Monday, 27 April 2015

देवभूमी...

हादरलेली,
कंपलेली...
मृत्यूचं तांडव
कोण कौरव, कोण पांडव...
चाललाय विनाश भयकारी
विध्वंसाची मोठी ललकारी
दगड-मातीचे शेकडो ढिगारे
वाजताहेत दुःखाचे नगारे
रस्त्यांवरचे तडे
मनांवरचे ओरखडे
कोलमडलेलं लाईफ नेटवर्क
गोठलेला जीवनाचा अर्क
वेदनेचा आर्त
स्मृतींचे गर्त
मध्येच येणारा चॅनलाचा बूम
``क्या लगता हैं आपको``ची धूम
कोरड्याठाक चर्चांचे उमाळे
भयप्रत्ययाचे प्रत्यक्ष सोहळे
खोल काळोखी डोहात
मिळतोय मदतीचा हात
माणूसकीचं मर्म
रुजवलेला शेजारधर्म
सावरावंच लागेल स्वतःला
याला, त्याला, प्रत्येकाला...
वेदनेचं एव्हरेस्ट करावं लागेल सर
ओलांडावा लागेल नुकसानाचा स्तर
प्रार्थना करणाऱ्या निरासगतेसाठी
अबोध मनांच्या आशेसाठी...


Sunday, 19 April 2015

`किमया`गीर...



अलीकडं प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी निमित्त लागतं. अमूक दिवस तमूक सप्ताह वगैरे. म्हणूनच लेखाचं निमित्त आहेत या आठवड्यातले ``अर्थ डे`` नि ``वर्ल्ड बुक डे``. कसंए की, काही पुस्तकं मनात एकदम ठाण मांडून बसतात. एखाद्या साधूसारखी... कुठंतरी आत खोलवर मुरत जातात... विचार करायला भाग पाडतात... त्यासाठी एकदा `अकूपार` जायला हवं.

`खमा गीर तुला` (दुःखी नको होऊ गीर!)  या सलामीच्याच वाक्यानं आपण खडबडून जागे होतो. एरवीतेरवी आपण केवळ कादंबरी म्हणून हाती घेतलेल्या `अकूपार`च्या मुखपृष्ठानं आपली उत्सुकता चाळवलेली असते. प्रस्तावना नि मनोगतातून पुढच्या लिखाणाविषयीचा इतकुसा कवडसा दिसतो. प्रारंभीचे हे `गीर`विषयीचे उद्गार ऐकून आपण त्यात मनःपूर्वक शिरायला – या कादंबरीतल्या अभयारण्यात... नि विचारांच्याही... एकदम तय्यार होतो. थेट `गीर`वासी होऊन त्याच्या सुखदुःखात सहभागी व्हायचा आपला इरादा पक्का करतो. म्हटलं तर `गीर` एक निव्वळ अभयारण्य. जायचं सिंह बघायचे, इतर वन्यजीवांना न्याहाळायचं, त्यांचं ढीगभर फोटोसेशन करुन कुठं कुठं पोस्ट करायचे. या सगळ्यावर कळस म्हणजे ``आम्ही गीरला जाऊन आलो``, अशी प्रौढी मिरवणं... अरेच्या ! पण `गीर` तर आपल्या सोबतीला आहे... आपल्यात आहे... मग इतकी प्रौढी मिरवायचं काय कारण... हे नि अशा धर्तीचे अनेक लहान मोठे धक्के देत वास्तवाची जाण करून द्यायचं काम `अकूपार` करते.

मोजक्याच नि अर्थपूर्ण कादंबऱ्या लिहिणारे ध्रुव भट्ट हे गुजरातीतील एक मोठे लेखक आहेत. त्यांच्या `समुद्रान्तिके`ला अनेक पुरस्कार मिळाले असून `तत्त्वमसि`ला `साहित्य अकादमी`सह अनेक पुरस्कार लाभलेत. कथानायक स्वतःच कथा सांगतो, पण त्याचं नाव आपल्याला शेवटपर्यंत समजत नाही;  एखाद्या विशिष्ट प्रदेशातील कथा लिहिण्यासाठी ते स्वतः तिथं राहून त्या अनुभवविश्वाच्याआधारे कथा लिहितात. या भट्ट यांच्या दोनही वैशिष्ट्यांचं प्रत्यंतर `अकूपार`मध्ये आल्यावाचून राहत नाही.




``ही सगळी गीर आहे. – माथेफिरू गीर!`` `गीर`ची तोंडओळख होताना `त्याच्या` कानी पडलेले हे शब्द... `गीर`बाबतच्या अशा नाना हकिगती `तो` सतत ऐकतो. निमित्त होतं ते पंचमहाभूतांपैकी पृथ्वी या तत्त्वाची चित्रं काढण्याचं. या कामानिमित्तानं आपण `त्याच्या`सोबत `गीर`च्या गहन अभयारण्यात शिरतो. असं म्हणतात की, जंगलात सतत काही ना काही घडत असतं. याचं प्रत्यंतर आपल्याला या प्रवासात पावलोपावली येत राहातं. `गीर`च्या घनदाट जंगलातलं वाकवळणं नि तिथल्या नद्यांच्या प्रवाहासोबतचा हा प्रवास... हा प्रवास अतिशय भावोत्कटपणं, तरलतेनं नि प्रसंगी काहीशा भाबडेपणानंही होतो. एरवीच्या व्यावहारिक जगात अशक्यप्राय वाटावेत असे इथले ऋणानुबंध इथली माणसं जोडतात. ही मंडळी लौकिकार्थानं शिक्षित नसली तरी मनानं `लई भारी` आहेत. भोवतालची परिस्थिती, पर्यावरण आणि या सगळ्यात गुंफलेला `मी` या सगळ्यांचं आकलन त्यांना होतं. केवळ माणसंच नव्हे तर गीरचे सिंह – त्यांच्या स्थानिक भाषेत `स्हावज` आणि इतर पशुपक्ष्यांसोबतही या लोकांचे तितकेच जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

नायक, आईमा, सांसई या प्रमुख पात्रांसह या अनेक लहान-मोठी पात्रं, एवढंच नव्हे तर निसर्गरुपही तितक्याच जोरकसपणं नि ताकदीनं उभी राहतात. या कल्पना-वास्तवाच्या राज्यावर भट्ट यांची प्रभावी हुकुमत असली तरी अनुवादक अंजनी नरवणे यांनीही केलेला अनुवादही तेवढाच सरसपणं उतरलाय. प्रमाण नि स्थानिक भाषेच्या लहेजाची सरमिसळ अगदी मस्तच उतरली आहे. `गीर`च्या वातारणाची भारावून टाकणारी ओळख आणि तिथली अनागर तरीही माणूसपण जागृत असणारी संस्कृती यांत आपल्याही कळतनकळत आपण गुंतत जातो. `अकूपार` या शीर्षकाची कथा मुळातूनच वाचण्याजोगी असल्यानं या रसग्रहणातला आनंद मी संपवत नाही. माणूस नि निसर्गातले यात अलगदपणं विणले गेलेले अनोखे अदृश्य रेशीमबंध आपल्याला विस्मयचकित करतात.

कसं आहे की, आपण `त्याच्या`सारखं सरस चित्र काढून आपलं सर्जन दाखवू शकत नाही, हे खरं आहे. पण... पण तरीही `त्याच्या`जागी स्वतःला कल्पू शकतो... आपल्या कल्पना नि विचारांचे रंग भरून ठाशीव असं काहीतरी काम करू शकतो... किंबहुना हीच तर `गीर`ची खरी किमया आहे... हे `गीर` अनुभवायलाच हवं... बघा तर प्रयत्न करून...



साभार – मेहता पब्लिशिंग हाऊस आणि माहीम सार्वजनिक वाचनालय. 

Sunday, 12 April 2015

`कॉफीशप्पथ`... खरंच...
 

`तिची` नि माझी पहिली भेट पहिली भेट कधी झाली, हे तितकंसं स्पष्टपणं नाही आठवत... `तिची` चव मला केव्हा नि कशी भावली कुणास ठाऊक... पण आठवतंय, तो लहानपणापासून नाकाला जाणवणारा तो `तिचा` टिपिकल `कॉफीबाज` वास... `तिचं` ते आजी-आजोबांच्या कपातलं असणं... आई-बाबांच्या कपात `तिच्या`ऐवजी चहा असणं नि म्या बापडीच्या नशीबात-आपलं कपात दूध असणं... तेव्हाच कदाचित `ती` आवडून गेली असेल... मग क्वचित `दूध-कॉफी` किंवा `दूध-चहा` पिण्याचे दिवस उगवले तेव्हा वाटलं, वाsssव आपण कॉफी-चहा प्यायला लागलोय, म्हणजे `मोठ्ठे झालोय...` अर्थात त्यातला `दूध` या मेन फॅक्टर आहे, हे जाणवून घेतलंच नसेल. पुढं आजोबा गेल्यावर `काहीतरी सोडायचं असतं`, या समजाखातर मी चहा अर्थात तेव्हाचा `दूध-चहा` सोडला. सोडलाsss म्हणता म्हणता चहाची चाह सुटली ती कायमचीच... कारण कॉफी का साथ काफी था। मग मी न् कॉफी एकदम घट्टमुट्ट मैत्रिणी झालो. व्हॉट अ परफेक्ट टायमिंग. आम्हांला एक फ्रेण्ड जॉईन झाली... आज्जी... एकदम सही मैफल जमून जायची गप्पांची... कधी शाळा-कॉलेजमधल्या दिवसभरच्या सुरस कथा, कधी फ्रीलान्सिंग करताना उडालेली धांदल नि कधी सिनिअर्सची मिळालेली शाब्बासकी… कधी एखाद्या लेख-बातमीला बऱ्याचजणांकडून मिळालेली दाद... कधी छापून न आलेल्या लेखाची दर्दभरी कहाणी... `कॉफीशप्पथ`... खरंच...

जॉब लागल्यावर दुपारची कॉफीमिटिंग अर्थातच मिस झाली. पुढ्यात आली कँटिनबॉयच्या हातची कॉफी. वेगळं दूध, वेगळी पावडर, वेगळी चव असलेलं ते पेय `कॉफी` नावानं ओळखलं जायचं. कॅटिनमध्ये खायच्या चीजवस्तूंचा खडखडाट झाल्यावर मग `कॉफी` नि `पार्ले-जी`चाच पोटाला आधार दिला जायचा. नंतरच्या ऑफिसमधला कँटिनबॉय त्याच्या टिपिकल साऊथइंडियन स्टाईलनं म्हणायचा ``मॅडमsss काsssपी...`` त्याच्या हातची कॉफी असायची कधी वेलचीवाली कधी इतकुशाच दूधाची... कित्येकदा मशीनमेड कॉफीही प्यायली. पण मशीनची कॉफी आपलीशी नाही बॉss वाटली. ती एकदम स्थितप्रज्ञच... कधी सहकाऱ्यांसोबत भटाकडं गेल्यावर ते आरामात कटिंग घ्यायचे, अगदी चवीचवीनं... पण भटाकडची कॉफी कधीच नाही आवडली. मग तिथं आपण फक्त गप्पाच मारायच्या असं ठरवलं मनाशी. मुलाखतींच्या निमित्तानं गेल्यावर पहिली विचारणा व्हायची नि अजूनही होते ती चहाचीच. तो घेतच नाही म्हटल्यावर `मग कॉफी?` असं (नाईलाजानं असावं कदाचित!) विचारलं जातं. ती ऑर्डर केली जाते.... आपल्या पुढ्यात कॉफीचा कप उगवतो तो मुलाखत संपल्यावर, तोही साययुक्त... मग पक्का डिसाईड किया... नायsss नोsss नेव्हरsss... `काही घेतच नाही`, असं समोरच्याला सांगायचं. विषयच संपला. असं खोटं बोलणं चालतं बॉsss कॉफीसाठी कायपणsss `कॉफीशप्पथ`... खरंच...
त्या अर्थानं मी `कॉफीबाज` नाहीये. की बॉsss वरचेवर कॉफी पितेच किंवा ती नाही प्यायली म्हणून डोकं दुखतं वगैरे वगैरे. अर्थात मी अशी `कॉफीबाज` आहे की, कॉफी मिळत नाहीये, म्हणून नाईलाजानं मी चहा चालेल, असं ऑप्शन स्वीकारलाय. नाही बॉsss अज्जिबातच नाही. खरंच कॉफीशप्पथ... कॉफी एकदम स्ट्रॉंग लागते बॉsss आपल्याला. तिचं परफेक्ट कॉम्बिनेशन नाही जमलं तर कॉफीला भेटण्यात काहीच मज्जा नाही राव... कारण ही स्ट्रॉंग कॉफीच मग सुखात आपल्यासोबत हसते नि दुःखात आपल्यासोबत रडतेही... आज्जी गेल्यावर `ती`च तर देतेय मला कंपनी... दोघीही आज्जीला मिस करतोय... `कॉफीशप्पथ`... खरंच...

चहा नि कॉफीची तुलना होऊच शकत नाही. चहातला कोरडेपणा कॉफीत नाहीए. कॉफीत आहे आपलेपणा... एक फ्रेण्डलीनेस... त्यामुळं कॉफीशॉप्सची टेबल्स सतत बुक्ड नसली तरच नवल. मे बी, सिनेमातल्यासारखं असावं का, `कॉफी आणि बरंच काही`... सीझन कोणताही असला तरी घरगुती कॉफीचं रंगरूप फारसं नाही बदलत. फारतर तिला वेलची-जायफळाची जोड... म्हणूनच मला ती वाटत असावी तत्त्वनिष्ठ... एकदम सच्चीमुच्ची... कधी कॉफीफँन्स एकत्र भेटल्यावर चिक्कार गप्पा रंगतात `तिच्या`सोबतच `तिच्या`वरूनच... `तिचे` ब्रँण्डस्, फ्लेव्हर्स, `तिचे` नवनवे अवतार नि `तिची` जुनी कुंडलीही... आता झालाय `कॉफी टाईम`... शेअरिंग टाईम... अगदी `कॉफीशप्पथ`... खरंच...



Sunday, 5 April 2015


`ती`



(दोघंजण विंगेतून येतात. वय वर्ष १०. ``च्या कानाला हॅण्डस् फ्री.)

अ-   गाणं ऐकताना मान डोलावत दाद देतोय.

ब- समोरून येतो. म्हणतो- हाय.

अ- दाद देत नाही.

हात हलवून म्हणतो, हायsss हायsss...


अ-   अहं... हं...हं... हायsss

- आईशप्पथ ! आज तुझ्याकडं मोबाईल. मज्जा आहे...

अ-   हो ना. `प्रोग्रॅम`चं स्क्रिप्ट पाठ करायचंय ना. हातात कागद घेऊन पाठांतराचे दिवस गेले. हा `२०२०`चा जमानाए नि एक सिक्रेटपण...

- सिक्रेट?sss मलापण सांग ना.

अ-   ये. कान इकडं कर. पाठांतर करायचं नि एकीकडं गाणीपण ऐकायची मध्येच.

- भारीए रे!

अ-   ये, आपण गाणी ऐकूया. (स्क्रोल दाबतो.) अं, हं. हे ऐक... `तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा...`

- अरे, हे गाणं कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतंय. अं... येस्स! माझ्या आज्जीला आवडायचं ते. काय बरं सांगायची ती? हंsss की काहीतरी `ती` आणि तिचा भाऊ मिळून गायचे वगैरे.

अ-   अरेरेरेsss बघ, पुन्हा स्क्रोल दाबलास... आता कुठलंय... `गोरीगोरीपान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण...`

- `वहिनी` आण? अरे, गाण्यातल्या मुलीला `वैनुडी` म्हणायचं असेल, त्या `एका लग्नाची दुसरी गोष्ट`मधल्या `कुहू`सारखं...

अ- ते काही मला माहीत नाहीये. च्चचsss बघ, पुन्हा स्क्रोल दाबलास... आता कुठलंय... हा, आपल्या आवडीचं. `मामाच्या गावाला जाऊया... मामाची बायको सुगरण`... तू गेला होतास का रे तुझ्या मामाकडं?

ब- हो. पण मला मामी कुठाय? किती शोधलं पण अजून मिळतंच नाहीये. आई तर सारखी रडत असते. कधी लग्न होणार मामाचं म्हणून. म्हणते मामासाठीची मुलगी बहुतेक चंद्रावरच शोधावी लागणार...

अ-   अरे! ते मोठे बघून घेतील. तू असा मूड खराब नको करून घेऊ. ओके ऐक, `काकूनं काकाच्या कपाटातले कोरे कागद कात्रीनं कराकरा कापले...` येsss, हसलाsss हसलाsss...

ब- हो, ही ``ची गंमत माझ्या मित्राच्या मावशीनं आम्हांला सांगितली होती. बघ रे, तो कसला लक्की आहे, त्याला मावशी आहे...

अ-   हो ना.

- अरे हे, तर काहीच नाही. आई सांगते की, तिच्या आईकडं कुकिंगला बाई, घरकामाला बाई यायच्या. कधीही कुठंही येता-जाता बऱ्याचजणी दिसायच्या...
  
अ-   परवा माझ्या मित्रानं एका म्युझियममध्ये `बेबीगर्ल` पाहिली. कसली क्युट होती म्हणाला तो. आपल्याला कधी बघायला मिळणार?

ब- ते सांगणं कठीण आहे. बाबा म्हणत होता, गेली काही वर्षं बेबीगर्ल्सना मारून टाकतायत. त्या नसल्या तर पुढं काही खरं नाही म्हणे...

अ-   खरं नाही? असं नको रे बाबा.  कुठलीही `बेबी` ती `बेबी`च की. मग तो बॉय असला काय किंवा गर्ल असली काय?

आणि - होsss तर. आम्हांला आज्जी, आई, मावशी, काकू, मामी, ताई, छोटी, मैत्रिण हवी आहे...

(दोघांच्या हाती ``सेव्ह गर्ल्स`` असा बोर्ड).


ता.क. - 

दोन वर्षांपूर्वी लिहिलेलं हे स्किट परवा हाती लागलं... मधल्या काळात ओळखीपाळखीतल्या काही घरांत `मुलगी झाली होsss...` कुठं पहिली, कुठं दुसरी... ``मुलगी झालीए`` ही खंत नाहीए अजिबात कुठंही... कुठं अग्रक्रमानं ``मुलगी``च दत्तक घेतली गेलीए... आशेचे किरण लुकलुकताहेत... कदाचित पुढल्यांना प्रकाश देण्यासाठी...

सध्या दिपिका पदुकोणच्या `माय चॉईस`वर उलटसुलट चर्चा होतेय. पण अजूनही `ती`च्या बेसिक अस्तित्वासाठीची लढाई सुरू आहे. `तिला` अद्यापही भोवतालाशी दो हात करायला लागताहेत, तिथं `माय चॉईस` ठरवायला काही काळ लोटावा लागेल... तो `चॉईस` कोणता असावा वगैरे पुढच्या गोष्टी... मग हे स्किट डिलिट करण्याचा `माय चॉईस` असेल...)