंटाळा झटकून सगळे भैरोबाच्या देवळापाशी जमा होऊ लागले होते...

भैरोबाचं देऊळ तसं गावापासून जरा लांबच. म्हटलं तर डोंगरावरच. देवळात लागलेले दिवे लुकलुकू लागले नि गावकऱ्यांची पावलं भराभरा त्या दिशनं पडू लागली. गावातल्या जवळपास सगळ्याच घरांची दारं पटापटा बंद झाली. अपवाद एकाच घराचा. त्या घरातला दिवा मात्र जळत होता. कदाचित कुठल्याशा चिंतेनं... कुठल्याशा विवंचनेनं...

त्या घरात राहायचे नवरे गुरुजी. एरवी अख्ख्या गावाला पुरून उरणारे गुरुजी आज अस्वस्थसे वाटत होते. तिकडं गावकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. ग्रामदैवत भैरोबाला बकऱ्याचा बळी दिला जाणार होता. तो प्रसन्न होणार होता. त्याच्या नेवैद्याचा बेत सगळ्यांना पसंत होता...

नवरे गुरुजी म्हणजे एक सदा प्रसन्न व्यक्तिमत्त्व. कनवाळू, हुशार, करड्या शिस्तीचे, कोमल हृदयाचे. त्यांचं शिकवणं म्हणजे मुलांसाठी पर्वणीच. इतरांच्या शिकवण्याकडं दुर्लक्ष करत टिवल्याबावल्या करणारी पोरंही त्यांच्या तासाला पुतळ्यासारखी स्तब्ध होऊन त्यांचं ओघवतं शिकवणं मुग्धपणं ऐकत राहात. गावातल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये त्यांचा सल्ला घेतला जाई.

गुरुजींना आठवू लागलं की, अखेर त्या दिवशी गावकऱ्यांनी भैरोबाला बळी द्यायचं ठरवलं. त्यांनी निक्षून या गोष्टीला विरोध केला, तरी त्यांना कुणी जुमानत नव्हतं. त्या वर्षी दुष्काळ पडला होता. पाण्याच्या थेंबा थेंबासाठी सारेजण आसुसले होते. सतत आकाशाकडं लक्ष जाई प्रत्येकाचंच. नजर फिरवावी तिथं नि तितक्याभर नुस्तेच आपले पांढऱ्या ढगांचे पुंजकेच्या पुंजके. श्रावण सरत आला तरी काळ्या ढगांचा पत्ता नव्हता...
गावकऱ्यांच्या समजूतीप्रमाणं नवससायास, प्रार्थना, जप सारे उपाय करून झाले. माणसं थकली, पण पावसाचं चिन्हं नाहीच. मग गेले सगळे भोलू मांत्रिकाला शरण. शरण आलेल्याला देऊ नये मरण, अशा काहीशा प्रसिद्ध ओळी फिल्मी स्टाईलनं पुटपुटत भोलूनं बळीचा उपाय सुचवला. नाईलाजानं लोकांनी तो मान्य केला. गुरुजींनी या उपायाचा निषेध केला. ते म्हणाले होते, सांगत होतो, तेव्हा लक्ष दिलं नाहीत. बेसुमार झाडं तोडलीत. नदीचं पाणी वाटेल तस्सं वापरलंत... सगळ्या पर्यावरणाचे कसे तीनतेरा वाजवलेत... आणि आता म्हणजे बळी देणारेत, पावसासाठी... त्यापेक्षा आता तरी जागं व्हा. अजूनही काही मार्ग काढता येईल... पण त्या मुक्या जीवाचा बळी देऊ नका... ऐका माझं...

तरीही पाण्याच्या आशेपायी गावकऱ्यांचा निश्चय कायम राहिला. बळी द्यायचंच ठरलं... आणि आज बळीचा दिवस उजाडलादेखील... बकऱ्याला नटवलं-सजवलं होतं. गुलाल माखला होता. ओढून ओढून त्याला देवळाकडं नेलं जात होतं. त्याची सुटकेची केविलवाणी धडपड व्यर्थ ठरत होती. त्याच्या ओरडण्याचा आवाज वाद्यांच्या कल्लोळात हरवून टाकला जात होता. नीट बघणाऱ्याला त्याच्या डोळ्यांतले भयचकित भाव व्यथित करणारे होते. अर्थात ते बघायची तसदी कुणीच घेतली नव्हती.

यशावकाश देवळाच्या आवारात जमाव पोहचला. देवाची करुणा भाकली गेली. भगतानं भैरोबाला साकडं घातलं. भोलूही होताच. पोरंटोरं नि आयाबायांच्या काळजाचा ठाव सुटत चालला होता. वातावरण एकदम गंभीर नि तणावाचं झालं होतं... प्रार्थनेनंतर साऱ्यांनी डोळे उघडून भक्तीभावानं भैरोबाकडं पाहिलं. त्याच्या मुद्रेवरचे खरे भाव कुणालाच दिसले नाहीत... एकजण पुढं झाला. त्यानं बकऱ्याकडं पाहिलं न पाहिलंसं केलं नि सुरा चालवला. चमकदार पात्यावर रक्ताची रांगोळी घातली गेली. भैरोबा की जय... एकच गलका झाला...

त्याच क्षणी योगायोग म्हणा की, आणखी काही... इकडं गावात एकल्याच उरलेल्या गुरुजींना अधिकच अस्वस्थ वाटू लागलं... त्यांचं भान हरपलं नि त्यांचे प्राण गेले... गावाला अतोनात दुःख झालं... बळी देऊनही पाऊस पडलाच नाही... भैरोबाच्या चेहऱ्यावरचे विवश भाव कुणालाच दिसले नव्हते... त्याला नको असतानाही बळी दिला गेला होता... तोही एक नव्हे दोन...




Sunday, 24 January 2016

अमन की आशा

म्हटलं तर `त्या` दोघी बहिणीच. म्हटलं तर जुळ्याच... किंवा म्हटलं तर पाठोपाठच्या...
म्हटलं तर लहान-मोठ्या. म्हटलं तर जवळच्या किंवा म्हटलं तर लांबच्यादेखील...
म्हटलं तर `त्यांच्या` येण्याच्या चाहुलीनं सारं घरदार आनंदलेलं. किंवा म्हटलं तर आजही आनंदतच...
म्हटलं तर वयस्करांनी `त्यांचं` नाव काय ठेवावं याचा चिक्कार काथ्थाकूट केला. किंवा म्हटलं तर केवळ मिनिटभरात `त्यांची` नावं निवडली गेली...
म्हटलं तर आयाबायांनी `त्यांच्या` स्वागताचा सोहळाच ठरवून टाकला. किंवा म्हटलं तर `त्यांचं` येणं हाच एक सोहळा होता...
म्हटलं तर पोराटोरांना `त्यांच्या`बद्दल कुतुहल वाटलं. किंवा म्हटलं तर किंचितशी आपुलकीची असूयाही...
म्हटलं तर तरुणांना `त्यांनी` कधीचीच मोहिनी घातली होती. किंवा म्हटलं तर मोहिनीचंच दुसरं रुप होत्या `त्या`...
म्हटलं तर `त्यांनी` तरुणींना नवी स्वप्नं दाखवली. किंवा म्हटलं तर `त्याच` भासत होत्या स्वप्नवत...
म्हटलं तर `त्या` आल्याच. नव्या उमेदीनं... ताज्या दमानं... किंवा म्हटलं तर `त्या` आल्या हीच घटना झाली राज्यभर... अधिकृत...
म्हटलं तर `त्यांच्या` येण्यानं समस्त लोकांना झाला आनंद. किंवा म्हटलं तर झाली लोकशाहीतल्या नव्या पर्वाची सुरूवात...
म्हटलं तर `त्यांच्या` येण्याची गोष्ट पार ६७ वर्षं जुनी. किंवा म्हटलं तर आजही आहे नवीनवी...
म्हटलं तर `त्या`निमित्तानं केलं जातं संचलन. किंवा म्हटलं तर `तो` असतो `अनेकता में एकता`चा कळतनकळत दाखला...
म्हटलं तर `त्यांचं` येणं सुकर करणाऱ्या अनाम अमर आठवणींची ज्योत. किंवा म्हटलं तर `त्यांचं` अस्तित्व शाबूत ठेवणाऱ्यांचा सत्कार.
म्हटलं तर भारतीय नागरिकत्वाची हवीशी पुन्हापुन्हा उठणारी मोहोर. किंवा म्हटलं तर पुढच्या पिढीसाठी ठेवा अनमोल...
म्हटलं तर असंख्य खेळाडूंना खेळवतात. किंवा म्हटलं तर खेळांच्या मैदानात `त्या` जोमानं सरसावून खेळतात...
म्हटलं तर कडेकपारींतल्या संगीताच्या सुरावटींतून. किंवा म्हटलं तर लोकप्रिय संगीताच्या बॉलिवूडी तडक्यांतून ऐकायला येतो `त्यांचा` आवाज...
म्हटलं तर मनामनांवर राज्य करणाऱ्या हिंदी चित्रपटांतून. किंवा म्हटलं तर अस्सल प्रादेशिकपटांतल्या संस्कृतींमधून `त्या` डोकावतात...
म्हटलं तर सोशल मिडियावरच्या शेअरिंग पोस्टमधून. किंवा म्हटलं तर अनेकांच्या डीपीजमधून झळकतात `त्या`...
म्हटलं तर विलक्षण अशा बहुभाषिक साहित्यकृतींतून. किंवा म्हटलं तर मैलांगणिक बदलत्या बोलीभाषांतून `त्या` वावरताहेत...
म्हटलं तर असं `त्यांचं` अस्तित्व जाणवतं असंख्य क्षणांमधून. किंवा म्हटलं तर आता हवंय `त्यांना` जपायला...
म्हटलं तर झाल्यात `त्या` ज्येष्ठ नागरिक. किंवा म्हटलं तर `त्या` म्हणतील फिरून नवी जन्मेन मी...
म्हटलं तर एक आहे अमन. म्हटलं तर एक आहे आशा. किंवा म्हटलं तर आहेत अमन की आशा...


                      

Sunday, 17 January 2016

आनंदी

आपल्या जाण्यायेण्याच्या परिसरातल्या काही जागा, काही ठिकाणं, काही सिग्नल्स डोक्यात इतके फिट्टपणं बसलेले असतात की, त्यात झालेला किंचितसा बदलही आपल्या लगेचच लक्षात येतो. तसंच माझंही झालं. हा एवढा ब्रिज संपल्यावर एक मोठ्ठासा सिग्नल, मग तिरकस क्रॉसिंग आणि बस पुन्हा मार्गाला लागणार, हे पक्कं ठरलेलंच. अजूनही तसंच होतं म्हणा. फक्त मधल्या काळात त्या सिग्नलच्या बाजूच्या रस्त्यावर साचायला लागले हाsss एवढाला कचरा... ओला-सुका कचरा नव्हे.. पण चिंध्याच चिंध्या... ढीगभर... आणि थोडाफार प्लॅस्टिकचा भस्मासूरही होताच सोबतीला. आपल्या मध्यममार्गी शिरस्त्यानं मी कपाळी चार आठ्या घालून ते सगळं पाहिलं नि सोडून दिलं...

मग थोड्याच दिवसात तिथं प्लॅस्टिकचा आडोसा आला, एकाचे दोन करत तीन-चार आडोसे बांधले गेले आणि त्यात संसार नांदू लागले. चार आयाबायांच्या चुलीचा धूर हवेत कोंदू लागला. बाप्यांच्या पत्त्यांच्या आवाजानं रस्ता जागा राहू लागला. आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे तिथल्या मुलाबाळांच्या दंग्यानं-हसण्यानं त्या आडोशाला `त्यांचं घर` म्हणायला मला भाग पडलं. येता-जाता दिसणाऱ्या अनेक घरांपैकीच हीदेखील, अशी मनात कुठंतरी नोंद झाली असावी...

मग त्या घरापेक्षा त्यातल्या मुलाबाळांवर लक्ष केंद्रित व्हावं, असं काहीसं घडू लागलं. कधी ती मुलं कुतुहलानं बाबा लोकांच्या पाठीवर ओणवून पत्त्यांकडं कुतुहलानं पाहात बसत. कधी आईजवळ चुलीशी बसून चहात बुडवून बिस्किटं चोपत असत. कधी त्या चिंध्यांच्या ढीगाऱ्यात शिरून आपल्याला हव्या तेवढ्या चिंध्या हुडकून त्यांनी खेळत. त्यांच्यातली चुणचुणीत मुलगी त्यांची टीमलीडर असावी. तिचं सगळेजण ऐकत... तिच्या मोठाल्या काळ्याभोर डोळ्यांत खूपसारी स्वप्नं बागडत असत... यांच्या शिक्षणाचं काय, असा शिक्षणमार्गी विचार माझ्या डोक्यात चार वेळा डोकावून गेला. त्याचं उत्तर काही दिवसांनी मिळालं... ती मुलगी नि आणखी एक मुलगा युनिफॉर्ममध्ये दिसत होते. हातात पुस्तकं नि दप्तर घेऊन शाळेला जायची तयारी... `स्कूल चले हम`सारखी...

मध्ये बऱ्यापैकी गॅप गेली त्या रस्त्यानं जाण्यासाठी... बस थांबता थांबताच तिच्याकडं लक्ष गेलंच. ती आज काय करतेय बघायला. आज तिचा बाबा कुणीतरी दिसेल्या सोफ्यावर एकदम ऐटीत बसला होता. आई त्याला चहा करून देत होती. `ती` बाकीच्यांसोबत खेळत होती. एकाशी काहीतरी भांडण झाललं असावं, म्हणून तो थोडा दूरच होता. तितक्यात एक गाडी पास झाली आणि `ती` ओरडली `sssss...` पोटात धस्स झालं... म्हटलं काही कुणाला लागलं की काय... तर `ती` त्या दुरावलेल्या मुलाला ओरडून आनंदानं नि भारावून विचारत होती, `देखी क्या गाडी... क्या भारी थी ना`... तोही नरमाईनं उत्तरला, `हां हां, बहोत ही भारी थी`... दुसरा चिमुरडा म्हणाला, `क्या ब्लॅक कलर था भाई... भारीवाली थी`... इकडं माझी ट्यूब लेट पेटली. आठवलं की, आज तर जुन्या गाड्यांची रॅली होती, त्यातलीच असणार ही गाडी असणार. मग `तिच्या`कडं पाहाता पाहाता बस हलली... गाडीचा नाद सोडून, `ती` चिंध्यांच्या कचऱ्यात मिळालेल्या आरशाच्या तुकड्याला मोठ्या कुतुहलानं नि उत्सुकतेनं न्याहाळत होती... मग हळूच `ती` त्यात डोकावली नि नंतर माझ्या नजरेआड झाली... मनातल्या मनात तिचं बारसं केलं `आनंदी`! आता, वाटतेय तिथून बसनं जायची उत्सुकता... का ही उत्सुकताही `आनंदी`नंच पासऑन केलेय?... कुणास ठाऊक?...




छायाचित्र सौजन्य – इंटरनेट.


Sunday, 10 January 2016



आकाश पेलताना...

खिडकीमधून दिसतं ना, तेवढंच आकाश नसतं. ते निराळंच असतं. काही आगळंच भासतं. बऱ्याचदा पडतं का त्यात जणू आपल्या मनाचं प्रतिबिंब... खरंतर पडतं, म्हणण्यापेक्षा दिसतं का, असं म्हणावं का बापडं... कधी असतात, भारी भारी आशा-आकांक्षांचे इमले... कधी मग, त्या इमल्यांतून रुजून क्वचित वास्तावात आलेली मनोरथांची रंगीबेरंगी फुले... कधी असतो, निराशेचे घोर गडद काळेकुट्ट ढग... कधी असतो, हिरव्याकंच बहराच्या सोबत... कधी असतात, फक्त शेकडो विचारांसारखे पांढरेच्या पांढरे ढगांचे पुंजके... कधी दिसतं, चैतन्याच्या अस्तित्वाचे सोनेरी कडांचे प्रेरक क्षितिज... कधी भावते, उंचचउंच डोंगररांगांची दोस्ती... कधी खुपते, केबल्स नि मोबाईल टॉवर्सची वस्ती... कधी वाटतं, झाडापानांतल्या एकाकी पक्षागत... तर कधी नुसतं नुसतं निळसर निळसर... आकाशी... आकाशी... कधी सतत सतत किलबिलत्या पक्षांचे थवे... तर कधी दूरवर पसलेली केवळ नि केवळ शांतावलेली निरभ्रता... कधी, रात्रीच्या निवांततेत हात डोक्याशी बांधून, निरखित राहायचे वरचे अगणित तारे... अशा वेळी भोवतालून, वाहू द्यावे सुखदुःखाचे हसरेबोचरे वारे... फक्त निरखित जावे रंगढंग... निश्चयाशी असावा नेटका दृढबंध... तोंड द्यावे क्षणांना... क्षणाक्षणाला... आकाश पेलताना... आकाश पेलताना...























सर्व छायाचित्रे – राधिका कुंटे.         

Sunday, 3 January 2016


नया है यह...

तोच सूर्य, तोच चंद्र
तीच पृथ्वी, तोच देश
तेच राज्य, तेच शहर
तेच तुम्ही, तीच मी
तीच हवा, तेच पाणी
तीच जागा, तीच गाणी
काही जुने, काही नवे
आपुल्या साऱ्यांसवे
नवे वर्ष, नवा श्वास
नवा हर्ष, नवा ध्यास
नव्या आकांक्षांचे किरण
नव्या उर्जेनं भरलेलं मन
नवी अनुभती, नवे क्षण
सकारात्मकतेचा कण कण,
नवनवी तंत्रज्ञानाची भाषा
पुन्हा पुन्हा शांतीची आशा
`सोळावं` पाऊल जपून
संवेदनेची ज्योत लावून
`नव्या`चे स्वागत करू या
पटदिशी `आमेन` म्हणू या
मी, तू, आपण, सर्वांसह...
भाई... नया है यह...



फोटो- राधिका कुंटे.