Sunday, 19 April 2015

`किमया`गीर...



अलीकडं प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी निमित्त लागतं. अमूक दिवस तमूक सप्ताह वगैरे. म्हणूनच लेखाचं निमित्त आहेत या आठवड्यातले ``अर्थ डे`` नि ``वर्ल्ड बुक डे``. कसंए की, काही पुस्तकं मनात एकदम ठाण मांडून बसतात. एखाद्या साधूसारखी... कुठंतरी आत खोलवर मुरत जातात... विचार करायला भाग पाडतात... त्यासाठी एकदा `अकूपार` जायला हवं.

`खमा गीर तुला` (दुःखी नको होऊ गीर!)  या सलामीच्याच वाक्यानं आपण खडबडून जागे होतो. एरवीतेरवी आपण केवळ कादंबरी म्हणून हाती घेतलेल्या `अकूपार`च्या मुखपृष्ठानं आपली उत्सुकता चाळवलेली असते. प्रस्तावना नि मनोगतातून पुढच्या लिखाणाविषयीचा इतकुसा कवडसा दिसतो. प्रारंभीचे हे `गीर`विषयीचे उद्गार ऐकून आपण त्यात मनःपूर्वक शिरायला – या कादंबरीतल्या अभयारण्यात... नि विचारांच्याही... एकदम तय्यार होतो. थेट `गीर`वासी होऊन त्याच्या सुखदुःखात सहभागी व्हायचा आपला इरादा पक्का करतो. म्हटलं तर `गीर` एक निव्वळ अभयारण्य. जायचं सिंह बघायचे, इतर वन्यजीवांना न्याहाळायचं, त्यांचं ढीगभर फोटोसेशन करुन कुठं कुठं पोस्ट करायचे. या सगळ्यावर कळस म्हणजे ``आम्ही गीरला जाऊन आलो``, अशी प्रौढी मिरवणं... अरेच्या ! पण `गीर` तर आपल्या सोबतीला आहे... आपल्यात आहे... मग इतकी प्रौढी मिरवायचं काय कारण... हे नि अशा धर्तीचे अनेक लहान मोठे धक्के देत वास्तवाची जाण करून द्यायचं काम `अकूपार` करते.

मोजक्याच नि अर्थपूर्ण कादंबऱ्या लिहिणारे ध्रुव भट्ट हे गुजरातीतील एक मोठे लेखक आहेत. त्यांच्या `समुद्रान्तिके`ला अनेक पुरस्कार मिळाले असून `तत्त्वमसि`ला `साहित्य अकादमी`सह अनेक पुरस्कार लाभलेत. कथानायक स्वतःच कथा सांगतो, पण त्याचं नाव आपल्याला शेवटपर्यंत समजत नाही;  एखाद्या विशिष्ट प्रदेशातील कथा लिहिण्यासाठी ते स्वतः तिथं राहून त्या अनुभवविश्वाच्याआधारे कथा लिहितात. या भट्ट यांच्या दोनही वैशिष्ट्यांचं प्रत्यंतर `अकूपार`मध्ये आल्यावाचून राहत नाही.




``ही सगळी गीर आहे. – माथेफिरू गीर!`` `गीर`ची तोंडओळख होताना `त्याच्या` कानी पडलेले हे शब्द... `गीर`बाबतच्या अशा नाना हकिगती `तो` सतत ऐकतो. निमित्त होतं ते पंचमहाभूतांपैकी पृथ्वी या तत्त्वाची चित्रं काढण्याचं. या कामानिमित्तानं आपण `त्याच्या`सोबत `गीर`च्या गहन अभयारण्यात शिरतो. असं म्हणतात की, जंगलात सतत काही ना काही घडत असतं. याचं प्रत्यंतर आपल्याला या प्रवासात पावलोपावली येत राहातं. `गीर`च्या घनदाट जंगलातलं वाकवळणं नि तिथल्या नद्यांच्या प्रवाहासोबतचा हा प्रवास... हा प्रवास अतिशय भावोत्कटपणं, तरलतेनं नि प्रसंगी काहीशा भाबडेपणानंही होतो. एरवीच्या व्यावहारिक जगात अशक्यप्राय वाटावेत असे इथले ऋणानुबंध इथली माणसं जोडतात. ही मंडळी लौकिकार्थानं शिक्षित नसली तरी मनानं `लई भारी` आहेत. भोवतालची परिस्थिती, पर्यावरण आणि या सगळ्यात गुंफलेला `मी` या सगळ्यांचं आकलन त्यांना होतं. केवळ माणसंच नव्हे तर गीरचे सिंह – त्यांच्या स्थानिक भाषेत `स्हावज` आणि इतर पशुपक्ष्यांसोबतही या लोकांचे तितकेच जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

नायक, आईमा, सांसई या प्रमुख पात्रांसह या अनेक लहान-मोठी पात्रं, एवढंच नव्हे तर निसर्गरुपही तितक्याच जोरकसपणं नि ताकदीनं उभी राहतात. या कल्पना-वास्तवाच्या राज्यावर भट्ट यांची प्रभावी हुकुमत असली तरी अनुवादक अंजनी नरवणे यांनीही केलेला अनुवादही तेवढाच सरसपणं उतरलाय. प्रमाण नि स्थानिक भाषेच्या लहेजाची सरमिसळ अगदी मस्तच उतरली आहे. `गीर`च्या वातारणाची भारावून टाकणारी ओळख आणि तिथली अनागर तरीही माणूसपण जागृत असणारी संस्कृती यांत आपल्याही कळतनकळत आपण गुंतत जातो. `अकूपार` या शीर्षकाची कथा मुळातूनच वाचण्याजोगी असल्यानं या रसग्रहणातला आनंद मी संपवत नाही. माणूस नि निसर्गातले यात अलगदपणं विणले गेलेले अनोखे अदृश्य रेशीमबंध आपल्याला विस्मयचकित करतात.

कसं आहे की, आपण `त्याच्या`सारखं सरस चित्र काढून आपलं सर्जन दाखवू शकत नाही, हे खरं आहे. पण... पण तरीही `त्याच्या`जागी स्वतःला कल्पू शकतो... आपल्या कल्पना नि विचारांचे रंग भरून ठाशीव असं काहीतरी काम करू शकतो... किंबहुना हीच तर `गीर`ची खरी किमया आहे... हे `गीर` अनुभवायलाच हवं... बघा तर प्रयत्न करून...



साभार – मेहता पब्लिशिंग हाऊस आणि माहीम सार्वजनिक वाचनालय. 

3 comments: