प्रिय भावंडांनो,
काय कसं, काय झालं मग रक्षाबंधन? मला वाटतं अजूनही बऱ्याचशा मनगटांवर `मी` असेन नि आपली ओळख फारशी जुनी झालेली नसेल. यातली बहुतांशी मनगटं असतील ती
भावांची नि त्याहून थोडं कमी प्रमाण असेल ते बहिणींच्या मनगटांचं. कसंए की, कितीही
बहिण-भाऊ समान वगैरेंच्या घोषणांचा, लेखाबिखांचा पाऊस पडत असला तरीही अजून
प्रत्यक्षात ती समानता कोसो दूर आहे नि ती किमान प्रतिकात्मकरित्याही प्रत्यक्षात
यायला आणखी काही काळ जावा लागेल बहुधा... आणि हो, मला त्याचं अजिबात वाईट वाटत
नाही. कारण मला तर सवय झाल्येय वर्षभर वाट बघण्याची... सो, त्या वाट बघण्याच्या
काळाची आता सुरूवात होतेय नि तोच तुमच्याशी संवाद साधायची ही संधी मिळालेय...
बघा आता, तुमची सवय मलाही लागतेय की काय... कारण आजकाल झालंय असं की, दिसलं माणूस
ऑनलाईन की कर त्याच्याशी कम्युनिकेट. मग त्याला वेळ आहे की नाही वगैरे उचापती
करायच्या नाहीत. फक्त टाईप करत राहायचं... अशा वेळी मला प्रश्न पडतो की मग
पुढ्यातल्या माणसांचं काय? म्हणजे बघा काल कितीतरी भावंडं एकत्र आली होती. त्याचे सज्जड पुरावे ढेरसाऱ्या
फोटोनिशी शाबित केले गेले. भरभरून पोस्ट करत शुभेच्छा दिल्या-घेतल्या गेल्या. ऑनलाईन
गोतावळ्याला अपडेट करताना समोरचं ऑफलाईन भावंड मोठ्या अपेक्षेनं तुमच्याशी
मज्जा-मस्ती करण्यासाठी आसुसलं होतं किंवा कुण्या भावंडाला तुमच्याशी काही शेअर
करायचं होतं हे जाणवलं का? पोरासोऱ्यांतल्या गप्पाटप्पा किंवा बरोबरीच्या भावंडांतली शेअरिंग्ज
प्रत्यक्षात वाटली गेली का? की फक्त राखीच्या पौराणिक महत्त्वापासून ते `राखी` नावावरच्या कोट्यांपर्यंत आणि रक्षाबंधन साजरा करणं योग्य-अयोग्य, अशा सोशल
मिडियावरच्या पोकळ अँक्टिव्हिटीजमध्येच तुम्ही सहभागी झाला होतात...
किंवा परदेशी असणाऱ्या भावंडाला ऑनलाईन विश करून त्याच्याकडून कुरिअरनं आलेलं
गिफ्ट मिरवताना इथल्या आजारी भावाची साधी विचारपूस केली गेली का? किंवा काहीजणांच्या एकुलत्या
एकपणाच्या हळव्या जखमेला कुरवाळणाऱ्यांच्या मनाचा कवडसा तुम्हांला दिसला का हो? किंवा मग भावंडाच्या अपमृत्यूचं भळाळतं
दुःख घेऊन जगण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या प्रयत्नांत तुम्हांला कधी साथ द्यावीशी
वाटली का? रक्षाबंधनाचं दणक्यात सेलिब्रेशन करताना दुष्काळी भागातल्या शेतकरी
बांधवांचा विचार क्षणभर तरी डोकावला होता का? किंवा त्याही पलिकडं जाऊन आपल्या अस्तित्वाच्या खुणांनी भवताल समृद्ध
करणाऱ्या हिरवाईचं-झाडांचं ऋण मानावंसं वाटलं का? आपल्या तोकड्या जगाच्या पलिकडं असणाऱ्या जगातल्या दुःखावर आपल्या
सहानुभूतीची नि माणूसकीची फुंकर घालावीशी वाटली का?
या साऱ्या `कां`ची उत्तर विचारताना `त्या सगळ्या प्रश्नां`ची उत्तरं माझ्यापाशी आहेत, असा माझा बिल्कुलच दावा नाही. किंबहुना
दावे-प्रतिदावे करण्याच्या मूडमध्येही मी नाहीये, कारण मला तो अधिकारही नाहीये.
जेमतेम दिवस-दोन दिवसांचं आयुष्य आहे माझं नि मग नशीबात असते वर्षभराची प्रतीक्षा...
माझ्या प्रतीकाचा खराखुरा अर्थ समजून घेऊन तसं वागणारी भावंडं माझ्या आजवरच्या
प्रदीर्घ प्रवासात अद्याप तरी मला फार ठळकपणं जाणवलेली नाही. त्यामुळं या
प्रतीकाचा अर्थ समजून घेणाऱ्या भावंडांची संख्या वाढली तर मग माझी गरजही उरणार
नाही नि त्याचाच मला अधिक आनंद वाटेल.
तुमच्या सेलिब्रेशन मूडमध्ये तुम्हांला थोडंसं डिस्टर्ब्ड केलं असेल, तर
सॉरी. पण त्यालाही कारण तुम्हीच. कारण एकदा का `आपलं माणूस` म्हटलं की, मग त्यांच्या भल्याचाच विचार करायची पद्धत आपल्यात अजून तरी
अस्तित्वात आहे, जी मी फॉलो करतेय... `जगण्याच्या प्रवासातली संवेदना नि माणूसकीची पेजेस` तुम्हीही जरूर फॉलो करा. जस्ट लाईक
इट...
कायम तुमचीच,
राखी.