Monday, 27 July 2015



विठोबा...

`तो` तर मला कायमच भेटत आलाय... फक्त माध्यमं वेगवेगळी होती... कधी शब्द, कधी सूर, कधी गाणं, कधी टाळ तर कधी मृदुंग... कधी थेट प्रक्षेपण तर कधी त्याच्या स्थानिक मंदिरातलं दर्शन... कधी फक्त चातुर्मास महात्म्यामधला, कधी कृष्ण-धवल नि नंतर नंतर रंगीत रुपड्यातला... कधी कधी वृत्तपत्रातल्या त्याच्या फुलपेज फोटोतून... `त्याच्या` या वेळोवेळी नि बहुतांशी वेळा वार्षिक भेटीसाठी कारणीभूत ठरायची ती माझी आज्जी. वडिलांची आई. आत्ता मी `तिच्या` अस्तित्वासाठी भूतकाळ वापरला तरी ती माझ्या आसपासच आहे, अशी आपली माझी एक समजूत... नि `तो` तर काय... अनादी-अनंत काळ पुंडलिकासाठी उभा ठाकलेला आहेच... आपल्या सगळ्यांचाच `विठोबा`...

`आज दिवसभर मोठ्यांचा उपास असणार आहे, तेव्हा आपल्याला उपासाचं नि रोजचं जेवण असं दोन्हीकडचं खायला मिळणार आहे, ` या आनंदी भावनेची एक लहर असणं, ही लहानपणच्या काही आषाढींची एक `उपाशी` आठवण. सोबतच चातुर्मासाच्या पुस्तकातल्या विठ्ठल-रखुमाईच्या कृष्णधवल फोटोला `तिनं` मनोभावे वाहिलेली प्राजक्ताची फुलं नि तुळस... संध्याकाळी जवळच्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन आल्यानंतर `तिनं` दिलेला प्रसाद नि कपाळी लावलेला बुक्का... `विठोबा` नि माझी ही पहिली भेट असावी. पुढं आषाढी एकादशीच्या सोहळ्याचं दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण सुरू झालं नि आज्जी ते मनोभावे पाहू लागली. अगदी अथपासून इतिपर्यंत. काही काळानं केबलवरून होणारं विविध वृत्तवाहिन्यांवरचं प्रक्षपेण नि वारीच्यानिमित्तानं केलं जाणारं निरुपण ऐकणं, हा `तिच्या`साठीचा वार्षिक दिनक्रमच होऊन गेला. त्यातही बाबामहाराज सातरकर, वा. ना. उत्पात, यशवंत पाठक, विवेक घळसासी, शंकर अभ्यंकर यांची निरुपणं `ती` विशेष आवडीनं ऐकायची. शिवाय वारीच्या निमित्तानं वृत्तपत्रांतून येणारं लिखाण फारच आवडल्यास त्यांचं `ती` कटिंग करून ठेवे.

`तिची` ही विठ्ठलभक्ती नि एकूणातली अध्यात्माची आवड येता-जाता माझ्या कानांवर पडत होती. कुठंतरी मनात झिरपत होती. म्हणूनच असेल बहुधा मराठी साहित्याचा अभ्यास करताना संत वाङ्मयाच्या निमित्तानं भेटलेली संतमंडळी मला परिचितांसारखीच वाटली. त्यांचं साहित्य अभ्यासताना, त्याच्या नोटस् काढताना हे `विठोबा` नावाचं रसायन काही वेगळंच आहे, हे जाणवलं. त्यामुळंच मी आज्जीच्या मागं लागून `तू पंढरपूरला जाऊन ये` असा लकडा लावला. मग पंढरीच्या विठू दर्शनाची आस मनी ठेवून तेव्हा नुकत्याच सुरू झालेल्या पंढरपूर गाडीनं आजी घरच्यांसोबत पंढरपूरला जाऊन आली. त्यातही मजा अशी की, त्यांचं आरक्षण असणारा डब्बा आणि ते चढले तो डब्बा यात बरंच अंतर होतं. गाडी इंटरलिंक नसल्यानं मधल्या स्टेशन्सवर डब्यातून चढ-उतार करत त्यांनी त्यांचा डब्बा गाठला होता. थेट पंढरपूरला जाऊन विठू माऊलीचं दर्शन घेऊन `ती` एवढी तृप्त झाली की, घरी आल्यावर `तिनं` फक्त माझ्या डोक्यावरून हात फिरवला होता... जो आत्ता लिहितानाही आठवतोय... किंचितसा जाणवतोयही...

पुढं वार्तांकनाच्या निमित्तानं प्रतिपंढरपूर मानल्या जाणाऱ्या वडाळा नि सायन येथील विठ्ठल मंदिरांत जायची संधी मला मिळाली, याचं `तिला` फार फार बरं वाटलं. विठोबाचा प्रसाद म्हणून मिळालेल्या नारळाच्या वड्या करून `तिनं` त्या सगळ्यांना वाटल्या होत्या. मंदिराच्या पुजाऱ्यांनी मला नि माझ्या सहकारी मैत्रिणीला दिलेले पासेस घेऊन `तिनं` एक `मिनी दिंडी`च काढली. फक्त ही दिंडी `टँक्सीदिंडी` होती. `ती` शेजारच्या काही आज्जींना घेऊन त्या पासेसवर ऐन आषाढीच्या दिवशी तिच्याच भाषेत सांगायचं तर `विठोबाला जाऊन आली`. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं ते समाधान खूप काही सांगून गेलं. काही वर्षांनी आई-बाबा पंढरपूरला जाऊन आल्यावर तिथल्या खाणाखुणा अजून तशाच आहेत की बदलल्यात, यावर घरी एक चर्चासत्रच झालं होतं.


विठोबाला पूजता पूजता कळत-नकळतपणं कितीतरी गोष्टी `तिनं` सहजगत्या आत्मसात केल्या होत्या. भले `ती` अभंगांचं नित्य पठण करत नव्हती, पण त्यात सांगितल्यानुसार सदाचार, सद्विचार, साधेपणा, सचोटी, साहाय्य, मार्गदर्शन, गुणग्राहकता आदी गुण `तिच्या` अंगी होते. भक्तीचा बडेजाव न मांडल्यानं घरातल्याच तुळशीची पानं वाहूनही `तिचा विठ्ठल` `तिला` प्रसन्न होत होता. `हरीमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी...` या अभंगानुसार आचरण करायचा प्रयत्न `तिनं` आयुष्यभर कसोशीनं केला... `तिच्या` त्या विठूप्रेमाची आठवण सध्या विठ्ठलमय होऊन गेलेल्या वार्तांकनं, चित्रिकरणांमुळं पुन्हा पुन्हा होतेय. आपल्या साध्यासुध्या आयुष्यात संतांनी सांगितलेल्या नि दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणाऱ्या `तिच्या` मनातला `विठ्ठल` रेखाटायचा केलेला हा तोडका प्रयत्न... `विठोबा` का असा शब्दांत पकडता येतोय?... तसा तर `विठोबा` रुजलाय आपल्या मनात मनात... माणूसकीच्या रुपानं तो कधी सगुण दिसतो, तर कधी भक्तीभावच्या रुपात निर्गुण... `विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी...`

Sunday, 19 July 2015


लाईफ इज लाईफ दॅट...


दिसतंय का ते आकाश...
आपल्या जीवनाचा अवकाश
त्याला कवटाळणारा उंचेला टॉवर...
पडेलsss पडेलss हळूsss सावरsss
आडव्याचं उभं वाढणारं शहर...
`मुंबई स्पिरीट`चा होतोय कहर
विळखेदार वायरींचं जंजाळ...
धावती मनं होतात भंजाळ
`नेटवर्क`लेलं वाय-फाय...
प्रत्यक्षात जस्ट हाय-बाय
पोपटी-हिरवटलेली पानं...
लाखो मुंबईकरांची मनं
शेकडो फांद्या वाढलेल्या...
म्हातारपणाच्या सावल्या
फूटू पाहणारी पालवी...
आशेच्या किरणांची पालखी
पांढरीशी फुलं नाजूक...
शहराची स्वप्नं भावूक
एक क्लिक, अँगल्स अनेक
ये हैं मुंबई, भाई देख... 



Sunday, 12 July 2015

पाऊस, पाणी नि परी

`क्लिकsss` कँमेऱ्याचा फ्लँश चमकावा तशी आकाशात वीज चमकली. सोफ्यावर चित्र काढत बसलेल्या परीनं चमकून आकाशाकडं बघितलं. तशी पुन्हा एक वीज चमकली नि मग सुरू झाला एकेक थेंबांचा डान्स... नि पाऊस पडायला लागलाही. हे पाहिल्यावर परीनं बेडरूममध्ये एकच धूम ठोकली नि ती आजीच्या कुशीत शिरली. ती म्हणाली, ``आजीsss ग... बघ आकाशानं क्लिक केलं... आता त्यांचा डान्स सुरू झाला नि आता त्यांचा बँण्डही वाजेल...`` तिचं वाक्य पुरं व्हायच्या आतच मोठ्यानं ढग गडगडायला सुरूवात झाली. जणू ते ढग या भित्र्याभागूबाईला हसत होते. आता परीचं काही खरं नव्हतं. तिची पार बोबडी वळाली होती. आजी तिला खूप समजावायचा प्रयत्न करत होती, पण ती काही ऐकायलाच तयार नव्हती. रडता रडता परीला झोप लागली...

परी पोहचली होती एका वेगळ्याच राज्यात. तिथं माणसं नव्हती. तर होतं जंगल. छान हिरवंगार. हीsss एवढाली मोठ्ठी झाडं, त्यांची कितीतरी पानं-फुलं. जंगलाच्या मधोमध होतं एक तळं. ``sss नो... इथंही पाणी आहेच का?`` म्हणत परी चार पावलं मागं गेली. तेवढ्यात ती कशाला तरी आपटली. काय होतं, ते तिला दिसलंच नाही. ती आपली सवयीनं `सॉरी` म्हणाली, हात हलवत तर तिच्या हाताला पाणीच लागलं एकदम... तिचा हात ओला झाला. ईsss ती किंचाळली. त्या सरशी सगळं जंगल तिच्याभोवती गोळा झालं. त्या शांत तळ्यातही खळबळ माजली. ``काय झालं?`` असं जो तो एकमेकाला विचारू लागला. तेवढ्यात तिच्या हातावर पडला एक टप्पोरा थेंब. मग काय तिची बोलतीच बंद झाली. बाकीचे सारे मात्र त्यांच्या अंगावर पडलेल्या थेंबांना `वेलकम` करत होते. मोरानं पिसारा फुलवला होता. वाघोबा खुशीत मिशीत हसत होते. पक्षी पंख फडफडवत होते. ससा दुडूदुडू धावत होता नि हत्तोबा सोंड हलवत होते. ``आईsss शप्पथsss काय झालं काय या सगळ्यांना?`` परी विचारात पडली.

तेवढ्यात खरोखरची परीराणी तिथं आली. ती आपल्या छोट्या परीला म्हणाली, ``तू पाण्याला घाबरतेस? त्यात काय आहे घाबरण्यासारखं? परीनं फक्त खऱ्या परीकडं पाहिलं. खरी परी म्हणाली, ``अग, पाण्याला काय घाबरायचं? ते तर आपल्या सगळ्यांचं लाईफ आहे. त्यामुळंच तर आपल्याला जीवन मिळतं. म्हणजे आपल्याला प्यायला पाणी लागतंच. आम्हांला जंगलात चारा-फळं मिळतात. झाडं-झुडुपं बहरतात. पाण्यामुळं शेतं पिकतात नि तुम्हांला धान्यं मिळतं. काय खरं ना?`` छोट्या परीनं फक्त मान डोलावली. ``पण ते पाणी... तो थेंब... ते क्लिक होणं... ते आवाज...`` तिच्या मनातले प्रश्न ओळखून परीराणी म्हणाली, ``अग, ते थेंब म्हणजे आपले फ्रेण्डस्. आपले मित्रच. पण `तो` पडलाच नाही तर मग आपलं काही खरं नसतं. मग दुष्काळ पडतो, पाणीकपात होते, जशी आता होऊ घातलेय, तुम्हा माणसांच्या राज्यात. हे होऊ नये म्हणून कायमच पाणी वाचवा नि पर्यावरणाशी मैत्री करा, असं आमचं सांगणं आहे, तुम्हाला. काही कळलं का?`` यावर परीनं अर्धवट मान हलवली. कारण थोडंसं कळलं होतं नि थोडंसं कळलं नव्हतंही.

परीराणी पुढं म्हणाली, ``आता पाण्याची वाफ होऊन ती आकाशात कशी जाते नि पुढं तिचं पावसात रुपांतर होतं, हे थोडी मोठी झाल्यावर तुला शिकायचंच आहे. पण आत्ता तू एवढंच लक्षात ठेव की, पाऊस, विजा नि ढग गडगडणं यात घाबरण्यासारखं काहीच नाहीये. ते सगळं होणं हे निसर्गाचाच एक भाग आहे. बघ, आम्ही कुणी घाबरतो का?`` ``नाहीsss`` असं सगळेजण एका सूरात ओरडले. नि मग काय पावसाला आणखीच आनंद झाला. तो या मित्रांसाठी आणखी जोरात पडू लागला. त्यासरशी सगळेजण गोल करून करू लागले रेनडान्स... ``पाऊस आला रे आला... येsss...`` आपल्या परीला परीराणीचं म्हणणं पटलं नि मग तीही सगळ्यांच्यात सामील झाली...


``येsss... पाऊस आलाsss`` असं परी झोपेत बडबडतेय, हे पाहून आजी धावतच आली. तिनं परीला जागं केलं. `काय झालं?`` म्हणून विचारू लागली. तोवर आई-बाबा, आजोबा नि दादा सगळेच जमले. परीला थोडा वेळ काही कळलंच नाही. ती फक्त गॅलरीतून आकाशाकडं पाहात राहिली. तेवढ्यात एक टप्पोरा थेंब गॅलरीत आला नि टुण्णकन उडी मारून ग्रिलवर बसला. लगेच परी त्याच्याजवळ गेली नि तिनं त्याला हातावर घेतलं. तेवढ्यात दुसरा, तिसरा नि चौथा थेंबही आलाच... तिनं दोन्ही हात पुढं केले. घरातले सगळे बघतच राहिले. परी म्हणाली, ``चल रे दादा, आपण आपल्या `मित्रा`ला भेटायला जाऊया... येsss... पाऊस आलाsss...`` बघता बघता परी नि दादा अंगणात पोहचलेदेखील. मग हेsssएवढाले थेंब त्यांच्या भेटीला आले. त्यांनी दोघांना गळामिठीच घालते. ते बघून विजमावशी आनंदानं चमकली नि ढगमामा हसत हसत गडगडले... परी खुदकन हसून म्हणाली, ``येsss...पाऊस आलाsss...``

Sunday, 5 July 2015

शॉपिंग... लाईफलॉंग...

`आपली` चाहूल लागल्यापासून आपल्यासाठीच्या खरेदीचे बेत रचले जातात. `आपण` पहिलं ट्यँह्याँsss केल्याक्षणी `आपल्या`साठीच्या ढीगभर खरेदीला सुरुवात होते, ती संपता संपतच नाही. कपडेलक्ते, खाऊ, खेळणी वगैरे वगैरे. कडेवर बसून मागितलेलं रंगीत भिरभिरं किंवा फुगा हे `आपलं` असं पहिलंवहिलं शॉपिंग असतं. गुडघ्याएवढं झाल्यावर आपल्यालाही `आपलीआपली` खरेदी करावीशी वाटते. अमूकच रंगाचा ड्रेस, तमूकच रंगाची गाडी असली स्पेसिफिकेशन्स यायला लागतात. टिनएजमध्ये घरच्यांनी, परिचितांनी मोठ्या प्रेमानं शॉपिंग करून आणलेल्या प्रत्येक वस्तूला नाकं मुरडायचाच मूड असतो. तेव्हा आई-वडिलांचा सहारा हवा असतो तो फक्त भरभक्कम पॉकेटमनीसाठी. बाकी त्यांच्या नि `आपल्या` पसंतीत जमीन-आस्मानाचं अंतर पडू लागलेलंच असतं. मग होतं शॉपिंगचं प्लॅनिंग... कधी फ्रेण्डससोबत. कधी `तो` किंवा `तिच्या`सोबत... खरंतर शॉपिंग हे फक्त निमित्त असतं, `आपण` भेटायचं. त्यामुळं अनेकदा होतं ते विंडो शॉपिंगच! तरीही कसलं सॉलिड फिलिंग येतं. सगळे मिळून भटकतोय, गप्पा हाणतोय, मजामस्करी करतोय. खादाडी चालूए नि तरीही मिसिंग आहे... समहाऊ काय होतंय, ते कळत नाहीए... तरीही त्या शॉपिंगचा सही फिल येतो. गच्च भरलेली लोकल बाजारपेठ असेल किंवा हायफाय मॉल्स... कॅची डिस्प्ले प्रॉडक्टस नि त्यातला रंगीबेरंगीपणा, नव्याकोऱ्या वस्तूंचा टिपिकल वास... `हा हवा, तो नको` करत शॉपिंग सिलेक्शनचा जणू आखाडाच केलेला. बरं, यात मुलगे नि मुली यांचं शॉपिंग असा एकेकाळचा भेदभाव तर आताशा मुळीच होत नाही. कधी हळूच इतरांचा डोळा चुकवून फक्त एकमेकांसाठी केलेलं शॉपिंगही कायमच लक्षातजोगं. कॉलेजमधली सुरेल स्वप्नांची वर्षं सरल्यावर त्या `रंगीन शॉपी मोमेंटस`ची याद काढत टिपिकल कॉर्पोरेट शॉपिंग करावं लागतं, तेव्हा काहींच्या तोंडाला फेस येतो. किंमतीनंच नाही तर हे फॉर्मल्सच फॉलो करावे लागणार या कल्पनेनंच... करिअर बहरल्यावर निवड होते, लाईफपार्टनरची. केलं जातं धमाकेदार सेलिब्रेशन. लाईफपार्टनरसोबत केलेलं लग्नाचं सिलेक्टेड शॉपिंग तर हल्ली शूटही केलं जातंय, एखाद्या इव्हेंटसारखंच... पुढं लग्नानंतर शॉपिंग एक्सपिरिअन्स पचनी पडायची सवय होऊ लागते नि काही काळानं नव्या जिवाची चाहूल लागते. बाळाच्या पहिल्या ट्यँह्याँsssची आतुरतेनं वाट पाहिली जाते... वर्तुळ पूर्ण होऊ घातलेलं असतं... शॉपिंग... अ लाईफलॉंग एक्सपिरिअन्स... जस्ट शॉप इट...