Sunday, 30 October 2016

फाssssस्ट फॉरवर्डsss


किती नि कुठवर धावायचं?
नेमकं कसं काय जगायचं?
घड्याळाचे काटे मागं पडले
मोबाईल सेकंद खुणावू लागले
शेअरिंगसाठी व्हॉटस् अँप की फेसबुक
खरेदीसाठी लाईफस्टाईल की मॅक्स
घरबसल्या ऑनलाईनचा ऑप्शन
झटकन घ्यायचा ओन डिसिजन
किती नि कुठवर धावायचं?
नेमकं कसं काय जगायचं?
नाटकं पाहात थिल्लर
सांस्कृतिक भूक होते चिल्लर
जुनं ते सोनं उकरून
रिमिक्स गीतं आळवून
फ्युजन फूड खातखात
चवीशी करत दोन हात
किती नि कुठवर धावायचं?
नेमकं कसं काय जगायचं?
तोंडी लावायला पर्यावरणाचा प्रश्न
केवळ भंपक कॉपी-पेस्टचं सत्र
जगणंच सगळं तऱ्हेवाईक
जणू एकेक बाहुले तांत्रिक
आपल्यावर बेतल्यावर होतो शहाणे
तोवर निरर्थक होते जगणे
किती नि कुठवर धावायचं?
नेमकं कसं काय जगायचं?
पुस्तकांच्या अक्षर जगात
`किंडल`चे वारे, `ईबुक्स`चे तारे
झाकोळला सूर्य `वाचना`चा  
कॉपीराईट वादाचा मुद्दा
संमेलनांचा वाढता पसारा
भाषेची गळचेपी आवरा
किती नि कुठवर धावायचं?
नेमकं कसं काय जगायचं?
महिनाभर अखंड झुंजायचं
`पगारवून` पवित्र व्हायचं
बिलं चुकती करत
लोनवर लोन काढत
सुखसोयीयुक्त आयुष्य
यंत्राधीनतेचं इंद्रधनुष्य
किती नि कुठवर धावायचं?
किती धरायचा कामाचा हेका
आपसूकच धरतो ताणाचा ठेका
नात्यांच्या रेशीमगाठी गुंतवायच्या की सोडवायच्या
`स्पेस`चा फंडा कसा किती अवलंबायचा
आपल्या मागची काळजी
आपल्या पुढची काळजी
किती नि कुठवर धावायचं?
नेमकं कसं काय जगायचं?
रोजरोजची चिंतन बैठक
डोका गया अपना सटक
छोड दो ये पागलपन
चल जरा `शाणा` बन
ते कसं काय व्हायचं?
`नेटसर्च` करून मोकळं व्हायचं
किती नि कुठवर धावायचं?
नेमकं कसं काय जगायचं?

 

 छायाचित्रं - राधिका कुंटे. 

Sunday, 16 October 2016

तिची एन्ट्री

...आणि तिनं एकदम घरातच एन्ट्री घेतली... आपल्या फेसबुकी भाषेत सांगायचं तर - फिलिंग सरप्राईज्ड... आणि हो, आनंदही वाटला... काल रात्रीपर्यंत ती एकदम शहाण्यासुरत्या मुलीसारखी तिला नेमून दिलेल्या जागेत वावरत होती. वाढत होती. रमत होती. आज सकाळी उठल्यावर पाहिलं तर हिची ही तऱ्हा... अजबच... तिचा एक हात जणू झेपावलेला माझ्याकडं... मला बोलावतेच आहे जशी काही... म्हणे ``ये, ग, जरा गप्पाबिप्पा मारायला...`` तिला म्हटलं, `तुभापो` अर्थात तुझ्या भावना पोहचल्या... पण खरंच, शप्पथ वेळच नाहीये ग माझ्याकडं... कितीतरी कामं उरकायची आहेत... तरीही वाऱ्याच्या तालावर हलतडुलत तू मलाही भूलवलंस... तुझ्याकडं येतायेता आठवणींची पालवीच फुटली की, ग मनात...

आठवली आपली पहिली भेट... मैत्रिणीसोबत गेले होते एका प्रदर्शनाला. चिक्कार गर्दी होती, माणसांची आणि पानाफुलांचीही... तर आपण दोघी आपापल्या मैत्रिणींसोबत होतो आणि अगदी अचानकच... आपल्या सगळ्यांचं लक्ष एकमेकींकडं गेलं. आम्ही दोघी क्षणभरातच तुमच्याकडं वळलो... तू नि काहीजणी माझ्यासोबत नि काहीजणी मैत्रिणीसोबत असे आपले दोन गट झाले. थोडंसं फिरून आपण घरी आलो...

मग आम्ही निगुतीनं तुझ्यासाठी छानशी जागा केली. तुला खाऊपिऊ घातलं. रोज तुझ्याशी क्षणभर गप्पा मारल्या. मैत्रीण आणि मी एकमेकींना तुमचीही खुशाली कळवत होतो. मग एक दिवस कळलं की, मैत्रिणीकडच्या तुझ्या मैत्रिणी... पण ही गोष्ट तुला सांगायचा धीर झाला नाही बिल्कुलच मला... तुला कळलं काही ना नाही, काही कल्पना नाही, पण तू तुझ्या नावाप्रमाणंच कायम प्रफुल्लित, हसतमुख राहात होतीस. बहरत होतीस, फुलत होतीस... सुखातही... दुःखातही... कुणी कौतुक केलं तरीही नि नाक मुरडलं तरीही... आपसूक आम्ही एकेक धडा गिरवत होतो तुझ्याकडं पाहून...

पानाफुलातलं कळणाऱ्या एका बहिणीच्या सल्ल्यानं अधूनमधून तुझी आवश्यक ती देखभाल करायचो. पुढं या सगळ्याची सवय झाली, आम्हांला नि तुलाही... आयुष्यातल्या काही गोष्टींप्रमाणं तुलाही गृहित धरलं गेलं... पण म्हणून तू तुझं फुलणं, बहरणं कध्धीच सोडलं नाहीस... दिवस येत राहिले... जात राहिले... उजाडलं नि मावळलंदेखील... बहुधा आज तुला माझी खूपच आठवण आलेली दिसतेय... म्हणून शेवटी तू ही अचानक एन्ट्री घेतलीस... ही एन्ट्री एकदम भारीच होती. तुझ्या अस्तित्वाची जाणीव पुन्हा एकदा तू ठाशीवपणं करून दिलीस... हे बघsss, तुझ्याभोवताली साचलेलं तण काढून टाकलंय मी... आता तुला एकदम मस्त वाटेल... हेsss किती वेळ गप्पा मारतोय आपण... चल, आता खरंच पळायला हवं कामाला... उद्या सकाळी मात्र नक्की भेटूया... बाय... बाय सदाफुली... फिलिंग - सदाफुली...




  

Sunday, 2 October 2016

पारिजातक


फोटो सौजन्य – अनिल नाईक.


पारिजातक

मी आहे पारिजातक
जणू मांगल्याचा नायक
रंग केशरी-पांढरा
नाजूक-छोट्या आकाराचा
आवडता मी बन्सीधरांचा
आणि अनेक देवांचा
सत्यभामेच्या घरी वाढलो
रुक्मिणीच्या दारी पडलो
या गोष्टीइतकाच आहे मी जुना
मंद सुगंध प्रफुल्लतो मनामना
टपटप टपटप पडती फुले
चटचट चटचट वेचति मोठी-मुले
माझं अस्तित्व बारामाही
पावित्र्याची जणू सही


फोटो - राधिका कुंटे.





Sunday, 18 September 2016

पुन्हा एकदा पाऊस...



पुन्हा एकदा पाऊस...
पुन्हा एकदा पाऊस...
असं म्हणेस्तोवर
तो लागला कोसळू
तो भेटेस्तोवर
थांबू की पळू...

पुन्हा एकदा पाऊस...
पुन्हा एकदा पाऊस...
असं म्हणेस्तोवर
तो पडे मुसळधार
त्याचा मान राखायचा तर
आपणही व्हावं सर...

पुन्हा एकदा पाऊस...
पुन्हा एकदा पाऊस...
असं म्हणेस्तोवर
तो बरसला रिमझिम
त्याला गाठायचं तर
ओळखावी लागेल सम...

पुन्हा एकदा पाऊस...
पुन्हा एकदा पाऊस...
असं म्हणेस्तोवर
तोच झाला ओलेता
त्याला भेटायचं तर
व्हावं लागेल सरिता...

पुन्हा एकदा पाऊस...
पुन्हा एकदा पाऊस...
असं म्हणेस्तोवर
ऐकली त्याची लोककथा
म्हणे, तू पड किंवा नाही,
तुला, कुणी चांगलं नाही म्हणणार...

पुन्हा एकदा पाऊस...
पुन्हा एकदा पाऊस...
असं म्हणेस्तोवर
तो झाला एकतान
त्याला शोधायचं तर
व्हावं लागेल फुलपान...

पुन्हा एकदा पाऊस...
पुन्हा एकदा पाऊस...
असं म्हणेस्तोवर
पाऊस पाऊस पाऊस
त्याला जिंकण्यासाठी
आपण हरायला हवं...



छायाचित्र – इंटरनेटवरून साभार.


Sunday, 4 September 2016

बाप्पा मोरया रे...

`तो` येतोय आपल्याकडं... काहींकडं `त्याचं` आगमन झालंही असेल तुम्ही हा लेख वाचत असाल तेव्हा... सगळीकडं `त्याचा` विचार नि `त्याचा`च विहार. `त्याच्या`साठी प्रसाद नि फुले. `त्याच्या` गुणांचेच भजन-कीर्तन. `त्याचे`च फोटो नि `त्याच्या`चसोबतचे सेल्फीसुद्धा. `त्याच्या`च निमित्तानं दिले जाणारे सामाजिक संदेश नि सामाजिक बांधिलकीचे दाखलेही... `त्याच्या` आगमनानं भारावलेला भवताल. `त्याच्या` उत्सवाच्या निमित्तानं आपापल्या सो कॉल्ड `बिझी लाईफ`मधून वेळात वेळ काढून माणसं भेटतात. उभ्या उभ्या का होईना चार संवादांचे क्षण पदरी पडतात. ती शिदोरी बहुधा वर्षभर पुरत असावी...

`त्याच्या` येण्याच्या निमित्तानं मीही काहीबाही लिहित राहाते. फोटोबिटो काढत राहाते. पोस्टत राहाते. `त्याच्या` विविध माध्यमांतल्या आणि अनेकविध भाव दर्शवणाऱ्या मुद्रांचं संकलन करते. कॅमेऱ्याच्या माध्यमातून `त्याला` टिपून `त्याला` जाणून घ्यायचा प्रयत्न करते. कधी `तो` नातलगांच्या सोसायटीजवळच्या देवळातला असतो. कधी बातमीदारीसाठी कला महाविद्यालयातल्या होतकरू कलाकारांच्या हातांमधल्या कलेत `तो` विसावलेला असतो. कधी विसाव्यासाठी गेलेल्या रिसॉर्टवरच्या परिसरात ठायीठायी दिसतो. किंवा कधी एखाद्या स्वामीनारायण मंदिराच्या कलाकुसर केलेल्या खांबात `तो` सुबकपणं कोरलेला असतो. कधी समाजमाध्यमातल्या फॉरवर्डेड फोटोंमध्ये तर कधी एखाद्या ग्रुपमधून अचानक भेटीस येतो. कधी एखाद्या प्रदर्शनातल्या स्टॉलवर विराजमान असतो. किंवा कधी काळांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संगतीत `त्याचं` अनादी रुप पुन्हा प्रत्ययास येतं. कधी काळाघोडा फेस्टिव्हलमधल्या कलाकृतीच्या माध्यमातून `त्याची` मुद्रा प्रतीत होते. तर कधी स्वतःच रेखाटलेल्या कलाकृतीतून `तो` गवसू पाहातो...   

`त्याच्या` या साऱ्या भावमुद्रा पुन्हा पुन्हा न्याहाळताना वाटतं की, `त्याची` बुद्धी, शक्ती, पालकांप्रतीचा आदरभाव, बंधूप्रेम, `त्याचा` नेतृत्वगुण, `त्याचा` समोरच्याला समजून नि ऐकून घेण्याचा स्वभाव, संकटांशी झुंजण्याची वृत्ती आणि `त्याच्या` मुखावर `चित्ती असो द्यावे समाधान` हा कायमस्वरुपी दिसणारा भाव... खरोखर अंमलात आणावेत असे आहेत `त्याचे` आचार. वाटेल त्या गोष्टी `फॉलो` करण्यापेक्षा `त्याला` `फॉलो` केल्यानं अनेक गोष्टी होतील सुकर. अनेक गुणी कलाकारांनी साकारलेल्या त्या कलानिधीच्या भावमुद्रांपैकी काही तुमच्यासाठीही... बोला, `गणपती बाप्पा मोरया`...


  









(छायाचित्रं- विविध माध्यमांतील कलाकारांकडून साभार.)