Saturday, 12 September 2015

बाळांनो...

आज दिवसभर मातृदिनाची महती गाणारे  मेसेजेस  नि फोटोज शेअर केले जाताहेत. मातृदिन नि बहुतांशी वेळा श्रावणी शनिवारचं अतूट असणारं समीकरण... या समीकरणाशी आपसूकच जोडली गेल्येय ती `त्यांची` आठवण... ``बाळांनो...`` अशी प्रसन्न चित्तानं नि धीरगंभीर आवाजात घातलेली साद... त्यानंतरचं `त्यांचं` ते थोडंसा पॉझ घेऊन बोलणं... दरवर्षी मातृदिनाला त्यांनी अतिशय आत्मीयतेनं सांगितलेली `दिनूचं बिल` ही गोष्ट आणि `नंतर मिळणारा खाऊ आठवणीनं आईला द्या,` असं `त्यांचं` सांगणं... त्यावर आम्ही विद्यार्थांनी आज्ञाधारकपणं डोलावलेल्या माना.. सगळं कसं आत्ता लख्खपणं आठवतंय...

`बालमोहन विद्यामंदिर` आणि `बापूसाहेब रेगे` हे एक अतूट समीकरण. शिक्षणमहर्षी दादासाहेब रेगे यांच्या शिक्षणपध्दतीचा वसा बापूसाहेबांनी समर्थपणं सांभाळला. अर्थात हे आता कळतंय. कारण तेव्हा `आपली शाळा` नि `आपण विद्यार्थी` एवढंच डोक्यात फिट्ट होतं. वेळोवेळी होणाऱ्या कार्यक्रमांच्या वेळी त्यांनी आमच्याशी साधलेला संवाद नि त्यांचं आम्हाला समजून घेणं, हे तेव्हा आम्हाला बोअर वाटलं असलं, तरी ते तेव्हा आवश्यकच होतं... सगळं कसं आत्ता लख्ख आठवतंय...

गोकुळाष्टमी असो, ध्वजवंदन असो, हस्तलिखितांचं प्रकाशन असो किंवा साधी डॉक्टरी तपासणी... त्या त्या वेळी `त्यांचं` तिथं उपस्थित असणंच खूप खूप आश्वासक वाटायचं. दहावीच्या सेंडऑफच्या वेळी आलेलं रडू आपण हे सगळं `मिस् करणार` म्हणून होतं... नि कदाचित आत कुठंतरी हे आश्वासक व्यक्तिमत्व आपल्याला सतत दिसणार नाही, ही जाणीवही झाली असावी... सगळं कसं आता लख्ख आठवतंय...

शाळेची पायरी ओलांडून व्यावहारिक जगाला सामोरं जाताना शाळा नि तिचे संस्कार कधीच दूर गेले नाहीत. `बालमोहन` या शब्दांची सकारात्मक जादू नि उर्जा ठायीठायी जाणवत गेली. काही ना काही निमित्तानं शाळेत जायची संधी शोधायची नि त्या उबदार वातावरणाचा आपलेपणा अनुभवायचा... दादांच्या पुतळ्यासमोरच्या पायरीला नमस्कार करतांना शाळेतला बापूसरांचा वावर आश्वस्त करणारा होता... सगळं कसं आत्ता लख्ख आठवतंय...

शाळेचे मूल्यसंस्कार नि तिथं मिळालेल्या ज्ञानकणांची शिदोरी बापूसरांच्यामार्फत आमच्यापर्यंत पोहचली. वयपरत्वे शरीर थकत चाललं तरी शिक्षणक्षेत्रात अविरत कार्य करण्याची उर्मी बापूसरांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी आखलेल्या विविध योजनांतून, पुस्तकांतून ते प्रतिबिंबित होत होतं... आणि अखेर तो क्षण आलाच... आठवणींचा कँलिडोस्कोप झरझर डोळ्यासमोरुन फिरु लागला. ``बाळांनो...`` अशी हाक आता पुन्हा कधी ऐकू येणार नाही. हे खरंय... पण `त्या हाके`चा कानोसा घेतला तर त्यातून रुजलेले संस्कार नि माणूसपण हे प्रत्येक `बालमोहनकरां`त आढळेल... हीच खरी त्यांना श्रध्दांजली ठरेल... सगळं कसं आत्ता लख्ख आठवतंय...


  
(छायाचित्र साभार – आम्ही बालमोहनकर– फेसबुक पेज–प्रणिल हातिसकर)

No comments:

Post a Comment