Monday, 14 October 2019


वाचणं... जगणं...

मी, तू, तुम्ही, आपण. आपण मिळून सारेजण; असं गृहित धरलं तर आपलं वाचणं आणि आपलं जगणं या दोन गोष्टींचा हिशेब शेजारशेजारी मांडून पाहिला तर कसा दिसतो हा जमाखर्च? आपण घरात असतो, घराबाहेर असतो. आपण आपल्यात असतो, आपण दुसऱ्यात असतो. आपण निसर्गात असतो, आपण शहरीकरणात असतो. माणसांच्या समुद्राची गाज आपल्यावर सतत आदळत असते. कधी ऐन गर्दीतही आपण एकटेपणाच्या बेटावर राहात असतो. कधी मनानं, कधी शरीरानं आपण कुठंकुठं असतो आणि कुठंकुठं नसतोही. पण हे सगळं असलं तरी आपलं जगणं चालूच असतं, कारण आपण असतो नि नसतोही... कारण आपण नाही वाचत नि वाचतोही...

खरंतर वाचणं नि जगणं या म्हटलं तर दोन समांतर गोष्टी का हो?... कारण बहुतांशी लोक्स कथा-कादंबऱ्या, ललित-कविता असं काहीबाहीच जास्त वाचतात. आपल्या प्रत्येकाची आयुष्यं तरी या साहित्य प्रकारांहून काही निराळी असतात. बहुधा नसावीत. क्षणाक्षणाला आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी काही वेळा कहानी में असा ट्विस्ट आणतात की, पुछोही मत! पण हे सगळं असलं तरी आपलं जगणं चालूच असतं, कारण आपण असतो नि नसतोही... कारण आपण नाही वाचत नि वाचतोही...

खरंतर वाचणं नि जगणं या दोन्ही मुद्द्यांचा किस फार पूर्वीपासून चालत आलेला दिसतो. मग तो जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन हा ज्येष्ठ साहित्यिक खांडेकर-फडके यांचा वाद असो किंवा श्लील-अश्लील लिखाण असो किंवा बेफाम वक्तव्यांनी भरलेले चरित्र किंवा तोलूनमापून लिहिलेलं आत्मचरित्र.... म्हटलं तर या सगळ्याच मुद्द्यांचं प्रतिबिंब आपल्या जगण्यात अनेकदा पडलेलं दिसतं. मग त्यावरून होणारी चहाच्या किंवा क्वचित कॉफीच्या पेल्यातली वादळ कधी लवकर शमतात, तर कधी फार रेंगाळतात. पण हे सगळं असलं तरी आपलं जगणं चालूच असतं, कारण आपण असतो नि नसतोही... कारण आपण नाही वाचत नि वाचतोही...

खरंतर वाचणं आणि जगणं या गोष्टी हातात हात घालून चालत असाव्यात जणू, असं वाटावं इतकं काहीजण वाचतात आणि जगतातही. प्रत्येक पुस्तकात काही ना काही गवसेल असं नाही, पण काही पुस्तकं मात्र प्रेरणा, विचार, प्रोत्साहन, आनंद, उर्जा आणि भरूभरून देणारी असतात, फक्त ते घ्यायला आपण तत्पर असलं पाहिजे. मात्र त्याचा अतिरेक होऊन पु.लं.च्या सखाराम गटणेसारखी स्थिती होऊनही उपयोगाचं नाही. वाचलेल्या शब्दांचं, त्यातल्या अर्थाचं आणि विचारांचं धन जपून वापरणं, त्यावर चिंतन-मनन करणं गरजेचं ठरतं. ते प्रत्यक्ष आचरणात आणणं आणि तसं कायम वागणं हे आणखी पुढचे टप्पे झाले. पण हे सगळं असलं तरी आपलं जगणं चालूच असतं, कारण आपण असतो नि नसतोही... कारण आपण नाही वाचत नि वाचतोही...

खरंतर वाचणं आणि जगणं या दोन गोष्टींबद्दल लिहायचं म्हटलं खरं, पण वाचन म्हणजे नेमकं काय, ते कसं, कुणी, किती, कधी, का करावं हा खरंतर निराळ्या लेखाचा विषय होईल. पण काहींना वाचणं म्हणजे अगदी नकोनकोशी गोष्ट वाटते. हो, खऱ्या वाचनप्रेमींना हे सहन होणार नाही, पण वाचणं न आवडणारीही माणसं आहेत. असू शकतात. असतातही. ती वाचत नाहीत. रोजचा पेपर वाचला तरी डोक्यावरून पाणी... पण तरीही त्यांच्या मते त्यांचं काहीही अडत नाही. पण मग त्यांची हजारो कल्पना नि त्यांची पणतवंडं आणि लाखो विचार नि त्यांची नातवंडं यांच्याशी भेटच घडत नाही. त्यादृष्टीनं ते अपुरे राहतात. अर्थात हे वाचनप्रेमीच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर. कारण त्यांचं काहीही अडत नसावं... पण हे सगळं असलं तरी आपलं जगणं चालूच असतं, कारण आपण असतो नि नसतोही... कारण आपण नाही वाचत नि वाचतोही...

खरंतर वाचणं आणि जगणं म्हणजे `जगणं नि वाचणं की वाचून जगणं नि जगून वाचणं...` असं शेरोशायरीत शोभेल असा किंवा हायकूत रुजलेला विचार मनात आला, तेव्हा या लेखाचं बीज मनात रुजलं. खरंतर काहीबाही वाचलं म्हणून काहीबाही लिहिता येत असावं माणसाला. कारण आपण वाचत असलेलं बहुतांशी वेळा कुणीतरी लिहिलेलं असतं. ते वाचून आपल्यालाही वाटू लागतं की आपणही काळ्यावर पांढरं करावं काहीतरी. त्याच नादात वाचत राहिलं जातं. जगणं होत राहातं. कधीतरी जमेल आपल्यालाही लिहिणं असं मनात घोकलं जातं. काळ पुढं सरकत राहातो. पण हे सगळं असलं तरी आपलं जगणं चालूच असतं, कारण आपण असतो नि नसतोही... कारण आपण नाही वाचत नि वाचतोही...

खरंतर आता वाचणं हेच जगणं झालेलं असतं. शब्दांनी आपल्याला झपाटलेलं असतं. `अक्षरांचा श्रम जाहला` म्हणत आपण नाना पुस्तकांना भेटतो. कधी उराउरी, कधी आदरानं, कधी थोडं अंतर ठेवून तर कधी मोकळा संवाद साधून... त्या पुस्तकांतले विचार, त्यातलं विश्व, त्यातली शब्दकळा, त्याची धाटणी, त्यातली शैली अशा भारंभार गोष्टींची सांगड मनाच्या कोपऱ्यात घालणं चालू असतं. मेंदू भवतलातल्या गोष्टी टिपून घेत असतो, त्यांचं निवड-टिपण करत असतो... आणि तो क्षण उवचितपणं उगवतोच... शब्दाला फुटते पालवी... विचारांला लागे लोभवी... झरझर लिहितो होतो आपण... `आपण लिहितोय` हे फिलिंगच जाम भारी वाटतं. मग त्या पहिल्यावहिल्या लिखाणाचं कौतुक होतं. त्यानंतरही आपण लिहितो, वाचतो आणि वाचतो, लिहितो... काळ पुढंपुढं सरकत राहातो. हे सगळं असलं तरी आपलं जगणं चालूच असतं, कारण आपण असतो नि नसतोही... कारण आपण नाही वाचत नि वाचतोही... अशा वेळी वाचणं जगणं होतं, लिहिणं जगणं होतं, जगणं वाचणं होतं, जगणं लिहिणं होतं... वाचाल तर जगाल, जगाल तर वाचाल. वाचत राहा, जगत राहा.

- 


फोटो - इंटरनेटवरून साभार. 



Saturday, 31 March 2018


पालवी


नमस्कार मंडळी. शतक महोत्सवी पोस्ट लिहिल्यानंतर जवळपास तीन महिन्यांनी आपण संवाद साधतोय. खरंतर हे ब्लॉगलेखन ही एक प्रकारे विचारांना फुटलेली पालवी मानावी का? वाचन, चिंतन, मनन आणि लेखन यामुळं कसदार झालेल्या मेंदूच्या जमिनीत इतर व्यावहारिक जगापल्याडच्या कल्पनांची बीजं रुजत असावीत. मग त्या अंकुरत असाव्यात, त्यांना इवलाली शब्दांची पानं फुटत असावीत आणि हळूहळू त्यांचा विस्तार होत ते रोपटं होत असावं. किंवा मग कधी मूळ झाडाचीच पानगळ होत असावी आणि त्यानंतर त्याला पालवी फुटत असावी.

ही पालवी कोणत्या प्रकारानं फुटलेली असेना ती वाढते, बहरते आणि त्यातून पुन्हा एकदा पालवतात कल्पना... त्यांना धुमारे फुटतात ते विचारांचे. हे विचारही शेकडो तऱ्हांचे असतात... एकासारखा दुसरा नाही आणि तिसऱ्यासारखा चौथा नाहीच... बरं हे विचार करणं थांबवता येतं का... नाय, नो, नेव्हर... म्हणा तसं करूही नये. कारण मुद्दलात विचार करणं, ही गोष्ट अलीकडं एखाद्या आश्चर्याकडं पाहिल्यागत ऐकली-पाहिली जाते. बरं तर बरं नुस्तं विचार करून भागतं, अशातला भाग नाही. तर विचार करून तो आचारात आणावा लागतो. नाहीतर मग `मुंगेरीलाल के हसिन सपनें`सारखे किस्सेच घडत राहातात. एक वेळ मुंगेरीलालचं हे स्वप्न पाहाणंही परवडत कारण निदान तो तेवढं तरी करतो. पण काही वेळा नुसतंच विचार करणं होतं. फक्त समाजमाध्यमांवर ढग काढले जातात किंवा पोस्टलं जातं त्या त्या वेळेपुरतं. मग हे त्या त्या वेळचं मत असतं, विचार असतात की भूमिका असते एखादी... कदाचित जाणूनबुजून घेतलेली. कदाचित उगीचच आव आणलेली किंवा कदाचित खरोखरच काहीच खरंच माहिती नसतं.

सखोल विचारांची पालवी ठामपणं बहणारी असते. सत्याचा जयघोष करणारी असते. सुसंस्कृतपणानं कलांचं कौतुक करणारी असते. समाजाप्रती आपली कृतज्ञता अल्प-स्वल्प स्वरुपात का होईना, व्यक्त करणारी असते. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणारी असते. विचारांना विचारांनी फुटलेला माणूसपणाचा सकारात्मक बहर पुन्हा जगवणारी असते. ``जगात नक्कीच काही चांगल्या गोष्टी घडत असाव्यात, नाहीतर इतकी फुलं फुलली नसती,`` अशी पोस्ट नुकतीच संगीतकार मिलिंद जोशी यांनी केली होती. त्यांच्या मताचा विचार करायचा झाला तर नक्कीच चांगुलपणाला पालवी फुटल्यावर काही चांगल्या गोष्टी घडत असतील आणि त्या आनंदात फुलं फुलत असतील. झाडाची पानगळ अपरिहार्य आहे, तसंच त्याचं पुन्हा पालवणंही अपरिहार्य आहे. तसं झाल्यावर सुखदुःखाच्या फांद्यांना सतत आशेची पालवी फुटते. फक्त त्या पालवीची काळ-वेळ आपल्याला पक्की ठाऊक नसते. पण ही पालवी फुटणार हा दुर्दम्य आत्मविश्वास असतोच. म्हणून मग पालवी पिंपळालाही फुटते, फुलझाडांनाही फुटते आणि मनामनातल्या विचारांनाही... विचारांची पानगळ नि विचारांचं पालवणं आणि शब्दांनी तो अर्थ वागवणं हे ओघानं येतंच. त्यानंतर पुन्हा पालवी फुटते, वाढते. बहरते आणि विचारांची झाडं फोफावतात...  फोफावत राहातात...


 (सर्व छायाचित्रं – राधिका कुंटे.) 

Saturday, 25 November 2017

आठवणींचा गजरा



आठवणी... लगडून येतात... फुलांसारख्या असतात. गंधित, सुगंधित... काही असतात घट्ट कळ्यांसारख्या... एकदम नाजूक, सुकुमार... कोमल, नाजूक... काही असतात, गुलाबी... गुलाबाच्या फुलाप्रमाणं गुलाबो रंगाच्या, गुलाबी ढंगाच्या, पाकळ्यांच्या... काही आठवणी असतात एकदम रंगीत... जलबेराटाईप... एकदम तरोताज्या... काही वेळा फुलांच्या आठवणींनाच लगडून येतात, काही माणसांच्या, काही व्यवसायांच्या, काही ठिकाणांच्या, काही काहीबाही आठवणी... कधी अशाच ट्रेनमधल्या, फुलवाली, गजरेवालीच्या, त्यांच्या फुलांसकटच्या आठवणी... तर काही उगाचच दुरूनच न्याहाळलेल्या... फुलांच्या आठवणी... कधी एखाद्या फुलवालीनं आपणहून दिलेल्या एक्स्ट्रा फुलाचा एक्स्ट्रा सुगंध... तर कधी ठामपणानं ठरलेलेच पैसे घेणारी गजरेवाली... कधी पुढ्यातल्या छोटीला पाजतानाच फुलं विकणारी आई फुलवाली... कधी शेजारी खेळणाऱ्या लहानग्याला दटावत फुलांची वेणी गुंफणारी वेणीवाली...

कधी चक्क ट्रेनमधली चिमुरडीच आठवते तिच्या निरागसपणासकट... एकदा मी विंडोसीटला बसले होते. माझ्याच शेजारी एका फुलवालीनं तिची टोपली ठेवली होती... फुलं-गजऱ्यांनी भरलेली. तिला काहीसं वाटलं नि तिनं थेट विचारलंच की, ``दीदी, पानी हैं?...`` होकार देत तिला पाण्याची बाटली दिली. तिनं एकाच दमात घटाघट सगळं पाणी पिऊन टाकलं. बाटली परत देताना काहीसं वाटून तिनं विचारलं... ``तुम्हें तो पानी...`` मी फक्त हसले. तिच्याकडून काही फुलं-गजरे विकत घेतले नि आणखी बायका डब्यात यायच्याआधी तिला विचारलं - (टिपिकल मध्यमवर्गिय वृत्तीनं) ``तुझ्या फुलांचा फोटो काढला चालेल का ग?`` ती म्हणाली हा... मग झटपट २-४ फोटो काढले. ती बघतच राहिली... तिच्या दृष्टीनं फुलांचा फोटो काढणं हा वेडेपणा असावा किंवा मग कदाचित `मोबाईल फोटोसेशन` तिच्या सवयीचा एक भाग झालं नसावं अद्याप... मला तिची फुलं-गजरे नि त्यांच्या `सुगंधाची श्रीमंती` जाणवली... भावली... मग ती पटदिशी निघून गेली पुढच्या डब्यात किंवा मग पुढच्या स्टेशनवरही... आता लिहिताना तिच्यातला किंचितसा व्यवहारीपणाही जाणवतोय...

कधी एखादी रोखठोक खमकी गजरेवाली भेटते. तर कधी एखादी म्हातारी आज्जी तिच्या सुरकुत्यांइतक्याच मायेनं गुंफलेले गजरे आपल्या हाती सोपवते. कधी संसारातल्या अडीअडचणींनी गांजलेली मध्यमवयीन गजरेवाली तिचे व्यापताप आपल्यापाशी घडाघडा बोलते. कदाचित चार गॅसिप करणाऱ्या इतर गजरेवाल्यांपेक्षा आपल्यासारखी तिऱ्हाईत माणसं जवळची वाटत असू... गजरेवाल्यांच्या तुलनेने गजरेवाले कमी झालेले दिसतात आताशा... किंवा बऱ्याचदा कुटुंबासमवेत असतात. एक गजरेवाले म्हातारबा, एक फुलं-गजरेवाले काका, एक फुलंविके दादा असे काही मोजकेचजणं आत्ता आठवताहेत... खरंतर या फुलं-गजरे विकणाऱ्या माणसांपेक्षा त्यांच्या फुलांचा, गजऱ्यांचा सुवास मनात दरवळतो आहे. आठवणींचा हा सुगंध अनेकदा रेंगाळत राहातो मनात... या आठवणींच्या कुपीची जादू कायम राहावी हेच खरं...



(सर्व छायाचित्रं- राधिका कुंटे)


(शंभरावी (१००) ब्लॉगपोस्ट)


(*या टप्प्यावर शब्दफुलांची ओंजळ घेणार आहे अल्पविराम. पुढचे अपडेट मिळतीलच.*)



Sunday, 12 November 2017

तांबटपुराण

साधारणपणं पाच-सहा वर्षांपूर्वी स्वयंपाकघराच्या खिडकीपासच्या उंबराच्या झाडावर एक चिमणीएवढा पक्षी काही क्षण दिसला नि एकदम गायब झाला. फक्त वाव... एवढेत उद्गार निघाले... घरातल्या बाकीच्यांना तो दिसू शकला नाही, अशी हळहळही वाटली. काही काळानं पुन्हा एकदा तो दिसला आलेला... थोडासाच वेळ होता नि पुन्हा गायब झाला. मग त्याच्या येण्याची वेळ बघितली नि जणू तो आल्यावर घड्याळ लावून घ्यावं जवळपास इतक्या काटेकोरपणं नि नियमित तो येत राहिला...

एक दिवस तो सकाळचा आला... फांदीला भोक पाडत राहिला... तितक्यात पालिकेची माणसं आली फांद्या तोडायला... कुणाकुणाच्या घरात अंधार येत होता... किडे-किटक येत होते वगैरे तक्रारी त्यांच्याकडं आल्या होत्या. फांद्या आमच्याही खिडकीजवळ येत असल्यानं ती बंद करायला सांगितली गेली. त्या माणसांच्या चाहुलीनं तो पक्षी केव्हाच आकाशी झेपावला होता... माझ्या डोळ्यांपुढं त्याचं ते खोड पोरखणं सतत येत होतं... तासाभरात त्या माणसांचं काम त्यांच्या लेखी फत्ते होऊन ती निघूनही गेली. बंद खिडकी मन घट्ट करून उघडली खरी... पण... त्या पक्ष्याची फांदी अर्धवट तुटली होती... किंवा फांदीवरच्या पक्ष्याचं मनच तुटलं होतं... झाडाच्या फांद्या झाडाखालीच विखुरल्या होत्या... त्या नेल्या जात होत्या... काही काळानं स्थिरावल्यासारखं झालं.

दुसऱ्या दिवशी सकाळी तो यायच्या आधीच माझ्या मनात कालवाकालव होऊ लागली... त्याचं काय होईल... पक्ष्यांना मन असतं का... आपली फांदी पाहून त्याला काय वाटले वगैरे सतराशेसाठ विचार मनात डोकावू लागले... तितक्यात तोच डोकावला त्याच्या फांदीवरून... जणू क्षणभर त्यानं माझ्याकडं पाहिलं न पाहिलं असं आपलं मला भासलं... त्याचं टोचावलेल्या ढोलीच्या शोधात त्यानं पुष्कळ वेळ घालवला... नंतर त्याला बहुधा खरं काय ते कळलं असावं... काही क्षण तो तस्साच निश्चलपणं त्याच कुटभर उरलेल्या फांदीवर बसून राहिला नि मग उडून गेला.

नंतरच्या सकाळी आला खरा, पण उंबराशेजारच्या शेजारच्या आंब्याच्या झाडाच्या फांदीवर बसलेला दिसला. त्याही झाडाची अवस्था उंबरापेक्षा निराळी नव्हती. पण त्याचा पसारा उंबराहून थोडा अधिक होता इतकंच... मग तिथल्या एका फांदीवर त्यानं जोमानं आपलं काम सुरू केलं... मनातल्या मनात मलाही किंचितसं हुश्श वाटलं... आता त्याच्याविषयी आणखीन माहिती जाणून घ्यावीशी वाटलं नि गुगलबाबाला सर्चलं... तेव्हा विकिपिडियाच्या आधारे कळलं हा तर तांबट होता. माहिती मिळाली ती अशी-   
तांबट महाराष्ट्रात प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणावर आढळणारा पक्षी आहे. त्याला इंग्रजीत कॉपरस्मिथ किंवा क्रिमसनब्रेस्टेड बार्बेट तर हिंदीत छोटा बसंत म्हणतात. तो तांबूस रंगाचा आणि चिमणीच्या आकाराचा असतो. त्याच्या कपाळ आणि छातीवर किरमिजी रंग असतो. डोळ्यांच्या वर-खाली अर्धवर्तुळाकार पिवळे पट्टे असतात. त्याचा पिवळाधम्मक कंठ दिसून येतो तर हिरव्या-पांढऱ्या रंगाचा आरीयुक्त अंतर्भाग असतो. मृत झाडांवर वा झाडांच्या मृत खोडांवर हे पक्षी पोकळी करून राहतात. अशा खोडाची निवड करण्यामागं प्रमुख कारण म्हणजे या खोडांवर लाकूड पोखरणं त्यांना सोपं जातं. तांबट पक्षी या पोकळीचा घरटं म्हणून वापर करतो. तो शक्यतो एकटा किंवा जोडीनं  आढळतो. वड, पिंपळ, अंजीर, जांभूळ, उंबर अशा झाडांवर तो आढळतो. रसाळ फळं, फुलाच्या पाकळ्या आणि काही प्रमाणात कीटक हे त्याचं आवडतं खाणं आहे. हा अगदी सहज नजरेत येत नाही, कारण त्याच्या रंगामुळं तो हिरव्या झाडांमध्ये सहज दडून बसतो, पण उन्हाळ्यात त्याला शोधाणं थोडं सोपं जातं. पानगळीमुळं तो नजरेत येऊ शकतो पण हा पक्षी दिसण्याचं प्रमुख कारण तो तांब्याच्या भांड्यावर घाव घातल्यावर येणाऱ्या आवाजासारखा आवाज करून आपलं लक्ष वेधून घेतो.

पुष्कळदा दरवर्षी त्याच झाडावर पुन्हा नवीन घरटं कोरलं जातं. ही माहिती तर खरीच ठरली. ते वर्षं आणि आता पुढंही तांबट येतोच आहे उंबरावर... कदाचित तो नाही, त्याच्या पुढच्या पिढ्या असतील... माहिती नाही... कधीतरी आणखीन एक तांबटही येतो, पण तो पाहुण्या कलाकारासारखा वागतो. माहिती नाही... पण येण्याची वेळ तीच ती आहे. ती असोशी आहे, टोकत राहण्याची... खोड पोखरत राहण्याची... एकाग्रता आहे, सजगता आहे. ध्यास आहे, साधना आहे जणू ती त्या तांबटाची... आता दरवर्षी किमान एखादं तरी फोटोसेशन करते त्याचं. अर्थात तो काही त्याचं काम थांबवत नाही त्यासाठी. मग कधी व्हिडिओही होऊन जातो झक्कपैकी. रोज वाट पाहावी, त्याची पुन्हा नव्यानं. त्याच्यासारख्या अदम्य आशेनं, सकारात्मकतेच्या दिशेनं...  

 
(छायाचित्र- राधिका कुंटे)

Sunday, 29 October 2017

वाट



 वाट येणारी...वाट जाणारी... वाट पाहणारी... वाट नाकारणारी...
वाट... मातीची... मातकट... वाट सिमेंटची... धुरकट...
वाट जंगलातली... हिरवट... वाट... झाडांची... पानवट...
वाट घनदाट, सळसळीची... वाट... पानगळ, निष्पर्णतेची...
वाट बैलगाडीची... निवांत क्षणांची... वाट गाडीची... वेगवान गतीची...




वाट... वळणावळणांची... घाटांची... वाट... सरळसोट... बेलाग कड्याची...
वाट... झाडामाडांची... वाट... समुद्रकिनाऱ्याची...
वाट... महामार्गाची... बेशिस्तीची... वाट... शहरी रस्त्यांची... बेफाट ट्रॅफिकची...
वाट... डांबरी रस्त्यांची, राणीच्या हाराची... वाट... खडबडीत रस्त्यांची, मिणमिणत्या दिव्यांची...
वाट... गगनचुंबी इमारतींकडं जाणारी... वाट... कुडाच्या झोपडीत नेणारी...



वाट... भरून आलेल्या आभाळाची... वाट... ढगांची पाहून शिणलेल्यांची...
वाट... धूसर... अंधुकशी... वाट... लख्ख प्रकाशाची... उजेडाची...
वाट... अंधाराची... काळोखाची... वाट... एकाकीपणाची... आत्मकेंद्रिततेची...
वाट... तंत्राची... प्रगतीची... वाट... आत्मग्नतेची... आत्मा हरवल्याची...
वाट... काळी-पांढरी... वाट... रंगीबेरंगी, मोरपंखी...





वाट... स्वप्नांची, मनोरथांची... वाट... सहकार्याची, साथीची...
वाट... मायेची, ममतेची... वाट... वात्सल्याची, स्नेहाची...
वाट... यशाची, झळाळती... वाट... अपयशाची, झाकोळलेली...
वाट... ध्येयाची, साध्याची... वाट... गोंधळलेली, गडबडलेली...
वाट... अधुरी, अपूर्णत्वाची... वाट... संपलेली, पूर्णत्वाची...



वाट... वाटेची... वाट... वाटेची... वाट वाटेचीच... वाटेचीच...




(सर्व छायाचित्रे – राधिका कुंटे)

Sunday, 15 October 2017

`झाड`पण




जुन्या फांद्यांशी गप्पा मारतानाच
खोडानं करून घ्यावी नव्या फांद्यांशी ओळख
विस्तारत पसरताना अवकाश व्यापताना
झाडानं जाणावं स्वतःचं व्यक्तिमत्त्व
कोमेजल्या फुलांनी मिटताना
काळजी घ्यावी नक्कीच `बी`ची
कच्ची-पक्की फळं खुशाल येऊ द्यावी
कालांतरानं होतातच ती अनुभवानं पक्व
पाकळ्या उमलताना मोजतात का श्वास?
परागकणांचा असतो का काही निरोप खास?
मग फुलपाखरांनीच का मागं राहावं?
सगळ्यांनाच आपलं मानून पाहावं!
पक्षी-किटक परोपजीवी वेली
कोण कुणाचं भक्षक? कोणकोणत्या वेळी?
झाडावरची घरटी बांधून तय्यार
पक्षीही असतातच हुश्शार
झाडांची सावली, सावलीचं झाड
छोटं असो वा मोठं, `झाड`पण नाही सोडणार
काळाच्या गतीत, काळ्या मातीत
बियांनी रुजावं, रोपानं जन्मावं
बहरावं, फुलावं, फळावं, गळावं
`झाडा`विषयी लिहिता, `क्लिक`ता
आपणही `झाड`पण जगून पाहावं...
हीsss पाहाsss कल्पना-चित्रांतली झाडं खुणावताहेत
त्यांच्या गोष्टी नि त्यातला ट्विस्ट पुन्हा कधीतरी...





(छायाचित्रं – राधिका कुंटे)

Sunday, 1 October 2017

`माणूसपणा`ची गोष्ट

माणसं... आपण सगळी माणसं. कुणी कसं कुणी असं. आपण माणूस असलो तरी प्रत्येकाचं रंग, रुप, स्वभाव, जीवनमान, आयुष्यमान, आयुष्यभान... अगदी विभिन्न... या `माणूसपणा`च्या विचारात असताना सहज चाळत होते जुन्या वह्या. हाती लागलं बरंच काही. त्यापैकी या माणूस विषयाशी निगडित असणारं १९९६, १९९८ आणि २००१ या कालावधीतलं हे लिखाण... तीन वेगळ्या टप्प्यांमधलं आणि तरीही आजच्या काळाला, परवाच्या घटनेला आणि बहुधा पुढच्या काही क्षणांशीही रिलेट होईल असं काही गवसलं... तेच मांडतेय... वाचा `माणसां`ची गोष्ट...


माणूस म्हणजे काय?

माणूस म्हणजे काय?
एक डोकं दोन पाय. मेंदू त्याचा लहानसा. कामाचा असे उपसा. दोन्ही त्याचे कर. कामे होती भराभर...
माणूस म्हणजे काय?
ही दुधावरची साय. वरूनी प्रेम दाखवावे. भेदाभेद करत राहावे. नवे दावे करावे.  समाजात मिसळावे...
माणूस म्हणजे काय?
जणू आंब्याची कोय. ताठर, कणखर दिल. अनेकदा होते चुकभूल. विश्वकर्त्याची निर्मिती सुरेख. देहाची या होतेच राख...
माणूस म्हणजे काय? कुणी असते अगदी गाय. कुणा नसते तमा. एखादा बनतो मामा.
माणूस तरी कसा माणूस? वाऱ्यावर जसं डोलतं कणीस...

******

जीवनओझे

घड्याळाच्या नादावर. रेल्वेच्या तालावर. संसाराच्या धावपळीत. ऑफिसच्या गडबडीत. सामान्य माणूस जगतो. जीवनओझे वाहतो...
तोंड देत गर्दीस. हात टेकत महागाईस. सुखासाठी घरकुलाच्या. छोट्याशा चिमुरड्याच्या. सामान्य माणूस जगतो. जीवनओझे वाहतो...
धकाधकीच्या जीवनात रंगीबेरंगी भावनांत. मोहमयी भुलभुल्लैयात. पैशांच्या दुष्ट विखळ्यात सामान्य माणूस जगतो. जीवनओझे वाहतो...
निवृत्तीनंतरचे विश्व, म्हातारा झाला अश्व. शर्यतीत नाही धावणार. वृद्धाश्रमात विसावणार. सामान्य माणूस जगतो. जीवनओझे वाहतो...
संध्याछाया पसरतात. जीवनच पालटतात. जीव शांतावतो. बंधमुक्त होतो. सामान्य माणूस जगतोच. जीवनओझे वाहतोच...

******

माणसं अशी का?

माणसं अशी का? प्रश्न हा नेमका. ज्याला त्याला पडतो. संभ्रमित करून टाकतो.
वागतात अशी कशी. पडतात तशी फशी. संबंध असून नसलेली. कळून सारं अवघडलेली.
प्रत्येकाचे डावपेच निराळे. मनात चालते आगळे. प्रश्न-उत्तरांचे खेळ सारे. जो तो सारखा विचारे.
गुपिते, गौप्यस्फोट सहज. होतात नियतीचे सावज. हाच मग होई प्रपंच. जरी असे वेगळा संच.
यातच आले माणूसपण. इतरांपासूनचे भिन्नपण. माणूस असाच राहिल. माणूसपण जगून पाहिल..

******




(छायाचित्र – इंटरनेटवरून साभार)