आजो...
लहानपण आठवलं की, आठवणींचे धागे आपोआप जुळायला लागतात नि
डोळ्यांसमोर येते एक भारदस्त मुद्रा... माझे आजोबा अर्थात वडिलांचे वडील. उंचधिंच
व्यक्तिमत्त्वं, धोतर, टोपी, कोट नि करारी चेहऱ्यामुळं त्यांची झटकन छाप पडे. आमचं
गाव रायगड जिल्ह्यामधलं नागांव. तिथं शिक्षण झाल्यावर लगेचच पोटापाण्यासाठी ते
मुंबईला आले नि इथंच स्थायिक झाले. मुंबईत त्यांनी फार मेहनत नि कष्ट केले. मला
आजोबा आठवतात, ते साऱ्यांचं करुन सुखी–समाधानी पावलेले. कुटुंबातले इतरजण त्यांना `आबा` म्हणाले, तरी मी तसं कधीच म्हटलं नाही. `आजोबा` किंवा `आजो`, अशी हाक
मारण्यात मला काय वाटायचं ते देवच जाणे.
ते मुळजीजेठा मार्केटमध्ये व्यापारी होते. त्यांची गुज्जुभाईशी
मैत्री असल्याने ते गुजराथी उत्तम बोलत. त्यांच्या व्यापारी मित्रांत ते प्रिय
होते. त्यांचे अनेक मित्र घरी येऊन तासन तास गप्पा मारत असत. आजोबा मूळचेच हुशार.
जिल्हात पहिले आलेले. त्यांना उत्कृष्ट वत्कृत्वकला अवगत होती. त्यांनी आपल्या
वाचनाच्या आवडीचा वारसा मला दिला. सकाळी उठल्यावर व्यायाम करणं अंघोळ करुन देवची
पूजा झाल्याशिवाय काहीही न खाणं, ठराविक वेळी जेवणं, सायंकाळी शिवाजी पार्कत फेरी
मारणं इत्यादी शिरस्ते त्यांनी कधीच सोडले अथवा मोडले नाहीत.
त्यांचा मनावर खूप ताबा होता. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे
त्यांचा डायबेटिस कधी न वाढल्यानं डॉक्टर्स त्यांची गणना आदर्श पेशंटमध्ये करत.
अर्थात यात आजीचा वाटा मोलाचा होताच. त्यांचं पाठांतरावर प्रभुत्व होतं. निरनिराळे
श्लोक, रामरक्षा, संस्कृत गोष्टी आदी पाठांतर करण्यालायक गोष्टी मी त्यांच्याकडून
शिकले. ते देवाचे फार करीत अशातला भाग नव्हे, पण जे करीत ते मनापासून. एकीकडं
रामरक्षा शिकवणाऱ्या आजोबांनी मला पत्ते खेळण्यासही शिकवलं, याचं राहून राहून मला
नवल वाटतं. त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्यानं ब्राम्हणसभा, सोसायटीचं
कार्यकारी मंडळ, गणेशोत्सवात ते सहभागी होत. समोर आलेल्या संकटांना ते धैर्यानं
तोंड देत. इतरांना मदत करत. ते प्रचंड स्वाभिमानी होते. तेवढेच शीघ्रकोपीही होते.
तो वारसा त्यांच्याकडून वडिलांकडं नि वडिलांकडून माझ्याकडं आला आहे. त्यात आमचं
गोत्र आहे, जमदग्नी... कुणाची काही खैर नाही...
माझ्या आयुष्यातला एक काळाभिन्न दिवस उगवलाच अखेरीस...
आदल्या दिवशी माझ्या वाढदिवसाचं गोडधोड खाऊन झोपलेल्या आजोबांना सकाळी...
हार्टअँटॅक आला. हाँस्पिटलमध्ये नेलं पण सगळं संपलंच... ऑक्सिजनची नळकांडीदेखील
शेवटपर्यंत त्या कणखर माणसानं लावू दिली नाही. अखेरपर्यंत स्वबळ नि आत्मविश्वासावर
त्यांची ठाम निष्ठा होती. आम्हा सर्वावर आभाळ कोसळलं. तेव्हा मी चौथीत होते. रडून
रडून वेड लागायची पाळी आली होती. आजीच्या कुशीत जायचं होतं, पण कुणीच जाऊ देत
नव्हतं...
त्यांचं शेवटचं दर्शन घेताना मनाचा बांध अजूनच फुटला... ते
मात्र शांत झोपी गेल्यासारखे वाटत होते. माणूस गेल्यावर काहीना काही सोडायचं असतं
म्हणे वर्षभर. त्या वर्षी आम्ही आंबे खाल्ले नाहीत. मी चहा सोडला तो कायमचाच. तब्बल
६वर्षं झाली आहेत, त्यांना जाऊन... पण आठवणी अजून ताज्याच आहेत. आत्ता ते हाक
मारतीलसं वाटतं. पण ते होणं नाही, हे ध्यानी येऊन मन खिन्न होतं. पण त्यांचा फोटो
पाहून मनाला उभारी येते. जिद्द वाढते... नि स्मृतींची पानं अजूनच चाळली जातात... आजोंच्याच...
(ता.क. – हा लेख मी लिहिला होता १९९६मध्ये. परवाच्या योगिनी
एकादशीला त्यांना जाऊन उणीपुरी २५वर्षं झाली. ते गेले, तेव्हा मी असेन जेमतेम नऊएक
वर्षांची. पहिली तीनएक अबोधपणाची वर्षं सोडली तर त्यांचा नि माझा सहवास तो
कितीसा... तरीही त्यांच्या अमीट स्मृतींचा ठसा मनावर उमटलाय कायमचा... त्याचीच
स्पंदनं या लेखात उमटलेत...ती जशीच्या तशी लिहिल्येत. दोन वर्षांपूर्वी त्यांचं
जन्मशताब्दी वर्षं होतं. आणखी काय बोलू... तुमचे आशीर्वाद कायम पाठीशी आहेतच...)
छान राधिकाताई. आमच्या भाऊंना जाऊन या वर्षी २१ वर्ष झाली. तुझा हा लेख वाचला आणि भाऊंच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या.
ReplyDeleteछान राधिकाताई. आमच्या भाऊंना जाऊन या वर्षी २१ वर्ष झाली. तुझा हा लेख वाचला आणि भाऊंच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या.
ReplyDeletekhupach chhan! Maze Aaba dolyansamor ubhe rahile... Apratim Lekh :)
ReplyDeletethank u.
Delete