Sunday, 23 August 2015

फॉर हिअर, ऑर टू गो?

स्थळ – मॅकडोनल्ड. वेळ – टळटळीत दुपार. कारण - गप्पा.
जवळपास तीनेक वर्षांनी मी नि मैत्रीण भेटत होतो. तिला उपनगरातून यायला सोईचं मध्यवर्ती ठिकाण निवडलं नि पोटोबा हा दुय्यम ऑप्शन असल्यानं मॅकडोनल्ड निवडलं. आम्ही भेटलो. मॉलमध्ये फेरफटका मारून मॅकडोनल्ड गाठलं. पोटभर गप्पा मारायचा मूळ उद्देश मनाशी घोकत  जुजबी ऑर्डर द्यायला गेलो. काऊंटरवर एका आजोबांचा ऑलरेडी संवाद चालू होता. `फॉर हिअर, ऑर टू गो?` काऊंटरपलीकडून विचारणा झाली. ``इथंच थांबून पदार्थांचा आस्वाद घेणार की इथले पदार्थ घेऊन `तिकडे` अर्थात `घरी` जाणार?`` असा नेहमीचा प्रश्न त्यांनी विचारला. आजोबांनी घेऊन जाणार सांगत कोणत्या पदार्थांत काय काय असतं, ते माहित करून घ्यायला सुरूवात केली. काऊंटरपलीकडून पटापटा सांगणं झालं नि आजोबांनी त्यांची ऑर्डर दिली. पाठोपाठ आम्ही आमची ऑर्डर देऊन गप्पांना सुरूवात केली.

मॅकमधून बाहेर पडायच्या डोअरजवळ बाकड्यावर नेहमीच्याच प्रथेप्रमाणं `रोनाल्ड मॅकडोनल्ड` स्थानापन्न झालेला. सध्याच्या `सेल्फी फिव्हर`मध्ये ही संधी कोण सोडणार? सेल्फीप्रेमी त्याच्याजवळ बसून `क्लिकिकाट` करत होते. आमचा नंबर आल्यावर काऊंटरला गेलो. अर्थातच त्या आजोबांनी पार्सल कलेक्ट केलं नि ते निघाले. आम्हीही आमची ऑर्डर घेऊन टेबलपाशी आलो. गप्पा पुन्हा कनेक्ट झाल्या. तितक्यात माझं लक्ष त्या बाकड्याकडं गेले. मगाचे आजोबा तिथं टेकले होते नि आणखी एक आजोबाही तिथं होते. मैत्रिणीला म्हटलं ``बघ, सहीए हे! आजोबा फारच हौशी दिसताहेत. सेल्फी काढताहेत की काय?`` तितक्यात मैत्रिणीला फोन आल्यानं ती त्यावर बोलण्यात मग्न झाली. मग लक्ष पुन्हा बाकड्याकडं गेलं. तोपर्यंत आजोबा नंबर एक तिथनू हलले होते. कदाचित ते त्यांच्या नातवंडांसाठी पार्सल घेऊन गेले असतील... दुसरे आजोबा मात्र तिथंच बसून होते. मैत्रिणीचा कॉल संपून पुन्हा गप्पा कनेक्ट झाल्या. एव्हाना पुढ्यातले पदार्थ संपल्यानं ट्रे उचलले गेले नि त्यादरम्यान आपोआपच बाकड्याकडं पाहिलं गेलं. आजोबा नंबर दोन जागेवर नव्हते. वेळेचं गणित जमवायचं असल्यानं आम्ही गप्पाष्टक आटोपतं घ्यायचं ठरवलं नि तितक्यात आजोबा नंबर दोन येऊन बाकड्यावर बसले. यावेळी मी थोडं निरखून पाहिलं. टिपिकल मराठी मध्यमवर्गीय माणूस. त्यांच्या हातात प्लॅस्टिकची पिशवी होती. त्यातून कसलेसे कागद काढून ते वाचायला लागले... आम्ही मॅकमधून बाहेर पडून थोडं शॉपिंग करून आपापल्या कामाला लागलो...

जवळपास महिना झाला असेल या गोष्टीला... ते आजोबा नंबर दोन मात्र काही केल्या डोक्यातून जात नव्हते. त्यांना असं बाकड्यावर का बसावं लागलं असेल? घरी काही अडचण असेल? की घराचाच काही प्रश्न असेल?... ज्येष्ठांच्या प्रश्नांच्या संदर्भांत त्यांच्या घरात असण्याची अडचण होते, असं ऐकलं-वाचलं होतं. त्यावर उत्तर शोधत कदाचित सार्वजनिक वृत्तपत्रांचे कट्टे, वाचनालयं, आजी-आजोबा उद्यानं या ठिकाणी दिसणारी वृद्धांची संख्या लक्षणीय होती. एकाकी वृद्धांच्या प्रश्नावर, जागेच्या अडचणींवर मात करण्यासाठी वृद्धाश्रमांपेक्षा एक तज्ज्ञांचा ज्येष्ठांची पाळणाघरं सुरू करायचा पर्यायही लेखाच्या निमित्तानं पुढं आणला होता. हीच साखळी पुढं जात ज्येष्ठांनी मॉलचा पर्यायही आपलासा केला की काय... असले विचार मनात घोंघावू लागले...

मग मधल्या काळात कधीतरी एका ज्येष्ठ फेसबुक फ्रेण्डनं एक फोटो शेअर केला. सहाएक वर्षांचा चिमुरडा `त्या बाकड्या`वर बसलाय. फारच मोठ्या कुतुहलानं नि ओसंडून वाहणाऱ्या आश्चर्यानं बोलके झालेले त्याचे डोळे `रोनाल्ड मॅकडोनल्ड`कडंच लागले होते. कॅसेट रिवाईंड व्हावी तसा त्या दोन्ही आजोबांचा प्रसंग डोळ्यांसमोर आला. त्या आजोबा नंबर दोनच्या जागेवर आता तो चिमुरडा बसला होता. कदाचित थोड्या वेळानं तो आत जाईल... जे कोण मोठं असेल त्यांच्याबरोबर... काऊंटरपलिकडून विचारणा होईल ``फॉर हिअर, ऑर टू गो?``  ते त्यांचा ऑप्शन सांगतील. मॅकच्या शेकडो आर्डर्समध्ये आणखी एक भर पडेल... कदाचित ते आजोबा नंबर एकच तर आपल्या नातवाला घेऊन आले नसतील ना तिथं... म्हणजे मग तसं असलं तर त्या आजोबा नंबर एकांच्या अस्तित्वाचा प्रश्न नसावा बहुधा... त्यांना त्यांची स्पेस मिळत असावी, नातवंडाचं प्रेम मिळत असावी नि... कसंए ना, कल्पनेचे खेळ सुरू झाले की लवकर थांबत नाही म्हणतात... पण ही कल्पना प्रत्येक आजी-आजोबांच्याबाबतीत प्रत्यक्षात येवो... त्या कल्पनेच्या पूरेपूर अभिव्यक्तीसाठी मॅकडोनल्डचीच री ओढत म्हणायला लागेल... I`am lovin` it!




(छायाचित्र - इंटरनेटवरून साभार)




No comments:

Post a Comment