Sunday, 2 April 2017

प्रिय कैरीस,


...आणि तू आलीस, बरं वाटलं. मलाच नाही तर आम्हांला सगळ्यांना. खरंतर तू आलीस, म्हणजे पाठोपाठ कडक शिस्तीचे उन्हाळाआजोबा येणार हे माहिती होतंच. कारण ते आल्यावर त्यांना माणसांनी अदबीनं राहिलेलं आवडतं. स्कार्फ, टोपी, छत्री घेऊन चालणारी माणसं त्यांना फारफार प्रिय आहेत. त्यामुळं आम्ही जातो, त्यांच्या ब्लॅकलिस्टमध्ये... तरीही या शिस्तीपेक्षा तुझी वाट बघणं आणि तुझं येणं अधिक आवडतं.

तशी आपली मैत्री आणि कट्टीबट्टी लहानपणापासूनचीच. ताई-दादा लोक्स तुला मिटक्या मारत खाताना आम्ही बघायचो तेव्हापासूनची... एकदा हळूच एक चिंटीमिंटी फोड उचलली होती त्यांच्या बशीतून... डोळे किलकिले करत पाहिलं भोवताली नि चाखली किंचितशी चव... आssह... आपली ती पहिली भेट आणि त्यानंतरच्या प्रत्येक मोसमातील भेटी... आंबट-तुरट चवींचा ठेवाच तो. पुन्हापुन्हा जिभेवर रेंगाळणारा... वाढत्या वयासोबत आपल्या भेटीत येत गेला खारटपणा, तिखटपणा, मसालेदारपणा... चिंच, आवळा, बोरं वगैरे तुझी बहिण-भावंडं अधूनमधून हजेरी लावतात, पण तुझी गोष्ट काही वेगळीच.

दारासमोरच्या आंब्याला मोहोर आला म्हणजे तुझ्या येण्याची चाहूल लागते. थोडुसा मोहोर गळला म्हणजे कुणी आपलं गेल्यासारखं वाटतं... पण बाकीच्यांच्या अस्तित्वानं थोडासा दिलासा मिळतो. मग हळूहळू मोहोराच्या जागी दिसू लागतात चिंगूमिंगू कैऱ्या... कैऱ्या कसल्या ती बाळंच खरंतर कैरीची... मग केवळ दारासमोरच्या आंब्याखेरीज लक्ष जातं, भोवतालच्या आंब्यांकडं. जाण्यायेण्याच्या वाटा केवळ ही `कैऱ्याळलेली झाडं` बघायला बदलून जातात... मग कधी ही झाडं स्टेशनवाटेवर असतात, कधी टिळक पुलाशेजारी, कधी भारतमाताच्या परिसरात, कधी मंत्रालयासमोर, कधी वसईत, कधी सिल्व्हासात. कधी घाटमाथ्यावरच्या कुण्या वळणावर, कधी शहरी नातलगांच्या घरांत. कधी गावाकडच्या नातलगांच्या आमराईत तर कधी एखादं एकटंच गावकुसाबाहेर वाढून वाटसरूंना आनंद देणारं...

बाळकैऱ्या वाढायला लागल्यावर येणाऱ्याजाणाऱ्यांचे डोळे नुस्ते लागून राहातात त्यांच्याकडं. विशेषतः शहराच्या व्यस्ततेत, फ्लायओव्हर्स, मोनो-मेट्रोच्या कृपेनं आणि प्रदुषणाच्या विळख्यातही अजून तगून राहिलेल्या या आम्रवृक्षांकडं माणसं अचंबित होऊन बघत राहतात. दरवेळी त्यांना कैरीची हाव असतेच असं नाही. मग ते आपसूकच झाडावरून पडलेली कैरी चुकून कधी मिळाली तर समाधानी असतात. काहीजणांना मात्र या कैऱ्यांचा आस्वाद घेतल्यावाचून राहावत नाही. मग उंच काठीला आकडा बांधून, कधी थेट झाडावर चढून कैऱ्या पाडण्याचा साधारणपणं तास-दीड तासाचा कार्यक्रमच पार पडतो. `दादा, मला दे ना...` अशी अनेक आर्जवं होतात. `या दोन कैऱ्या माझ्या,` अशी थोडीशी गुर्मीयुक्त भाषाही कानी पडते. माना वर करकरून कैऱ्यांना टिपलं जातं. माना दुखून येतात पण कैऱ्या संपत नाहीत. मग थकूनभागून पाडलेल्या कैऱ्यांचं वाटप होतं. काही तिथंच आंब्याखाली कापून, तिखट-मीठ लावून खाल्ल्या जातात. दात आंबतात. तोंडं कसनुशी होतात. घरचा ओरडा खावा लागतो, पण तरीही कैरी खाणं मस्टच असतं.

तरीही काही कैऱ्या झाडावर शाबूत असतात. यथावकाश त्या मोठ्या होतात. त्यातल्या काही पडतात. त्यातल्या दोन-चार कुणाला मिळाल्या तरी त्यांचं लोणचं होतं, जे लई भारी लागतं. काही कैऱ्या पाखरांच्या वाटच्या असतात. त्या पाखरंच खातात. निसर्गाला सगळी लेकरं सारखीच... आमरायांमधल्या कैऱ्यांचं भाग्य आणखीनच उजळतं. त्यांना आणखीन वाढायची संधी मिळते नि त्यांचे आंबे होतात. त्यांचं फॅनफॉलोइंग वाढतंच जातं. मात्र आंब्यांच्या प्रकारांवरून केला जाणारा भेदाभेद कैरीच्या वाट्याला बिल्कुल येत नाही, हेही कैरीचं नि कैरीप्रेमींचं भाग्यच. सध्यातरी कैऱ्यांचे लाईक्स वाढताहेत. पटापटा फोटो अपलोड होतातहेत. कैऱ्यांच्या दिवसांतल्या आठवणींनी यंगहार्टेड सिनिअर्स आणि खरोखरचे ज्युनिअर्स यांची मनं कैरीमय होताहेत... त्याला `पेपरबोट`च्या मार्केटिंग कौशल्याची जोड मिळते आहे... आठवणींचे झुले कैरीच्या फोडी, पन्हं, आंबेडाळ, लोणची अशा खाद्यंतीसोबत झुलू लागलेत...
  
कारण... प्रिय कैरी, तू आलीस, फारफार बरं वाटलंय आम्हांला सगळ्यांना...

- तुझेच, 
कैरीप्रेमी.



छायाचित्रे- राधिका कुंटे. 



No comments:

Post a Comment