Sunday, 3 May 2015

लालाला लाला...


``बॉलिवूडमध्ये आमीरखानच्या करिअरला २७वर्षं पूर्ण.`` अशी बातमी वाचत होते. तेवढ्यात कुठल्याशा एफएमवर `ते` गाणं लागलं... `लालालाsss लालाsss...`` ते एक असो... कारण आठवणींचं बरंए ना, त्या फिल्मचं रिळ उलगडत नाही, इतक्या झटपट नि तरलतेनं उलगडतात... सो, त्या उलगडताना मी कशाला मागं राहू... मीही शिरले त्यांचा हात धरून भूतकाळात...

आमीरविषयी पहिल्यांदा ऐकलं ते भावंडांकडून. ती दादा-ताई कॅटॅगरीतली असल्यानं त्यांचं वाक्य प्रमाण असायचं त्या काळी! (अजूनही असतं बाबा! ते एक असो...) ताईकडून ऐकली ती त्याची भरभरून स्तुती. (त्याला आजच्या भाषेत `फॅनफॉलोअर` म्हणतात म्हणे... ते एक असो...) त्यांनी थिएटरमध्ये जाऊन पाहिलेल्या `क्यू टू क्यू` अर्थात `कयामत से कयामत तक`च्या स्टोरीचे (तेव्हाच्या भाषेत गोष्टीचे... ते एक असो) कौतुकाचे पोवाडे... त्यातली हिट्ट गाणी... मग भाड्यानं मिळणाऱ्या व्हिसीआरवर कॅसेट आणून तो पाहिला. (एके काळी फिल्म अशाही पाहिल्या जायच्या. ते एक असो...) त्यातला `पापा कहते हैं` म्हणणारा `तो` लक्षात राहिला... त्या वयाचा परिणाम असावा बहुधा... पुढं त्याची आणखी एक फिल्म पाहिली. सोबत होत्या दोन हिरॉईन्स. कॉलेज लाईफ वगैरे... एकदम चॉकलेट हिरो... (अर्थात तेव्हाचं नेमकं फिलिंग आठवत नाहीये... पण असंच असावं... ते एक असो...) ते फिलिंग असणार त्या `टिपिकल टिनएजटाईप्स`चं...

मग एकदा शाळेच्या रस्त्यावरच दिसला तो एकदम... (स्वप्नबिप्न नाही की शुटिंग वगैरेही नाही. एवढं कुठं आमचं भाग्य!!! ते एक असो...) त्याचा फोटो होता पोस्टकार्डसाईज! ती एक धूमच आली होती त्या काळात. आपापल्या आवडत्या नट-नट्यांचे फोटो विकत घ्यायचे नि ठेवून द्यायचे आपल्याजवळ. नो मॅजिकबिजिक... नो लॉजिकवॉजिक... (म्हणजे सगळेच तसं करत असावेत, असा अंदाज. ते एक असो...) मग कुणाचं कलेक्शन सरस आहे अशी चढाओढच लागायची. मग ओघानंच या फोटोंच्या एक्सचेंज ऑफरमध्ये होणारी लुटुपुटूची भांडणं. रुसवेफुगवे वगैरे. (बाकी काही नाही तरी त्या फोटोविक्यानं चांगलं कमावलं असणार त्या काळात... ते एक असो...) मीही आमीरचे बरेच फोटो जमवले होते. शिवाय काही अमिताभचे, काही जुहीचे नि एखादा माधुरीचाही असावा. (भाव कायम आमीरचा वधारलेला होता तेव्हा नि आताही. नि अमिताभ कितीही झालं तो दोन पिढ्याआधीचा... हो, आवडतो म्हणून काय झालं... ते एक असो...) पुढं हे वेड वर्षा-दोन वर्षांत ओसरलं असावं. फोटोवालाही गायब झाला असावा. किंवा मग फोटोंवर पैसे खर्च करण्यावरून आम्हा फोटोफॅन्सना घरून सज्जड दम भरला गेला असावा. (म्हणूनच तेव्हाच्या फिल्मी पुरवण्या नि मासिकांतले फोटो, लेखांची कात्रणं वहीत सारली जात होती... ते एक असो...)

नंतर केबलच्या दिवसांत त्याच्या फिल्म्स घरच्यांची बोलणी चवीचवीनं खात खात रात्रभर जागूनबिगून पाहिल्या जायच्या... (बोलण्यांसोबत `ही ऐकण्यातली नाही`, हे समजून असेल, पण पुढ्यात चाऊ-माऊ-खाऊ आणून ठेवला जायचा... ते एक असो...)  मग कॉलेजमध्ये गेल्यावर थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघितल्या जाऊ लागल्या. पुढं फिल्ममध्ये कसं असतं, `मौसम ने ली  अंगडाई`... तसं आमच्या काळानंही मोठ्ठी अंगडाई घेतली नि इंटरनेटची खिडकी सुरुवातीला किलकिली झाली, मग उघडली नि आता तर ती सताडल्येय... माहितीचा धबाबा धबधबाच कोसळतोय.... अविरतपणं... (सेकंदासेकंदांचे अपडेट... ते एक असो...) या साऱ्या कल्लोळात ती `स्पेशल कात्रणं` कुठंतरी कोपऱ्यात सरली असावीत आपणहूनच...

मधल्या काळात आमीरविषयी कितीतरी विरोधाभासाच्या गोष्टी घडल्या नि अजूनही अधूनमधून घडतातहेत. मध्येच तो झळकतो छोट्या पडद्यावर `सत्यमेव जयते` म्हणत. अनेक महत्त्वाच्या विषयांना वाचा फोडत... (कलाकार म्हणून तो आजही सॉलिड आहे... ते एक असो...) वर्षाकाठी एकच फिल्म करणारा हा `मि. परफेक्शनिस्ट`. त्याच्या परफेक्शनमुळंच असेल कदाचित मी त्याच्याशी आणखी कनेक्ट झाले असेन...       

`हायsss ताईsss` म्हणत एन्ट्री घेतलेल्या बहिणीनं मला गदागदा हलवलंन... ``कुठं हरवलीस?``, असं विचारती झाली. ``काही नाही ग,`` म्हणत आठवणींच्या रिळाला पॉज केलं. एफएमवरचं ते गाणं संपून भलतंच कर्णकटू गाणं वाजत होतं. निःश्वास टाकून टिनएजर बहिणीला म्हटलं ``बोल ग...`` ती म्हणाली, ``मी म्हणत होते की,`` तेवढ्यात तिच्या फोनची रिंग वाजली. तिनं पॉज घेत कॉल रिसिव्ह केला... मी क्षणभर गरगरलेच... तीच ती धून... मगाचीच... तोच तो उदित नारायण नि साधना सरगमचा आवाज... मजरूह सुलतानपुरींचे अर्थवाही शब्द... जतीन-ललितचं तरल संगीत... आमीर-आएशावर चित्रित झालेलं... आजच्या टिनएजर्सपर्यंत तितक्याच अलगदपणं पोहचलेलं ते गाणं... तितकंच फ्रेश नि एनर्जेटिक... कदाचित आणखी एकीला काही वर्षांनी ट्रान्समध्ये नेऊ शकणारं... `जो जिता वही सिकंदर`मधलं - ``पहला नशा... पहला खुँमार``... (ते एक असो...)  




7 comments: