Sunday, 28 February 2016

उमजलं समजलं

बऱ्याच दिवसांनी त्या भागात जात होते... तिथं ती एक लाकडी खिडकी... टिपिकल चौकोनी दारं-खिडक्यांची. म्हटलं तर जुन्या आठवणींच्या अदृश्य पडद्यांची... अधेमधे त्यातून पांढरेधोप केसांच्या, सुरुकुत्यांमुळं अधिकच सुरेख दिसणाऱ्या एक आज्जीबाई डोकवायच्या. कधी नुसत्याच रस्त्यावरची गंमत पाहात. कधी त्यांच्या वयाला न जुमानता पटापट सुया फिरवत लोकरकाम करणाऱ्या. त्यांच्या त्या हातांची लय पाहायला मिळावी म्हणून मीही रेंगाळत, रमतगमत जाते. मध्ये कधीतरी त्या आज्जींना ते जाणवलं की काय, कोण जाणे... त्या आपलं काम चालू ठेवत माझ्याकडं बघून अस्फुटपणं हसल्या. चालता चालता विचार करून लागले... काय होतं, त्या हसण्यात... त्या सातत्यानं लोकर विणण्यात... तो सुरुकुतलेला चेहरा, ते पांढरेधोप केस काय सांगू पाहात होते...
   
उमजलं समजलं...
`हो`ला हो, `नाही`ला नाही
उमजलं समजलं...
हे हे असं आहे, हो हो असं आहे
उमजलं समजलं...
हे हे असं नाही, हो हो असं नाही
उमजलं समजलं...
हे सत्य, ते असत्य
उमजलं समजलं...
जगण्याची रित, कधी विपरित
उमजलं समजलं...
कधी काळं, कधी पांढरं
उमजलं उमजलं...
आयुष्यातले सट्टे, सब घोडे बारा टक्के
उमजलं समजलं...
चौऱ्यांशीचा पट, हसे कान्हा नटखट
उमजलं समजलं...
तो आणि मी, मी आणि तो
उमजलं समजलं...
आत्मा-परमात्मा, सामान्यही हुतात्मा
उमजलं समजलं...
जाणिवेची नेणीव, नेणिवेची जाणीव
उमजलं समजलं...
खरंच का, असं घडलं?
उमजलं... समजलं...

...आत्ता असं वाटतंय की बहुधा मला काहीतरी कणभरसं हाती गवसतंय, त्या साऱ्यांमधलं... वाटलं, तेवढं तर तेवढं आपल्याला आकळलेलं आज्जींना सांगून बघूया तर खरं... मग बघू काय म्हणतात त्या... खरंतर ओळख ना पाळख... पण निव्वळ त्या खिडकीतल्या डोकावणं नि माझं त्यांच्याकडं पाहाणं हाच काय तो समान धागा... तोच का तो... त्यांच्या हाताल्या लोकरीचा... अर्धवट विणून झालेल्या वस्त्राचा... पुन्हा जाईन तेव्हा असेल का, ते लोकरकाम पूर्ण झालेलं... काय विणत असतील त्या, कुणासाठी, कशासाठी... हज्जार प्रश्नांचा भुंगा मनात गुणगुणू लागला... त्यातल्या त्यात हे एक बरं झालं की, तेवढं तरी मला उमजलं... समजलं...


  
प्रातिनिधिक छायाचित्र सौजन्य – संजय पटवर्धन.





Sunday, 21 February 2016


मुखवटा

मुखवटा... चेहऱ्यावरचा... चेहऱ्यामागचा... मुखवटा...
मुखवटा... लोकांसमोरचा... स्वतःपुरता... मुखवटा...
मुखवटा... काळा-पांढरा... रंगीबेरंगी... मुखवटा...
मुखवटा... मोजून-मापून आखलेला... मुखवटा...
मुखवटा... अघळपघळ विस्तारलेला... मुखवटा...
मुखवटा... घरचा-दारचा... जनांचा-महाजनांचा... मुखवटा...
मुखवटा... ओथंबल्या भावनांचा... दगडी कोरडेठाकपणाचा... मुखवटा...
मुखवटा... भूतकाळानं वर्तमनापुढं धरलेला भविष्याचा आरसा... मुखवटा...
मुखवटा... चहाच्या कपात घोंघागवणारं वादळ... मुखवटा...
मुखवटा... एका बातमीची नि बातमीमागची गोष्ट... मुखवटा...
मुखवटा... वर्तमानपत्रीय आयुष्याच्या कोलाजचा तुकडा... मुखवटा...
मुखवटा... वास्तव-फॅण्टसीचा रंगीत कॅलिडोस्कोप... मुखवटा...
मुखवटा... परिस्थितीच्या ताण्याबाण्यांचं हेडिंग-सबहेडिंग... मुखवटा...
मुखवटा... बऱ्याचदा परिस्थितीची अवघड कोंडी... मुखवटा...
मुखवटा... बहुतांशी तत्त्वनिष्ठा नि वास्तवाचा झगडा... मुखवटा...
मुखवटा... अनेकदा गैरसमजांचा गुंताडा... मुखवटा...
मुखवटा... सत्य-असत्याच्या दुनियेतली पोकळी... मुखवटा...
मुखवटा... संक्रमण काळातली उमलती पाकळी... मुखवटा...
मुखवटा... श्रीमंतीची जरब... मध्यमवर्गीय कुचंबलेपण... मुखवटा...
मुखवटा... इतरांच्या अस्तित्वाचं प्रयोजन... मुखवटा...
मुखवटा... खऱ्या प्रेमभावाचा संघर्ष... मुखवटा...
मुखवटा... आयुष्यभर मूल्य-तत्वांची सांगड... मुखवटा...
मुखवटा... खऱ्या-खोट्याचा जबरी झगडा... मुखवटा...
मुखवटा... श्रद्धा-अंधश्रद्धांचा जबरदस्त पगडा... मुखवटा...
मुखवटा... संवादी अभियनाची मैफल... मुखवटा...
मुखवटा... नाटकी-सटकी... गदारोळ-गहजब... मुखवटा...
मुखवटा... आनंदाचा धबधबा... दुःखाचा कडेलोट... मुखवटा...
मुखवटा... उत्साहाच्या उकळ्या... मत्सराच्या ज्वाळा... मुखवटा...
मुखवटा... मदतीचा उकाडा... मोहाचा सापळा... मुखवटा...
मुखवटा... नजाकती अदांचा... थापलेल्या रंगांचा... मुखवटा...
मुखवटा... सोवळा-ओवळा... देशी-विदेशी चेहऱ्यांचा... मुखवटा...
मुखवटा... छापील-इलेक्ट्रॉनिक तोंडावळ्याचा... मुखवटा...
मुखवटा... गग्गोड भाषेचा... मिंग्लिशच्या कडबोळ्यांचा... मुखवटा...
मुखवटा... `लेखी-बोली-ऐकिवा`चा... `इमोजी टच`चा... मुखवटा...
मुखवटा... स्मार्टी लाईफस्टाईल... टेक्नॉलॉजिकल स्माईल... मुखवटा...
मुखवटा... एका आवर्तनाची पूर्तता... `खेड्यांकडं परता`च्या हाका... मुखवटा...
मुखवटा... पुन्हा व्हावा `निसर्गसखा`... पुन्हा `सकार` साकारावा... मुखवटा...
मुखवटा... तुमचा-आमचा-यांचा... माझा-तुझा-सगळ्यांचा... मुखवटा...
मुखवटा... मुखवटा... मुखवटा... मुखवटा... मुखवटा... मुखवटा...




छायाचित्र- इंटरनेटवरून साभार.


Sunday, 14 February 2016

जीवनगाडी

जीवनगाडी झुकझुक झुकझुक
झुकझुक झुकझुक झुकझुक
पहिलं स्टेशन `बालपण`...
तो `साबणाचा फुगा`...
म्हणे `टायटन रागा`...
जीवनगाडी झुकझुक झुकझुक
झुकझुक झुकझुक झुकझुक
दुसरं स्टेशन `किशोर`...
`मन होई विभोर`...
म्हणे `चंद्राची कोर`...
जीवनगाडी झुकझुक झुकझुक
झुकझुक झुकझुक झुकझुक
तिसरं स्टेशन `तरुण`...
`बरसतो वरुण`...
म्हणे `दिसतं गुलाबून`
जीवनगाडी झुकझुक झुकझुक
झुकझुक झुकझुक झुकझुक
चौथं स्टेशन `मध्यमा`...
`गाठताना लागे दमा`...
म्हणे `आयुष्याचा खानसामा`...
जीवनगाडी झुकझुक झुकझुक
झुकझुक झुकझुक झुकझुक
पाचवं स्टेशन `म्हातारपण`...
पुन्हा तो `फुग्याचा साबण`...
म्हणे `मृत्यूचं रिंगण`...
जीवनगाडी झुकझुक झुकझुक
झुकझुक झुकझुक झुकझुक



  


Sunday, 7 February 2016

क्षण एक पुरे...

``एकदा काय झालं, एक फुलपाखरू उडत उडत आलं नि एका फुलावर बसलं. तितक्यात तिकडून आला``... बस्स... याच `आला`नंतर सुरू होतो कल्पनाशक्तीचा खेळ. तुम्हीही वाचताना सरसावून बसला असालच की, अं... `त्या फुलपाखरा`चं पुढं काय होतं?, ते वाचायला... खरंतर त्याचं काय होतं, हे सांगणारी गोष्ट मोजून चार वाक्यांत संपवता येईल. किंवा मग तिला मोठ्या नमुनेदार भावकाव्याचं रुपडं देता येईल. किंवा मग त्यावर रचता येईल एक लघुकथा किंवा अगदी कथाही. किंवा अधिक व्यापक पट घेऊन मांडता येईल कादंबरी... किंवा मग महाकादंबरीचा पटही... फक्त गोष्ट सांगणाऱ्यानं ठरवायचं की, गोष्ट कोणत्या फॉर्ममध्ये सांगायची ते...

थोडी पुस्तकी भाषा मांडायची, तर एका विशिष्ट अशा स्थलकालानुबद्ध परिस्थितीत, क्षणी निर्माण होणाऱ्या लेखकाच्या अनुभूतीला `साहित्य` असं म्हणता येईल. या साहित्यातून त्या त्या काळचा समाज, प्रवृत्ती, परिस्थिती, लेखकाच्या भावानुभवाचं प्रगटीकरण होत राहातं. त्यामुळंच समाजात घडणाऱ्या घडामोडी, घटनांचं प्रतिबिंब साहित्यात आवर्जून पडतं. अनेकदा अनेक संदर्भांत म्हटलं गेलेलं तुम्हांलाही आठवत असेल की, `साहित्य हे वास्तव आणि कल्पनेचा सुरेख संगम आहे`. हांsss हांsss बिल्कुल घाबरू नका... आपण `साहित्यशास्त्र` किंवा `साहित्य आणि समाज` या `मराठी`च्या विषयांचा अभ्यास करणार नाहीयोत. पण मराठीची विद्यार्थिनी असल्यानं त्या अभ्यासाची झलक दिसू शकतेही...

तर `त्या फुलपाखराचं काय झालं`, हेही लेखकाच्या मनात ठरलं असेल खरं... पण तरीही तो ते अनेक प्रकारे व्यक्त करू शकेल. एकदम सकारात्मक, अतिशय नकारार्थी, फिफ्टी-फिफ्टी, तटस्थ वगैरे वगैरे... कसं काय असतं बुवा हे व्यक्त होणं?... ते काही मशीन नव्हे झेरॉक्सचं, की टाकला आत पेपर नि पडली बाहेर झेरॉक्स.  कसंए की तो एक क्षण पुरतो, क्लिक होण्यासाठी... कधीकधी पटकन क्लिक होते `कल्पना` नि उतरवलं जातं सगळं कागदावर किंवा कॉप्युटरवर... कधी असं काही बदाबदा सुचायला लागलं की उडते तारांबळ. विचारामागून विचार सुरूच आपले... ती गजरेवाली नाही, का कशी गुंफते फुलामागून एकेक फुलं सराईतपणं... तस्संच... मग रफपेपर, बसचं तिकिट असं वाट्टेल ते चालतं कल्पना उतरवून घ्यायला. मात्र कुणाला लागतो अमूकच पेपर नि तमूकच पेन... कुणाला लागतो पिनड्रॉप सायलेन्स, तर कुणाला चालून जाते लोकलगर्दी... त्या तंद्रीत सुचतं ते भराभरा लिहून काढावंच लागतं. नाहीतर मग फार अस्वस्थता येते बुवा... कारण नाही, लिहिलं तर अनेकदा केवळ अर्धामुर्धा भाग आठवतो... त्यात घातलेली भर काही वेळा उतरते बेमालूम... कधी वाटू शकते विजोड ठिगळासारखी...

कधी मात्र `फुलपाखराचं काय करावं`?, हे कितीही आटापिटा केला तरी ढिम्म उमगतच नाही. त्या `फुलपाखराच्या कल्पने`ची `कोषातली अळी` होते जणू.... डाराडूर झोपी गेलेली... जीव कसा नुसता कासाविस होऊ लागतो... `सुचत नाही काही, म्हणून जीवाची होते लाहीलाही`, असले काहीतरी फुटकळ शब्द लुडबुडू लागतात डोक्यात... तितक्यात होतं काहीतरी एकदम क्लिक... `कल्पना`...

कल्पना
कल्पने रुसलीस का?
सांग रागावलीस का?
कुठं आहेस आत्ता?
काय तुझा पत्ता?
किती तुला ग शोधले
हाती काही न गवसले
मती सुन्न झाली
लेखणी ही थबकली
काव्यराजा अडला
कागदची गोंधळला
सांग की ठावठिकाणा?
किती हा आडमुठेपणा?
विचारांच्या गर्दीत हरवलीस
कुठे न तुझा मागमूस
उत्तर तूच देशील
भरारी मारत येशील...

आता सुचलं की `काहीतरी`... पण ते निघालं तिसरंच... काय तर म्हणे? `कल्पना`... `या फुलपाखराचं काय करायचं`?, हा प्रश्न `जैसे थे`... आपल्याभोवतालच्या अनेक प्रश्नांसारखा... कधीतरी, काहीतरी करायला हवं, `या फुलपाखराचं`... सुचेलही कदाचित पुढल्या कोणत्यातरी लेखात... `तो एक क्षण पुरे, क्लिक होण्यासाठी`... तोपर्यंत `कल्पने`चे पंख फडफडत राहणार... `फुलपाखरा`च्या अनाहत उडण्याइतकेच...
     
  
    (रेखाचित्रकार - जयंत कुंटे.)



(सलग सुवर्णमहोत्सवी (५०) पोस्ट.)