शब्दखाऊ...
खासमखास शब्दखाऊ खासमखास बच्चेकंपनीसाठी...
झाड
फूल ग फूल
झाडाचा डूल
पान ग पान
इवलसं छान
फळ ग फळ
झाडाचं बळ
झाड ग झाड
उंच ताडमाड
--
पान
झाडाचं बाळ
झाडाचं बाळ
खुदूखुदू हसतंय
गोड गोड लाजतंय
वाऱ्यानं वाजतंय
पोपटी हिरवं होतंय
मजेत डुलतंय
झुल झुल झुलतंय.
--
मासोळी
सोनसोन सोनेरी
चमचम चंदेरी
सुळसुळ सुळसुळ
चुळबुळ चुळबुळ
खळबळ खळबळ
सळो की पळ
पाण्यात मासोळी
स्विमिंग करी...
मध्येच झाली
खेकड्याशी टक्कर
मासोळीला
आली चक्कर
गोल गर्रगर्र
गरगर फिरी
पाण्यात मासोळी
स्विमिंग करी...
कासवाचा
धरून हात
पाणपरीच्या
जाई घरात
मिळालं फ्रेश
ऑक्सिजनचं टॉनिक
मासोळी आता
जणू वैमानिक
पाण्यात मासोळी
स्विमिंग करी...
--
मनीमाऊ
मनीमाऊ
मनीमाऊ
एकटीच काय
खातेस खाऊ ?
दूध पातेलभर
पोळ्या डझनभर
केव्हाच झाल्या गट्टम
पोट फुगलंय फट्टम
समोरच्या घरातला
फिशचा वाटा
त्या स्पेशल डिशवर
पिल्लांचा डल्ला मार
ऐसपैस झोपतेस सोफ्यावर
पिलं मात्र खोक्यात अंग दुमडून
तो बघ आला बोकोबा
मिशा मिशा फेंदारून
आता उठा राणीबाई
चटकन आळस आवरून
नाहीतर अंगावर गुरकावेल
ते मात्र भारी पडेल.
--
छायाचित्रे – राधिका कुंटे आणि इंटरनेटवरून
साभार.
No comments:
Post a Comment