Sunday, 9 August 2015


कहाणी महाशब्दांची...

ऐका परमेश्वरा महाशब्दा, तुमची कहाणी. आटपाट नगर, शतकांहून जुना वड. महानदी गंगा. नवं आयटी पार्क. बावन्न नंबर शार्प. तिथं एक भला माणूस तप-वाचन करत आहे. सकाळी उठतो. योगाभ्यास करतो. खिशात क्रेडिट कार्ड घेतो. बुकस्टोअरमध्ये जातो. तिथून पुस्तकं आणतो. ती चाळतो. त्यातली पाच पुस्तकं बाजूला ठेवतो. एक अनाथ मुलांना देतो. एक पाहुण्यांस देतो. एक वाचनवेड्या माणसांना देतो. एक परदेशी नातलगांना पाठवून देतो. उरलेली आपण वाचतो. असं करता करता माणसाचं वय वाढू लागतं, चष्म्याचा नंबर वाढू लागतो. पाठीचा कणा वाकू लागतो. पण वाचायचा ध्यास कायम राहातो. अशी पन्नास वर्ष वाचनांत गेली. एवढं तप-वाचन कोण्या कारणे करतो? `महाशब्द भेटावेत` या कारणे करतो.

सध्याच्या काळातले बोलके पक्षी–पक्षीण झाडावर बसले होते. ते त्याला विचारू लागले ``भल्या माणसा, ज्ञानी माणसा, ध्यानी माणसा, विचारी माणसा, पुस्तकं तर आणतोस, पुस्तकं तर वाचतोस. एवढं तप-वाचन कोण्या कारणे करतोस?`` `महाशब्द भेटावेत` या कारणे करतो.

आभासाच्या राजवाड्यात कल्पनेच्या पलंगावर `महाशब्द` निजले होते, तिथे जाऊन पक्षी-पक्षिणी सांगू लागली, आटपाट नगर, शतकांहून जुना वड, महानदी गंगा, नवं आयटी पार्क. बावन नंबर शार्प. तिथं एक भला माणूस तप-वाचन करत आहे. सकाळी उठतो. फ्रेश होतो. योगाभ्यास करतो. खिशात क्रेडिट कार्ड घेतो. बुकशॉपीत जातो. शॉपीतून पुस्तकं आणतो. ती चाळतो. त्यातली पाच पुस्तकं बाजूला ठेवतो. एक अनाथ मुलांना देतो. एक पाहुण्यांस देतो. एक वाचनवेड्या माणसाला देतो. एक परदेशी नातलगांना पाठवून देतो. उरलेली आपण वाचतो. असं करता करता माणसाचं वय वाढू लागतं, चष्म्याचा नंबर वाढू लागतो. पाठीचा कणा वाकू लागतो. पण वाचायचा ध्यास कायम राहिला. अशी पन्नास वर्ष वाचनांत गेली. एवढं तप-वाचन कोण्या कारणे करतो? `महाशब्द भेटावेत` या कारणे करतो. 

`महाशब्द` बरं म्हणाले. चटकन उठले. पटकन तयार झाले. मेट्रोमार्गे निघाले नि भल्या माणसाजवळ जाऊन उभे राहिले. ``भल्या माणसा, ज्ञानी माणसा, ध्यानी माणसा, विचारी माणसा, पुस्तकं तर आणतोस, पुस्तकं तर वाचतोस. एवढं तप-वाचन कोण्या कारणे करतोस?`` `महाशब्द भेटावेत` याकारणे करतो. तेव्हा `महाशब्द` तो मीच, असं म्हणाले. कशानं भेटावा? कशानं ओळखावा? असाच भेटेन, असाच ओळखेन. अक्षर-शब्द-वाक्य-शब्दसमूह-प्रतिभाधारी- सृजनचारी माघारी वळला. तर `महाशब्दा`ची मूर्ती समोर आली. ``भल्या रे भक्ता शरणांगता, राज्य माग, भांडार माग, संसारीचं सुख माग.`` ``राज्य नको. भांडार नको. संसारीचं सुख नको. तुझं माझं एक वाचन. तुझी माझी एक लेखणी. तुझी माझी एक स्तुती.`` कुठं करावी? साहित्याद्वारी, भल्या माणसाच्या घरी. असं त्याला एकरुप केलं. `महाशब्दां`ची कहाणी ऐकती, त्यांचे शब्दज्ञान वाढती. नित्य पुस्तकं वाचती, त्यांना होय शब्दलोकप्राप्ती. ही साठा उत्तारांची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.


(संपूर्ण चातुर्मास संग्रहातील `कहाणी श्रीविष्णूंची` या कहाणीवर आधारित. साभार)

1 comment: