पोहत राहिन प्रवाहात...
एकावर एक हात नि दोन्ही अंगठे विरुद्ध
दिशेला हलले नि भिंतीवरच्या सावलीतला मासा दिसला... कदाचित लहानपणी पाहिलेला तो
पहिला मासा असेल, आपण सर्वांनीच. आपलेच हात जणू मासा झाल्येत नि भिंतीवरच्या
प्रकाश-सावलीच्या समुद्रात आपण खेळतोय पोहण्याचा खेळ... पोहत राहिन प्रवाहात... मग
`खरा मासा` पाहिला तो मामाच्या सोसायटीतल्या विहिरीत. एकदम काळाकुळकुळीत... आणि
बहुधा एक कासवही होतं त्याच्यासोबत. पुढच्या फेरीत त्या `काळोबा`सोबत आणखी एक मासाही दिसला होता त्याच्याचसारखा. मग तो प्रघातच पडून गेला
की, मामाच्या घरी जाण्याआधी या `विहिरमित्रां`ना `हाय` करायचं... पुढं
मामानं घर बदललं नि ते `विहिरमित्र`
आठवणींतच राहिले...
मग थोडे अंधुकसे आठवताहेत ते `तारापोरवाला मत्सालया`तले मासे. बराचसा अंधार आणि टिपिकल माशांच्या अस्तिवाचा वास, सगळीकडं कसा
भरून राहिलेला. प्रत्येक फिशटँकपाशी रेंगाळणारी मी. टॅंकवर टिचक्या मारून त्यांची
झोपमोड करणारी चिमखडी... नंतर पाहिलं माशांना ते आत्याकडं गेल्यावर, कर्जतच्या नदीत.
कसले आरामात पोहत होते ते... `नॅचरली` ना! तेवढ्यात गाळ घेऊन गावातली मुलं आली. मग पुढचं काही बघायला मी थांबलेच
नाही तिथं... ते मासे आठवणींतच राहिले...
मग तर काय मासे आले शेजारीच! केशरीजर्द, सोनेरी रंगाचे
नि आपलाच तोल सांभाळत संथगतीनं घरभर फिरणारं कासवदेखील... त्यांच्या पहिल्या भेटीत
वाटलं होतं, `अरे आता काय, आपली रोजच भेट होईल. पण छे,
रुटिनमधून वेळ मिळेल तो कसला?` आणि एक दिवस कळलं की टँक
फुटला... मासे नि कासव... आठवणींतच राहिले... मग एकदा भाच्याबरोबर पाहिलं माशांचं
प्रदर्शन... ते होते टँकमध्ये सुळकन् पोहत नि हा पठ्ठ्या बाहेरच्या बाजूनं त्यांना
बघायला धावत. किती ते प्रकार नि किती ते सततचं पोहणं, हे सगळं मोबाईलच्या
कॅमेऱ्यात आठवणीनं क्लिक केलं... मधल्या काळात मासे दिसले आसपास, पण जिवंत नाही. मैत्रीणींच्या
पुढ्यातल्या डब्यांत किंवा हॉटेलमधल्ये डिशमध्ये. पण त्यांना अजिबातच लक्षात ठेवलं
नाही मी. नावंही सांगितली होती खाणाऱ्यांनी आवर्जून, पण मुळी लक्षच दिलं नाही
त्याकडं... आठवणींचा तर प्रश्नच नाही...
आणि परवा छोट्या भावाबरोबर `तारापोरवाला मत्सालाया`त गेले पुन्हा एकदा. भावाला माहिती सांगण्यासाठी सर्च केल्यावर कळलं की, मुंबईत सागरी मत्स्यसंशोधन केंद्र असावं, अशी संकल्पना
१९२३मध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या मिलार्डनी मांडली होती. मग समुद्रातलं
अद्भूतरम्य जग लोकांना पाहायला मिळण्याच्या हेतूनं मरीन ड्राईव्हला १९५१मध्ये मत्स्यालय
बांधलं गेलं. मत्स्यालयाच्या बांधणीसाठी त्यावेळी आठ लाख रुपये खर्च झाला, त्यापैकी दोन लाखांचा निधी तारापोरवाला यांनी
दिला होता. हेच मत्सालय लहानपणी मी पाहिलं होतं. वर्षभराच्या रिनोव्हेशनंतर ते
खुलं झालंय. दर्शनी
भागात प्रवेशद्वाराजवळ ओशनेरियम सदृश्य पाण्याचा टँक उभारण्यात आल्यानं आपल्याला समुद्रातून
चालत जात असल्याचा नि भोवताली मासे असल्याचा सही फिल मिळतो. आतल्या भागात जुन्या
साध्या काचांऐवजी पारदर्शक फ्लेक्सी काचा बसवण्यात आल्यानं टँकमधले मासे नि जलजीव
अगदी जवळून पाहता येतात. एक सो एक मासे, हा पाहू की तो पाहू... वरच्या एलईडी
स्क्रिनवर झळकणारी त्यांची मराठी-इंग्रजीतली माहिती. बच्चे क्या बुढे भी खुश हो
रहे थे! ओळखीच्या फ्रेंण्डी
गोल्ड फिशपासून ते आगाऊ स्टिंग रेपर्यंत आणि अगडबंब समुद्री कासवापासून ते
पिटुकल्या दमसेल माशापर्यंत सगळ्या मासे कंपनीची ओळखपरेडच जणू होते. `एंजल`च भासणारा मासा नि खरोखरचा `जाएंट फिश` आणि कोंबडा मासा नि समुद्री घोडा चर्चेचा
विषय होतात. त्यांचे फोटो काढता काढता ``फोटो शूट करना मना
हैं, फाईन भरना पडेगा`` या काहींच्या `सुनवलेल्या` वाक्याला ``हमनें पे किया हैं`` हे उत्तर देताना नाकीनऊ आले होते. घरी परतल्यावर भावाला दाखवला, तोच तो
माशांचा खेळ... आपलेच हात जणू मासा झाल्येत नि भिंतीवरच्या प्रकाश-सावलीच्या समुद्रात
आपण खेळतोय पोहण्याचा खेळ... पोहत राहिन प्रवाहात...