Sunday, 20 September 2015

ॐकार स्वरुपा...


 

ॐकाराचे ध्यान ते
पाहूनी मन हरखते
सिद्धिविनायकाच्या शिरी
शिरपेच भक्तीचा शोभतो भारी

श्रीगजाननाचे हाती
शंख, चक्र, गदा, मोदक विलासती
लंबोदर, पीतांबर
असं हे स्वरुप सुंदर

गजराजाचे मुख
गणांचे ते सुख
असा जो गणेश
गणांचा तो धीश

विद्येच्या या देवतेची करू प्राणप्रतिष्ठा
नमन करूनी अर्पावी श्रद्धा नि निष्ठा
वहावी ती दुर्वांची जुडी नि जास्वंद
प्रसाद मोदकाचा घ्यावा आनंद

जे याच्या चरणी लीन होती
साऱ्या विवंचना दूर जाती
असे हे भव्यदिव्य ॐकाराचे स्वरुप
युगेयुगे बघतचि रहावे हे अलौकिक रुप

काल जुन्या वह्या सापडल्या खणाच्या तळात हरवलेल्या. त्या चाळताना दिसली ही कविता. १९९५मध्ये केलेली, शाळेत असताना. वाचता वाचता आठवलं तेव्हा झालेलं कोडकौतुक. एका छोटेखानी वृत्तपत्रात ती छापूनही आली होती. बाबाच्या ऑफिसमधल्या मासिकातही आली होती. आपलं `नाव छापून येणं` तेही आपल्या लाडक्या बाप्पाच्या कवितेमुळं हे फारच भारी वाटलं होतं तेव्हा... आत्ताच्या `फेसबुकी` भाषेत सांगायचं तर `फिलिंग ब्लेस्ड.` आणखी एक गोष्ट जाणवली की, तेव्हाही बाप्पा साध्याच रुपातला भावला होता. `विद्येची देवता` म्हणून त्याचा उल्लेख केला होता. कदाचित त्यावेळी पाठांतराचा भाग असणाऱ्या `श्रीगणपती स्तोत्र` नि `अथर्वशीर्षा`चा तो परिणाम असू शकेल.

(चित्र – राधिका कुंटे)

पुढं माझ्या क्षमतेनुसार केलेलं काहीबाही वाचन, ऐकणं-पाहाणं, संवाद-चर्चा यांचं परिणाम स्वरुप असेल, अनेक माध्यमांतून `बाप्पा जाणवू लागला`... कधी स्वतःच काढलेल्या चित्रांमधून... कधी `गणाधीशाय धीमही`सारख्या गाण्यांतून... कधी `काळाघोडा फेस्टिव्हल`मध्ये मांडलेल्या कलाकारांच्या गणशेफ्रेम्समधून... कधी `गणेशा एक मोनोग्राफ ऑन द एलिफंट फेस्ड गॉड` या अँलिस गेटी यांच्या पुस्तकाचा `विश्वात्मका देवा तूचि गणेशा` या डॉ. म. ल. वझे यांनी केलेला अनुवाद वाचून... कुठं मैत्रिणींसोबत पाहिलेल्या ज्येष्ठ चित्रकार सुभाष अवचट यांच्या गणेशचित्रांच्या प्रदर्शनातून... कधी कुणासोबत घराघरांतल्या गणेशोत्सावाच्या पद्धतींबद्दलच्या गप्पाटप्पांतून... कधी ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांच्या लाईव्ह रेखाटनातून दिसलेला वाड्याच्या चौकटीतला गणेश... कधी मूर्तीकारांच्या मुलखातींतून साकारणारा... काही वेळा बातमीदारी करताना मोठाल्या मंडळांच्या गणपतींपासून ते शतकी वाटचाल चाललेल्या घरगुती गणेशांचं दर्शन घेताना... विविध क्षेत्रांतील सेलेब्रेटींच्या गणपतींविषयीच्या मनोगतांना शब्दांकित करताना... ऑफिसमधल्या गणपतींपासून ते मैत्रिणींच्या घरच्या गणपतींपर्यंत... `आपल्या घरी गणपती नाही` ही लहानपणी कुठंतरी वाटणारी खंत बाजूला सारून, वेळोवेळी निरनिराळ्या प्रकारच्या गणेशमूर्ती हौसेनं जमवताना... त्यामुळं आकारलेल्या गणेश कॉर्नरला जपताना... तरुणाईच्या गणेशोत्सावाविषयीच्या भावना मांडताना नि त्यांनी गणेशोत्सवाच्या निमित्तानं उचललेल्या चांगल्या पावलांचा कानोसा लेखांतून प्रतिबिंबित करताना...


म्हटलं तर या कॅलिडेस्केपमधल्या कितीतरी गोष्टी प्रत्यक्षात दिसताहेत, काही ठळक, काही पुसटशा... काहींना सीमारेषा, काही क्षितिजासारख्या... काही सतत विचार करायला लावणाऱ्या... यातला `मी` वगळला तर थोड्याफार फरकानं `आपण` सगळेच गणपतीबद्दल काही ना काही विचार-आचार करत असूच. तसं पाहायला गेलं तर `आपण` कोण हो `त्याचा` विचार करणारे? `तोच` तर विचार करायला लावणारा आहे का? खरंच?... `त्याच्या` मूर्तीबद्दल वेळोवेळी लिहून आलंय. ``समोरच्याचं ऐकून घेणं, कमी बोलणं, क्षमाशील असणं, शांत स्वभाव, चिंतनशीलता, प्रसंगी आक्रमकता आणि सगळ्यांच्या पाठीशी विचारपूर्वक खंबीरपणं उभं राहाणं,`` हे सारेसारे गुण त्यातून प्रतीत होतात. आजच्या कॉर्पोरेट ट्रेनिंग्जमध्ये यापेक्षा काय वेगळं शिकवलं जातं? आपण सोशल मिडियाचा वापर करणाऱ्या साऱ्यांनी हेही `फॉलो` करायलाच हवं... `मी`पणातून बाहेर पडून `आपण सारे मिळून` या वृत्तीत वेळीच शिरलो, तर पुष्कळशा गोष्टी साध्य होतात, हेच तर गणेशोत्सवातून आपसूकपणं शिकवलं जातंय... अशा वेळी गणेशाचं `ॐकार स्वरुप` पुन्हा एकदा जाणवू लागतं... त्यातली `सकारात्मक उर्जा` नकळतपणं आपल्यात सामावायला लागते नि तीच आपल्या कामांत उमटू लागते... मग ते `ॐकार स्वरुप` कायमचंच आपलंसं होऊन जातं... कारण... गणपती बाप्पा मोरया...

(चित्र – राधिका कुंटे)

No comments:

Post a Comment