Sunday, 10 May 2015

हॅलो, मी बोलतोय...

हाय एव्हरीबडी! व्हॉट्स अँप? माझ्या आजोबांची नि तुमची ओळख झालीच असेल ना? तुम्ही त्यांना हातात धरलंच असेल ना कधीतरी? असेच असतील ना तुमचेही सुट्टीचे दिवस? दे धम्माल... रंगांची कम्माल... रंगवण्याच्या नावाखाली केलेली मस्ती... चित्रासोबत स्वतःलाही रंगवणं... किती मज्जा येते ना... हातावर, कपड्यांवर रंग लागल्यावर... `क्यूँ की, दाग अच्छे होते हैं`... शिवाय पणजोबांना हातात धरून कदाचित तुम्ही खोटीखोटी लढाईही खेळली असाल... आठवतंय का काहीतरी यातलं... नाहीतर आता डोक्याला आणखी ताण न देता माझा डीपी तरी बघा. स्टेटसवरून कळलंच असेल मी आहे ब्रशोबा रंगोबा चित्रे!

होय होय... मी आधुनिक पिढीतला असल्यानं व्हॉट्स अँप वापरतोय. माझी चुलत-मावस भावंडं पेंटच्या टुल बॉक्समध्ये राहातायत सध्या. पण मला करायचाय माझ्या आजोबांसारखा साहसी प्रवास... सो, मी प्रिफर केलाय ज्युनिअर्सचा वॉटरकलर बॉक्स... सध्या माझ्या सोबतीला आहेत एक नाही, दोन नाहीत तर १५ कलर्स. काळा-पांढरा, पिवळ्या, लाल, हिरव्या, निळ्या रंगांच्या छटांची सोबत एकदम मस्त वाटतेय मला... हेsss आमच्या शॉपीत केवढी गर्दी झालेयsss. आत्ताच मी ऐकलं, ते तुम्हीही ऐकलंत का.. कुणीतरी वॉटरकलर बॉक्सबद्दल विचारतंय. आता कदाचित मी जाईन- साहिर, ऋत्विक किंवा सोहा, आर्याकडं... मग तो मला आधी न्याहाळेल. हळूच ओपन करेल. रंगावरून नुसतीच बोटं फिरवेल... हंsss हंsss कसा असेल तो फिल... रंगांकडून येईल माझ्याकडं. अलगदपणं मला चिमटीत पकडेल. मग बुडवेल शेजारच्या पाण्याच्या वाटीत... वाsssव... ती असेल माझी पहिलीवहिली पाण्यातली डुबकी... स्सsss... गारेगार... मग मला उचलून ठेवेल आवडत्या रंगावर. मीही तो रंग घेईन शोषून नि चालायला लागेन कागदावर. रंगू लागेल समोरचं चित्र. कधी टिपिकल सनसेटचा काळा-पिवळा सीन. कधी रंगीत फ्लॉव्हरपॉट. कधी पोकेमॉन तर कधी नुसतेच रंगांचे फटकारे. कधी फक्त त्रिकोण-चौकोन आकारे...

नाही, नाही... मला काही ज्युनिअरमध्येच नाही राहायचंय. जायचंच आहे सिनिअरमध्ये. तिथं ऑईलपेंट कलर्सच्या क्लासिक शेडस् माझी नक्कीच वाट बघत असतील. तिथं मिळेल कदाचित मला प्रमोशन. कलरपॅलेटवर मी रंगवेन मनमुराद छटा. मी म्हणजे ज्याच्या कुणाच्या हातात मी असेन तो... अर्थात तो कलावंतच असणार. कदाचित शिकाऊ किंवा मग कदाचित एकदम सिनिअर मोस्टही असेल. आपण कुणाच्या हातात असायचं, ते काय बॉsss आपल्या हाती थोडंच असतं. तर मग समोरच्या मोठ्ठ्या कॅनव्हासवर मी लागेन बागडू. कधी अँबस्ट्रॅक्ट. कधी चेहरे. कधी मुखवटे, कधी मिक्स नि कधी गिमिक्सदेखील... कधी पकडाव्या लागतील निसर्गाच्या लहरी... तप्तजाळ उन्हाळा, जीवघेणा पावसाळा, कुडकुडणारा हिवाळा किंवा मग रंगवाव्या लागतील नजरा विखारी... कधी मायेचा ओलावा तर कधी प्रेमाचा बोलावा... कधी सोबत असेल संगीताची धून तर कधी रंगेल फक्त गप्पांचा फड... रंगेल सोहळा रंगांचा... त्याचा मी साक्षीदार असेन नि त्यात सामीलही होईन. रंग आणि मी... रंगलेला स्टुडिओ... रंगीन दुनिया... रंगांची किमया... कधी कोरड्या रंगाचं पॅलेट.... कधी केव्हाचा रिकामा कॅनव्हास. कधी गूढशा स्टुडिओत उदबत्तीच्या वासासारख्या रेंगाळणाऱ्या काही नवजात कल्पना... काही चमकदार. कुणी गोष्टीवेल्हाळ. काही रुक्ष. काही सूक्ष्म. काही काटेकोर कुणी पक्की कमर्शिअल... कसं काय फिलिंग असेल ते...


येsssस्सsss मेरा नंबर आ गया दोस्तों... मी चाललोय पिशवीत बसून कुठंतरी. आयलाsss... या कलरशेडना तर हसू फुटतंय खुशीचं... खोsss खोsss हसत सुटलाय नुस्ते लेकोहोsss... आवरा, आवरा स्वतःला... नाहीतरी आधीच मिक्स व्हाल की अशानं. मग त्या रंगवेड्याच्या आयडियाची कल्पना आपण रंगीत कशी काय करणार? सो, कुल गाईज! हॅव अ पेशन्स! सो फ्रेण्डस्, आम्ही जाम एन्जॉय करणारोत असं दिसतंय. पुढचा प्रत्येक क्षण असेल आमच्यासाठी स्पेशल. काय? तुमच्याचकडं घेऊन आलाय मला तुमच्या घरातल्या ज्युनिअरसाठी?... बघा, बघा, मला नीट ओळखा... डीपी नि स्टेट्स लगेच चेक करा... मी ब्रशोबा रंगोबा चित्रे... चला, रंगांच्या दुनियेतल्या सफरीला... हॅप्पी कलरिंग... 

3 comments: