`मी`पण
कितीही आधुनिक साधनं निर्माण झाली तरीही, `मीपणा`चा शोध आणि त्यापासून घ्यायचा बोध ही गोष्ट अजूनही तितकीच दुर्बोध आहे...
कधीकधी थेट धावत सुटावंसं वाटतं ते क्षितिजापर्यंत...
पण ते तर सतत लांब राहातं. सतत दुरावतं. असतं ते का आभासी... की खरंच...? जीवनातल्या यशाचं
क्षितिजही असंच असतं का? तेही फसवं असतं का? की आपणच आपलं क्षितिज ठरवायचं असतं? की ती आपण नि
यशामधली एक काल्पनिक लक्ष्मणरेषा असते? या साऱ्या प्रश्नांची
उत्तरं मिळवण्यासाठी दमदार पावलं टाकावीच लागतात त्या क्षितिजाच्या दिशेनं... त्यासाठी
ओळख करून घ्यावी लागते `मीपणा`ची. आता
हा `मी` कोण? `कोहंम`? या गहनाचं उत्तर `सोहम` असं (आध्यात्मिक अर्थानं) असं असलं तरी ते सगळ्यांना अद्यापही सापडलेलं
नाहीये... `मी` या शब्दांतच कसा
शीगोशीग भरलाय अहंकाराचा वारा... `मी`पणाचा
पसारा... त्यातल्या यःकश्चित जीवाचं जीवन. त्या जीवनातले काही वर्षांचे क्षण नि
त्या साऱ्या क्षणांचं सामर्थ्य... हे सामर्थ्य घडवणारे किंवा बिघडवणारे श्वास... अंतर
उरतं ते फक्त क्षणाचंच. एका जीवानं श्वास घ्यायचा नि एका जीवानं श्वास सोडायचा...
दोघांसाठी वास्तव असतं हे आयुष्य...
कसं असतं हे आयुष्य? फारच अवघड प्रश्न... कारण
त्याचा पोत कधी सारखा नसतोच. सतत विचित्रपणं बदलतो. कधी मऊसूत, कधी जाडसर, कधी
बोचरा, कधी हसरा, कधी अनोखा, कधी पारखा... रंग विविध, आकार अनेक. बदलत्या रचना,
गूढ अंधाऱ्या. ठाऊक नसतात पऱ्या शापित, कळत नाही त्याचं गुपित, आपणच आपलं समजून
घ्यायचं हित... म्हणा तेही तेवढं सोप्पं काम नसतं. कारण असंख्य वेळा उधळतो
भावनांचा कल्लोळ. मनाची गुंतागुंत आणि मन कितीही घट्ट केलं तरी उरतोच एक
अतूट-अस्पष्टसा पाश. त्याचं काय करावं हा प्रश्न अद्याप वेताळालाही सुटलेला
नाहीये...
तरीही भोवतालच्यांच्या पाठिंब्याच्या
जोरावर पुढंपुढं चालत राहावंच लागतं. मेहनत, परिश्रम, सातत्य, साफल्य आणि यशाच्या
पायऱ्या क्रमाक्रमानं चढाव्या किंवा काहीदा उतराव्याही लागतात. त्यामुळं या
चढउतारात `ग`ची बाधा झाली तर गडगडून जाल एकदम. म्हणून त्या `ग`चा कान पकडून त्याला चार हात लांबच ठेवायला हवं. ते साध्य झालं तर मग
कदाचित क्षितिजापर्यंत पोहचता येईल. कारण आपण भिरकावलेला असेल `मी`पणा. उरलेले असू ते फक्त `आपण`. नव्या उमेदीनं, उत्साहानं भारावलेले... रंगीबेरंगी स्वप्नांचे गुच्छ
घेऊन आणि नव्या आकांक्षांचे पंख लाभलेले... सोबत ठेवूया मोजकाच आत्मविश्वास नि
चिक्कार माणूसकी... आणि हो, सकारात्मकतेच्या वलयात एकदा का शिरकाव झाला की, मग
दुःखाची बरसात झेलूनही आनंदाची गाणी गायची कला आत्मसात करता येईल. कविवर्य बा. भ.
बोरकरांनी म्हटलंच आहे की, `जीवन त्यांना कळले हो, मीपण
ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो...`
छायाचित्रं- जयंत कुंटे.
No comments:
Post a Comment