Sunday, 21 August 2016

`मी`पण


कितीही आधुनिक साधनं निर्माण झाली तरीही, `मीपणा`चा शोध आणि त्यापासून घ्यायचा बोध ही गोष्ट अजूनही तितकीच दुर्बोध आहे...

कधीकधी थेट धावत सुटावंसं वाटतं ते क्षितिजापर्यंत... पण ते तर सतत लांब राहातं. सतत दुरावतं. असतं ते का आभासी... की खरंच...? जीवनातल्या यशाचं क्षितिजही असंच असतं का? तेही फसवं असतं का? की आपणच आपलं क्षितिज ठरवायचं असतं? की ती आपण नि यशामधली एक काल्पनिक लक्ष्मणरेषा असते? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी दमदार पावलं टाकावीच लागतात त्या क्षितिजाच्या दिशेनं... त्यासाठी ओळख करून घ्यावी लागते `मीपणा`ची. आता हा `मी` कोण? `कोहंम`? या गहनाचं उत्तर `सोहम` असं (आध्यात्मिक अर्थानं) असं असलं तरी ते सगळ्यांना अद्यापही सापडलेलं नाहीये... `मी` या शब्दांतच कसा शीगोशीग भरलाय अहंकाराचा वारा... `मी`पणाचा पसारा... त्यातल्या यःकश्चित जीवाचं जीवन. त्या जीवनातले काही वर्षांचे क्षण नि त्या साऱ्या क्षणांचं सामर्थ्य... हे सामर्थ्य घडवणारे किंवा बिघडवणारे श्वास... अंतर उरतं ते फक्त क्षणाचंच. एका जीवानं श्वास घ्यायचा नि एका जीवानं श्वास सोडायचा... दोघांसाठी वास्तव असतं हे आयुष्य...

कसं असतं हे आयुष्य? फारच अवघड प्रश्न... कारण त्याचा पोत कधी सारखा नसतोच. सतत विचित्रपणं बदलतो. कधी मऊसूत, कधी जाडसर, कधी बोचरा, कधी हसरा, कधी अनोखा, कधी पारखा... रंग विविध, आकार अनेक. बदलत्या रचना, गूढ अंधाऱ्या. ठाऊक नसतात पऱ्या शापित, कळत नाही त्याचं गुपित, आपणच आपलं समजून घ्यायचं हित... म्हणा तेही तेवढं सोप्पं काम नसतं. कारण असंख्य वेळा उधळतो भावनांचा कल्लोळ. मनाची गुंतागुंत आणि मन कितीही घट्ट केलं तरी उरतोच एक अतूट-अस्पष्टसा पाश. त्याचं काय करावं हा प्रश्न अद्याप वेताळालाही सुटलेला नाहीये...

तरीही भोवतालच्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर पुढंपुढं चालत राहावंच लागतं. मेहनत, परिश्रम, सातत्य, साफल्य आणि यशाच्या पायऱ्या क्रमाक्रमानं चढाव्या किंवा काहीदा उतराव्याही लागतात. त्यामुळं या चढउतारात ``ची बाधा झाली तर गडगडून जाल एकदम. म्हणून त्या ``चा कान पकडून त्याला चार हात लांबच ठेवायला हवं. ते साध्य झालं तर मग कदाचित क्षितिजापर्यंत पोहचता येईल. कारण आपण भिरकावलेला असेल `मी`पणा. उरलेले असू ते फक्त `आपण`. नव्या उमेदीनं, उत्साहानं भारावलेले... रंगीबेरंगी स्वप्नांचे गुच्छ घेऊन आणि नव्या आकांक्षांचे पंख लाभलेले... सोबत ठेवूया मोजकाच आत्मविश्वास नि चिक्कार माणूसकी... आणि हो, सकारात्मकतेच्या वलयात एकदा का शिरकाव झाला की, मग दुःखाची बरसात झेलूनही आनंदाची गाणी गायची कला आत्मसात करता येईल. कविवर्य बा. भ. बोरकरांनी म्हटलंच आहे की, `जीवन त्यांना कळले हो, मीपण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो...`


   
छायाचित्रं- जयंत कुंटे.

Sunday, 7 August 2016

मैत्रीचा कॅलिडोस्कोप


आजच्या मैत्रीदिनानिमित्त मित्रत्वाच्या भावनांचा हा रंगीबेरंगी कॅलिडोस्कोप.



मैत्री म्हणजे
स्नेहाची सावली
आशेची पालवी
एनर्जीचा आखाडा
भावनांचा गुंताडा

मैत्री म्हणजे
रुसवे फुगवे
डावे उजवे
राग लोभ
भावनांचा क्षोभ

मैत्री म्हणजे
मनाची आपुलकी
थोडीशी वडिलकी
बरीचशी दादागिरी
भावनांची कारागिरी

मैत्री म्हणजे
काही वेळा प्रौढी
काही वेळा स्वार्थी
काही वेळा दुजाभाव
भावनांचे स्वभाव

मैत्री म्हणजे
कधी आगाऊपणा
कधी चुलगखोरपणा
कधी कांगावा
भावनांचा सांगावा

मैत्री म्हणजे
भास आभासाचे डोह
वास्तव सत्याचा दाह
मनोरथांचा भारी दंगा
भावनांचा चाले पिंगा

मैत्री म्हणजे
बालपणीच्या आठवणी
तारुण्याची गाणी
मध्यमांचे तराणे
भावनांचे म्हातारणे

मैत्री म्हणजे
टोकरीतला रानमेवा
अवीट सुखठेवा
खट्टी-मिठी बोली
भावनांची बाहुली

मैत्री म्हणजे
मैत्रीसाठी शब्द अपुरे
मैत्रभाव सदा पाझरे
जिवाला जीव देणे
भावनांतले मैत्र जाणणे

मैत्री म्हणजे
जीवनाचा शोध
आयुष्याचा बोध
अविरत मग्न
भावनांतले स्वप्न...




छायाचित्र – इंटरनेटवरून साभार

Sunday, 24 July 2016

`बेस्ट` चांगुलपणा



आज एक गोष्ट सांगते. गोष्ट तशी फार ताजीताजी नाहीये. पण तेवढी शिळीपाकीही नाहीये. खरंतर ही गोष्ट सांगण्यापेक्षा दाखवता आली असती, तर `बेस्ट`च झालं असतं. पण त्या काळात आता एवढा फोन स्मार्ट झालेला नव्हता. तो खरोखरच केवळ संपर्क साधण्यापुरताच होता. तर ही गोष्ट आज आठवण्याचं कारण आज रविवार आहे, एवढं फुसकं नाहीये. आजही पाऊस पडलाय एवढंच नाहीये. काय ते सांगतेच...

रविवार सकाळ तशी आरामाचीच. तरीही काही अपरिहार्य कामास्तव घराबाहेर पडणं भागच होतं. कदाचित ही थोडी कुरकुरत सुरू झालेली मॉर्निंग गुड होण्यासाठी मग छानसा पावसाचा शिडकावा झाला. स्टॉपवर गेल्या क्षणी बस आपलीच गाडी पुढ्यात येऊन उभी राहावी, इतक्या झटपट उभी राहिली. नेहमीची चपळाई करून हवी ती विंडो सीट मिळवलीही. वाऱ्याची झुळुक येऊन गप्पा करू लागली होती. हक्काच्या सुट्टीचा वार असल्यानं सुदैवानं रस्त्यावर वाहतुकीची कोंडी अजून झाली नव्हती. ती बस मात्र यथास्थित भरलेली होती. झपाझप स्टॉप मागं पडत होते. एका मोठ्या सिग्नलला बस थांबली नि अचानक बसमधून आवाज आला, `हरी ओम् तत्सत्.` या सादेला शेजारच्या बसमधून तसाच प्रतिसाद मिळाला. म्हणजे तेवढ्यातल्या तेवढ्यात सिग्नलच्या निमित्तानं मिळालेल्या थांब्यावर आमच्या बसच्या ड्रायव्हरचा शेजारच्या बस ड्रायव्हरशी क्षणभराचा आध्यात्मिक संवाद घडला होता. तो कदाचित मागच्या गाडीवाल्याला सोसला नसावा. कारण त्याच्या गाडीचा हॉर्न कर्कश्शपणं वाजला नि आमची बस पुढं निघाली.

आता अधूनमधून घुंगुरांचाही आवाज यायला लागला होता. कंडक्टर आमच्यापर्यंत न पोहचल्यानं  आम्ही (इथं आम्ही हे `मी` आदरार्थी नव्हे. आम्ही म्हणजे मी नि माझी सहप्रवासिनी) माना वेळावून त्याच्याकडं पाहात होतो. थोडंसं निरखून पाहिलं तर काय... आपल्या पंचिंग मशीनला कंडक्टरनं घुंगरू लावले होते. (हो, एके काळी बसचं तिकिट आजच्या एवढं कोरडंठाक नि गुळगुळीत नव्हतं. ते पंच करावं लागे. काही छंदिष्ट ही तिकिटं जमवत असत.) बसच्या खडखडाटाच्या तालासोबत त्याच घुंगुरांचा नाद ऐकू येत होता. तितक्यात गुणगुणणंही ऐकू येऊ लागलं. मग स्पष्टसा स्वरच थेट उमटला, `मोगरा फुलला, मोगरा फुलला...` अख्खी बस एकमेकांच्या तोंडाकडं चमकून पाहायला लागली. कंडक्टर मात्र शांतपणं उभाच होता... रेल्वे तर रेल्वे आता बसमध्येही सकाळ सकाळी कोण शिरलंय... असा टिपिकल मध्यमवर्गीय विचार भोज्या करून गेला. मग साऱ्या नजरा आपसूकच वळल्या ड्रायव्हरकडं. एरवी ड्रायव्हर म्हटला की, राकट नि अरसिक अशा प्रतिमेलाच तडा गेला होता. या सगळ्या गलबल्यापासून दूर असणारा ड्रायव्हर त्याच्याच तंद्रीत मश्गुल होता. हे ध्यानी आल्यावर सगळ्यांच्याच नजरांमध्ये कौतुक उमटलं नि प्रवाशांनी `बेस्ट` म्हणत मनापासून दाद दिली.

आजही बाकी सारा प्रसंग तस्साच घडलाय. ड्रायव्हर-कंडक्टरची जोडी वेगळी असली, तरी आध्यात्मिक साद तीच आहे, मोगराही फुललाय. फक्त कंडक्टरजवळ इलेक्ट्रॉनिक तिकिट यंत्र आलंय. घुंगुरांचा आवाज लोपला असला तरी अध्यात्मामुळं अंगी रुजलेला चांगुलपणा तोच राहिलाय. `बेस्ट`मध्ये अजूनही `बेस्ट चांगुलपणा` शिल्लक आहे...


  

छायाचित्रं इंटरनेटवरून साभार. 

Sunday, 10 July 2016

भावानुभव


 रिमझिमता पाऊस, कोसळे सरस
नभ होती रिते, अशी भावूकता दाटे
मनामनातील चाफा, गंध त्याचा पसरला
कुंजने आमराईत ऐकावी, कोकिळ धून बसरावी
तोच अवचित पुढे सरकती, थेंबावरती अनेक थेंब
हिरवीगार झाडे झुकती, कुरुवाळीत आपुले प्रेम
लागावी मग भावसमाधी, घ्यावा पुरेसा अवधी
आपसूक होई चिंतन, विचारांचे चिक्कार मंथन
मोडतोड, तोडमोड होईल, हाती काही गवसेल
नवे शब्द, शब्दांना अर्थ
अर्थला गंध, गंधाला श्वास
श्वासाला मन, मनाला कोण
मन मातीचे, कोण्या रितीचे
मातीतून आकारला शब्द, शब्दांतून उलगडले अर्थ
अर्थाला लाभला गंध, गंधाला हवासा श्वास
श्वासास लाभले मन, मनाला हवेसे कोण
शब्द, अर्थ, गंध, श्वास, मन
चाले अखंड प्रवास सृजन
रिमझिमता पाऊस, रिमझिमता पाऊस
कोसळे सरस... कोसळे सरस...



छायाचित्रं - राधिका कुंटे


Monday, 27 June 2016

मी परतलोय...


मी परतलोय... मी परतलोय...
``असशील तसा, घरी परतून ये. आम्ही रागावणार नाही,`` अशा आशयाची तुमची आर्जवं, विनंत्या माझ्यापर्यंत पोहचल्या अखेरीस. पण त्याला कारणभूत ठरलाय तो तुमच्या डोळ्यांतला भाव. माझी खरोखरच मनापासून तुम्ही पाहिलेली वाट. गावागावातल्या बायाबापड्यांची पाण्यासाठी चाललेली वणवण आणि करपणाऱ्या शेताकडं बघूनही हातपाय न गाळणाऱ्या शेतकऱ्यांची धडपड... जनावरांच्या मुखी चार घास चारा जावा आणि खोलखोल गेलेल्या पाण्याच्या थेंबांसाठी झगडणाऱ्या नि प्रसंगी जीव गमावलेल्या लेकराबाळांसाठी... मी परतलोय...

मी परतलोय... मी परतलोय...
पण मी मुळीच परतलेलो नाहीये, सोशल मिडियावरच्या कोरड्याठाक उमाळ्यांनी. फोटोंमधलं दुष्काळी दुःख पाहून टाकलेल्या उसाशांनी... फक्त स्वतःचीच उशी भिजवणाऱ्या नि अलंकारांनी वेढलेल्या कवितांमुळं... केवळ पोकळ घोषणाबाजी आणि कागदी घोडे नाचवणाऱ्यांच्या नादाला मी मुळी लागलेलो नाही. शिवाय ते सतत कसला ना कसला इव्हेंट मॅनेज करणारे आणि ``अब वहॉं कैसे हालात हैं``... असे नको तेव्हा, नको ते सवाल करणारे आणि चर्चांची गुऱ्हाळं चालवणाऱ्यांकडं मी ढुंकूनही पाहिलेलं नाहीये... तरीही मी परतलोय...

मी परतलोय... मी परतलोय...
अस्सल खवय्यांसाठी. माझ्या येण्याच्यानिमित्तानं त्यांच्या खवळलेल्या जिभांचे चोचले पुरवण्यासाठी. तेलकट, मसालेदार, चमचमीत, खमंग, खुसखुशीत, चटकदार आदी विशेषणं त्यांना चाखता यावीत म्हणून. चहा आणि कॉफीवेड्यांना त्यांच्या लाडक्या पेयांची संगत पुन्हा पुन्हा लाभावी म्हणून. समोर चटचट भाजले जाणारे बुट्टे आणि मरीन ड्राईव्हचा किनारा अशी त्या त्या ठिकाणची कॉम्बिनेशन्स पुन्हा पुन्हा व्हावीत म्हणून... मी परतलोय...


 मी परतलोय... मी परतलोय...
पण मी मुळीच परतलेलो नाहीये, भुक्कड सेल्फी काढण्याच्या नादात जीव गमावणाऱ्यांसाठी. किंवा अपंग होणाऱ्यांसाठी. धबधब्यांत भिजताना नको ती हुल्लडबाजी करणाऱ्यांसाठी. रस्त्यावरचा चिखल बाईक किंवा मोटारीनं उडवत पादचाऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या धनदांडग्या बाळांसाठी. डोंगरांना पोखरणाऱ्यांसाठी. फांदी पडण्याची भीती दाखवून बहरलेली झाडं अमानुषपणं तोडणाऱ्यांसाठी. रस्त्यांवरचे खड्डे न बुजवणाऱ्यांसाठी आणि तरीही निमुटपणं त्याच रस्त्यांवरून चालणाऱ्यांसाठी... तरीही मी परतलोय...

मी परतलोय... मी परतलोय...
सह्याद्रीच्या कुशीत निर्धास्त तरीही सावधपणाची सावली सोबत बाळगत फिरणाऱ्यांसाठी. डोंगरदऱ्यांना आपलं मानून त्यांत भटकणाऱ्यांसाठी. गडकिल्ल्यांचा इतिहास आठवत वर्तमानात त्यांच्या जतनासाठी झगडत भविष्यासाठी त्यांना जतन करणाऱ्यांसाठी. निसर्गातल्या हिरवाईचा आनंद लुटत आणि त्यात इवल्याशा हातांनी बिया पेरून आणखी भर घालणाऱ्यांसाठी. हे सारे क्षण कॅमेऱ्यांत बंदिस्त करणाऱ्यांसाठी आणि त्यासाठी शब्द, चित्रादी असंख्य माध्यमं वापरून ते सर्वदूर पोहचवणाऱ्यांसाठी... मी परतलोय...


 मी परतलोय... मी परतलोय...
मी आल्याच्या खुशीत गाणं गुणगुणाऱ्यांसाठी. सीडीज ऐकणाऱ्यांसाठी. मैफिली भरवणाऱ्यांसाठी. शब्दांनी माझं स्वागत करणाऱ्यांसाठी. कवितांची संमेलनं भरवणाऱ्यांसाठी. माझ्या गारव्यानं पांघरूणात गुडुप्प होऊन आत्मीयतेनं पुस्तकं वाचणाऱ्यांसाठी. नृत्य-नाट्यादी कलांच्या आविष्कारासाठी... मी परतलोय... हे पाहून अंगणातली तुळस डोलू लागलेय. गाय हंबरतेय. गॅलरीतली सदाफुली तरारलेय. घरात गळती असूनही माणसं हसतमुख आहेत... ते पाहा...ते येताहेत... आज्जी-आजोबा काठी घेऊन... तरीही खंबीरपणं चिखलगाळातून वाट काढत... त्यांचे हात धरून मजेत चालली आहेत, बागडत... आणि आई-बाबा त्या चौघांना आश्वस्त करताहेत मागून चालत की, ``आम्ही आहोत तुमच्यासोबत...`` या कुणास्तव कुणीतरी गायलेल्या अनामिक सुरांनी मीही भारून गेलोय... आणि म्हणूनच मी परतलोय...
आणि हो, पुन्हा रागावून जाणार नाही, याची खबरदारी तुम्ही घ्याल अशी आशा बाळगतोय...
कारण मी परतलोय... मी परतलोय...





(छायाचित्रं – इंटरनेट आणि सोशल मिडियावरून साभार)

Sunday, 12 June 2016

अपडेटेड

आपण होताहोत क्षणाक्षणाला अपडेट
ये हैं अपडेटेड टेक्नॉलॉजी की माया...
कोसळताहेत बातम्यांचे कडे धडाधड
होताहेत फोटो अपलोड पटापट...
ढीगभर अँप्स गिळंकृत करताहेत फोन मेमरी
क्षणार्धात कळतंय कसे आहेत छोरा-छोरी...
समोरच्या माणसाला बुजलेला
प्रत्यक्ष संवादाला कुलुप लावलेला...
सोशल मिडियावर भडाभडा बोलतो
चटाचटा पोस्टून अस्तित्व दर्शवतो...
कधी गाठतो एकटेपणाची गढी
उकरतो आठवणींची मढी...
गळा काढून संस्कृतीच्या नावानं
स्वतः चालतो आपल्याच नादानं...
कधी उचलतो वेदनांची तळी
शांततेआडूनही बंदुकीची गोळी...
कधी चालवतो सर्जनावर तलवार
शब्दांतीत होतात अत्याचार...
जाणीवांचा यक्ष दडवला जातो
शैलीचं झाकण कचकचून आवळतो...
सैरभैर होतं मग मोरपीस
का त्यालाही होतेय लागण?...
कधी कोरड्या दुःखाचा फुटतो पाझर
सामाजिक बांधीलकीचा वाहतो निर्झर...
स्वच्छता, सदाचाराचे फुटतात धुमारे
वाहतात केवळ सेल्फीचेच वारे...
लाईक्स मोजता मोजता
आयुष्य होत राहातंय डिलिट
सतत पोस्टण्याच्या नादात
जगण्याची स्पेस होतेय ट्विट...
जो तो लिहितोय, फोटोतोय
व्हिडिओतोय, रिअॅक्टतोय...
कोटींतले हजारभर राहिलेत का सुजाण?
आहे का त्यांच्या विचारांची जाण?
नाही झालाय ना त्यांच्या संवेदनांचा बाजार
आहे का अजून त्यांच्या माणूसपणाचा आधार...
करो क्लिक, शोधा, सर्चा
लवकर लवकर, येईल मोर्चा...
व्हावं लागेल मग डिसकनेक्ट
कदाचित तेव्हा होऊ खरे अपडेट!!!!



U
PDATE
UPDATE
UPDATE