आठवणींचा गजरा
आठवणी... लगडून येतात... फुलांसारख्या असतात.
गंधित, सुगंधित... काही असतात घट्ट कळ्यांसारख्या... एकदम नाजूक, सुकुमार... कोमल,
नाजूक... काही असतात, गुलाबी... गुलाबाच्या फुलाप्रमाणं गुलाबो रंगाच्या, गुलाबी
ढंगाच्या, पाकळ्यांच्या... काही आठवणी असतात एकदम रंगीत... जलबेराटाईप... एकदम
तरोताज्या... काही वेळा फुलांच्या आठवणींनाच लगडून येतात, काही माणसांच्या, काही
व्यवसायांच्या, काही ठिकाणांच्या, काही काहीबाही आठवणी... कधी अशाच ट्रेनमधल्या,
फुलवाली, गजरेवालीच्या, त्यांच्या फुलांसकटच्या आठवणी... तर काही उगाचच दुरूनच
न्याहाळलेल्या... फुलांच्या आठवणी... कधी एखाद्या फुलवालीनं आपणहून दिलेल्या
एक्स्ट्रा फुलाचा एक्स्ट्रा सुगंध... तर कधी ठामपणानं ठरलेलेच पैसे घेणारी
गजरेवाली... कधी पुढ्यातल्या छोटीला पाजतानाच फुलं विकणारी आई फुलवाली... कधी
शेजारी खेळणाऱ्या लहानग्याला दटावत फुलांची वेणी गुंफणारी वेणीवाली...
कधी चक्क ट्रेनमधली चिमुरडीच आठवते तिच्या
निरागसपणासकट... एकदा मी विंडोसीटला बसले होते. माझ्याच शेजारी एका फुलवालीनं तिची
टोपली ठेवली होती... फुलं-गजऱ्यांनी भरलेली. तिला काहीसं वाटलं नि तिनं थेट
विचारलंच की, ``दीदी, पानी हैं?...`` होकार देत तिला पाण्याची बाटली दिली. तिनं एकाच
दमात घटाघट सगळं पाणी पिऊन टाकलं. बाटली परत देताना काहीसं वाटून तिनं विचारलं... ``तुम्हें तो पानी...`` मी फक्त हसले. तिच्याकडून काही फुलं-गजरे विकत
घेतले नि आणखी बायका डब्यात यायच्याआधी तिला विचारलं - (टिपिकल मध्यमवर्गिय
वृत्तीनं) ``तुझ्या फुलांचा फोटो काढला चालेल का ग?`` ती म्हणाली हा... मग झटपट २-४ फोटो काढले. ती
बघतच राहिली... तिच्या दृष्टीनं फुलांचा फोटो काढणं हा वेडेपणा असावा किंवा मग
कदाचित `मोबाईल फोटोसेशन` तिच्या
सवयीचा एक भाग झालं नसावं अद्याप... मला तिची फुलं-गजरे नि त्यांच्या `सुगंधाची श्रीमंती` जाणवली...
भावली... मग ती पटदिशी निघून गेली पुढच्या डब्यात किंवा मग पुढच्या स्टेशनवरही... आता
लिहिताना तिच्यातला किंचितसा व्यवहारीपणाही जाणवतोय...
कधी एखादी रोखठोक खमकी गजरेवाली भेटते. तर कधी एखादी
म्हातारी आज्जी तिच्या सुरकुत्यांइतक्याच मायेनं गुंफलेले गजरे आपल्या हाती
सोपवते. कधी संसारातल्या अडीअडचणींनी गांजलेली मध्यमवयीन गजरेवाली तिचे व्यापताप
आपल्यापाशी घडाघडा बोलते. कदाचित चार गॅसिप करणाऱ्या इतर गजरेवाल्यांपेक्षा
आपल्यासारखी तिऱ्हाईत माणसं जवळची वाटत असू... गजरेवाल्यांच्या तुलनेने गजरेवाले
कमी झालेले दिसतात आताशा... किंवा बऱ्याचदा कुटुंबासमवेत असतात. एक गजरेवाले
म्हातारबा, एक फुलं-गजरेवाले काका, एक फुलंविके दादा असे काही मोजकेचजणं आत्ता
आठवताहेत... खरंतर या फुलं-गजरे विकणाऱ्या माणसांपेक्षा त्यांच्या फुलांचा,
गजऱ्यांचा सुवास मनात दरवळतो आहे. आठवणींचा हा सुगंध अनेकदा रेंगाळत राहातो
मनात... या आठवणींच्या कुपीची जादू कायम राहावी हेच खरं...
(सर्व छायाचित्रं-
राधिका कुंटे)
(शंभरावी
(१००) ब्लॉगपोस्ट)
(*या
टप्प्यावर शब्दफुलांची ओंजळ घेणार आहे अल्पविराम. पुढचे अपडेट मिळतीलच.*)
As usual.... सुगंधी
ReplyDelete