Monday, 27 July 2015



विठोबा...

`तो` तर मला कायमच भेटत आलाय... फक्त माध्यमं वेगवेगळी होती... कधी शब्द, कधी सूर, कधी गाणं, कधी टाळ तर कधी मृदुंग... कधी थेट प्रक्षेपण तर कधी त्याच्या स्थानिक मंदिरातलं दर्शन... कधी फक्त चातुर्मास महात्म्यामधला, कधी कृष्ण-धवल नि नंतर नंतर रंगीत रुपड्यातला... कधी कधी वृत्तपत्रातल्या त्याच्या फुलपेज फोटोतून... `त्याच्या` या वेळोवेळी नि बहुतांशी वेळा वार्षिक भेटीसाठी कारणीभूत ठरायची ती माझी आज्जी. वडिलांची आई. आत्ता मी `तिच्या` अस्तित्वासाठी भूतकाळ वापरला तरी ती माझ्या आसपासच आहे, अशी आपली माझी एक समजूत... नि `तो` तर काय... अनादी-अनंत काळ पुंडलिकासाठी उभा ठाकलेला आहेच... आपल्या सगळ्यांचाच `विठोबा`...

`आज दिवसभर मोठ्यांचा उपास असणार आहे, तेव्हा आपल्याला उपासाचं नि रोजचं जेवण असं दोन्हीकडचं खायला मिळणार आहे, ` या आनंदी भावनेची एक लहर असणं, ही लहानपणच्या काही आषाढींची एक `उपाशी` आठवण. सोबतच चातुर्मासाच्या पुस्तकातल्या विठ्ठल-रखुमाईच्या कृष्णधवल फोटोला `तिनं` मनोभावे वाहिलेली प्राजक्ताची फुलं नि तुळस... संध्याकाळी जवळच्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन आल्यानंतर `तिनं` दिलेला प्रसाद नि कपाळी लावलेला बुक्का... `विठोबा` नि माझी ही पहिली भेट असावी. पुढं आषाढी एकादशीच्या सोहळ्याचं दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण सुरू झालं नि आज्जी ते मनोभावे पाहू लागली. अगदी अथपासून इतिपर्यंत. काही काळानं केबलवरून होणारं विविध वृत्तवाहिन्यांवरचं प्रक्षपेण नि वारीच्यानिमित्तानं केलं जाणारं निरुपण ऐकणं, हा `तिच्या`साठीचा वार्षिक दिनक्रमच होऊन गेला. त्यातही बाबामहाराज सातरकर, वा. ना. उत्पात, यशवंत पाठक, विवेक घळसासी, शंकर अभ्यंकर यांची निरुपणं `ती` विशेष आवडीनं ऐकायची. शिवाय वारीच्या निमित्तानं वृत्तपत्रांतून येणारं लिखाण फारच आवडल्यास त्यांचं `ती` कटिंग करून ठेवे.

`तिची` ही विठ्ठलभक्ती नि एकूणातली अध्यात्माची आवड येता-जाता माझ्या कानांवर पडत होती. कुठंतरी मनात झिरपत होती. म्हणूनच असेल बहुधा मराठी साहित्याचा अभ्यास करताना संत वाङ्मयाच्या निमित्तानं भेटलेली संतमंडळी मला परिचितांसारखीच वाटली. त्यांचं साहित्य अभ्यासताना, त्याच्या नोटस् काढताना हे `विठोबा` नावाचं रसायन काही वेगळंच आहे, हे जाणवलं. त्यामुळंच मी आज्जीच्या मागं लागून `तू पंढरपूरला जाऊन ये` असा लकडा लावला. मग पंढरीच्या विठू दर्शनाची आस मनी ठेवून तेव्हा नुकत्याच सुरू झालेल्या पंढरपूर गाडीनं आजी घरच्यांसोबत पंढरपूरला जाऊन आली. त्यातही मजा अशी की, त्यांचं आरक्षण असणारा डब्बा आणि ते चढले तो डब्बा यात बरंच अंतर होतं. गाडी इंटरलिंक नसल्यानं मधल्या स्टेशन्सवर डब्यातून चढ-उतार करत त्यांनी त्यांचा डब्बा गाठला होता. थेट पंढरपूरला जाऊन विठू माऊलीचं दर्शन घेऊन `ती` एवढी तृप्त झाली की, घरी आल्यावर `तिनं` फक्त माझ्या डोक्यावरून हात फिरवला होता... जो आत्ता लिहितानाही आठवतोय... किंचितसा जाणवतोयही...

पुढं वार्तांकनाच्या निमित्तानं प्रतिपंढरपूर मानल्या जाणाऱ्या वडाळा नि सायन येथील विठ्ठल मंदिरांत जायची संधी मला मिळाली, याचं `तिला` फार फार बरं वाटलं. विठोबाचा प्रसाद म्हणून मिळालेल्या नारळाच्या वड्या करून `तिनं` त्या सगळ्यांना वाटल्या होत्या. मंदिराच्या पुजाऱ्यांनी मला नि माझ्या सहकारी मैत्रिणीला दिलेले पासेस घेऊन `तिनं` एक `मिनी दिंडी`च काढली. फक्त ही दिंडी `टँक्सीदिंडी` होती. `ती` शेजारच्या काही आज्जींना घेऊन त्या पासेसवर ऐन आषाढीच्या दिवशी तिच्याच भाषेत सांगायचं तर `विठोबाला जाऊन आली`. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं ते समाधान खूप काही सांगून गेलं. काही वर्षांनी आई-बाबा पंढरपूरला जाऊन आल्यावर तिथल्या खाणाखुणा अजून तशाच आहेत की बदलल्यात, यावर घरी एक चर्चासत्रच झालं होतं.


विठोबाला पूजता पूजता कळत-नकळतपणं कितीतरी गोष्टी `तिनं` सहजगत्या आत्मसात केल्या होत्या. भले `ती` अभंगांचं नित्य पठण करत नव्हती, पण त्यात सांगितल्यानुसार सदाचार, सद्विचार, साधेपणा, सचोटी, साहाय्य, मार्गदर्शन, गुणग्राहकता आदी गुण `तिच्या` अंगी होते. भक्तीचा बडेजाव न मांडल्यानं घरातल्याच तुळशीची पानं वाहूनही `तिचा विठ्ठल` `तिला` प्रसन्न होत होता. `हरीमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी...` या अभंगानुसार आचरण करायचा प्रयत्न `तिनं` आयुष्यभर कसोशीनं केला... `तिच्या` त्या विठूप्रेमाची आठवण सध्या विठ्ठलमय होऊन गेलेल्या वार्तांकनं, चित्रिकरणांमुळं पुन्हा पुन्हा होतेय. आपल्या साध्यासुध्या आयुष्यात संतांनी सांगितलेल्या नि दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणाऱ्या `तिच्या` मनातला `विठ्ठल` रेखाटायचा केलेला हा तोडका प्रयत्न... `विठोबा` का असा शब्दांत पकडता येतोय?... तसा तर `विठोबा` रुजलाय आपल्या मनात मनात... माणूसकीच्या रुपानं तो कधी सगुण दिसतो, तर कधी भक्तीभावच्या रुपात निर्गुण... `विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी...`

3 comments: