Sunday, 22 January 2017

कल्हई




परवा आठवणीतील गाणी वेबसाईटवरची गाणी वाचत-ऐकत होते. एका पानावर होतं कल्हईवरचं गीत. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं. गीताचे बोल होते भांड्याला कल्हई लावा, भांड्याला कल्हई लावा. तांब्याची पितळेची करून देतो कल्हई... मन थोडंसं भूतकाळात झेपावलं. लहानपणी पाहिलेलं चित्र डोळ्यांसमोर आलं... धगधगीत फुललेले निखारे... जमून आलेली भट्टी... आधी काळवंडलेली भांडीक्षणार्धात चकाचक होतात... ही कमाल असते कल्हईवाल्यांची.

तो कल्हईचा धूर आठवता आठवता चटका बसला तो वर्तमानाचा. सध्या कल्हईवाल्यांना पूर्वीच्या तुलनेनं कमी काम मिळतंय. नेहमीच्या ग्राहकांकडं सहा महिने किंवा वर्षाकाठी कल्हई लावून घेणं सुरु असलं तरीही कदाचित आणखीन काही वर्षांनी कल्हई करणं, ही संकल्पनाच बंद होईल की काय अशी अटकळ बांधली जातेय. अर्थातच कल्हई करण्याचा व्यवसाय बंद पडेल, या विचारानं मन थोडं खंतावलं.

मुंबईत सध्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतके कल्हईवाले उरले आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे पूर्वीइतक्या सर्रासपणं पितळ्याची भांडी आता वापरली जात नाहीत. पितळ्यापेक्षा वापरायला सोप्या नि सुटसुटीत असणाऱ्या स्टिल किंवा अन्य धातूंच्या भांड्यांचा वापर केला जात असल्यानं साहजिकच पितळ्याची भांडी अडगळीत पडली किंवा मोडीत निघाली. केटरिंग क्षेत्रात पूर्वी पितळ्याच्या भांड्यांचा वापर अधिकांशी केला जायचा. तेही आता बंदच झालं आहे. त्यामुळं कल्हई करावी एवढी भांडीच शिल्लक राहिलेली नाहीत किंवा अनेकदा ती गोळा करावी लागतात.

पितळी भांड्यांत स्वयंपाक करकरून विविध प्रकारचे थर चढवलेली भांडी तशीच वापरल्यास ते आरोग्यास घातक ठरतं. म्हणूनच त्यांना कल्हई केली जाते. ही कल्हई कशी केली जाते... तर भांडी प्रथम गॉस्टिक सोड्यानं स्वच्छ करून घेतात. ती घासून गरम पाण्यानं धुवून त्यात नवसागर घालतात. त्यामुळं धूर येऊन त्यात कल्हई वितळवली जाते. मग हातानं ते भांडं स्वच्छ करून घेतलं जातं. दिसायला नि वाचायला सोप्पं दिसलं तरी हे काम वाटतं तेवढं सोप्पं नाहीये. सध्या कल्हईकाम करणाऱ्यांमध्ये काहीजण वडिल-काका किंवा वडिल-भाऊ यांच्या मागं कल्हई करून आपल्या वडिलोपार्जित उद्योग चालू ठेवत आहेत. पण त्यात म्हणावी तशी कमाई होत नाही. वडाळा, दादर, अँण्टॉप हिल परिसरातल्या काही कल्हईवाल्या काकांशी बोलल्यावर कळलं की, पूर्वीसारखा या व्यवसायात राम उरलेला नाही. पूर्वी शंभर आणे धंदा व्हायचा, आता जेमतेम पंचवीस आणेच होतोय. महिन्याला कल्हईतून मिळणारी पुंजी पुरेशी ठरत नाहीये. पुढचं भवितव्य फारसं स्पष्ट दिसत नाहीये... या व्यवसायातल्या परंपरा जपून आणि त्याचं यथायोग्य तऱ्हेनं आधुनिकीकरण करून त्याला काही ऊर्जितावस्था आणता येईल का, यावर विचार होऊन कृती व्हायला हवी... या विचारात असताना खेबुडकर यांचं गीत पुन्हा आठवू लागलं...

भांड्याला कल्हई, लावा भांड्याला कल्हई
तांब्याची पितळेची, करून देतो कल्हई

माझ्या कल्हईचा न्याराच ढंग
देतो भांड्यांना चांदीचा रंग
गल्लोगल्ली हे घेऊन सोंग
माझ्या कामात माझा मी दंग
थोरांची गरिबांची एकच इथे कल्हई

मज बंगल्यात कोणी पुकारी
कधी जातो मी झोपडदारी
कधी रोखीत कधी उधारी
एका मोलाची ही मज सारी
लेखणीची अन्‌ कल्हईची एकच माझी झिलई

कधी स्वप्‍नीं मलाही दिसले
ओठीं भिडले चांदीचे पेले
हाती कथलाचे पुसणे आले
परि त्याचे सोने झाले
कष्टाची मोलाची भाकर हक्काची खावी.





(गीत सौजन्य - आठवणीतील गाणी वेबसाईट. छायाचित्र सौजन्य – इंटरनेट. छायाचित्र – राधिका कुंटे)

No comments:

Post a Comment