Sunday, 30 April 2017

ले ले सेल्फी ले ले रे...




भोवताली सुरू आहे सेल्फीयुग, एक क्लिक सही, बाकी सब झुठ
रोजच्या रोज सेल्फी काढणं हाच एक उद्योग, त्यासाठी स्पॉट मिळणंच एक सुयोग
अडकून स्वप्रतिमेच्या जाळ्यात, लक्ष केंद्रित फ्रंट कॅमेऱ्यात
मान किंचित वाकडी आणि पाऊट, कधी उगाच अँक्शन नि शाऊट
बहुतांशी स्वतःला स्वतःच टिपणं, कधी क्वचित ग्रुपसोबत `असणं`
स्वसेल्फीच आवडे अनेकांना, इतरांचा सेल्फी फसलेला वाटे बहुतेकांना
सेल्फीची सायकॉलॉजी, पॉझिटिव्ह-निगेटिव्हिटी, सोशल मिडियावरची पोस्टॉलॉजी
सेल्फी काढताना दिसतं का प्रतिबिंब, की दिसतं एक उलट... एक सुलट...
शेकडो वर्षांचा नैसर्गिक कॅमेरा, पाण्याचा खळखळता वाहता झरा
कुरुप वेड्या पिल्लाला शहाणं करणारा, नावडतीला आवडती ठरवणारा
त्यानंतरचा सेल्फी कॅमेरा होता आरसा, त्यानं पत्करला सत्याचा वसा
सिंड्रेलाची आई खाष्ट, बुटक्यांची साथ बेस्ट, शेवट गोड होणारी गोष्ट
मधल्या काळातले जत्रेतले मजेशीर आरसे, जाड-बारीक, उंच-बुटके निरनिराळे खासे
आताच्या फ्रंट कॅमेऱ्याचे मेगा-पिक्सल, थेटच दाखवते आहे ते पिक्चर
अनेकदा होते फोटोकारागिरी, रंग-चेहऱ्यांची हेराफेरी
खरे-खोटे, खोटे-खरे, कृष्णधवल-रंगीत, रंगीत-कृष्णधवल
कोलाज करी कोलाज करी, फोटोंची अवघ्या दाटीवाटी
स्वप्रतिमांचा मिळे कॅनव्हास, एकाहून एक सरस भास
लाईक्स, डिसलाईक्स, कमेंटस् शेअरिंग
मज्जा-सज्जा, उदासी-नैराश्य, बोलघेवडेपणा-वरवरचे विचार, झटकन कॉपी-पेस्ट
होतो कुणी झपाटल्यागत, कुणी सतत अपडेट राही
कुणाला नोटिफिकेशन्सची घाई, कुणाला अनेकादा भास होई
तर कुणी झिडकारी सेल्फी, नकारे डिजिटल स्वप्रीती
स्वतःत डोकावणं, स्वतःला ओळखणं, खरंच इतकं असतं का सोप्पं
स्वतःला जोखणं, स्वतःला जाणणं खरंच इतकं असतं का अवघड
एकदा तरी काढा मनाची सेल्फी, मदतीला येईल बुद्धीची स्टिक
वापरून विचारांचा कॅमेरा, संवेदनांचा टाका फ्लॅश
बघा तरी कसा फोटो येईल झक्कास, खऱ्या भावनांचा कॅलिडोस्कोप फर्मास
अपडेट करा स्वतःला तत्त्वांनी, अॅप डाऊनलोड करा माणुसकीचं
हो गई सब तय्यारी, सेल्फी आएगा अब भारी
ओ सेल्फीबाज, ले ले सेल्फी ले ले रे...



छायाचित्रे – इंटरनेटवरून साभार.








Sunday, 16 April 2017

ऊन... ऊन...

ऊन ऊन,
ऊन ऊन... पिवळंधम्मक
मँगोला लागतो
चटकमटक
ऊन ऊन,
ऊन ऊन... सोनेरी फोड
द्राक्षं लागतात
आंबटगोड
ऊन ऊन,
ऊन ऊन... केशराचा घड
सगळ्यांचंच लाडकं
लालेलाल कलिंगड
ऊन ऊन,
ऊन ऊन... तापट रागीट
रानमेव्याची
गोडी अवीट
ऊन ऊन,
ऊन ऊन... कोवळं कोवळं
केव्हाही प्यावं-घ्यावं
ताजं शहाळं
ऊन ऊन,
ऊन ऊन... न्यारं नारिंगी
फस्त करा
संत्री-मोसंबी
ऊन ऊन,
ऊन ऊन... एकदम शहाणं
समजून घ्या
सूर्याचं वागणं
ऊन ऊन,
ऊन ऊन...


 

Sunday, 2 April 2017

प्रिय कैरीस,


...आणि तू आलीस, बरं वाटलं. मलाच नाही तर आम्हांला सगळ्यांना. खरंतर तू आलीस, म्हणजे पाठोपाठ कडक शिस्तीचे उन्हाळाआजोबा येणार हे माहिती होतंच. कारण ते आल्यावर त्यांना माणसांनी अदबीनं राहिलेलं आवडतं. स्कार्फ, टोपी, छत्री घेऊन चालणारी माणसं त्यांना फारफार प्रिय आहेत. त्यामुळं आम्ही जातो, त्यांच्या ब्लॅकलिस्टमध्ये... तरीही या शिस्तीपेक्षा तुझी वाट बघणं आणि तुझं येणं अधिक आवडतं.

तशी आपली मैत्री आणि कट्टीबट्टी लहानपणापासूनचीच. ताई-दादा लोक्स तुला मिटक्या मारत खाताना आम्ही बघायचो तेव्हापासूनची... एकदा हळूच एक चिंटीमिंटी फोड उचलली होती त्यांच्या बशीतून... डोळे किलकिले करत पाहिलं भोवताली नि चाखली किंचितशी चव... आssह... आपली ती पहिली भेट आणि त्यानंतरच्या प्रत्येक मोसमातील भेटी... आंबट-तुरट चवींचा ठेवाच तो. पुन्हापुन्हा जिभेवर रेंगाळणारा... वाढत्या वयासोबत आपल्या भेटीत येत गेला खारटपणा, तिखटपणा, मसालेदारपणा... चिंच, आवळा, बोरं वगैरे तुझी बहिण-भावंडं अधूनमधून हजेरी लावतात, पण तुझी गोष्ट काही वेगळीच.

दारासमोरच्या आंब्याला मोहोर आला म्हणजे तुझ्या येण्याची चाहूल लागते. थोडुसा मोहोर गळला म्हणजे कुणी आपलं गेल्यासारखं वाटतं... पण बाकीच्यांच्या अस्तित्वानं थोडासा दिलासा मिळतो. मग हळूहळू मोहोराच्या जागी दिसू लागतात चिंगूमिंगू कैऱ्या... कैऱ्या कसल्या ती बाळंच खरंतर कैरीची... मग केवळ दारासमोरच्या आंब्याखेरीज लक्ष जातं, भोवतालच्या आंब्यांकडं. जाण्यायेण्याच्या वाटा केवळ ही `कैऱ्याळलेली झाडं` बघायला बदलून जातात... मग कधी ही झाडं स्टेशनवाटेवर असतात, कधी टिळक पुलाशेजारी, कधी भारतमाताच्या परिसरात, कधी मंत्रालयासमोर, कधी वसईत, कधी सिल्व्हासात. कधी घाटमाथ्यावरच्या कुण्या वळणावर, कधी शहरी नातलगांच्या घरांत. कधी गावाकडच्या नातलगांच्या आमराईत तर कधी एखादं एकटंच गावकुसाबाहेर वाढून वाटसरूंना आनंद देणारं...

बाळकैऱ्या वाढायला लागल्यावर येणाऱ्याजाणाऱ्यांचे डोळे नुस्ते लागून राहातात त्यांच्याकडं. विशेषतः शहराच्या व्यस्ततेत, फ्लायओव्हर्स, मोनो-मेट्रोच्या कृपेनं आणि प्रदुषणाच्या विळख्यातही अजून तगून राहिलेल्या या आम्रवृक्षांकडं माणसं अचंबित होऊन बघत राहतात. दरवेळी त्यांना कैरीची हाव असतेच असं नाही. मग ते आपसूकच झाडावरून पडलेली कैरी चुकून कधी मिळाली तर समाधानी असतात. काहीजणांना मात्र या कैऱ्यांचा आस्वाद घेतल्यावाचून राहावत नाही. मग उंच काठीला आकडा बांधून, कधी थेट झाडावर चढून कैऱ्या पाडण्याचा साधारणपणं तास-दीड तासाचा कार्यक्रमच पार पडतो. `दादा, मला दे ना...` अशी अनेक आर्जवं होतात. `या दोन कैऱ्या माझ्या,` अशी थोडीशी गुर्मीयुक्त भाषाही कानी पडते. माना वर करकरून कैऱ्यांना टिपलं जातं. माना दुखून येतात पण कैऱ्या संपत नाहीत. मग थकूनभागून पाडलेल्या कैऱ्यांचं वाटप होतं. काही तिथंच आंब्याखाली कापून, तिखट-मीठ लावून खाल्ल्या जातात. दात आंबतात. तोंडं कसनुशी होतात. घरचा ओरडा खावा लागतो, पण तरीही कैरी खाणं मस्टच असतं.

तरीही काही कैऱ्या झाडावर शाबूत असतात. यथावकाश त्या मोठ्या होतात. त्यातल्या काही पडतात. त्यातल्या दोन-चार कुणाला मिळाल्या तरी त्यांचं लोणचं होतं, जे लई भारी लागतं. काही कैऱ्या पाखरांच्या वाटच्या असतात. त्या पाखरंच खातात. निसर्गाला सगळी लेकरं सारखीच... आमरायांमधल्या कैऱ्यांचं भाग्य आणखीनच उजळतं. त्यांना आणखीन वाढायची संधी मिळते नि त्यांचे आंबे होतात. त्यांचं फॅनफॉलोइंग वाढतंच जातं. मात्र आंब्यांच्या प्रकारांवरून केला जाणारा भेदाभेद कैरीच्या वाट्याला बिल्कुल येत नाही, हेही कैरीचं नि कैरीप्रेमींचं भाग्यच. सध्यातरी कैऱ्यांचे लाईक्स वाढताहेत. पटापटा फोटो अपलोड होतातहेत. कैऱ्यांच्या दिवसांतल्या आठवणींनी यंगहार्टेड सिनिअर्स आणि खरोखरचे ज्युनिअर्स यांची मनं कैरीमय होताहेत... त्याला `पेपरबोट`च्या मार्केटिंग कौशल्याची जोड मिळते आहे... आठवणींचे झुले कैरीच्या फोडी, पन्हं, आंबेडाळ, लोणची अशा खाद्यंतीसोबत झुलू लागलेत...
  
कारण... प्रिय कैरी, तू आलीस, फारफार बरं वाटलंय आम्हांला सगळ्यांना...

- तुझेच, 
कैरीप्रेमी.



छायाचित्रे- राधिका कुंटे. 



Sunday, 19 March 2017

शोध(लाग)लेला सेल्फी


 ...आणि आणखी एकदा एक प्रवास...
प्रवास कुठला, कधीचा, कुणाचा, कशासाठी...
हे बोचकारणारे प्रश्न नकोत... प्रवास होणं महत्त्वाचं...
शहराची हद्द सोडणं महत्त्वाचं... थोडासा वेळ डोंगरदऱ्यांत घालवणं महत्त्वाचं...
तर पेट्रोल-डिझेलचे टिपकल वास नाकाशी घोंगावत असतानाच, आली गार वाऱ्याची झुळूक...
एसी नव्हेच बिल्कुल... तोच तो समस्तांना सुखावणारा वारा नि सोबत त्याची झुळूक...
मग हातातला मोबाईल पर्समध्ये टाकून दिला खुशाल...
होताहेत `अपडेट` त्यांना, होऊ द्या हुशार...
राहू दे, आजचा दिवस आम्हांला ``...
गिरवू दे, हिरवी आणि मातकट मुळाक्षरं...
निसर्गाच्या कॅनव्हासवर वसंत ऋतूचा वॉश दिला गेलाय...
घरोघरच्या मातीच्या चुली वेगळ्या नि इथल्या मैलो न मैल पसरलेल्या मातीचा पसारा निराळा...
``वेलकम`` म्हणत झाडं तऱ्हतऱ्हांच्या शेडचे ड्रेस घालून घोळक्यानं स्वागताला उभी...
पोपटी, गडद हिरवा, मातकट हिरवा, तपकिरी हिरवा, सोनसळी, पिवळट, पालवलेली आणि...
आणि काही तर अगदी तटस्थच... निष्पर्ण... पण त्यातही आपलं ``झाडपण वागवणारी``...
मग आपसूकच हे ``झाडपण`` आपल्याला झपाटून टाकतं... भोवताली हीच सगळी मंडळी असतात काही तास आपल्या...
मग ही झाडं-पानं, डोंगर-माती आणि आपण थोडंसं एकजीव होऊ लागतो...
झाडांवरची लाल, गुलाबी, शेंदरी, पिवळी, केशरी, पांढरी फुलांची श्रीमंती आपल्याला खुणावू लागते...
काही काळासाठी मग बाजूला ठेवलेला मोबाईल हातात येतो नि काहींना आपल्या कॅमेऱ्यात `क्लिकतो`... कुणाला `व्हिडिओतो`...
तरीही यातून काहीतरी उरतंच...   
आपल्यातून आपसूकच फुटते एक पालवी...
ती असते कल्पनेची...
कल्पनेला धुमारे फुटायच्या आत आपण पोहचलेलो असतो मुक्कामी...
पाहुणचार, गप्पागोष्टी, कामंधामं अशा भौतिक जगातल्या गोष्टी आपण करतो...
भोवतालच्यांना कल्पना येत नाही, पण आपल्या डोक्यात काहीतरी खदखदत असतं...
रटरटत असतं... थोडंसं ओसंडत असतं... क्षणभराची तंद्रीही लागते...
मग कुणीतरी पुन्हा आपल्याला भोवताच्या भौतिक जगात ओढून घेतं...

...आणि आणखी एकदा एक प्रवास...
प्रवास कुठला, कधीचा, कुणाचा, कशासाठी...
हे बोचकारणारे प्रश्न नकोत... प्रवास होणं महत्त्वाचं...
तर मग सुरू होतो परतीचा प्रवास...
या बिंदूपर्यंत थांबलेला त्या बिंदूपर्यंतचा...
पुन्हा एकदा येते वाऱ्याची झुळूक...
पुन्हा हाय-हॅलो करते `निसर्गाई`...
आता मात्र क्षणभर अपडेट व्हायची निकड लागते भासू...
ऑन होतो मोबाईल नि होतो नेटपॅकचा खात्मा...
तितक्यातच डाऊन होते बॅटरी...
आणि काहीशा आनंदानंच आपण पुन्हा सामावतो त्या निसर्गाच्या समष्टीत...
कललेला सूर्य, वाकुल्या दाखवणाऱ्या सावल्या... झपाझप मागं पडणारा घाटरस्ता...
टनेलमधल्या क्षणिक अंधाऱ्या क्षणांमध्ये सामोरा आला उजेड-अंधाराच्या पाठशिवणीचा खेळ...
आशा-निराशा, आनंद-दुःख आणि उत्साह-हताशा या चुलत भावंडांची जणू एक साखळी... 
तितक्यात आला हायवे संपल्याचा बोर्ड... झाडांची रांग मागं पडलेली...
होऊ लागलं ट्रॅफिक जॅम... सिग्नलवरचे चिमुरडे रडवेले बोल... ``अब मैं किस की गोदी में खेलूँ???...``
ते वाक्य डोक्यात शिरेपर्यंत गाडी सरकली पुढं...
घर आलंच...

 ...आणि आणखी एकदा एक प्रवास...
प्रवास कुठला, कधीचा, कुणाचा, कशासाठी...
हे बोचकारणारे प्रश्न नकोत... प्रवास होणं महत्त्वाचं...
तर प्रवास होणं महत्त्वाचं... `स्व`चा शोध घणं महत्त्वाचं...



छायाचित्रे – राधिका कुंटे

Sunday, 5 March 2017

निमित्त २ वर्षपूर्तीचं...

लिहिणं... म्हणजे काय असतं?... फक्त एका शब्दापुढं दुसरा शब्द ठेवणं... की, मनातल्या विचारांचा अर्थ वाहणाऱ्या अचूक शब्दाची नस पकडून त्यांना बोलतं करणं?... विचार... म्हणजे काय असतं?... मनातल्या असंख्य भावभावना की, भावनांच्या गर्दीतल्या नेमक्या काहींच्या कानाला धरून त्यांना चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करत सुसूत्र करणं?... मन म्हणजे काय असतं?... हे गणित काही कुणाला अजून ठोकपणं उलगडलेलं नाहीये... की मानवी तल्लख मेंदूचंच भावनिक रुपडं म्हणजे मन?... कठीण आहे याबद्दल काही सांगणं... या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज म्हणजे लिहिणं म्हणावं, तर तसंही नेहमीच होतं असंही नाही... खरंतर `लिहिणं` या प्रोसेसबद्दल लिहिणं, हेही फारच गुंतागुंतीचं... त्याचंही एक ठराविक शास्त्र असलं तरीही... त्यामुळं तो वैचारिक भाग शहाण्यासुरत्या लोकांसाठी ठेवून उरलेली शब्दवेडी, नादिष्ट किंवा ठार वेडी माणसं थेट लिहियलाच लागतात. त्यासाठी एक माध्यम मिळालं `ब्लॉग`चं.

ब्लॉगच्या माध्यमातून या व्यक्त होताना काही नेहमीचेच, काही हटके असे लिखाणाचे फॉर्म्स गवसत गेले. कधी ललित लेखानं काव्याचं रुप धारण केलं. कधी कविता ललित लेख झाली. कधी काव्य चौकोनी, त्रिवेणी स्वरुपांत उमटलं. तर कधी लेखांना फोटोंची जोड अजोड ठरली. कधी चित्रं, कधी रेखाटनांच्या माध्यमांतून शब्दांहून सरस असं काही हाती लागलं. या सगळ्या गोष्टींना प्रसंगी त्यातल्या प्रयोगाला तुमची दाद मिळत गेली. कधी भरभरून, कधी मनःपूर्वक, कधी फक्त लाईक्स तर कधी कमेंटून... कधी नाराजून, कधी खोचक-बोचक, कधी तिरकस तर कधी चक्क आकस... कधी सरळसोटपणा, कधी मिश्किलपणा, कधी गूढ, कधी खरी तर कधी फक्त खोटीखोटी... कधी चक्क पाठीत खंजीर खुपसणारी, कधी चक्क कॉपी-पेस्ट होऊन मलाच ते फॉरवर्ड करणारी... कधी वेळेची सबब सांगणारी तर कधी लेखाची वाट पाहाणारी... अशा नाना प्रकारे मिळणाऱ्या वाचकांच्या दादेमुळं हा इथवरचा प्रवास झालाय. लिहायला हुरुप आणि प्रोत्साहन मिळालंय.  

खरंतर हे सगळं सगळं असं शब्दांत मांडणं कठिणए... पण शब्दफुलांचीच ओंजळ असल्यानं मी तुमच्या भरवशावर हा प्रयत्न करतेय...

शब्दफुलांची ओंजळ या ब्लॉगचं गाठलंय दुसरं वर्ष.
वाचकहो, तुमच्याच प्रोत्साहानामुळं हा टप्पा गाठता आलाय.
वाचकहो, तुमचे मनःपूर्वक आभार.
वाचत राहा, शब्दफुलांची ओंजळ...




छायाचित्र – राधिका कुंटे.