दृष्टिकोन
परवा एका क्लिनिकमध्ये गेले होते. माझा
नंबर यायला वेळ होता. मग आपला उगीचच सोशल साईटवर टीपी चालू होता. घड्याळाचे पुढं
सरकू लागले, तसा त्या टीपीचाही कंटाळा येऊ लागला. तितक्यात क्लिनिकच्या पायऱ्या
चढून त्या तिघी आल्या. पहिली आली झपाझप. पटदिशी रिसेप्शनवर जाऊन तिनं अपॉइंटमेंटची
वेळ तिनं सांगितली. नंतर दुसरी आली ती थोडी मध्यमवयीन. त्यापाठोपाठ जराशा थकल्या
पावल्यांनी आली तिसरी. तिघी खुर्चीवर बसल्या. तितक्यात माझ्यासमोर बसलेल्या
माणसाचा नंबर आला नि तो आत गेला. तेव्हा किंचितशी चुळबुळ झाली त्या तिघींची. मग
पसरली काही क्षणांची शांतता...
मला आपलं आठवलं, उगीचच एक कोडं. ``बापलेक दोघंजण भाकऱ्या
भाजल्या तीन. त्या समान वाटायच्या कशा... तर त्या वाटायच्या एक एक एक. म्हणजे एकूण
तीनजणं होते- बाप-लेक आणि बाप-लेक अशा दोन जोड्या...`` काही क्षणांत
भानावर आले. कुठंपण काहीपण आठवतं राव आपल्याला... तितक्यात त्या तरतरीत पहिलीनं
हाक मारली तिसरीला ``अरी, ओ नानी...``
आईशप्पथ!!! हा कसला भारी योगायोग म्हणावा... `कोडं` आणि `समोरच्या तिघी` हे समीकरण एकदमच फिट्ट जुळलं म्हणायचं. मग थोडं कान देऊन त्यांचं बोलणं
ऐकू लागले.
नानी नातीला काही रिपोर्ट दाखवत होती.
त्याबद्दल काही प्रश्न विचारत होती. किती तारखेला रिपोर्ट काढला, पैसे किती लागले
वगैरे वगैरे. नात तिला समजावत होती. मध्यमवयीन ती त्यांचा तो संवाद ऐकत होती.
तितक्यात एकजण रिसेप्शनशी आला. नानी लगेच सजग झाली. नातीला म्हणाली, ``अग आपला नंबर आहे ना. तो
बघ चाललाय.`` नातीनं तिला समजावलं. तो वेगळ्या कामासाठी आलाय
वगैरे वगैरे. तो माणूस निघूनही गेला. नानी फार कुतुहलानं इकडंतिकडं बघत होती. कोणकोण
कायकाय करतंय, ते न्याहाळत होती. पुन्हा एकदा काही क्षणांच्या शांततेनं हजेरी
लावली...
त्यांच्या संवादाला काहीसा कोकणी-हिंदीचा लहेजा
होता. नानीनं पुन्हा चुळबुळ सुरू केली. आता अधूनमधून ती माझ्याकडं टक लावून बघू
लागली. मध्येच लहान मुलांसारखी नातीला विचारू लागली की, ``हमारा नंबर कब आएगा...`` नातीनं खुसुरफुसुर करत तिला काहीतरी समजावलं. ती जराशी शांत बसली पण
पुन्हा तिचे प्रश्न सुरूच झाले. मग नातीनं गंमत केली. आईच्या फोनवरून नानीला फोन
लावला. तो उचलण्यात नानीचं लक्ष डायव्हर्ट झालं नि नातीनं फोन कट केला. मग कुणी
फोन केला, कसा केला, तुला कळला कसा नाही हे सगळं नानीला समजावण्यात काही वेळ खर्ची
झाला. पुन्हा नानीचा प्रश्न हाजीर झालाच की, ``हमारा नंबर कब
आएगा...`` तो टाळण्यासाठी धाकट्या मायलेकी नानीला म्हणाल्या,
``तू बस. आम्ही जरा जाऊन येतो.``
आपल्या पर्स नानीकडं सोपवून त्या फ्रेश व्हायला गेल्या. पुन्हा एकदा काही
क्षणांच्या शांततेनं हजेरी लावली...
आता नानी थेट माझ्याकडं पाहू लागली. मला
उगीच जबाबदारी वाटू लागली तिची. जणू तिला माझ्यावर सोपवून धाकट्या माय-लेकी गेल्या
होत्या. नानीच्या डोळ्यांत अद्याप कुतुहल होतंच. तितक्यात ती पर्सेस बाजूच्या
खुर्चीवर ठेवून झपाट्यानं आत गेली. आता आली का पंचाईत... कुठं गेली नानी... हे
विचार मनात येईस्तोवर नानी आली नि पाठोपाठ त्या दोघींही. मनातल्या मनात सुटकेचा
निःश्वास टाकला. नानीनं लहान मुलं आपली चूक लगोलग कबुल करतात तसं त्यांना सांगून
टाकालं की मी तुम्हांला आत शोधायला गेले होते... त्यावर धाकट्या माय-लेकींना हसूच
आलं. मग किंचितसं दूर उभं राहून त्यांनी आपापसात काही खुसरफुसर केलं. तेही नानी
कुतुहलानं बघत होतीच. तितक्यात त्यांचा नंबर लागला एकदाचा. वाटलं आता नानी आत
जाईल. पण आत गेल्या त्या धाकट्या दोघीच. नानी बाहेरच. पुन्हा एकदा काही क्षणांच्या
शांततेनं हजेरी लावली...
काही वेळानं नानी उठली. फ्रेश व्हायला
गेली. ती खुर्चीशी आल्यावर दिसलं की, तिनं तोंडावर पाणी मारलंय. जवळच्या रुमालानं
तिनं चेहरा पुसला. डोळे पुसले. चष्म्याची काच पुसली नि तो लावला. मग कुणालासा फोन
लावून पलीकडच्याची खुशाली विचारली. अपार कुतुलहानं भोवतालच्या जगाला निरखू लागली.
रस्त्यावरची वाहतूक, शेजारपाजारची दुकानं, रिसेप्शनमधले पेशंट, रिसेप्शनिस्ट मुली
वगैरे वगैरे. तितक्यात त्या दोघी बाहेर आल्या आणि माझा नंबर लागला. मी आत निघाले.
त्या दोघी बाहेर आलेल्या दिसताच नानी चटकन उठलीच. त्या घरी गेल्या असणार. मी आत
निघाले... बदलला होता तो भोवतालाकडं पाहण्याचा दृष्टिकोन... `नानी`च्या अपार कुतुहलाचा चष्मा लावणं मला आवडलं होतं म्हणा... पुन्हा एकदा
काही क्षणांच्या शांततेनं हजेरी लावली...
No comments:
Post a Comment