Sunday, 24 July 2016

`बेस्ट` चांगुलपणा



आज एक गोष्ट सांगते. गोष्ट तशी फार ताजीताजी नाहीये. पण तेवढी शिळीपाकीही नाहीये. खरंतर ही गोष्ट सांगण्यापेक्षा दाखवता आली असती, तर `बेस्ट`च झालं असतं. पण त्या काळात आता एवढा फोन स्मार्ट झालेला नव्हता. तो खरोखरच केवळ संपर्क साधण्यापुरताच होता. तर ही गोष्ट आज आठवण्याचं कारण आज रविवार आहे, एवढं फुसकं नाहीये. आजही पाऊस पडलाय एवढंच नाहीये. काय ते सांगतेच...

रविवार सकाळ तशी आरामाचीच. तरीही काही अपरिहार्य कामास्तव घराबाहेर पडणं भागच होतं. कदाचित ही थोडी कुरकुरत सुरू झालेली मॉर्निंग गुड होण्यासाठी मग छानसा पावसाचा शिडकावा झाला. स्टॉपवर गेल्या क्षणी बस आपलीच गाडी पुढ्यात येऊन उभी राहावी, इतक्या झटपट उभी राहिली. नेहमीची चपळाई करून हवी ती विंडो सीट मिळवलीही. वाऱ्याची झुळुक येऊन गप्पा करू लागली होती. हक्काच्या सुट्टीचा वार असल्यानं सुदैवानं रस्त्यावर वाहतुकीची कोंडी अजून झाली नव्हती. ती बस मात्र यथास्थित भरलेली होती. झपाझप स्टॉप मागं पडत होते. एका मोठ्या सिग्नलला बस थांबली नि अचानक बसमधून आवाज आला, `हरी ओम् तत्सत्.` या सादेला शेजारच्या बसमधून तसाच प्रतिसाद मिळाला. म्हणजे तेवढ्यातल्या तेवढ्यात सिग्नलच्या निमित्तानं मिळालेल्या थांब्यावर आमच्या बसच्या ड्रायव्हरचा शेजारच्या बस ड्रायव्हरशी क्षणभराचा आध्यात्मिक संवाद घडला होता. तो कदाचित मागच्या गाडीवाल्याला सोसला नसावा. कारण त्याच्या गाडीचा हॉर्न कर्कश्शपणं वाजला नि आमची बस पुढं निघाली.

आता अधूनमधून घुंगुरांचाही आवाज यायला लागला होता. कंडक्टर आमच्यापर्यंत न पोहचल्यानं  आम्ही (इथं आम्ही हे `मी` आदरार्थी नव्हे. आम्ही म्हणजे मी नि माझी सहप्रवासिनी) माना वेळावून त्याच्याकडं पाहात होतो. थोडंसं निरखून पाहिलं तर काय... आपल्या पंचिंग मशीनला कंडक्टरनं घुंगरू लावले होते. (हो, एके काळी बसचं तिकिट आजच्या एवढं कोरडंठाक नि गुळगुळीत नव्हतं. ते पंच करावं लागे. काही छंदिष्ट ही तिकिटं जमवत असत.) बसच्या खडखडाटाच्या तालासोबत त्याच घुंगुरांचा नाद ऐकू येत होता. तितक्यात गुणगुणणंही ऐकू येऊ लागलं. मग स्पष्टसा स्वरच थेट उमटला, `मोगरा फुलला, मोगरा फुलला...` अख्खी बस एकमेकांच्या तोंडाकडं चमकून पाहायला लागली. कंडक्टर मात्र शांतपणं उभाच होता... रेल्वे तर रेल्वे आता बसमध्येही सकाळ सकाळी कोण शिरलंय... असा टिपिकल मध्यमवर्गीय विचार भोज्या करून गेला. मग साऱ्या नजरा आपसूकच वळल्या ड्रायव्हरकडं. एरवी ड्रायव्हर म्हटला की, राकट नि अरसिक अशा प्रतिमेलाच तडा गेला होता. या सगळ्या गलबल्यापासून दूर असणारा ड्रायव्हर त्याच्याच तंद्रीत मश्गुल होता. हे ध्यानी आल्यावर सगळ्यांच्याच नजरांमध्ये कौतुक उमटलं नि प्रवाशांनी `बेस्ट` म्हणत मनापासून दाद दिली.

आजही बाकी सारा प्रसंग तस्साच घडलाय. ड्रायव्हर-कंडक्टरची जोडी वेगळी असली, तरी आध्यात्मिक साद तीच आहे, मोगराही फुललाय. फक्त कंडक्टरजवळ इलेक्ट्रॉनिक तिकिट यंत्र आलंय. घुंगुरांचा आवाज लोपला असला तरी अध्यात्मामुळं अंगी रुजलेला चांगुलपणा तोच राहिलाय. `बेस्ट`मध्ये अजूनही `बेस्ट चांगुलपणा` शिल्लक आहे...


  

छायाचित्रं इंटरनेटवरून साभार. 

No comments:

Post a Comment