Sunday, 29 March 2015

देखणा उन्हाळा


हं... हं... अजिबात चक्करून जाऊ नका असं उन्हातून आल्यासारखं... `देखणा उन्हाळा` असंच एकदम करेक्टली वाचलंय तुम्ही... कारण...
... कारण असतोच देखणा उन्हाळा आता तुम्हाला वाटतंय का की, मी उन्हाळ्याच्या कारणमीमांसेत शिरणारेय... तर ती शक्यता सोडाच. कसंए ना की, आपण सहसा विश्वास ठेवतो ते आपल्याला दोन किंवा चार डोळ्यांनी दिसणाऱ्या समोरच्या गोष्टींवर. सो, तसा विचार केला तर पार सूर्यमालेच्या खोलात शिरायचं झालं तर आपल्याला दिसतात ते सूर्य नि चंद्र. पैकी चंद्र दिसतो तेव्हा बऱ्याच अंशी आपले डोळे झोपेच्या मार्गावर चालायला लागलेले असतात. सो, आपण बघतो, म्हणजे आपल्याला जाणवतो, किलकिल्या डोळ्यांनी आपण बघतो तो सूर्यच...... कारण असतोच देखणा उन्हाळा तर या सूर्याची बाळं रोज आपल्यासाठी जन्म घेतात, किंवा कदाचित ती कायम असतात, आपण त्यांना रोज नव्यानं बघत असतो. कसलं सॉलिड लाईफ आहे त्यांचं... सकाळच्या कोवळ्या उन्हाचा फिल घेतलाय का कधी? आपल्याला उठवायलाच येतं ते... एकदम मायेनं... मग ही बाळं वयात येतात नि आपल्याच रुबाबात राहतात... एकदम रोखठोक... कुणालाच न जुमानणारं कडकडीत ऊन... मग वाटत असावी त्यांना पश्चिमेची ओढ... मध्यम वय असतंच बिनतोड. ते समुद्रातलं हळूहळू बुडणं किंवा डोंगरआडचं मावळणं... त्याच `त्या` वेळी बाळंही होत असावीत कातर... म्हाताऱ्यांच्या मायेची साखर... जराशी रेंगाळत परततात ती सूर्याकडं... पुन्हा उजाडण्यासाठी...
... कारण असतोच देखणा उन्हाळा कालच एका छोट्यानं पिवळा टीशर्ट घातला होता. तर त्याची मैत्रिण त्याला चिडवत होती, ``यलो यलो... डर्टी फलो...`` पण या पठ्ठ्याला त्या चिडवण्यानं काहीच फरक पडत नव्हता. तो आपल्याच धुनकीत होता. त्यावरून आठवला `यलो` सिनेमा! त्यातलं गौरीचं कसब नि तिचं `यलो सिक्रेट`... नि ते खरंए... पिवळा रंग मानला जातो सेन्सेटिव्ह. त्याला जॉय, हॅप्पीनेससोबत असोसिएट केलं जातं. त्यातून मिळते आपल्याला एनर्जी...
... कारण असतोच देखणा उन्हाळा तसा म्हणायला पिवळा हा प्राथमिक रंग आहे रंगाच्या दुनियेतला. कदाचित म्हणूनच त्याची दोस्ती होऊन अनेकांशी भारी कॉम्बिनेशन्स होत असावीत. तीच इन होतात नि मिरवली जातात `समर फॅशन` म्हणून! मग पिवळ्या ड्रेसमधली माणसं कशी निवांत वाटतात उन्हात वावरताना... एवढी की, जणू ती उन्हाला ``इंच का पिंच, नो डबल पिंच`` असं म्हणत असावीत...
... कारण असतोच देखणा उन्हाळा कधी उन्हानं होतो जीव घाबरा. ओलागच्च घामाचा निथळा. पाण्यासाठीची कासावीस... थंडाव्यासाठीची सॉलिड घासाघीस... पिवळ्या-केशरी सरबतांचा मारा... पिवळा चाफा-शेवंतीच्या सुवासाचा सहारा... किंवा मग डिओज, परफ्युम्स, अत्तरांचा उतारा... मग समर होतो हॅप्पी... मिळते जादु की झप्पी...  ... कारण असतोच देखणा उन्हाळा...


 







No comments:

Post a Comment