Sunday, 15 March 2015

झाड


जाता येता ते दिसायचं... हेsss मिठीत येईल एवढं... केवढाला त्याचा विस्तार... पानोपानी आलेला बहार... शहराच्या तुटक्या उन्हाला अद्याप न सरावलेले कितीतरीजण क्षणभर त्याच्या बुंध्याशी विसावत. पोरंटोरं त्याच्या फांद्यांवर खेळत. आयाबाया त्याची अलाबला काढत. एका टळटळीत दुपारी पालिकेची गाडी आली. त्या झाडाच्या काळजात धस्स झालं. परवाच पलिकडच्या गल्लीतल्या दोस्तावर झालेला `वार` त्याला आठवला... ``आता आपली पाळी...``, असं मनाशी कबूल करत ते सज्ज झालं `माणसांच्या चुकांचे वार` झेलायला... झाडाशी आलेल्या माणसांनी निर्विकारपणं आपापली हत्यारं काढली. झाडाचा आवाका पाहत पाहत त्यांनी कटिंग घेतलं. भोवतालची गर्दी फक्त पाहत होती... टकामका... टकामका... मग एकजण पुढं सरसावला... त्यानं पहिला घाव घातला... मागोमाग फक्त सपासप... सपासप... सपासप... सपासप... सपासप... इथं कुणालाच चिपको आंदोलन माहित नव्हतं... किंवा तसं काही करावंसं वाटलं नसावं... स्थितप्रज्ञतेचे मुखवटे ओढून घेतले होते प्रत्येकानं... झाड मात्र जमिनीवरच पाय रोवून उभं होतं... त्याचं इमान कायम होतं...
सपासप... न जाणो कितेक सपासप घाव... सपासप... घावांचा गजर नि भोवतालच्या गर्दीतले सुस्कारे... चुकार दबके हुंदके... आणखी एका हिरव्या दोस्ताचं काम तमाम केलं गेलं... अगला नंबर किस का था?... त्या माणसांनी त्या हिरव्या मित्राच्या तुटक्या बुंध्यावर बसून पुन्हा कटिंग घेतला... प्लँस्टिक कप्स तिथंच फेकून ते पुन्हा तशाच बेफिकिरीनं निघून गेले. तो पडला होता असाच... अस्ताव्यस्त... तुटलेला... मागच्या माणसांनी त्याला गोळा केला... त्याच्या बुंध्याच्या आसपास एक साफसुथरं करून टाकलं. गर्दी तर केव्हाचीच पांगली होती. उरलेल्या बोडक्या बुडातून फुटत होता फक्त पाझर... मायेचा... करुणेचा... तीच ती चिरंतनता... अपार वेदनांनी बांधलेली... निरंतर होरपळूनही शाश्वत ठरणारी... वैशाख वणव्याचे दिवस असेच सरले. मृद्गंधाचं शिंपण झालं नि ते शहारलं... तरारलं... पालवलं... नवा फुटला कोंब... आशेचा... असोशीचा... तुटूनही फिरून नव्यानं जन्मायचा... आपलं `झाडपण` न सोडायचा...



3 comments:

  1. छान वाटलं वाचून ! :-)

    ReplyDelete
  2. किती जाणीवेने लिहिलेलं... आता रस्त्यातला प्रत्येक झाड बोलक वाटायला लागणार

    ReplyDelete
  3. जाणिवेचा मऊलूस कोंब!

    ReplyDelete