Sunday, 29 March 2015

देखणा उन्हाळा


हं... हं... अजिबात चक्करून जाऊ नका असं उन्हातून आल्यासारखं... `देखणा उन्हाळा` असंच एकदम करेक्टली वाचलंय तुम्ही... कारण...
... कारण असतोच देखणा उन्हाळा आता तुम्हाला वाटतंय का की, मी उन्हाळ्याच्या कारणमीमांसेत शिरणारेय... तर ती शक्यता सोडाच. कसंए ना की, आपण सहसा विश्वास ठेवतो ते आपल्याला दोन किंवा चार डोळ्यांनी दिसणाऱ्या समोरच्या गोष्टींवर. सो, तसा विचार केला तर पार सूर्यमालेच्या खोलात शिरायचं झालं तर आपल्याला दिसतात ते सूर्य नि चंद्र. पैकी चंद्र दिसतो तेव्हा बऱ्याच अंशी आपले डोळे झोपेच्या मार्गावर चालायला लागलेले असतात. सो, आपण बघतो, म्हणजे आपल्याला जाणवतो, किलकिल्या डोळ्यांनी आपण बघतो तो सूर्यच...... कारण असतोच देखणा उन्हाळा तर या सूर्याची बाळं रोज आपल्यासाठी जन्म घेतात, किंवा कदाचित ती कायम असतात, आपण त्यांना रोज नव्यानं बघत असतो. कसलं सॉलिड लाईफ आहे त्यांचं... सकाळच्या कोवळ्या उन्हाचा फिल घेतलाय का कधी? आपल्याला उठवायलाच येतं ते... एकदम मायेनं... मग ही बाळं वयात येतात नि आपल्याच रुबाबात राहतात... एकदम रोखठोक... कुणालाच न जुमानणारं कडकडीत ऊन... मग वाटत असावी त्यांना पश्चिमेची ओढ... मध्यम वय असतंच बिनतोड. ते समुद्रातलं हळूहळू बुडणं किंवा डोंगरआडचं मावळणं... त्याच `त्या` वेळी बाळंही होत असावीत कातर... म्हाताऱ्यांच्या मायेची साखर... जराशी रेंगाळत परततात ती सूर्याकडं... पुन्हा उजाडण्यासाठी...
... कारण असतोच देखणा उन्हाळा कालच एका छोट्यानं पिवळा टीशर्ट घातला होता. तर त्याची मैत्रिण त्याला चिडवत होती, ``यलो यलो... डर्टी फलो...`` पण या पठ्ठ्याला त्या चिडवण्यानं काहीच फरक पडत नव्हता. तो आपल्याच धुनकीत होता. त्यावरून आठवला `यलो` सिनेमा! त्यातलं गौरीचं कसब नि तिचं `यलो सिक्रेट`... नि ते खरंए... पिवळा रंग मानला जातो सेन्सेटिव्ह. त्याला जॉय, हॅप्पीनेससोबत असोसिएट केलं जातं. त्यातून मिळते आपल्याला एनर्जी...
... कारण असतोच देखणा उन्हाळा तसा म्हणायला पिवळा हा प्राथमिक रंग आहे रंगाच्या दुनियेतला. कदाचित म्हणूनच त्याची दोस्ती होऊन अनेकांशी भारी कॉम्बिनेशन्स होत असावीत. तीच इन होतात नि मिरवली जातात `समर फॅशन` म्हणून! मग पिवळ्या ड्रेसमधली माणसं कशी निवांत वाटतात उन्हात वावरताना... एवढी की, जणू ती उन्हाला ``इंच का पिंच, नो डबल पिंच`` असं म्हणत असावीत...
... कारण असतोच देखणा उन्हाळा कधी उन्हानं होतो जीव घाबरा. ओलागच्च घामाचा निथळा. पाण्यासाठीची कासावीस... थंडाव्यासाठीची सॉलिड घासाघीस... पिवळ्या-केशरी सरबतांचा मारा... पिवळा चाफा-शेवंतीच्या सुवासाचा सहारा... किंवा मग डिओज, परफ्युम्स, अत्तरांचा उतारा... मग समर होतो हॅप्पी... मिळते जादु की झप्पी...  ... कारण असतोच देखणा उन्हाळा...


 







Sunday, 22 March 2015



लब्जों की बात...

ग्रंथालयातल्या रॅक्सवरची पुस्तकं धुंडाळताना `ते` हाती लागलं. `त्याच्या` मुखपृष्ठावरची नावंच इतकी `लई भारी` होती की, हम उन्हें देखतें ही रह गए... एवढा तुरंत असर झाला होता त्या पुस्तकाचा... पुस्तकाचं शीर्षक वाचून मन जरासं धुनकीतच होतं... घरी आल्यावर पुस्तक टीपॉयवर ठेवलं नि कामाला लागले. मग दोन दिवसात काही पुस्तक हातात घ्यायला जमलंच नाही. कदाचित त्या पुस्तकालाही `सही वक्त का इंतजार` असावा. हां, आता येता-जाता पुस्तकाकडं लक्ष जात होतं, पण... कसं असतं ना की एखाद्या ओळखीच्या माणसाला जस्ट हाय-हॅलो केलं जातं, पण त्याच्याशी बोलायचा योग यावा लागतो, तसंच काहीसं आमचं म्हणजे माझं नि या पुस्तकाचं झालं होतं. त्याच्या शीर्षकानं भूतकाळातली कुठलीशी एक तार छेडली होती, केव्हाच... पर... पर वो लम्हाही क्या, जो युँही हमारे हाथ आए...

आणि `वो वक्त आ गया`... आमचा संवाद सुरू झाला... पुस्तक होतं `मिर्झा गालिब`. लेखक होते गुलजार. अनुवाद होता अंबरीश मिश्र यांचा. शब्दांच्या दुनियेतल्या या `बडेबुजुर्गां`ची ओळख म्या बापडीनं काय करून द्यावी?... मुखपृष्ठावरच्या उर्दू कॅलिग्राफीपासून ते मलपृष्ठावरच्या नेहमीच्याच `गुलजार पोज`मधले गुलजारजी पुरें किताबपर छा जाते हैं, असं म्हणावं तर मग मिर्झा गालिबांचं अस्तित्व तर पदोपदी जाणवत राहातं... का असं म्हणावं का की, कौन किस में समा गया हैं, कोई भी न जानें। फिर भी कुछ तो बतलाती हैं, लब्जों की जुबानें। वाटतं कसे असतील हे मिर्झाजी... कैसी होगी उन की जिंदगानी... मग पुढ्यात येतं गुलजारजींचं प्रास्ताविक... पाठोपाठ येतं अंबरीश मिश्रांचं मनोगत... `पुढं काय`ची उत्सुकता ताणली जात असतानाच दस्तुरखुद्द मिया गालिबच पुढ्यात उभे ठाकतात... अगदी दत्त म्हणून... फिर ऐसा लगता हैं की जैसे खुद गालिबजी हम से बातें कर रहें हैं।





भाई, ये गालिबजी बिल्कुल अकेले नहीं हैं। ते येतात ते त्यांच्या समष्टीसह... तो सारासारा काळाचा पट, त्यांचं त्यातलं जगणं नि सुखदुःखांच्या कढईत सततचं परतत रहाणं... लिहिण्याच्या ओघात मी सुखदुःख असं म्हटलं खरं, पण खरंतर गालिबच्या वाट्याला दुःख, निराशा, अहवेलना, नि विश्वासघाताची चुरचुरीत फोडणी आलेली दिसते. पण या फोडणीला न जुमानता गालिब ठामपणं उभे राहिले... कारण त्यांची मुळं घट्टपणं या मातीत रुजली होती... या साऱ्या सोसण्याचाही त्यांनी जणू उत्सव केला होता नि या उत्सवातली उर्जा होती त्यांचे शब्द... त्यांचे सांगाती... त्यांचा एकेक शब्द कित्ती नि काय काय बोलून जातो आपल्याशी... तेही अगदी सहजगत्या काळाला कवेत घेत... त्यांचे शब्द आजचे वाटणारे... मग आपोआपच `गालिबजी` असा दुरावा न राहता `गालिब` केव्हाच आपलासा होऊन जातो... कारण गालिबच्याच शब्दांत सांगायचं तर,
या रब जमाना मुझ को मिटाता हैं किस लिए?
लौह-ए-जहॉं पे हर्फे-एक-मुकर्रर नहीं हूँ मैं।
(मी म्हणजे पुन्हा पुन्हा लिहिता येईल असं अक्षर नाही. मग हे जग मला पुसून टाकण्याची खटपट का करतेय?)

शब्दांच्या शहनशहाची दास्तॉं बया करणारं हे पुस्तक एकाच दमात वाचून संपवलं. खरंतर संपवलं असं तरी कसं म्हणणार? कारण वो तो `गालिब लब्ज` हैं। वो तो हमेशा पढनेवालों के साथ रहने के लिए आते हैं। मग काही काळ `गालिब-गुलजार धून`मध्येच गेला. `यूट्यूब`वर सर्चलं नि पुढ्यात आला गुलजारांचा `व्हिज्युअल मिर्झा गालिब`... `दिल ही तो हैं`... म्हणत पडद्यावर गुलजार, जगजित सिंग नि नसरुद्दिन शहांची `बया एँ गालिब` दिसत होती... `हाच तो गालिब` म्हणत भूतकाळाची तार छेडणारा दुवा... लहानपणीची अंधुकशी आठवण जागवणारा... शब्दांचाच आत्मा, संगीताचा सूर आणि जीवनाचं सार सांगणारा `शब्दांचा जोगिया`...
या `शब्द खेळियां`ची माफी मागून अर्ज करते,
गालिब बनना मुमकिन नहीं हैं।
गुलजार बनना मुमकिन नहीं हैं।
मगर लब्जों को अपनाना मुमकिन हैं।



(साभार – ऋतुरंग प्रकाशन आणि दादर सार्वजनिक वाचनालय)

Sunday, 15 March 2015

झाड


जाता येता ते दिसायचं... हेsss मिठीत येईल एवढं... केवढाला त्याचा विस्तार... पानोपानी आलेला बहार... शहराच्या तुटक्या उन्हाला अद्याप न सरावलेले कितीतरीजण क्षणभर त्याच्या बुंध्याशी विसावत. पोरंटोरं त्याच्या फांद्यांवर खेळत. आयाबाया त्याची अलाबला काढत. एका टळटळीत दुपारी पालिकेची गाडी आली. त्या झाडाच्या काळजात धस्स झालं. परवाच पलिकडच्या गल्लीतल्या दोस्तावर झालेला `वार` त्याला आठवला... ``आता आपली पाळी...``, असं मनाशी कबूल करत ते सज्ज झालं `माणसांच्या चुकांचे वार` झेलायला... झाडाशी आलेल्या माणसांनी निर्विकारपणं आपापली हत्यारं काढली. झाडाचा आवाका पाहत पाहत त्यांनी कटिंग घेतलं. भोवतालची गर्दी फक्त पाहत होती... टकामका... टकामका... मग एकजण पुढं सरसावला... त्यानं पहिला घाव घातला... मागोमाग फक्त सपासप... सपासप... सपासप... सपासप... सपासप... इथं कुणालाच चिपको आंदोलन माहित नव्हतं... किंवा तसं काही करावंसं वाटलं नसावं... स्थितप्रज्ञतेचे मुखवटे ओढून घेतले होते प्रत्येकानं... झाड मात्र जमिनीवरच पाय रोवून उभं होतं... त्याचं इमान कायम होतं...
सपासप... न जाणो कितेक सपासप घाव... सपासप... घावांचा गजर नि भोवतालच्या गर्दीतले सुस्कारे... चुकार दबके हुंदके... आणखी एका हिरव्या दोस्ताचं काम तमाम केलं गेलं... अगला नंबर किस का था?... त्या माणसांनी त्या हिरव्या मित्राच्या तुटक्या बुंध्यावर बसून पुन्हा कटिंग घेतला... प्लँस्टिक कप्स तिथंच फेकून ते पुन्हा तशाच बेफिकिरीनं निघून गेले. तो पडला होता असाच... अस्ताव्यस्त... तुटलेला... मागच्या माणसांनी त्याला गोळा केला... त्याच्या बुंध्याच्या आसपास एक साफसुथरं करून टाकलं. गर्दी तर केव्हाचीच पांगली होती. उरलेल्या बोडक्या बुडातून फुटत होता फक्त पाझर... मायेचा... करुणेचा... तीच ती चिरंतनता... अपार वेदनांनी बांधलेली... निरंतर होरपळूनही शाश्वत ठरणारी... वैशाख वणव्याचे दिवस असेच सरले. मृद्गंधाचं शिंपण झालं नि ते शहारलं... तरारलं... पालवलं... नवा फुटला कोंब... आशेचा... असोशीचा... तुटूनही फिरून नव्यानं जन्मायचा... आपलं `झाडपण` न सोडायचा...



Saturday, 7 March 2015

`मी`... `तू`... `आपण`...

`मी`... `तू`... `आपण`...


`मी`... `तू`... म्हटलं तर ही फक्त सर्वनामं... `मी` म्हटलं तर बरंच काही... `तू` म्हटलं तरी बरंच काही... या `मी`-`तू`मध्ये भोवतालच्या असंख्यजणीही येतात. या `मी`ला कुणी काही म्हणतं, कुणी काही... पण `ती`ला ना सीमा... ना कोणत्या रेषा... ना जात... ना कोणते पंथ... ही `मी` आहेच अशी अनादी... अनंत... आपल्या पुराणातल्या व्यक्तिरेखांपासून ते आजच्या शतकातल्या आपल्यासमोर वावरणाऱ्या प्रत्येकीमध्ये ती दडलेली आहे. `मी` काही इथं बायकांच्या इतिहास-भूगोल उगाळायला बसलेली नाहीये. `झालं गेलं गंगेला मिळालं`... असं म्हणतात... हाsहाsहाsss म्हणजे सगळं काही पोटात घ्यायचं `ती`नं...`गंगे`नं... असो...

कसं आहे ना की, वर्षांनुवर्षांच्या त्याच त्या वेदना, हुंकार नि निःश्वासांची सवय झाल्येय आता आपल्याला... आपल्याला नि आपल्या भोवतालच्यांनादेखील... मग `महिलादिना`सारखं एखादं निमित्त शोधायचं नि महिलांच्या कर्तृत्वाला सलाम ठोकायचे... त्यांचा आदर-सत्कार करायचा... नि मग वर्षभर... हां, आता काहीजण, काही संस्था अतिशय पोटतिडकीनं या सगळ्याबद्द्ल काम करताहेत... मुंगीच्या पावलानं का होईना बदल घडतोय. हे खरंय. पण... मध्यंतरी माध्यमातल्या एका मैत्रिणीनं लिहिलेलं होतं की, ``आपल्याला दुःख विकायला आवडतं... विकत घ्यायलाही आवडतं... पण तेच जर आयुष्याचा जरासा भाग झालं की आपण विस्कटतो... पांढरपेशी जगण्याची एक खूण...`` या चार वाक्यांत `तिनं` तर आपल्या दुःखाचं सारच सांगून टाकलंय... जणू असं की एखाद्या रहस्याचा स्फोटच झाला असावा...

कसं आहे ना की, असे स्फोट होणं अगदी जरूरीचं आहे. बास्स झाले की, आता वेदना, हुंकार नि निःश्वासांचे ढोल बडवणं... आता आपलं आपणच सक्षम व्हायचं असं मनाशी ठरवून टाका एकदा कायमचंच. `जे ठरवाल ते होतंच`, असं म्हणतात. एरवीही आपण पक्कं असं ठरवून कितीतरी गोष्टी करतोच की... माध्यमांनी नि प्रायोजक असणाऱ्या जाहिरातींच्या चकचकाटी दुनियेतली `लिटिलस्टार`, `यंगस्टार`, `सुपरस्टार`, `सुपरमॉम`, `सुपरदादीमॉं` अशी चढत्या श्रेणीतली लेबलं आपणच आपल्याला लावून घेणं बंद करायला हवं. आपल्याला सगळ्या गोष्टी मँनेज करता यायलाच पाहिजेत, हा अट्टाहास कशासाठी नाही आल्या सगळ्या गोष्टी मँनेज करता तर काय बिघडलं?

कसं आहे ना की, आपण समजतोय की आपल्याला सगळं कळतंय... शिवाय `बाईच्या जातीला हे आलंच, हे केलंच पाहिजे` अशा `पाहिजे`च्या नावाखाली अनेक गोष्टी आपल्यावर लादल्या जातात... काही वेळा त्यांचा भडिमार केला जातो. आता हे लादलेलं ओझं भिरकावून द्यायला हवं. याचा अर्थ असा बिल्कुल नाही की जबाबदारी घ्यायचीच नाही. तर ती घ्यायची नि पारही पाडायची... पण आपलं मन राखून... स्वत्व शाबूत ठेवून... सगळ्यांच्या सहकार्यानं.

कसं आहे ना की, आपण हे जे ठरवतोय, त्याची चुणूक कुठंकुठं दिसायलाही लागल्येय... घरातली नि घरच्यासारखी असणारी अनेकजणं मदतीचा हात हाती घेण्यासाठी उभी आहेत. अगदी मनापासून... मग ती कोणतीही मदत असू शकेल. चिंटूचं स्वतःचा पसारा आवरणं असेल, मिनूचं रोपांना पाणी घालणं असेल. नवऱ्याचं बाळाची नँपी बदलणं असेल, दोन्ही आई-बाबांचं सदैव मदतीसाठी तत्पर असणं असेल. कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी मित्रानं केलेली मदत असेल, मैत्रिणीच्या आईनं पाठवलेला खाऊचा डब्बा असेल. म्युझिक टिचरनं दिलेली शाबासकीची थाप असेल, आवडत्या लेखकाचं आपल्या पत्राला आलेलं उत्तर असेल किंवा साधासा `मॉर्निंग` खरोखर `गुड` करणारा मेसेज असेल... या सगळ्या सकारात्मक गोष्टी आपला हुरुप वाढवणाऱ्या ठरतात. `हे सगळं आपल्या भोवतालीच घडत असतं. `झिम्मा`त विजयाबाईंनी म्हटल्याप्रमाणं, फक्त ते टिपकागदासारखं टिपून घेणं, आपल्याला साधायला हवं...`

कसं आहे ना की, सोनारानं कान टोचले की कळतं, असं म्हणतात. पण कान टोचल्यावर कानातलं घालायचं की नाही, हे ठरवणं आपल्याच हाती असतं. तसंच इथंही लागू पडतं. आपण काय करायचं नि काय नाही करायचं हे ठरवून घ्यायचं. किती सोपी गोष्ट आहे. अशा कितीतरी गोष्टी आपण निसर्गातूनही शिकतोच. रात्र संपल्यावर दिवस उजाडणार हे गृहितच धरलं जातं. आता काही रात्री गडद, काळोख्या नि भयंकर असतात... त्या संपणारेत की नाही, अशी अनिश्चितताही जाणवते... पण न डगमगता त्यांना सामोरं जायचं. प्रयत्न करत राहायचं... कुठूनतरी सूर्याची किरणं आपल्यापर्यंत पोहचतील... या अटळ विश्वासानं...

कसं आहे ना की, हे असले उपदेशाचे डोस आपल्याला अनेकांनी अनेकदा दिल्येत. फक्त ते आपल्या कानांवरून गेल्येत... मनांत रुजलेले नाहीत. पण आता वेळ दवडणं चांगलं नाही. एकीकडं चांगल्याची सुरुवात झाली असेल तर मग त्याची `लागण` सगळीकडं व्हायलाच हवी. पटतंय की हे ओझं उतरवणं एवढं सोप्पं काम नाहीये... पण ते उतरवावं लागणारेय... अश्वत्थामासारखी भळभळती जखम घेऊन फिरायचं की झाशीच्या राणीसारखं धाडस दाखवायचं... हे एकदा ठरायलाच हवं. बघा, हे दाखलेही आता जुनेपानेच झाल्येत की. फारतर आता एखाद्या कल्पना चावलांचं नाव घेता येईल. पण या मंडळींशी आपली तुलना होऊच शकत नाही, हेही आपल्याला मनातून माहिती असतंच. मग `आपुलाचि वाद आपणासि` म्हणत आपणच आपला आदर्श (चांगल्या अर्थानं) व्हायला काय हरकत आहे.

कसं आहे ना की, प्रेम, ममता, माया, सौंदर्य, सेवा, सुशृषा, साहचर्य, सुगरण, सहकारी, वगैरे वगैरे त्याच त्या पठडीतल्या भूमिकांत शिरताना आपण `स्व`लाच हरवून बसलोय. विसरलोय... विसरतोय... आपल्यालाही एक चौथा कमरा हवाच आहे. आपलं अस्तित्व दाखवणारा... काहींनी तो मिळवलाय... काही मिळवू पाहताहेत... फुकाच्या अहंकाराचे फुत्कार, कडवट भूतकाळ, अगतिकता, सोशिकपणा, दांभिकता, सहानुभूती, अशा विविधरंगी भावभावनांच्या विटांनी आपल्या मनाची भिंत लिंपून घेतोय आपण... हे सगळं बांधकाम आता अनधिकृत ठरवा. मनाचं अवकाश कसं लख्खं... मोकळंढाकळं असू द्या... त्यात प्रसन्नता, उत्साहाचं शिंपण करा फार तर. सकारात्मकता मात्र कायमची वस्तीला असू द्या. मग `मी` नि `तू`मधलं अंतर पार मिटूनच जाईल... तेव्हा `you & me`चा `we` होईल. हा `आपण सगळ्याजणी` एकत्र, एकभावनेनं असण्याचा क्षण खरंच महत्त्वाचा... त्या क्षणाची आत्मीयतेनं वाट बघत बसण्यापेक्षा चला, थेट कामालाच लागूया...
-    

Tuesday, 3 March 2015

ओम नमो जी आद्या...



ओम नमो जी आद्या...


ओम... एक अनादी अनंत हुकार... एक अनाहत नाद... हा नाद गुंजत राहतो विश्वभरात... कधी निसर्गात... कधी संगीतात... कधी शब्दांत... शब्द... तेही असतात असंख्य... अनोख्या अक्षरांचे... त्यांच्या दुनियेत शिरायचं ते मान खाली घालून नि फक्त मन लावून अनुभवायचा त्यांचा नजारा नि निरखायचा त्यांचा नखरा... शक्य झालंच कधी चुकून तर टिपून घ्यायचं त्यांना... मग जाणवते आपल्यातच एक अनुभूती... शब्दांची... ती असतेच मुळी अवर्णनीय... मग आपल्या हातात उरतं ते फक्त ही शब्दफुलं आपल्या ओंजळीत टिपणं...