`जाणं`
आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन... श्रीगणेशाच्या
विसर्जनाचा सोहळा मोठ्या थाटामाटात चाललंय. वाद्यकल्लोळांचा धूमाकुळ, फटाक्यांचा धमाका नि जल्लोषासोबतच अधूनमधून पाणावणारे डोळेही... `पुढच्या वर्षी लवकर या`, या घोषणांचा पाऊस नि
गणपतीचा प्रतीकात्मक आशीर्वाद मिळाल्यानं मानसिक हुरुप येऊन पुढच्या कामाला अधिक
जोमानं लागण्याची अनेकांची मानसिकता... गजाननाचं `देव` असूनही विसर्जित होणं, `पुढल्या वर्षी`चं येणं पक्कं असणं नि तरीही जिवाला वाटणारी हुरहुर... `गणेशोत्सव दरवर्षी साजरा होणार` हे माहिती असूनही ते
बाप्पांचं विसर्जन जिवाला कासावीस करतं... मग कायम आपल्या जवळ असणारं चालतं-बोलतं
माणूस जातं, तेव्हा त्या मागं उरलेल्या जिवाचं काय होतं...
त्याच्या अवघ्या भावविश्वाचं जणू होत्याचं नव्हतं होतं... त्या एका `जाण्या`नं...
`जाणं` ही म्हटलं तर केवळ एक क्रिया. माणूस
किंवा खरंतर सजीव प्राणी अमूक ठिकाणहून तमूक ठिकाणी `गेला`. खरंतर `गेला` हा
शब्दही वैशिष्ट्यपूर्णच. `गेला` म्हणजे `नुसता गेला` किंवा `गेला`... म्हणजे
त्याचा मृत्यू झाला... ``माझे आजोबा गेले,`` हे चौथीत वर्गात सांगावं लागलं होतं नि त्याचा अनेक मैत्रिणींना काहीच
उलगडा झाला नव्हता. `गेले` म्हणजे
त्यांना वाटलं होतं की, कुठं बाहेरगावी `गेले` की काय... मी तरी त्यांना काय सांगणार
होते? कारण ते खरंच कुठं `गेलेत`,
हे मला तरी कुठं माहिती होतं. कारण भोवताली कुणी `गेलं` तरी त्याची थेट झळ आपल्याला पोहचत नसते.
ते गंभीर वातावरण. ती `शेवटची तयारी` नि `रामनाम`... या
सगळ्याबद्दल लहानपणी असतं ते केवळ भयमिश्रित कुतुहल... `मृत्यू` नावाच्या गोष्टीचं... तशीच माझी गत
होती. आजोबा आता आपल्यासोबत नसणार, एवढंच तेव्हा उमगलं होतं.
कालमानानुसार, या `जाण्या`विषयीच्या जाणीवा बदलत राहिल्या... ते भय
मागं पडलं, कुतुहलाची जागा माहितीनं घेतली. मृत्यू म्हणजे
जीवित प्राण्याच्या जीवनात येणारी अपरिहार्य पायरी. मृत्यूनंतर शरीराचं कार्य
थांबतं नि प्राणी निष्क्रिय होतो. मृत्यूनंतर शरीराचं हळूहळू विघटन होण्यास
सुरूवात होते. जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाला मृत्यू येणं नि तो `जाणं` ही गोष्ट शंभर टक्के सत्यच. ढोबळमानानं
मृत्यूविषयी दृष्टिकोन दिसतात ते वैद्यकीय, धार्मिक नि
आध्यात्मिक. शिवाय प्रत्येकाच्या मतानुरुप, परिस्थितीनुरुप
नि देशकालमानानुसार बदणारी मतं वेगळीच. कोणतं मत खरं नि कोणतं खोटं किंबहुना
खऱ्या-खोट्याच्या कसोट्यांचे निकष लावून त्या तपासून बघायला आपल्यासारख्या
सामान्यांना वेळ असतो? कुठं मग आपण सोईस्कररित्या एखादं
मत तयार करतो किंवा मग एखादं सोईचं असणारं मत चक्क `फॉलो` करतो.
गणेशोत्सवापाठोपाठ येतोय `पितृपंधरवडा` नि मग नवरात्रोत्सव. सुखाच्या लहरींसोबत दुःखंही वाटून घ्यायला शिका,
हे आपल्या आधीच्या पिढ्यांना सांगायचं असावं का?... या काळात आपल्याच पूर्वजांचं स्मरण करायचं असेल तर मग हा काळ अशुभ कसा
काय? उलट त्यांनी केलेले सुसंस्कार, बसवून दिलेली जगण्याची घडी आठवून, त्यांच्या
चांगल्या पावलांवर पाऊल टाकून चालायची ही किती मोठी संधी आहे, आपल्यासाठी! हा विचार प्रत्यक्षात आणणारेही
काहीजण आहेतच. केवळ धार्मिक कार्य करण्यापेक्षा गरजूंना विनामूल्य शिकवणं, गरीबांना अन्नदान करणं, ग्रंथालयाला देणगी देणं,
समाजसेवी संस्थांना आर्थिक मदत करणं, अंध आणि
मूकबधिर बांधवांना सक्रिय मदत करणं ही झाली केवळ वानगीदाखल उदाहरणं. यात तुम्ही
तुमच्या विचारांनी वेगळे उपक्रम राबवू शकताच.
पूर्वजांचं स्मरण करणं ही गोष्ट चांगलीच. पण माणूस जिवंत
असताना त्याला चांगली वागणूक देणं ही सर्वाधिक चांगलं. कारण मृत्यूला वय ही गोष्ट
अजिबात कधीच मान्य नसते. त्यामुळं मग मरणासन्न अवस्थेत वयोवृद्ध माणूस असू शकतो
तसाच तरणाताठा माणूस किंवा अगदी अजाण बालकही असू शकतं. अनेक वेळा मृत्यू बेसावधपणं
गाठून वार करू शकतो. त्याच्या त्या तडाख्यानं आपण घायाळ होतो. दुःखी होतो. पण
दुःखाला कवटाळून बसणं, ही फारशी शहाणपणाची गोष्ट नाही. ते त्या `जात्या जिवा`लाही आवडणारं नसतं. केवळ व्याकूळ होऊन
जगण्यात कोणता शहाणपणा आहे? अर्थात काही वेळा या गोष्टी
सांगायला-बोलायला ठीक असतात, पण त्या आचरणं कठीण असतं,
हेही माहित असतं, पण ते `फॉलो` करायला हवंच. जन्म-मृत्यू या गोष्टी
आपल्या हाती नसतात, हे उघड सत्य मान्य करायला हवं. तो जगाचा
नियम आहे. जगाचा आरंभ, लय आणि विलय ही गती कायम राहणारेय.
त्यात बदल होणं नाही... बीज अंकुरले, रोप वाढले, पाना-फुलं-फळांनी बहरलं, शुष्क झालं नि पुन्हा पालवी
फुटली... हा `निसर्गाचा रोलर कोस्टर` आपल्यालाही लागू होतोच... तेव्हा हे `येणं` नि `जाणं` या मधोमध
असणारं आयुष्य सकारात्मकतेनं नि माणूस म्हणून जगून घ्यायला हवं... म्हणजे मग आपलं `जाणं` अर्थगर्भ होईल.
छायाचित्र
– इंटरनेटवरून साभार.
No comments:
Post a Comment