फुलपाखरी क्षण...
आणि आम्ही अखेरीस भेटलो... कधीपासून लांबत
होतं आमचं भेटणं... कध्धीपासून ठरत होतं नि तरीही भेट म्हणून काही होत नव्हती.
नुसत्या गुगल मॅपवरचा सर्च आपल्या भेटण्याच्या जागेचा फिल देत होता... तो फिल
घेऊनच मन `फ्लाय` करू बघत होतं. पण प्रत्यक्ष भेटीचा आनंद काही वेगळाच असतो ना. त्याला
त्या `व्हर्च्युअल फिल`ची काय सर येणार
बॉsss... मग एका फंक्शनच्यानिमित्तानं तरी भेटूया म्हटलं...
पण छे... आपली भेट लांबवणारा आणखी एक व्हिलन आला नि माझं येणं कॅन्सलच झालं. आता
म्हटलं हे काय बॉsss खरं लक्षण दिसत नाहीये. एकीकडं
मालिकांच्या वाढत्या शेपटीला नावं ठेवता ठेवता आपलीही भेट लांबणं नि ती न होण्याची
सतराशेसाठ कारणं दरवेळी मी देणं, हे काही खरं नाही बॉsss. सो,
एक दिवस केलाच शेवटी फिक्स आपल्या भेटीचा. `सी यू सून` म्हणत स्टेट्सही अपडेट करून झाला.
आणि आम्ही अखेरीस भेटलो... कधीपासून
लांबलेला तो क्षण आलाच. प.पू. शाहरुखखाननं आपल्या एका चित्रपटातल्या डायलॉगमध्ये
म्हणून ठेवलंच आहे की, `कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो... तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने
की कोशिश में लग जाती हैं...` आपल्याबाबतीतही तेच झालं.
टॅक्सीपासून ते टीएमटीपर्यंत व्हाया मध्य रेल्वेचीही बडी मेहरबानी झाली माझ्यावर
नि मी येऊन थडकले तुझ्या दाराशी. तुझी नेमप्लेट झळकत होती- बटरफ्लाय गार्डन-ओवळेकर
वाडी. चार वेळा वाचून खात्री करून घेतली शेवटी आपण भेटतोय याची. या भेटीचा साक्षीदार
होता भोवतालचा निसर्ग.
आणि आम्ही अखेरीस भेटलो... तुझ्या अंडी,
अळी, कोश नि किटक या चारही अवस्थांची माहिती करून घेतली. तुम्ही सारेजण मोकळ्या
अवकाशात श्वास घेत होता. ना कोणत्या चौकटींचे सापळे होते, ना कोणत्या मोहांची
जाळी... होता तो फक्त पंख पसरून विहरण्याचा स्वच्छंदपणा... आपला `फुलपाखरू धर्म` पाळण्याचं आचरलेलं व्रत... त्या व्रताला ओवळेकर बंधूंनी खुल्या मनानं
दिलेली स्पेस. दोन एकर जागेचा खुबीनं वापर करत साकारलेलं फुलपाखरांचं उद्यान.
त्याला अन्य निसर्गप्रेमींनी केलेली मदत.
आता फुलपाखरांचं असं झालेलं एक हक्काचं ठिकाण. तुमच्या लाईफस्टाईलला
उपयुक्त असलेली इथली आंबा, चिकू, चिंच, अशोक, उंबरादी विशिष्ट प्रकारची झाडं. त्यांच्यामुळं
तुमच्या फॅमिली सर्कलला सपोर्ट मिळाला. मुळात तुमचा लाईफस्पॅन तो कितीसा... पण या
झाडांच्या आधारे तो आकारतोय... तुमच्या अस्तित्वामुळं एक निसर्गचक्रच इनडायरेक्टली
पाहायला मिळतंय.
आणि आम्ही अखेरीस भेटलो... तुमची भेट घेता
घेता तुमचं फोटोसेशनही भरपूर चालू होतंच. धडाधडा कॅमेरे, मोबाईल्स, टॅब्जचा
क्लिक्लिकाट होत होता. मी आपली बाबाआदमच्या जमान्यातल्या कोडॅकचा जीव मुठीत धरून
तुझ्या वेगाला त्यात पकडू पाहात होते. पिवळा, तपकिरी, किरमिजी, पोपटी, शेंदरी किती
किती ते रंग... प्लेन, ठिपके, नक्षीदारपणाचे वेगळाले ढंग... विषारी नि
बिनविषारीपणाचे निकष... पाहून नजर भिरभिरली... क्षणभर तुमच्यासोबत मी मनानं
उडालेही... वाटलं किती क्षणभंगूरता आहे या जीवनात... उडताना पुढचा क्षण माहित नसतो
ना कसा असेल ते... वाटतंय की, म्हणूनच तुम्ही असता सतत पंख फडकवत... क्षणाक्षणाची
महती ओळखत... तरीही सदा प्रफुल्लित... आयुष्याचे रंग खरंच ओळखलेत का तुम्ही... की
म्हणूनच ते उमटलेत तुमच्या पंखांवर... अगदी अलगद... अलवारपणं... आता तुमचा निरोप
घेऊ म्हणता घेता येत नाहीये... पण तुम्हीच दिलेला धडा आता गिरवू म्हणतेय... `फुलपाखरी क्षण` भरभरून जगेन म्हणतेय... सो, आपल्या पुढच्या भेटीपर्यंत, एन्जॉय धिस
मेमोरेबल मुव्हेमेंट... गेट... सेट... बटर`फ्लाय`...
मस्त
ReplyDeletethank u
Deletethank u.
ReplyDeleteMaast aahe :)
ReplyDeleteChan
ReplyDeleteSundar👌
ReplyDeleteSundar👌
ReplyDeletethank u.
ReplyDeletewow.. very nice
ReplyDeletethank u.
Delete