Sunday, 28 June 2015

स्टोन पेपर सिझझ्

खेळूया टी२०.
खेळ - `स्टोन पेपर सिझझ्`  
साहित्य – हात.
प्लेअर्स - दोन.
माहिती - स्टोन- दगड, पेपर-कागद, सिझझ्- कात्री.
खेळ म्हटलं तर जुनाच. एके काळी चीनमध्ये शोधला गेलेला नि म्हटलं तर तो अजूनही नवाच... कारण आत्ताची टेक्नॉसॅव्ही शाळकरी मुलांची पिढीही तो अजून खेळतेय. कदाचित तिला तो आवडला किंवा जस्ट एक फाईन टीपी म्हणून त्यांनी तो `लाईक` केलाय.
या खेळाचे नियम म्हटले तर एकदम साधेसे नि सोप्पे... वापरायचा आपला एक हात नि खेळणारे प्लेअर्स हवेत दोन. एरवी पंजा म्हणजे एका पक्षाची निक्षाणी. पण इथं पंजा म्हणजे कागद. दगड म्हटलं की, आठवतं ते गाणं `एलिझाबेथ एकादशी`मधलं ``दगड, दगड``... किंवा मग बळाचा वापर. पण इथं दगड म्हणजे हाताची मूठ. आणि कात्री म्हणताच अनेकांना आठवेल ती ``ची मज्जा... `काकानं काकूच्या कपाटातले कागद कात्रीनं कराकरा कापले` ती ``ची किमया. पण इथं कात्री म्हणजे दोन बोटांनी केलेली अँक्शन.


या खेळातल्या शक्यता तीनच. दगड कात्रीला भारी पडतो, पण दगडाला कागद रॅप करू शकतो. नि कात्री कागदाला पटकन कापू शकते. दोघां प्लेअर्सनी एकाच वेळी आपापल्या अँक्शन्स करायच्या. दोघांच्या विरुद्ध अँक्शन झाल्या तर त्यात जिंकणाऱ्याला मार्क मिळतात. ते जस्ट दुसऱ्या हातानं करायचे काऊंट... किंवा मग सेम टू सेम अँक्शन आली तर टाय होऊन जातो. मार्क कुणालाच मिळत नाहीत... बस्स... हे एवढंच. पुढचा सगळा खेळ खेळायचा, पटकन रिप्लाय करून नि थोडंसं लॉजिक वापरून... समोरचा आता कोणती अँक्शन करेल, याचा अंदाज बांधायचा फक्त... वाटलं, किती रिलेट होतंय हे खऱ्या आयुष्यात... आपणही जगता जगता असेच कितीतरी अंदाज—आडाखे बांधतो. काही चुकतात, काही बरोबर येतात. कधी होते विन-विन सिच्युएशन. कधी हार, कधी जित... `येsss` भाचा ओरडला तसा `हा प्लेअर` आला भानावर... अंदाज बांधता बांधता आम्ही पाच पॉइंटचा गेम खेळलो नि अर्थातच भाचेसाहेब ठरले विनर... फुल्ल एक्साईट झालेला... नेक्स्टटाईम भेटल्यावर त्याच्याच भाषेत सांगायचं तर `वर्ल्डकप खेळूया` अर्थात आणखी पॉइंटस् खेळायचं ठरलंय आमचं... तोपर्यंत थोडी नेट प्रॅक्टिस करायचेय, बोला, बोला, कोण तयार आहे... वन टू थ्री, स्टार्ट, स्टोन पेपर सिझझ्... 

Sunday, 21 June 2015

बाबा,

`फादर्स डे`च्या निमित्तानं, साधलेला हा संवाद... तसं एरवीही आपण बोलतो... भांडतो... चर्चा करतो... प्रसंगी पिटुकली मारामारीदेखील... पण अनेकदा असंही काही असतं, जे अव्यक्त राहातं... माझं झालंय, तसं तुझंही असेल बहुधा... कसंय की आम्ही पोरं हल्लीच्या सायकॉलॉजीच्या धरून आपापल्या फिलिंग्ज व्यक्त करतो... पण तुम्ही बाबालोकं अजूनही थोडे कोषातच राहताय... थोडं तुम्हीही व्यक्त व्हायला शिकायला पाहिजे नाही का... कारण आता बाबा लोकंही `टिपिकल बाबाकँटँगरीतले राहिलेले नाहीत. पालकत्वाची जबाबदारी तू नि आई मिळून निभावत असता...
आता कुणी म्हणेल, बापानं काय करावं, हे पोरं शिकवायला लागलीत... पण खरं तर `आम्ही मोठं झालोय,` हे तुम्हीच मोठी माणसं सतत आमच्या मनावर बिंबवता नि मग आम्ही काही सांगितलं तर मग पुन्हा तोच तो राग आळवला जातो... असं सोईसोईनं खरंच लहान-मोठं होता येतं कातसं असतं तर सगळ्यांनीच `लहान राहाणंप्रिफर केलं असतं, ते शक्य नाहीये, हेही कळतंय... सो, असं कुणी म्हणून `मोठं नि लहान` होत नसतंच... आम्हांला तुमचं `बाबापण` आहे तसंच आवडतंय... तुम्हांला काय वाटतंय आमच्याविषयी... जनेक्सटविषयी... ते नक्की पोस्ट करा... तेही सोशल साईटवर... कारण मग सगळ्याच बाबांचं `ई माध्यमा`तून व्यक्त होणं हेच खरं `फादर्स डे`चं मोठ्ठं सेलिब्रेशन ठरेल. `हँप्पी फादर्स डे`!      


सगळ्या पोरांबाळांच्या वतीनं घेतलेला हा पुढाकार...

प्रिय बाबास...

मुलगी झाली... अभिनंदन...
घरात फुललं आनंदवन...
इवलीशी कुडी हातात घेताना...
जीव आकाशाएवढा झाला होता तुझा...
कुशीवर वळणं... रांगणं...
माझ्या वाढीत तुझं सामील असणं...
पहिल्यांदा `बाबा` शब्द उमटल्यावर
चेहऱ्यावर फुललेला आनंद...
फोटोग्राफीची मॉडेल घरातलीच
क्षण टिपायची घाई मनातली...
माझ्या वाढत्या मस्तीत
तुझं सहजपणं सामील होणं...
मूलांत मूल होऊन
त्यांच्यासोबत धम्माल करणं...
धरून तुझं बोट
चालायला शिकले वाट
अक्षरं गिरवणं नि रेघोट्या ओढणं...
केलास काही शिकवायचा प्रयत्न...
धावपळीची शाळा संपली
आपली मैत्री अधिक रुळली
कॉलेजलाईफमध्ये तूही सामावून गेलास
मैत्रिणींचा `काकानव्हे मित्रच होऊन गेलास
पहिली नोकरी... नवं विश्व...
तुझा हात कायम आश्वस्त
अभावितपणं आलेल्या वादळांना
तू स्वतःवर झेललंस
आयुष्य तू
पेलून धरलंस
आता कणभर थकलायस
थोडासा वाकलायस
आता तू धर माझं बोट
भरपूर चालायचेय वाट
नव्यानव्या स्वप्नांची
आशाआकांक्षांची...

-    प्लीज रिप्लाय...


Sunday, 14 June 2015

आजो... 



लहानपण आठवलं की, आठवणींचे धागे आपोआप जुळायला लागतात नि डोळ्यांसमोर येते एक भारदस्त मुद्रा... माझे आजोबा अर्थात वडिलांचे वडील. उंचधिंच व्यक्तिमत्त्वं, धोतर, टोपी, कोट नि करारी चेहऱ्यामुळं त्यांची झटकन छाप पडे. आमचं गाव रायगड जिल्ह्यामधलं नागांव. तिथं शिक्षण झाल्यावर लगेचच पोटापाण्यासाठी ते मुंबईला आले नि इथंच स्थायिक झाले. मुंबईत त्यांनी फार मेहनत नि कष्ट केले. मला आजोबा आठवतात, ते साऱ्यांचं करुन सुखी–समाधानी पावलेले. कुटुंबातले इतरजण त्यांना `आबा` म्हणाले, तरी मी तसं कधीच म्हटलं नाही. `आजोबा` किंवा `आजो`, अशी हाक मारण्यात मला काय वाटायचं ते देवच जाणे.

ते मुळजीजेठा मार्केटमध्ये व्यापारी होते. त्यांची गुज्जुभाईशी मैत्री असल्याने ते गुजराथी उत्तम बोलत. त्यांच्या व्यापारी मित्रांत ते प्रिय होते. त्यांचे अनेक मित्र घरी येऊन तासन तास गप्पा मारत असत. आजोबा मूळचेच हुशार. जिल्हात पहिले आलेले. त्यांना उत्कृष्ट वत्कृत्वकला अवगत होती. त्यांनी आपल्या वाचनाच्या आवडीचा वारसा मला दिला. सकाळी उठल्यावर व्यायाम करणं अंघोळ करुन देवची पूजा झाल्याशिवाय काहीही न खाणं, ठराविक वेळी जेवणं, सायंकाळी शिवाजी पार्कत फेरी मारणं इत्यादी शिरस्ते त्यांनी कधीच सोडले अथवा मोडले नाहीत.

त्यांचा मनावर खूप ताबा होता. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचा डायबेटिस कधी न वाढल्यानं डॉक्टर्स त्यांची गणना आदर्श पेशंटमध्ये करत. अर्थात यात आजीचा वाटा मोलाचा होताच. त्यांचं पाठांतरावर प्रभुत्व होतं. निरनिराळे श्लोक, रामरक्षा, संस्कृत गोष्टी आदी पाठांतर करण्यालायक गोष्टी मी त्यांच्याकडून शिकले. ते देवाचे फार करीत अशातला भाग नव्हे, पण जे करीत ते मनापासून. एकीकडं रामरक्षा शिकवणाऱ्या आजोबांनी मला पत्ते खेळण्यासही शिकवलं, याचं राहून राहून मला नवल वाटतं. त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्यानं ब्राम्हणसभा, सोसायटीचं कार्यकारी मंडळ, गणेशोत्सवात ते सहभागी होत. समोर आलेल्या संकटांना ते धैर्यानं तोंड देत. इतरांना मदत करत. ते प्रचंड स्वाभिमानी होते. तेवढेच शीघ्रकोपीही होते. तो वारसा त्यांच्याकडून वडिलांकडं नि वडिलांकडून माझ्याकडं आला आहे. त्यात आमचं गोत्र आहे, जमदग्नी... कुणाची काही खैर नाही...

माझ्या आयुष्यातला एक काळाभिन्न दिवस उगवलाच अखेरीस... आदल्या दिवशी माझ्या वाढदिवसाचं गोडधोड खाऊन झोपलेल्या आजोबांना सकाळी... हार्टअँटॅक आला. हाँस्पिटलमध्ये नेलं पण सगळं संपलंच... ऑक्सिजनची नळकांडीदेखील शेवटपर्यंत त्या कणखर माणसानं लावू दिली नाही. अखेरपर्यंत स्वबळ नि आत्मविश्वासावर त्यांची ठाम निष्ठा होती. आम्हा सर्वावर आभाळ कोसळलं. तेव्हा मी चौथीत होते. रडून रडून वेड लागायची पाळी आली होती. आजीच्या कुशीत जायचं होतं, पण कुणीच जाऊ देत नव्हतं...

त्यांचं शेवटचं दर्शन घेताना मनाचा बांध अजूनच फुटला... ते मात्र शांत झोपी गेल्यासारखे वाटत होते. माणूस गेल्यावर काहीना काही सोडायचं असतं म्हणे वर्षभर. त्या वर्षी आम्ही आंबे खाल्ले नाहीत. मी चहा सोडला तो कायमचाच. तब्बल ६वर्षं झाली आहेत, त्यांना जाऊन... पण आठवणी अजून ताज्याच आहेत. आत्ता ते हाक मारतीलसं वाटतं. पण ते होणं नाही, हे ध्यानी येऊन मन खिन्न होतं. पण त्यांचा फोटो पाहून मनाला उभारी येते. जिद्द वाढते... नि स्मृतींची पानं अजूनच चाळली जातात... आजोंच्याच...


(ता.क. – हा लेख मी लिहिला होता १९९६मध्ये. परवाच्या योगिनी एकादशीला त्यांना जाऊन उणीपुरी २५वर्षं झाली. ते गेले, तेव्हा मी असेन जेमतेम नऊएक वर्षांची. पहिली तीनएक अबोधपणाची वर्षं सोडली तर त्यांचा नि माझा सहवास तो कितीसा... तरीही त्यांच्या अमीट स्मृतींचा ठसा मनावर उमटलाय कायमचा... त्याचीच स्पंदनं या लेखात उमटलेत...ती जशीच्या तशी लिहिल्येत. दोन वर्षांपूर्वी त्यांचं जन्मशताब्दी वर्षं होतं. आणखी काय बोलू... तुमचे आशीर्वाद कायम पाठीशी आहेतच...) 

     

Sunday, 7 June 2015

`तो`


`तो` आला, `त्यानं` पाहिलं, `त्यानं` जिंकलं...
मोसमातला पहिला थेंब. शुभेच्छांची देवघेव. आशादायी उठाठेव.
हिरवे भवताल. मनं तजेलदार. उत्साहाचा चमत्कार.
सत्य की भास. आता थोडा सहवास. धरा आनंदाची कास.
चोहूकडं पसरावा. सुखाचा ठेवा. समृद्धीचा मंत्र व्हावा.
रुजेल बियाणे. पिकांचे तराणे. निवारावे दुष्काळाचे दुःसह्य गाणे.
कोसळत्या वर्णनांच्या धारा. शब्दांचा बेभान वारा. भावना लोटती महापूरा.
चमचमीत. शेकतशेकत. अस्सल खवय्येगिरीची सोबत.
गळके छप्पर. रस्ते कुठले, खड्डे शंभर. कचरा कुंडीच्या बाहेर.
डासांची गुणगुण. माशांची भुणभुण. बेडकांचं डरावणं.
गारेगार वारे. विजा चमकदार. गडगडाट भारी लयदार.
वाटेतले कोपरे-आसरे. छत्र्या-रेनकोटांचे सहारे. कधी तरी फक्त भिजा रे.
जनी-मनी वसे. रानी-वनी हसे. `तो`च कायम सरसे.
`तो` आला, `त्यानं` पाहिलं, `त्यानं` जिंकलं...