Sunday, 19 February 2017

विचार



`मेरा नंबर कब आएगा...` असा `विचार` मनात अनेकदा कधी सकारण कधी अकारण डोकावून जातोच. कसंए की, घड्याळाच्या काट्याला धरून चालणारा मुंबईकर किंवा आजकाल डिजिटल आकड्यांच्या काऊंटडाऊनमध्ये गुंतलेला एकूणातच कोणतीही बिझी व्यक्ती... एकदा घराबाहेर पडली की, त्या काट्याला धरून तशी कमीच असते. अनेकदा ती व्यक्ती त्या काट्याला चिटकून पक्षी वेळेला धरून राहायचा प्रयत्न करते किंवा अनेकदा चक्क लोंबकाळायचा प्रयत्न करते. हा अथक प्रयत्न करता करता काही काही वेळा चक्क लागू शकते `विचारसमाधी`...

`विचारसमाधी` हे नेमकं काय प्रकरण असतं बुवा???... ते काही फारफार गहनसहन प्रकरण नसतं. विचार... संस्कार-आचार, काळ-काम-वेगाचं गणित... विचार... भूतकाळी, वर्तमानकाळी, भविष्यकाळी नि अवकाळी... विचार... नवरस, शतसंवेदना, भावनांचे डोह नि खरे-खोटे इमोजीही... विचार... आज, उद्या, परवा आणि तेरवा, एरवा नि आत्ताचे... विचार... गडगडाटी, सनसनाटी, खणखणाटी नि टणटणाटी... विचार... गडबडलेले, गोंधळलेले, वेढलेले नि घेरलेले... विचार... कृतीप्रवण, कृतीशून्य, कृतक नि कृतीतले... विचार... एकावर एक रचलेले, खचलेले, मचमचलेले, खदखदलेले नि पसरलेले... विचार... सुशोभित, अलंकारिक, रत्नखचित नि नटवलेले... विचार... गद्यातले, पद्यातले, धड्यांतले नि ब्लॉगातले... विचार... ध्येयाचे, धोरणांचे, धाकाचे नि धारिष्ट्याचे... विचार... इतिहासातले, भूगोलातले, विज्ञानातले नि वर्तमान क्षणांतले... विचार... शास्त्रकसोटीचे, गणिती आकडेमोडीचे, रोखठोक नि व्यावहारिक... विचार... भावनिक, समजून-उमजून घेणारे, नि हृदयस्पर्शी... विचार... झाडांचे, फुलांचे, पानांचे नि पर्यावरणाचे... विचार... शब्दांचे, सूरांचे, अर्थाचे नि भाषांचे... विचार... लिहिलेले, टाईपलेले, सुलेखनलेले नि बिटवीन्स द लाईन्सवाले... विचार... सुपरसॉनिक, क्रूझ, सुस्साट बाईकिंग नि वेगवान चालतानाचे... विचार... सूतासारखे सरळ, गुंड्यासारखे वाटोळे, उलटसुलट विणलेले नि मनाच्या सुईत ओवले जाणारे... विचार... मतांचे, संवादाचे, मूल्यांचे, सुशासनाचे नि सुसंगत... विचार... कैक क्षणांचे, मिनिटांचे, तासांचे, दिवसांचे नि वर्षांचेही...

sssबाप्पाsss विचारसमाधी भंगली की राव या हॉर्नमुळं!!! ``हॉर्न ओके प्लीज`` असं कितीही लिहिलेलं असलं तरीही किती `हॉर्न ओके` असावा, याचा काही प्रमाण... नेहमीप्रमाणंच ट्रॅफिकचं गाडं पुढं हलायचं नाव घेत नव्हतं. इतक्यात थोडासा मागून तो कान दचकवणारा आवाज ऐकू आला... `वे टू अँब्युलन्स` वगैरे `योजना` राबवायला जागाच नव्हती... तरीही ती कूर्मगतीनं वाट मिळेल तशी पुढं सरकत होती. उगीचच मनात अपराधी वाटून गेलं. काय आपण मघापासून `मेरा नंबर कब आएगा...`ची टेपवजा रड लावून ठेवलेय... खरंतर अँब्युलन्सचा नंबर आधी लागावा, असं खूप प्रकर्षानं जाणवायला लागलं. कदाचित ही जाणीव भोवतालच्या ट्रॅफिकमध्ये व्हायरल झाली असावी, अशा नि इतपत प्रमाणात भोवतालच्या गाड्या मागंपुढं होऊ लागल्या... `कासवाला सशाची गती मिळाली`... अँब्युलन्स हलली आमच्या सिग्नलपासून... पुढं सरकली... डोक्यावरचं ओझं खांद्यावर आलं... आत कोण असेल? काय झालं असेल? सोबत कोण असेल? की, काही वेळा अँब्युलन्सवाले कधीतरी उगीचच सायरन वाजवत गाडी रेटतात तस्सं काही असेल?... सगळ्या प्रकारचे सकारात्मक-नकारात्मक, वास्तवदर्शी-मनःस्पर्शी वगैरे विचार मनात हजेरी लावून गेले... बघा `विचार` आलेच की पुन्हा... वारूळात किंवा गॅलरीतल्या चिमुकल्या भोकात जा-ये करणाऱ्या मुंग्या पाहिल्यात का कधी तुम्ही?... बहुतांशी रांगेची शिस्त पाळतातच. एखादी चुकते तिला वाटेवर आणतात. पण `विचार` म्हणजे मुंगी नव्हे... ते तर वाऱ्याहून बेफाट वेगानं धावतात...  त्याच वेगात नि त्याच उद्योगीपणानं मग `विचारांचं`ही वारुळ उभं राहिलं तर त्यात नवल ते काय?... `विचारां`चं वारुळ असतं हलतं-डोलतं... चालतं-बोलतं... त्यातून `मनाचा नाग` बाहेर पडायचा तर पुंगी आपणच वाजवायला हवी... कशी नि कोणती... ते पुन्हा कधीतरी... सध्या तरी या `विचारांच्या वारुळा`कडं लक्ष द्यायला हवं...




माझ्या ब्लॉगची सहस्त्रचंद्रावी (८०) पोस्ट.

(छायाचित्र – इंटरनेटवरून साभार.)


2 comments: