Friday, 22 April 2016

तोसे नैना जब से मिले...





``और अगला गाना पेश करते हैं, फिल्म `मिकी व्हायरस`से... जी हाँ, सही पहचाना दोस्तो! आवाज हैं अरिजित सिंग की, और गाना हैं... तोसे नैना जब से मिले``... गाण्याची सुरावट सुरू झाली नि जणू ट्रान्समध्येच जायला झालं... त्यातला एकेक `लब्ज` सही मायनें में लागू होत होता आयुष्याला... त्यातल्या क्षणांना... सुरावटींची लय कमी होऊ लागली...

अरिजित गाऊ लागला...
इस लम्हें को रोक दूँ
या मैं खुद को इस में झोंक दूँ
क्या करू क्या करू क्या करू
इस लम्हें मैं कुछ भी जानू ना
नैना नैना लागे...
तोसे नैना जब से मिले,
बन गये सिलसिलें...
तोसे नैना जब से मिले...

हो रे, बाबा हो, अगदी शंभर काय, हज्जार टक्के खरंए हे... त्या क्षणांना कसं काय रोखावं, स्वतःला कसं, काय, केव्हा सांभाळावं, काहीच म्हणून उमगत नाही बॉsss. स्वतःला त्या क्षणांमध्ये पूर्णपणं झोकून द्यावं का? की आणखी काही करावं... काय करावं, काय करावं, काय करावं?... का सरळ हात झटकून, असं म्हणावं, त्या क्षणांबद्दल मला बॉsss काहीच माहिती नाहीये... पण असं तरी कसं म्हणता येईल?... कारण `तुला` पाहतानाच तर क्षणभरात सगळं घडलं... म्हणायला झाली, फक्त नजरानजर... पण बस्सsss तितकं पुरेसं होतं... तेवढ्यानंच पुढचा `अक्षर` सिलसिला घडायला... कारण, ``तोसे नैना जब से मिले, बन गये सिलसिले``...

अरिजित पुढचं कडवं आळवू लागला...
ओ... सुद-बुद खोई हैं खोई मैंने
हाँ जान गवाई गवाई हैं मैंने
हाँ तुझ को बसाया धडकन में
ओ सावरें...
तोसे नैना जब से मिले,
बन गये सिलसिले``...

`तुला` पाहिल्यावर जणू भोवतालाचं भान हरपून जातं. व्यावहारिक जगाचा विसर पडतो... काळ-वेळेचे निर्बंध आपसूकच विलग होऊन जातात... खाण्यापिण्याची शुद्ध न उरण्याइतकं `तुझ्या`त रमायला होतं... वाटतंय की, `तूच` माझा बहिश्वर प्राण झालायस... माझ्या ध्यानी-मनी `तूच` वसलायस... माझ्या श्वासाश्वासात `तुझं` अस्तित्व जाणवतंय... तरीही `तुला` हाक मारायची धिटाई करतेय.. `ओ सावरे`... कारण, ``तोसे नैना जब से मिले, बन गये सिलसिले``...

अरिजितचं जादूभरं कडवं सुरू होतं...
खुद को खोकर तुझ को पाया,
इस तरह से मुझको जीना आया
तेरी लगन में सब हैं गवायाँ
इस तरह से मुझको जीना आया
तेरी हँसी मेरी खुशी
मेरी खुशी तू ही
तोसे नैना जब से मिले,
बन गये सिलसिले...

`तुला` मिळवण्याच्या नादात स्वतःलाच हरवून बसलेय... `तुला` मिळवण्याचा ध्यास घेतलाय... असंच काहीसं घडलं असावं... काही का असेना पण निदान `तुझ्या`मुळं जगणं तरी काही अंशी कळलंय... `तुझ्या` भेटीच्या हुरहुरतेपोटी, `तुझा` हात हाती घ्यायच्या आसेमुळं, आयुष्यातल्या असंख्य गोष्टी गमावून बसलेय... पण तरीही `तुला` पाहून होणारा आनंद... `तुझ्या`शी संवाद साधल्यानं मिळणारं समाधान... आणि `तुझ्या` अस्तित्वामुळं जगण्याच्या समष्टीचा हळूहळू उलगडणारा अर्थ... हे सारं हवंहवंसं वाटणारं... कारण, ``तोसे नैना जब से मिले, बन गये सिलसिले``...

खरंच, हा सिलसिला लहानपणीच सुरू झालेला... आपली पहिली भेट घडवली आजोबांनी... तेव्हा हाती घेतलेला `तुझा` हात अद्याप सुटलेला नाहीये... मग आपल्या घरच्यांनी (आपले नातलग, मित्रपरिवार, ग्रंथालयांतील कर्मचारी), विविध ग्रंथदालनं, ब्लॉग्ज आणि अन्य `ई माध्यमां`तून `आपली` भेट सातत्यानं घडतेय... आणि पुढंही घडत राहावी... राहिल... `तुझ्या` `अक्षर` जगात मला उलुशी पण हक्काची जागा दिल्याबद्दल, अभिजात शब्दांचे संस्कार केल्याबद्दल, कल्पनेपासून वास्तवाच्या जगात फिरण्याची संधी दिल्याबद्दल आणि `तूच` हे चार शब्द लिहिण्याची `शब्दशक्ती` दिलीस, त्या वरदानाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. एवढी वर्षं `तुला` वाचतेय, तरीही अजून अनंत पुस्तकं वाचायची बाकी आहेतच... लिस्ट वाढता वाढे.... अर्थात त्यामागं आहे अपार उत्सुकता, कुतुहल, `तुझ्या`बद्दलच्या आपुलकीची साद...  पुस्तका, मित्रा, सख्या, सोबत्या... कोणत्या नि किती नावांनी हाक मारावी `तुला`... `तुला` आवडेल ते नाव निवड... आणि हो, सगळयात महत्त्वाचं म्हणजे ज्या निमित्तानं हे सगळं व्यक्त केलंय, त्या २३ एप्रिल अर्थात `जागतिक पुस्तक दिना`च्या हार्दिक शुभेच्छा...
... अरिजितचे सूर हळूहळू लय पावत होते... सुरावट मंदावत होती... तरीही त्या शब्दांनी कायमचं पछाडलं होतंच... कारण, ``तोसे नैना जब से मिले, बन गये सिलसिले``...









*(प्रिय पुस्तकोबा, केवळ `तुझ्या`साठी, पंधरवड्याला ब्लॉग लिहिण्याचा हा अपवाद.)*


(रेखाचित्र – इंटरनेटवरून साभार)



Sunday, 17 April 2016

शब्दखाऊ...

खासमखास शब्दखाऊ खासमखास बच्चेकंपनीसाठी...


झाड
फूल ग फूल
झाडाचा डूल
पान ग पान
इवलसं छान
फळ ग फळ
झाडाचं बळ
झाड ग झाड
उंच ताडमाड

 --

 पान
झाडाचं बाळ
झाडाचं बाळ
खुदूखुदू हसतंय
गोड गोड लाजतंय
वाऱ्यानं वाजतंय
पोपटी हिरवं होतंय
मजेत डुलतंय
झुल झुल झुलतंय.
  

--

मासोळी
सोनसोन सोनेरी
चमचम चंदेरी
सुळसुळ सुळसुळ
चुळबुळ चुळबुळ
खळबळ खळबळ
सळो की पळ
पाण्यात मासोळी
स्विमिंग करी...
मध्येच झाली
खेकड्याशी टक्कर
मासोळीला
आली चक्कर
गोल गर्रगर्र
गरगर फिरी
पाण्यात मासोळी
स्विमिंग करी...
कासवाचा
धरून हात
पाणपरीच्या
जाई घरात
मिळालं फ्रेश
ऑक्सिजनचं टॉनिक
मासोळी आता
जणू वैमानिक
पाण्यात मासोळी
स्विमिंग करी...

-- 

 मनीमाऊ
मनीमाऊ
मनीमाऊ
एकटीच काय
खातेस खाऊ ?
दूध पातेलभर
पोळ्या डझनभर
केव्हाच झाल्या गट्टम
पोट फुगलंय फट्टम
समोरच्या घरातला
फिशचा वाटा
त्या स्पेशल डिशवर
पिल्लांचा डल्ला मार
ऐसपैस झोपतेस सोफ्यावर
पिलं मात्र खोक्यात अंग दुमडून
तो बघ आला बोकोबा
मिशा मिशा फेंदारून
आता उठा राणीबाई
चटकन आळस आवरून
नाहीतर अंगावर गुरकावेल
ते मात्र भारी पडेल.


--


छायाचित्रे – राधिका कुंटे आणि इंटरनेटवरून साभार.

Sunday, 3 April 2016

ऊन


 सध्या नकोशा वाटणाऱ्या उन्हाची हजेरी इथं बघून जीवाची काहिली झाली की काय तुमच्या ? तरी बरं की, गेल्या वर्षी याच ब्लॉगच्या माध्यमातून `देखण्या उन्हाळ्या`बद्दल लिहिलं होतं. त्यामुळं गेल्या वर्षीचा उन्हाळा सुसह्य झाला असावा, काहींसाठी... तो लेख वाचला नसल्यास ही लिंक- http://shbdaphulanchi.blogspot.in/2015/03/blog-post_29.html

खरंतर निसर्गाची किमयाच अशी आहे, की त्यावर लिहिल्या-बोलल्याशिवाय, आपल्याला राहवत नाही. मग तो ऋतूबदल असला तरीही त्या ऋतूला जीवनाशी रिलेट करणं ओघानं होतंच. तसंही आपल्याला थंडी-पावसापेक्षा उन्हाळ्याची सोबत अधिक महिने असते. उन्हाशी अनेकदा होतात गप्पागोष्टी.. आपसूकच शब्दांना चढतो साज, येते त्यांना केशरी-सोनेरी झिलाई, बसून कोवळ्या उन्हाच्या कुशीत, उन्हाचं गाणं गायलं जातं...     
 ऊन

 ऊन ऊन
ऊन ऊन...
तू तिथं मी
मी तिथं तू
ऊन ऊन
ऊन ऊन...
कोवळं ऊन
चैतन्याची खूण
ऊन ऊन
ऊन ऊन...
रणरणतं ऊन
वास्तवाची चूल
ऊन ऊन
ऊन ऊन...
कलतं ऊन
जखमा भरून
ऊन ऊन
ऊन ऊन...
मावळतीचं ऊन
कायम स्वमग्न
ऊन ऊन
ऊन ऊन...
काळोखी गर्भ
प्रकाशाचं बीज
ऊन ऊन
ऊन ऊन...
पुन्हा उजाडलं
चक्र गरगरलं
ऊन ऊन
ऊन ऊन...


छायाचित्रे – राधिका कुंटे.




Sunday, 20 March 2016

रंगयात्री...

गरगरते पंखे, घरघरते एसी आणि हाश्शsssहुश्शss म्हणणारी माणसं... दर उन्हाळ्यातलं कॉमन चित्र. ही उन्हाची तलाखी वाढतच जाणारेय. दुपारच्या वेळी स्माईलवाला गॉगल लावलेला सूर्य अधिकाधिक रुसून बसणारेय. भोवतालच्या आसमंताला जणू उन्हाच्या पिवळ्या रंगाचाच वॉश दिला गेलाय, असला काहीसा फिल आपल्याला येऊ लागतो. मग आणखीनच उकडायला लागतं नि जीव कासाविस होऊन जातो... कबूल आहे, हे सगळं होतंच, पण आपल्याला फारच रखरखीत नि भगभगीत वाटणाऱ्या या सगळ्या वातावरणातून थोडंसं तरी `बाहेर` यायला हवं. `अगदी बाहेरच` म्हणतेय मी. कारण पंखा किंवा एसीच्या थंडाव्यापेक्षा एखाद्या झाडाच्या सावलीत मिळणारा गारवा लई भारी असतो. फक्त त्यासाठी थोडंसं रुटिनपलिकडं डोकवायला हवं. प्रयत्नपूर्वक शोधावेत निसर्गातले रंगयात्री...

फार काही दूर देशी जायची गरज बिल्कुल नाहीये. आपल्याच आसपास एक नजर टाका की जरा. काही झाडांची पानगळ होऊन त्यांना नवीन पालवी फुटत्येयही. त्यामुळं हिरव्या-पोपटी रंगांच्या न्याऱ्या शेडस् जागोजागी दिसू लागल्यात. शहरात राहात असाल तर तुमच्या परिसरातले, रस्त्यांलगतचे देशी बदाम, गुलमोहर, सोनमोहोर, पालवायला लागलेत. थोडीशी तसदी घेऊन, किंचित वाट वाकडी करून गेलात तर काटेसावर, पांगारा आणि बहाव्याला फुलं येऊ लागल्येत. त्या फुलांचे लाल-गुलाबी-पिवळेधम्मक रंग लुभावणारे आहेत. कुसुंबाच्या झाडाची लाल-हिरवी पानं हॅलो म्हणताहेत. पिंपळाला पालवी फुटतेय. पळसाची `भाषिक पानं तीनच` असली तरी तोही फुलतोय... लेटलतीफ सागाची मात्र पानगळ सुरू होतेय. त्याला जवळजवळ मेअखेरीस पानं येतील... चैत्राची चाहूल देणारं कोकिळ कूंजन कानी पडू लागलंय. शिंपी, तांबट पक्षी झाडांवर आपली हजेरी लावताहेत. हळद्याची पिसं पिवळीजर्द होताहेत. कित्येक फुलपाखरं भिरभिरताहेत... हे आहेत निसर्गातले रंगयात्री...

काळा आणि पांढरा या रंगांच्या मधल्या भव्य पटावर निसर्गाच्या रंगांची उधळण सुरू आहे. कारण, ही रंगांची दुनिया, आगळीच किमया. विलोभनीय सृष्टी, नित्यनूतन दृष्टी. हा तांबडा भडकदार, पावित्र्याचा रखवालदार. आकाशाची निळाई, सूर्याची केशरी झिलाई. दिसे रसरसता पिवळा, चटकदार असे जांभळा. की गडद हवा हिरवा, घुमतसे सदा पारवा. सृष्टी रंगविभोर झाली, सप्तरंगाची दाटी जमली... ही एवढी किमया भोवतालच्या निसर्गात घडतेय, तरीही एक हुरहुर मनाला लागून राहिलेय... एका अस्वस्थतेची किनार वेढून राहिलेय... अनेक भागांत दुष्काळ समोर उभा ठाकलाय... शेती करपतेय... शेतकऱ्यांवरच्या आणि पर्यायानं आपल्या सगळ्यांवरच्या संकटांच्या चाहुलीची... त्यासाठी पारंपरिक होळी आणि रंगपंचमीचा वसा बदलायला हवा. वृक्षतोड थांबवायलाच हवी. पाण्याचा अक्षम्य अपव्यय आणि रंगानं रंगणं थांबायलाच हवं. त्यापेक्षा त्यावर होणाऱ्या खर्चाची रक्कम गरजूंना द्यायला हवी. पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्यासाठी झटायला हवं... आपापला खारीचा वाटा उचलला गेला, तर संकटांचा डोंगर पार करणं तुलनेनं सोपं जाऊ शकतं... निसर्गातल्या चैतन्यदायी सेलिब्रेशनची ओळख पटली की निसर्गाशी आपली नकळत मैत्री होते. जपायला हवं मनात उमटणाऱ्या संवेदनांना... निसर्गातल्या चैतन्याच्या खुणा सगळ्यांनी जपायला हव्यात. त्यासाठी व्हायला हवं, निसर्गातले रंगयात्री...


 छायाचित्र – राधिका कुंटे

Sunday, 6 March 2016

निमित्त वर्षपूर्तीचं...


लिहिणं... म्हणजे काय असतं?... फक्त एका शब्दापुढं दुसरा शब्द ठेवणं... की, मनातल्या विचारांचा अर्थ वाहणाऱ्या अचूक शब्दाची नस पकडून त्यांना बोलतं करणं?...
विचार... म्हणजे काय असतं?... मनातल्या असंख्य भावभावना की, भावनांच्या गर्दीतल्या नेमक्या काहींच्या कानाला धरून त्यांना चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करत सुसूत्र करणं?...
मन म्हणजे काय असतं?... बाप्पा होsss... आता हे गणित काही बॉsss कुणाला अजून ठोकपणं उलगडलेलं नाहीये... की मानवी तल्लख मेंदूचंच भावनिक रुपडं म्हणजे मन?...

कठीण आहे याबद्दल काही सांगणं... वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज म्हणजे  लिहिणं म्हणावं, तर तसंही नेहमीच होतं असंही नाही... खरंतर `लिहिणं` या प्रोसेसबद्दल लिहिणं, फारच गुंतागुंतीचं... त्याचंही शास्त्र असलं तरीही... त्यामुळं तो वैचारिक भाग शहाण्यासुरत्या लोकांसाठी ठेवून उरलेली शब्दवेडी, नादिष्ट किंवा ठार वेडी माणसं थेट लिहियलाच लागतात. यात मी कोणत्या कॅटॅगरीत बसतेय, ते तुम्हीच ठरवा...

खरंतर लिहिते आहेच अगदी दुसरी-तिसरीत असल्यापासून... लिखाणाच्या त्या त्या टप्प्यांवर, वयाच्या त्या त्या वळणांवर, कामाच्या त्या त्या स्वरुपांमुळं, माणसांच्या अनाकलनीय स्वभावामुळं, परिस्थितीच्या बदलत्या वाटांमुळं, कधी लिहिण्याची मिळालेली दैवी देणगी जोपासलेय म्हणून, कधी अहेतूक, कधी सहेतूक, कधी उर्मी, कधी उमासा, कधी फक्त सुचतंय म्हणून... लिहित राहिले... लिहित राहिले... येईल तसं... ते व्यक्त होत राहिलं कवितेतून, लेखांतून... कधी फक्त पाठोपाठ भरणाऱ्या वह्यांमध्ये... कधी प्रकाशित होणाऱ्या लेखांमधून... कधी फक्त विचारांचे तरंग... कधी अस्फुटसे रंग...

यापलिकडंही काहीतरी होतं, ज्याला व्यक्त व्हायचं होतं... फक्त मिळत नव्हता वाव... माध्यम माहित असलं तरी नव्हता प्रेरक भाव. `ब्लॉग` या माध्यमातून व्यक्त होण्याची प्रेरणादायी ठरले ते माझ्या मैत्रिणींचे ब्लॉग. त्यासाठी भक्ती तांबे, लीना दातार, मृणाल भगत यांना मोठ्ठं थँक्यू. त्यांनी या नवशिक्या ब्लॉगरला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी लीलया पार पाडली. पाठोपाठ ब्लॉगसंबंधित तांत्रिक गोष्टींसंदर्भातल्या बालिश वाटू शकणाऱ्या प्रश्नांना न थकता उत्तरं देण्याचं काम भाऊ अवधूत भागवत आणि सौरभ वैशंपायन यांनी केलं. ब्लॉग सुरु झाल्यावर काही महिन्यांत करायचं ठरलं, त्याचं फेसबुक पेज. त्यासाठी पुन्हा भक्ती तांबे आणि जुईली म्हात्रे या दोघींनी पुष्कळ मदत केली. कधी योग्य माहितीची पडताळणी करण्यासाठी त्या विषयातल्या माहितगारांना अनेकांना व्हॉटस् अँपच्या माध्यमातून त्रास दिला, त्या सगळ्यांची नावं लिहिणं शक्य नाही. मात्र या सगळ्यांची मी मनःपूर्वक आभारी आहे. लेख लिहिण्यात गुंतल्यावर बाकीची व्यवधानं सांभाळणाऱ्या घरच्या मंडळींबद्दल अधिक काय लिहू...

या व्यक्त होण्यातून काही नेहमीचेच, काही हटके असे लिखाणाचे फॉर्म्स गवसत गेले. कधी ललित लेखानं काव्याचं रुप धारण केलं. कधी कविता ललित लेख झाली. कधी काव्य चौकोनी, त्रिवेणी स्वरुपांत उमटलं. तर कधी लेखांना फोटोंची जोड अजोड ठरली. कधी चित्र, कधी रेखाटनांच्या माध्यमांतून शब्दांहून सरस असं काही हाती लागलं. कधी भूत, कधी भविष्य तर कधी वर्तमानातली सफारी... कधी गोष्ट, कधी खाष्ट, कधी स्वप्न, कधी सत्य, कधी कल्पना, कधी गूढ, कधी मिश्किल, कधी या सगळ्यांचीच पुसटशी सीमारेषा... अल्याड-पल्याड ठरणारं लिखाण हातून होत गेलं. कधी रात्री-बेरात्री, कधी प्रवासात सुचणं, तर कधी काही न सुचल्यानं कोसळलेला अस्वस्थतेचा पहाड... तो ओलांडताना झालेली दमछाक आणि मग झरझर समोरच्या स्क्रिनवर शब्द उमटू लागताच स्थिरावलेपण... खरंतर हे सगळं सगळं असं शब्दांत मांडणं कठिणए... पण शब्दफुलांचीच ओंजळ असल्यानं मी तुमच्या भरवशावर हा प्रयत्न करतेय...

शब्दफुलांची ओंजळ या ब्लॉगची आज वर्षपूर्ती.
वाचकहो, तुमच्याच प्रोत्साहानामुळं हा टप्पा गाठता आलाय.
वाचकहो, तुमचे मनःपूर्वक आभार.
आता आपण भेटणार आहोत, दर पंधरा दिवसांनी.
वाचत राहा, शब्दफुलांची ओंजळ...