Sunday, 6 September 2015

बिंब प्रतिबिंब

परवा एक चित्र शेअर केलं बहिणीनं व्हॉटस् अँपवर. भाचीनं काढलं होतं. चित्राचं शीर्षक होतं `नेचर ड्रॉइंग`. सूर्याचं चित्र. खरंतर एका परीनं बिंब-प्रतिबिंबाची चित्रातली जुगलबंदीच. म्हणजे तिनं ते जस्ट ड्रॉइंग म्हणून काढलं असण्याची शक्यताच शंभर टक्के, पण आपले विचार काय एकदा सुचले की, कसे सुस्साट धावायला सुरूवात होते नाही का... हे तर चित्र... चित्रकार नि आपल्या कल्पनाशक्तीचा मुक्त संचार... त्यातही हे पाण्यात पडलेलं प्रतिबिंब... त्या प्रवाहाच्या तरंगांना विचारांनीही फॉलो करायला सुरूवात केली...
****
चटकन आठवलं, शाळेत असताना वाचलेलं `बिंब-प्रतिबिंब` हे चंद्रकांत खोतलिखित पुस्तक. स्वामी विवेकानंदांवरची आत्मचरित्रपर कादंबरी. पुस्तकाच्या मलपृष्ठावर खोत यांनी लिहिलंय की, ``बिंब प्रतिबिंब हे नाव ज्ञानेश्वरांनी सुचवलं. ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात एक ओवी आहे – उटूनि दोन्ही आरसे। वोडलिया सरिसे। कोण कोणा पाहतसे। कल्पावें पां?।... श्रीरामकृष्ण आणि विवेकानंद हे एकमेकांसमोर ठेवलेले दोन स्वच्छ, निष्कलंक आरसेच नाहीत काय? किंवा एकमेकांच्या जवळ ठेवलेले दोन दिवेच. कोणत्या दिव्यानं कोणता दिवा लावला हे सांगता येऊ नये, अशा प्रकारचे.`` या आदर्श गुरुशिष्यांबद्दल आणिक काय लिहावे...
****
कालच केलं गेलं ते शिक्षकदिनाचं मोठ्ठं सेलिब्रेशन. शिक्षकांबद्दलच्या आदरभावनेपासून ते थोडीशी त्यांची थट्टा करण्यापर्यंतच्या पोस्ट शेअर केल्या गेल्या. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरपासून ते आपल्यासारख्या सामान्यांचे शिक्षकांसोबतचे फोटो धडाधड अपलोड केले गेले. त्यातले काही शिष्यांनी तर काही खुद्द शिक्षकांनीच शेअर केले. तेही फोटो एका परीनं बिंब-प्रतिबिंब म्हणावेत का? त्या फोटोंतून शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचा वसा पुढं चालवणारी पिढी खरंच घडेल का? या काचं उत्तर व्यक्तिसापेक्ष असलं तरीही शिक्षक-विद्यार्थ्यांच्या नात्यामध्ये असणारा यथायोग्य विश्वासाचं नातं कायम फुलत राहावं... ते कधी कोमेजू नये...
****
कालच होती जन्माष्टमी. कृष्णम् वंदे जगद्गुरू. अवघ्या जगाच्या गुरुस्थानी असणाऱ्या श्रीकृष्णाचा शिष्य अर्जुन तितकाच समर्थ धनुर्धर. `कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका,` हा कृष्णानं तेव्हा केलेला उपदेश आजच्या घडीला फॉलो करण्यासारखा आहे. किंबहुना अर्जुनानं तो तसा फॉलो केलाही. बिंब-प्रतिबिंबाचा आविष्कार म्हणावा अशी ही गुरु-शिष्य नि प्रसंगी मित्रत्वाचं नातं असलेली जोडी. आपण मात्र त्यातून योग्य तो काळानुरुप बोध न घेता केवळ गीतेचे श्लोक पठण करत राहिलो आहोत... आपल्याला शक्य असणारी सकारात्मक कृती करण्याची वेळ प्रत्यक्षात येणार कधी? का अजूनही कृष्णाच्या अवताराची वाट बघत थांबायचंय? आपण सारेच `कृष्ण`चं किमना प्रतिबिंब तरी होऊ शकतो का?
****
तुर्कस्तानच्या किनाऱ्यावर चिमुकल्या आयलानच्या पालथ्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा फोटो सोशल मीडियावर `व्हायरल` झाला नि सारं जग हेलावून गेलं... मती कुंठित झाली. पाठोपाठ दुःख, संताप, हतबलता, असहाय्यतेची जणू लाटच उसळली... युरोपातल्या स्थलांतरितांच्या लोंढ्याचं भीषण नि जळजळीत वास्तव या फोटोच्या माध्यमातून समोर आलं. त्या लाटांच्या प्रवाहात पडलेल्या आयलानच्या चिमुकल्या डोळ्यांतल्या स्वप्नांचं प्रतिबिंब कुठं शोधायचं आता? त्याच्या बाळमुठीतल्या आशेच्या पाकोळ्या कुठल्या कडेकपारीत उडाल्यात? त्याच्या मृतदेहाच्या कारणांच्या बिंबाशी जायचा प्रयत्न नि ही समस्या मुळापासून निवारायचा  खरोखर प्रयत्न होईल का?
****
सुस्साटलेले विचार काळोखी अंधाऱ्या प्रतिमांच्या लाटांवर स्वार असतानाच व्हॉटस् अँपवर खुद्द भाचीचाच कॉल आला. ``मावशी, कसं वाटलं ग, माझं चित्र?`` या पाचवीतल्या मुलीला हे एवढं सगळं विचारांचं महाभारत थोडीच ऐकवू शकणार होते? तिला आपलं म्हटलं, ``छानच आहे ग`` नि बाकीच्या आमच्या नेहमीच्या गप्पाटप्पा केल्या. फोन ठेवल्यावर पुन्हा एकदा त्या चित्राकडं पाहिलं. सूर्य होताच चित्रात. आता तो मावळता की उगवता... हे एकदा पक्कं ठरवायला हवं होतं. त्यावरून मग त्याचा प्रकाशही ठरणार होता. संधीप्रकाश की जगतप्रकाश... त्यावरून भोवतालाचं वर्णन करावं लागणार होतं. गडद होणाऱ्या अंधारात लपून जाणाऱ्या डोंगरदऱ्या की उजेडाचा वसा घेऊन उर्जेनं भारलेल्या दऱ्याखोऱ्या... शेकडो नकारांनी वठलेलं झाड की सकाराच्या होकारांनी वठलेल्या झाडाला फुटू पाहाणारी पालवी... नेचर ड्रॉइंग की फिलॉसॉफिकल थॉट... बिंब की प्रतिबिंब...

चित्रकार – शची जोगळेकर 

1 comment:

  1. Tasa pahile tar khup vegle vishay aahet sagle, pan tu Khup sunder connect kela aahes saglyanna.. Khup ch sunder..

    ReplyDelete