Friday, 14 August 2015


प्रिय स्वातंत्र्य,
 
हाय, व्हॉटस् अप, डूड?
कसंए ना की, `ऑगस्ट` उजाडल्यावर आम्हांला `तुझी` चाहुल लागते. एक नाही दोन नाही तर दरवर्षीचंच आहे हे. फक्त प्रत्येकाचे `तुझ्या` चाहुलीचे प्रेफरन्सेस वेगवेगळे असतात. म्हणजे असं बघ की, एकदम सिनिअरमोस्ट लाईक पणजोबा-आजोबा कॅटॅगरीतल्या लोकांना आठवतात `ते दिवस`... त्यांनी `तुला` मिळवण्यासाठी केलेला संघर्ष, दिलेला लढा. जहाल-मवाळ, नेमस्त-सुधारक अशी त्या लढाईची कितीतरी रुपं त्यांना आठवतात. त्यांच्या या आठवणींतला काही अंश तर आम्हांला अभ्यासालाही आहेच. म्हणजे त्यांच्यासाठी जो `वर्तमान` ठरला होता तो आमच्या अभ्यासाचा खरंतर आमच्यासाठी `इतिहासा`चा एक भाग आहे. त्यांच्यानंतरची पिढी जन्मली थेट `स्वातंत्र्या`तच नि आताचे आम्ही `स्वतंत्र`च आहोत, आम्हांला जाणीव आलेय तेव्हापासून... तरीही आमच्या `स्वातंत्र्याचा शोध` संपतच नाहीये... आईशप्पथ... भूतकाळ, वर्तमानकाळ नि भविष्यालाही सॉलिड कवटाळून घेतलंय या स्वातंत्र्यानं... या काळाचं काय करावं आता...

कसंए ना की, असं म्हणतात बुवा की, तुम्ही आज, आत्ता नि या क्षणाचा विचार करा. सो, मी ते `जस्ट फॉलो` करते. यू नो आम्हांला एखादी गोष्ट `फॉलो` करायला आवडते. ती आम्ही पटाकन पोस्ट करतो नि तिला लाईक्स मिळण्याची वाट बघतो. पण... पण मध्यंतरी काही गोष्टी वाचनात आल्या नि हे असं `फॉलो करणं` खरंच आवश्यक आहे का, अशा दुविधेत मी सापडले. तो प्रश्न मी माझ्या फ्रेण्डसनाही फॉरवर्ड केला... हो हो, ते तसं करणं आवश्यक आहे का? हाच प्रश्न असूनही. मग थोडंसं लॉजिक, थोडीशी सायकॉलॉजी नि थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड वापरून आमची छानपैकी चर्चा झाली, तीही `प्रत्यक्षात`! त्या चर्चेत येऊन गेले अनेक मुद्दे... अभिव्यक्ती स्वातंत्र्यापासून ते आपल्या भोवतालच्या वास्तवापर्यंत. पबमध्ये रंगणाऱ्या तरुणाईपासून आदिवासी पाड्यांवर काम करणाऱ्या स्वयंसेवकांपर्यंत. सेल्फीमाईंडेड पर्सन्सपासून ते सिनिअर्सना `ई`साक्षर करणाऱ्यांपर्यंत. फक्त फन-फाईन-फ्रेण्डसमध्ये रमणाऱ्यांपासून ते समाजासाठी `धडपडणाऱ्या मुलां`पर्यंत... यातली कोणती गोष्ट `फॉलो` करायची आपण... कारण ती करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहेच. मुळात स्वातंत्र्य म्हणजे तरी काय यावरही एक सो एक सवाल जबाब घडलेच. त्यावर कुणीतरी गुगलून ``फ्रिडम म्हणजे मानवी मूल्य किंवा स्थिती. दुसऱ्यांच्या शक्तीनं प्रतिबद्द न होता स्वमर्जीप्रमाणं वागण्याची क्षमता. स्वातंत्र्य म्हणजे स्वतंत्रतेची आणि स्वायत्ततेची गरज. निवड, सृजन, निर्मिती, शोध घेण्याची क्षमता आणि स्वतःला मुक्तपणं अभिव्यक्त करणं.`` वगैरे व्याख्याच शोधून काढली. तरीही आमच्या स्वातंत्र्याचा शोध संपतच नाहीये... आईशप्पथ... कारण हे `मूल्य`, `स्वायत्तता`, `शोध घेणं`, `अभिव्यक्त होणं` हे सगळं आपल्या डोक्यावरून जायला लागलंय राव... या शब्दांचं काय करावं आता...

कसंए ना की, आम्ही कितीही गोंधळलो तरी तो गोंधळ चेहऱ्यावर दाखवत नाही. यू नो, जस्ट चिल... चिल... मग मोठे लोकं लेक्चर्स देतात की, यांना जबाबदारीची जाणीव नाही. कळत नाही वगैरे वगैरे. म्हणून मग थोडं मोठ्यांसारखं वागायला गेलो तर मग ऐकवलं जातं की, जास्त शहाणपणा करू नको, एवढे काही तुम्ही मोठे नाही झालात... अरे यार, हे लहान-मोठं होणं सोईसोईनं असतं की काय... म्हणजे आम्हांला ते कळणार कसं नि मग आम्ही आमचं स्व-तंत्र कसं चालवायचं... डोक्याचा नुस्ता भुगा होतो कधी कधी... अमूक करू नको किंवा अमूक कर अशा गोष्टींमध्ये स्वातंत्र्य बांधलेलं असतं का की स्वातंत्र्य ही फक्त एक भावना आहे... की, जस्ट फिल इट... पण मग तो फिल तरी कसा घ्यायचा... कारण एखादी कृती केल्याशिवाय त्यावर प्रतिक्रिया येणार असं काही असतं का... म्हणजे मग समजा ती प्रतिक्रिया नकारात्मक असेल तर मग आपण केलेल्या `सो कॉल्ड` आगाऊपणाला बंडखोरीचं लेबल लावायचं का... तोही एका अर्थी स्वातंत्र्यासाठी केलेला मिनिमिनि झगडा मानायचा का... तरीही आमच्या स्वातंत्र्याचा शोध संपतच नाहीये... आईशप्पथ... कारण या उलट्यासुलट्या वेगानं आदळणाऱ्या विचारांनी आपण एकदम सरबरलेले होतो... या विचारांचं काय करावं आता...

कसंए ना की, आमचा वर्तमान हा असा आहे. थोडासा मिक्स अँण्ड मॅचटाईप्सचा. आमच्या लाईफस्टाईलसारखाच. आम्हांला तो तर जगायचाच आहे पण यू नो, थोडासा भूतकाळही जवळचा वाटतोय. त्या देशप्रेमी लोकांमुळं आमचं अस्तित्व आहे हे कळतंय. त्यांचे विचार कण-कणभर कळायला लागलेत, ते पूर्णपणं कळण्याएवढे आम्ही मॅच्युअर झालेलो नाही. पण ते वाचताना किंवा त्या रिलेटेड व्हिडिओज `यू ट्यूब`वर बघताना आमच्या डोळ्यांपुढं उभं राहातं भविष्याचं अंधूकसं चित्रं... डोळ्यांपुढं येतो अस्पष्टसा भारत... कारण याच `वर्तमाना`त आता `नजिकच्याच भूतकाळात` असं म्हणावं लागणारं डॉ. अब्दुल कलामांनी रंगवलेलं `२०२०`चं स्वप्नं `आम्ही याची देही याची डोळा` कधी `लाईव्ह` कधी `न्यूज`मध्ये पाहिलं-वाचलेलं असतं... ते आत्ता प्रॅक्टिकली विचार केला तर प्रत्यक्षात येईल ही शक्यता कमीच दिसतेय. त्यांनी `पेरलेल्या स्वप्नां`मधली काही रोपं अंकुरायला लागली असतीलही... कारण स्वप्नं पाहाण्याचा नि ती सत्यात उतरवण्याचा अधिकार नव्हे स्वातंत्र्यच प्रत्येकाला आहे. तरीही आमच्या स्वातंत्र्याचा शोध संपतच नाहीये... आईशप्पथ... कारण या स्व-तंत्र स्वप्नांनी एकदम भुरळच घातलेय आपल्याला... या स्वप्नांचं काय करावं आता...

तेव्हा बा, स्वातंत्र्या, तुझ्या भेटीची आस लागलेय. थोडी लवकरची अपॉइंटमेंट दे रे बाबा... आता ती द्यायची की नाही द्यायची हे स्वातंत्र्य तुला आहेच.
तुझीच,
स्वातंत्र्यप्रेमी.



(छायाचित्र - इंटरनेटवरून साभार)

No comments:

Post a Comment