`माणूसपणा`ची गोष्ट
माणसं... आपण सगळी माणसं. कुणी कसं कुणी असं. आपण
माणूस असलो तरी प्रत्येकाचं रंग, रुप, स्वभाव, जीवनमान, आयुष्यमान, आयुष्यभान... अगदी
विभिन्न... या `माणूसपणा`च्या विचारात असताना
सहज चाळत होते जुन्या वह्या. हाती लागलं बरंच काही. त्यापैकी या माणूस विषयाशी निगडित
असणारं १९९६, १९९८ आणि २००१ या कालावधीतलं हे लिखाण... तीन वेगळ्या टप्प्यांमधलं
आणि तरीही आजच्या काळाला, परवाच्या घटनेला आणि बहुधा पुढच्या काही क्षणांशीही रिलेट
होईल असं काही गवसलं... तेच मांडतेय... वाचा `माणसां`ची गोष्ट...
माणूस म्हणजे काय?
माणूस म्हणजे काय?
एक डोकं दोन पाय. मेंदू त्याचा लहानसा. कामाचा
असे उपसा. दोन्ही त्याचे कर. कामे होती भराभर...
माणूस म्हणजे काय?
ही दुधावरची साय. वरूनी प्रेम दाखवावे. भेदाभेद
करत राहावे. नवे दावे करावे. समाजात मिसळावे...
माणूस म्हणजे काय?
जणू आंब्याची कोय. ताठर, कणखर दिल. अनेकदा होते
चुकभूल. विश्वकर्त्याची निर्मिती सुरेख. देहाची या होतेच राख...
माणूस म्हणजे काय? कुणी
असते अगदी गाय. कुणा नसते तमा. एखादा बनतो मामा.
माणूस तरी कसा माणूस? वाऱ्यावर जसं डोलतं कणीस...
******
जीवनओझे
घड्याळाच्या नादावर. रेल्वेच्या तालावर. संसाराच्या
धावपळीत. ऑफिसच्या गडबडीत. सामान्य माणूस जगतो. जीवनओझे वाहतो...
तोंड देत गर्दीस. हात टेकत महागाईस. सुखासाठी
घरकुलाच्या. छोट्याशा चिमुरड्याच्या. सामान्य माणूस जगतो. जीवनओझे वाहतो...
धकाधकीच्या जीवनात रंगीबेरंगी भावनांत. मोहमयी
भुलभुल्लैयात. पैशांच्या दुष्ट विखळ्यात सामान्य माणूस जगतो. जीवनओझे वाहतो...
निवृत्तीनंतरचे विश्व, म्हातारा झाला अश्व. शर्यतीत
नाही धावणार. वृद्धाश्रमात विसावणार. सामान्य माणूस जगतो. जीवनओझे वाहतो...
संध्याछाया पसरतात. जीवनच पालटतात. जीव शांतावतो.
बंधमुक्त होतो. सामान्य माणूस जगतोच. जीवनओझे वाहतोच...
******
माणसं अशी का?
माणसं अशी का? प्रश्न हा नेमका. ज्याला
त्याला पडतो. संभ्रमित करून टाकतो.
वागतात अशी कशी. पडतात तशी फशी. संबंध असून
नसलेली. कळून सारं अवघडलेली.
प्रत्येकाचे डावपेच निराळे. मनात चालते आगळे. प्रश्न-उत्तरांचे
खेळ सारे. जो तो सारखा विचारे.
गुपिते, गौप्यस्फोट सहज. होतात नियतीचे सावज. हाच
मग होई प्रपंच. जरी असे वेगळा संच.
यातच आले माणूसपण. इतरांपासूनचे भिन्नपण. माणूस
असाच राहिल. माणूसपण जगून पाहिल..
******
(छायाचित्र –
इंटरनेटवरून साभार)
No comments:
Post a Comment