Sunday, 27 September 2015

`जाणं`

आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन... श्रीगणेशाच्या विसर्जनाचा सोहळा मोठ्या थाटामाटात चाललंय. वाद्यकल्लोळांचा धूमाकुळ, फटाक्यांचा धमाका नि जल्लोषासोबतच अधूनमधून पाणावणारे डोळेही... `पुढच्या वर्षी लवकर या`, या घोषणांचा पाऊस नि गणपतीचा प्रतीकात्मक आशीर्वाद मिळाल्यानं मानसिक हुरुप येऊन पुढच्या कामाला अधिक जोमानं लागण्याची अनेकांची मानसिकता... गजाननाचं `देवअसूनही विसर्जित होणं, `पुढल्या वर्षी`चं येणं पक्कं असणं नि तरीही जिवाला वाटणारी हुरहुर... `गणेशोत्सव दरवर्षी साजरा होणार` हे माहिती असूनही ते बाप्पांचं विसर्जन जिवाला कासावीस करतं... मग कायम आपल्या जवळ असणारं चालतं-बोलतं माणूस जातं, तेव्हा त्या मागं उरलेल्या जिवाचं काय होतं... त्याच्या अवघ्या भावविश्वाचं जणू होत्याचं नव्हतं होतं... त्या एका `जाण्या`नं...

`जाणंही म्हटलं तर केवळ एक क्रिया. माणूस किंवा खरंतर सजीव प्राणी अमूक ठिकाणहून तमूक ठिकाणी `गेला`. खरंतर `गेलाहा शब्दही वैशिष्ट्यपूर्णच. `गेलाम्हणजे `नुसता गेलाकिंवा `गेला`... म्हणजे त्याचा मृत्यू झाला... ``माझे आजोबा गेले,`` हे चौथीत वर्गात सांगावं लागलं होतं नि त्याचा अनेक मैत्रिणींना काहीच उलगडा झाला नव्हता. `गेलेम्हणजे त्यांना वाटलं होतं की, कुठं बाहेरगावी `गेलेकी काय... मी तरी त्यांना काय सांगणार होतेकारण ते खरंच कुठं `गेलेत`, हे मला तरी कुठं माहिती होतं. कारण भोवताली कुणी `गेलंतरी त्याची थेट झळ आपल्याला पोहचत नसते. ते गंभीर वातावरण. ती `शेवटची तयारीनि `रामनाम`... या सगळ्याबद्दल लहानपणी असतं ते केवळ भयमिश्रित कुतुहल... `मृत्यूनावाच्या गोष्टीचं... तशीच माझी गत होती. आजोबा आता आपल्यासोबत नसणार, एवढंच तेव्हा उमगलं होतं.

कालमानानुसार, या `जाण्या`विषयीच्या जाणीवा बदलत राहिल्या... ते भय मागं पडलं, कुतुहलाची जागा माहितीनं घेतली. मृत्यू म्हणजे जीवित प्राण्याच्या जीवनात येणारी अपरिहार्य पायरी. मृत्यूनंतर शरीराचं कार्य थांबतं नि प्राणी निष्क्रिय होतो. मृत्यूनंतर शरीराचं हळूहळू विघटन होण्यास सुरूवात होते. जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाला मृत्यू येणं नि तो `जाणंही गोष्ट शंभर टक्के सत्यच. ढोबळमानानं मृत्यूविषयी दृष्टिकोन दिसतात ते वैद्यकीय, धार्मिक नि आध्यात्मिक. शिवाय प्रत्येकाच्या मतानुरुप, परिस्थितीनुरुप नि देशकालमानानुसार बदणारी मतं वेगळीच. कोणतं मत खरं नि कोणतं खोटं किंबहुना खऱ्या-खोट्याच्या कसोट्यांचे निकष लावून त्या तपासून बघायला आपल्यासारख्या सामान्यांना वेळ असतोकुठं मग आपण सोईस्कररित्या एखादं मत तयार करतो किंवा मग एखादं सोईचं असणारं मत चक्क `फॉलोकरतो.

गणेशोत्सवापाठोपाठ येतोय `पितृपंधरवडानि मग नवरात्रोत्सव. सुखाच्या लहरींसोबत दुःखंही वाटून घ्यायला शिका, हे आपल्या आधीच्या पिढ्यांना सांगायचं असावं का?... या काळात आपल्याच पूर्वजांचं स्मरण करायचं असेल तर मग हा काळ अशुभ कसा कायउलट त्यांनी केलेले सुसंस्कार, बसवून दिलेली जगण्याची घडी आठवून, त्यांच्या चांगल्या पावलांवर पाऊल टाकून चालायची ही किती मोठी संधी आहे, आपल्यासाठीहा विचार प्रत्यक्षात आणणारेही काहीजण आहेतच. केवळ धार्मिक कार्य करण्यापेक्षा गरजूंना विनामूल्य शिकवणं, गरीबांना अन्नदान करणं, ग्रंथालयाला देणगी देणं, समाजसेवी संस्थांना आर्थिक मदत करणं, अंध आणि मूकबधिर बांधवांना सक्रिय मदत करणं ही झाली केवळ वानगीदाखल उदाहरणं. यात तुम्ही तुमच्या विचारांनी वेगळे उपक्रम राबवू शकताच.
  
पूर्वजांचं स्मरण करणं ही गोष्ट चांगलीच. पण माणूस जिवंत असताना त्याला चांगली वागणूक देणं ही सर्वाधिक चांगलं. कारण मृत्यूला वय ही गोष्ट अजिबात कधीच मान्य नसते. त्यामुळं मग मरणासन्न अवस्थेत वयोवृद्ध माणूस असू शकतो तसाच तरणाताठा माणूस किंवा अगदी अजाण बालकही असू शकतं. अनेक वेळा मृत्यू बेसावधपणं गाठून वार करू शकतो. त्याच्या त्या तडाख्यानं आपण घायाळ होतो. दुःखी होतो. पण दुःखाला कवटाळून बसणं, ही फारशी शहाणपणाची गोष्ट नाही. ते त्या `जात्या जिवा`लाही आवडणारं नसतं. केवळ व्याकूळ होऊन जगण्यात कोणता शहाणपणा आहेअर्थात काही वेळा या गोष्टी सांगायला-बोलायला ठीक असतात, पण त्या आचरणं कठीण असतं, हेही माहित असतं, पण ते `फॉलोकरायला हवंच. जन्म-मृत्यू या गोष्टी आपल्या हाती नसतात, हे उघड सत्य मान्य करायला हवं. तो जगाचा नियम आहे. जगाचा आरंभ, लय आणि विलय ही गती कायम राहणारेय. त्यात बदल होणं नाही... बीज अंकुरले, रोप वाढले, पाना-फुलं-फळांनी बहरलं, शुष्क झालं नि पुन्हा पालवी फुटली... हा `निसर्गाचा रोलर कोस्टरआपल्यालाही लागू होतोच... तेव्हा हे `येणंनि `जाणंया मधोमध असणारं आयुष्य सकारात्मकतेनं नि माणूस म्हणून जगून घ्यायला हवं... म्हणजे मग आपलं `जाणंअर्थगर्भ होईल. 

  
छायाचित्र इंटरनेटवरून साभार.

Sunday, 20 September 2015

ॐकार स्वरुपा...


 

ॐकाराचे ध्यान ते
पाहूनी मन हरखते
सिद्धिविनायकाच्या शिरी
शिरपेच भक्तीचा शोभतो भारी

श्रीगजाननाचे हाती
शंख, चक्र, गदा, मोदक विलासती
लंबोदर, पीतांबर
असं हे स्वरुप सुंदर

गजराजाचे मुख
गणांचे ते सुख
असा जो गणेश
गणांचा तो धीश

विद्येच्या या देवतेची करू प्राणप्रतिष्ठा
नमन करूनी अर्पावी श्रद्धा नि निष्ठा
वहावी ती दुर्वांची जुडी नि जास्वंद
प्रसाद मोदकाचा घ्यावा आनंद

जे याच्या चरणी लीन होती
साऱ्या विवंचना दूर जाती
असे हे भव्यदिव्य ॐकाराचे स्वरुप
युगेयुगे बघतचि रहावे हे अलौकिक रुप

काल जुन्या वह्या सापडल्या खणाच्या तळात हरवलेल्या. त्या चाळताना दिसली ही कविता. १९९५मध्ये केलेली, शाळेत असताना. वाचता वाचता आठवलं तेव्हा झालेलं कोडकौतुक. एका छोटेखानी वृत्तपत्रात ती छापूनही आली होती. बाबाच्या ऑफिसमधल्या मासिकातही आली होती. आपलं `नाव छापून येणं` तेही आपल्या लाडक्या बाप्पाच्या कवितेमुळं हे फारच भारी वाटलं होतं तेव्हा... आत्ताच्या `फेसबुकी` भाषेत सांगायचं तर `फिलिंग ब्लेस्ड.` आणखी एक गोष्ट जाणवली की, तेव्हाही बाप्पा साध्याच रुपातला भावला होता. `विद्येची देवता` म्हणून त्याचा उल्लेख केला होता. कदाचित त्यावेळी पाठांतराचा भाग असणाऱ्या `श्रीगणपती स्तोत्र` नि `अथर्वशीर्षा`चा तो परिणाम असू शकेल.

(चित्र – राधिका कुंटे)

पुढं माझ्या क्षमतेनुसार केलेलं काहीबाही वाचन, ऐकणं-पाहाणं, संवाद-चर्चा यांचं परिणाम स्वरुप असेल, अनेक माध्यमांतून `बाप्पा जाणवू लागला`... कधी स्वतःच काढलेल्या चित्रांमधून... कधी `गणाधीशाय धीमही`सारख्या गाण्यांतून... कधी `काळाघोडा फेस्टिव्हल`मध्ये मांडलेल्या कलाकारांच्या गणशेफ्रेम्समधून... कधी `गणेशा एक मोनोग्राफ ऑन द एलिफंट फेस्ड गॉड` या अँलिस गेटी यांच्या पुस्तकाचा `विश्वात्मका देवा तूचि गणेशा` या डॉ. म. ल. वझे यांनी केलेला अनुवाद वाचून... कुठं मैत्रिणींसोबत पाहिलेल्या ज्येष्ठ चित्रकार सुभाष अवचट यांच्या गणेशचित्रांच्या प्रदर्शनातून... कधी कुणासोबत घराघरांतल्या गणेशोत्सावाच्या पद्धतींबद्दलच्या गप्पाटप्पांतून... कधी ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांच्या लाईव्ह रेखाटनातून दिसलेला वाड्याच्या चौकटीतला गणेश... कधी मूर्तीकारांच्या मुलखातींतून साकारणारा... काही वेळा बातमीदारी करताना मोठाल्या मंडळांच्या गणपतींपासून ते शतकी वाटचाल चाललेल्या घरगुती गणेशांचं दर्शन घेताना... विविध क्षेत्रांतील सेलेब्रेटींच्या गणपतींविषयीच्या मनोगतांना शब्दांकित करताना... ऑफिसमधल्या गणपतींपासून ते मैत्रिणींच्या घरच्या गणपतींपर्यंत... `आपल्या घरी गणपती नाही` ही लहानपणी कुठंतरी वाटणारी खंत बाजूला सारून, वेळोवेळी निरनिराळ्या प्रकारच्या गणेशमूर्ती हौसेनं जमवताना... त्यामुळं आकारलेल्या गणेश कॉर्नरला जपताना... तरुणाईच्या गणेशोत्सावाविषयीच्या भावना मांडताना नि त्यांनी गणेशोत्सवाच्या निमित्तानं उचललेल्या चांगल्या पावलांचा कानोसा लेखांतून प्रतिबिंबित करताना...


म्हटलं तर या कॅलिडेस्केपमधल्या कितीतरी गोष्टी प्रत्यक्षात दिसताहेत, काही ठळक, काही पुसटशा... काहींना सीमारेषा, काही क्षितिजासारख्या... काही सतत विचार करायला लावणाऱ्या... यातला `मी` वगळला तर थोड्याफार फरकानं `आपण` सगळेच गणपतीबद्दल काही ना काही विचार-आचार करत असूच. तसं पाहायला गेलं तर `आपण` कोण हो `त्याचा` विचार करणारे? `तोच` तर विचार करायला लावणारा आहे का? खरंच?... `त्याच्या` मूर्तीबद्दल वेळोवेळी लिहून आलंय. ``समोरच्याचं ऐकून घेणं, कमी बोलणं, क्षमाशील असणं, शांत स्वभाव, चिंतनशीलता, प्रसंगी आक्रमकता आणि सगळ्यांच्या पाठीशी विचारपूर्वक खंबीरपणं उभं राहाणं,`` हे सारेसारे गुण त्यातून प्रतीत होतात. आजच्या कॉर्पोरेट ट्रेनिंग्जमध्ये यापेक्षा काय वेगळं शिकवलं जातं? आपण सोशल मिडियाचा वापर करणाऱ्या साऱ्यांनी हेही `फॉलो` करायलाच हवं... `मी`पणातून बाहेर पडून `आपण सारे मिळून` या वृत्तीत वेळीच शिरलो, तर पुष्कळशा गोष्टी साध्य होतात, हेच तर गणेशोत्सवातून आपसूकपणं शिकवलं जातंय... अशा वेळी गणेशाचं `ॐकार स्वरुप` पुन्हा एकदा जाणवू लागतं... त्यातली `सकारात्मक उर्जा` नकळतपणं आपल्यात सामावायला लागते नि तीच आपल्या कामांत उमटू लागते... मग ते `ॐकार स्वरुप` कायमचंच आपलंसं होऊन जातं... कारण... गणपती बाप्पा मोरया...

(चित्र – राधिका कुंटे)

Saturday, 12 September 2015

बाळांनो...

आज दिवसभर मातृदिनाची महती गाणारे  मेसेजेस  नि फोटोज शेअर केले जाताहेत. मातृदिन नि बहुतांशी वेळा श्रावणी शनिवारचं अतूट असणारं समीकरण... या समीकरणाशी आपसूकच जोडली गेल्येय ती `त्यांची` आठवण... ``बाळांनो...`` अशी प्रसन्न चित्तानं नि धीरगंभीर आवाजात घातलेली साद... त्यानंतरचं `त्यांचं` ते थोडंसा पॉझ घेऊन बोलणं... दरवर्षी मातृदिनाला त्यांनी अतिशय आत्मीयतेनं सांगितलेली `दिनूचं बिल` ही गोष्ट आणि `नंतर मिळणारा खाऊ आठवणीनं आईला द्या,` असं `त्यांचं` सांगणं... त्यावर आम्ही विद्यार्थांनी आज्ञाधारकपणं डोलावलेल्या माना.. सगळं कसं आत्ता लख्खपणं आठवतंय...

`बालमोहन विद्यामंदिर` आणि `बापूसाहेब रेगे` हे एक अतूट समीकरण. शिक्षणमहर्षी दादासाहेब रेगे यांच्या शिक्षणपध्दतीचा वसा बापूसाहेबांनी समर्थपणं सांभाळला. अर्थात हे आता कळतंय. कारण तेव्हा `आपली शाळा` नि `आपण विद्यार्थी` एवढंच डोक्यात फिट्ट होतं. वेळोवेळी होणाऱ्या कार्यक्रमांच्या वेळी त्यांनी आमच्याशी साधलेला संवाद नि त्यांचं आम्हाला समजून घेणं, हे तेव्हा आम्हाला बोअर वाटलं असलं, तरी ते तेव्हा आवश्यकच होतं... सगळं कसं आत्ता लख्ख आठवतंय...

गोकुळाष्टमी असो, ध्वजवंदन असो, हस्तलिखितांचं प्रकाशन असो किंवा साधी डॉक्टरी तपासणी... त्या त्या वेळी `त्यांचं` तिथं उपस्थित असणंच खूप खूप आश्वासक वाटायचं. दहावीच्या सेंडऑफच्या वेळी आलेलं रडू आपण हे सगळं `मिस् करणार` म्हणून होतं... नि कदाचित आत कुठंतरी हे आश्वासक व्यक्तिमत्व आपल्याला सतत दिसणार नाही, ही जाणीवही झाली असावी... सगळं कसं आता लख्ख आठवतंय...

शाळेची पायरी ओलांडून व्यावहारिक जगाला सामोरं जाताना शाळा नि तिचे संस्कार कधीच दूर गेले नाहीत. `बालमोहन` या शब्दांची सकारात्मक जादू नि उर्जा ठायीठायी जाणवत गेली. काही ना काही निमित्तानं शाळेत जायची संधी शोधायची नि त्या उबदार वातावरणाचा आपलेपणा अनुभवायचा... दादांच्या पुतळ्यासमोरच्या पायरीला नमस्कार करतांना शाळेतला बापूसरांचा वावर आश्वस्त करणारा होता... सगळं कसं आत्ता लख्ख आठवतंय...

शाळेचे मूल्यसंस्कार नि तिथं मिळालेल्या ज्ञानकणांची शिदोरी बापूसरांच्यामार्फत आमच्यापर्यंत पोहचली. वयपरत्वे शरीर थकत चाललं तरी शिक्षणक्षेत्रात अविरत कार्य करण्याची उर्मी बापूसरांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी आखलेल्या विविध योजनांतून, पुस्तकांतून ते प्रतिबिंबित होत होतं... आणि अखेर तो क्षण आलाच... आठवणींचा कँलिडोस्कोप झरझर डोळ्यासमोरुन फिरु लागला. ``बाळांनो...`` अशी हाक आता पुन्हा कधी ऐकू येणार नाही. हे खरंय... पण `त्या हाके`चा कानोसा घेतला तर त्यातून रुजलेले संस्कार नि माणूसपण हे प्रत्येक `बालमोहनकरां`त आढळेल... हीच खरी त्यांना श्रध्दांजली ठरेल... सगळं कसं आत्ता लख्ख आठवतंय...


  
(छायाचित्र साभार – आम्ही बालमोहनकर– फेसबुक पेज–प्रणिल हातिसकर)

Sunday, 6 September 2015

बिंब प्रतिबिंब

परवा एक चित्र शेअर केलं बहिणीनं व्हॉटस् अँपवर. भाचीनं काढलं होतं. चित्राचं शीर्षक होतं `नेचर ड्रॉइंग`. सूर्याचं चित्र. खरंतर एका परीनं बिंब-प्रतिबिंबाची चित्रातली जुगलबंदीच. म्हणजे तिनं ते जस्ट ड्रॉइंग म्हणून काढलं असण्याची शक्यताच शंभर टक्के, पण आपले विचार काय एकदा सुचले की, कसे सुस्साट धावायला सुरूवात होते नाही का... हे तर चित्र... चित्रकार नि आपल्या कल्पनाशक्तीचा मुक्त संचार... त्यातही हे पाण्यात पडलेलं प्रतिबिंब... त्या प्रवाहाच्या तरंगांना विचारांनीही फॉलो करायला सुरूवात केली...
****
चटकन आठवलं, शाळेत असताना वाचलेलं `बिंब-प्रतिबिंब` हे चंद्रकांत खोतलिखित पुस्तक. स्वामी विवेकानंदांवरची आत्मचरित्रपर कादंबरी. पुस्तकाच्या मलपृष्ठावर खोत यांनी लिहिलंय की, ``बिंब प्रतिबिंब हे नाव ज्ञानेश्वरांनी सुचवलं. ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात एक ओवी आहे – उटूनि दोन्ही आरसे। वोडलिया सरिसे। कोण कोणा पाहतसे। कल्पावें पां?।... श्रीरामकृष्ण आणि विवेकानंद हे एकमेकांसमोर ठेवलेले दोन स्वच्छ, निष्कलंक आरसेच नाहीत काय? किंवा एकमेकांच्या जवळ ठेवलेले दोन दिवेच. कोणत्या दिव्यानं कोणता दिवा लावला हे सांगता येऊ नये, अशा प्रकारचे.`` या आदर्श गुरुशिष्यांबद्दल आणिक काय लिहावे...
****
कालच केलं गेलं ते शिक्षकदिनाचं मोठ्ठं सेलिब्रेशन. शिक्षकांबद्दलच्या आदरभावनेपासून ते थोडीशी त्यांची थट्टा करण्यापर्यंतच्या पोस्ट शेअर केल्या गेल्या. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरपासून ते आपल्यासारख्या सामान्यांचे शिक्षकांसोबतचे फोटो धडाधड अपलोड केले गेले. त्यातले काही शिष्यांनी तर काही खुद्द शिक्षकांनीच शेअर केले. तेही फोटो एका परीनं बिंब-प्रतिबिंब म्हणावेत का? त्या फोटोंतून शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचा वसा पुढं चालवणारी पिढी खरंच घडेल का? या काचं उत्तर व्यक्तिसापेक्ष असलं तरीही शिक्षक-विद्यार्थ्यांच्या नात्यामध्ये असणारा यथायोग्य विश्वासाचं नातं कायम फुलत राहावं... ते कधी कोमेजू नये...
****
कालच होती जन्माष्टमी. कृष्णम् वंदे जगद्गुरू. अवघ्या जगाच्या गुरुस्थानी असणाऱ्या श्रीकृष्णाचा शिष्य अर्जुन तितकाच समर्थ धनुर्धर. `कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका,` हा कृष्णानं तेव्हा केलेला उपदेश आजच्या घडीला फॉलो करण्यासारखा आहे. किंबहुना अर्जुनानं तो तसा फॉलो केलाही. बिंब-प्रतिबिंबाचा आविष्कार म्हणावा अशी ही गुरु-शिष्य नि प्रसंगी मित्रत्वाचं नातं असलेली जोडी. आपण मात्र त्यातून योग्य तो काळानुरुप बोध न घेता केवळ गीतेचे श्लोक पठण करत राहिलो आहोत... आपल्याला शक्य असणारी सकारात्मक कृती करण्याची वेळ प्रत्यक्षात येणार कधी? का अजूनही कृष्णाच्या अवताराची वाट बघत थांबायचंय? आपण सारेच `कृष्ण`चं किमना प्रतिबिंब तरी होऊ शकतो का?
****
तुर्कस्तानच्या किनाऱ्यावर चिमुकल्या आयलानच्या पालथ्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा फोटो सोशल मीडियावर `व्हायरल` झाला नि सारं जग हेलावून गेलं... मती कुंठित झाली. पाठोपाठ दुःख, संताप, हतबलता, असहाय्यतेची जणू लाटच उसळली... युरोपातल्या स्थलांतरितांच्या लोंढ्याचं भीषण नि जळजळीत वास्तव या फोटोच्या माध्यमातून समोर आलं. त्या लाटांच्या प्रवाहात पडलेल्या आयलानच्या चिमुकल्या डोळ्यांतल्या स्वप्नांचं प्रतिबिंब कुठं शोधायचं आता? त्याच्या बाळमुठीतल्या आशेच्या पाकोळ्या कुठल्या कडेकपारीत उडाल्यात? त्याच्या मृतदेहाच्या कारणांच्या बिंबाशी जायचा प्रयत्न नि ही समस्या मुळापासून निवारायचा  खरोखर प्रयत्न होईल का?
****
सुस्साटलेले विचार काळोखी अंधाऱ्या प्रतिमांच्या लाटांवर स्वार असतानाच व्हॉटस् अँपवर खुद्द भाचीचाच कॉल आला. ``मावशी, कसं वाटलं ग, माझं चित्र?`` या पाचवीतल्या मुलीला हे एवढं सगळं विचारांचं महाभारत थोडीच ऐकवू शकणार होते? तिला आपलं म्हटलं, ``छानच आहे ग`` नि बाकीच्या आमच्या नेहमीच्या गप्पाटप्पा केल्या. फोन ठेवल्यावर पुन्हा एकदा त्या चित्राकडं पाहिलं. सूर्य होताच चित्रात. आता तो मावळता की उगवता... हे एकदा पक्कं ठरवायला हवं होतं. त्यावरून मग त्याचा प्रकाशही ठरणार होता. संधीप्रकाश की जगतप्रकाश... त्यावरून भोवतालाचं वर्णन करावं लागणार होतं. गडद होणाऱ्या अंधारात लपून जाणाऱ्या डोंगरदऱ्या की उजेडाचा वसा घेऊन उर्जेनं भारलेल्या दऱ्याखोऱ्या... शेकडो नकारांनी वठलेलं झाड की सकाराच्या होकारांनी वठलेल्या झाडाला फुटू पाहाणारी पालवी... नेचर ड्रॉइंग की फिलॉसॉफिकल थॉट... बिंब की प्रतिबिंब...

चित्रकार – शची जोगळेकर