तिची एन्ट्री
...आणि तिनं एकदम घरातच
एन्ट्री घेतली... आपल्या फेसबुकी भाषेत सांगायचं तर - फिलिंग सरप्राईज्ड... आणि हो, आनंदही वाटला...
काल रात्रीपर्यंत ती एकदम शहाण्यासुरत्या मुलीसारखी तिला नेमून दिलेल्या जागेत
वावरत होती. वाढत होती. रमत होती. आज सकाळी उठल्यावर पाहिलं तर हिची ही तऱ्हा...
अजबच... तिचा एक हात जणू झेपावलेला माझ्याकडं... मला बोलावतेच आहे जशी काही...
म्हणे ``ये, ग, जरा
गप्पाबिप्पा मारायला...`` तिला म्हटलं, `तुभापो` अर्थात तुझ्या भावना पोहचल्या... पण खरंच,
शप्पथ वेळच नाहीये ग माझ्याकडं... कितीतरी कामं उरकायची आहेत... तरीही वाऱ्याच्या
तालावर हलतडुलत तू मलाही भूलवलंस... तुझ्याकडं येतायेता आठवणींची पालवीच फुटली की,
ग मनात...
आठवली आपली पहिली भेट... मैत्रिणीसोबत
गेले होते एका प्रदर्शनाला. चिक्कार गर्दी होती, माणसांची आणि पानाफुलांचीही... तर
आपण दोघी आपापल्या मैत्रिणींसोबत होतो आणि अगदी अचानकच... आपल्या सगळ्यांचं लक्ष
एकमेकींकडं गेलं. आम्ही दोघी क्षणभरातच तुमच्याकडं वळलो... तू नि काहीजणी
माझ्यासोबत नि काहीजणी मैत्रिणीसोबत असे आपले दोन गट झाले. थोडंसं फिरून आपण घरी
आलो...
मग आम्ही निगुतीनं
तुझ्यासाठी छानशी जागा केली. तुला खाऊपिऊ घातलं. रोज तुझ्याशी क्षणभर गप्पा
मारल्या. मैत्रीण आणि मी एकमेकींना तुमचीही खुशाली कळवत होतो. मग एक दिवस कळलं की,
मैत्रिणीकडच्या तुझ्या मैत्रिणी... पण ही गोष्ट तुला सांगायचा धीर झाला नाही
बिल्कुलच मला... तुला कळलं काही ना नाही, काही कल्पना नाही, पण तू तुझ्या
नावाप्रमाणंच कायम प्रफुल्लित, हसतमुख राहात होतीस. बहरत होतीस, फुलत होतीस...
सुखातही... दुःखातही... कुणी कौतुक केलं तरीही नि नाक मुरडलं तरीही... आपसूक आम्ही
एकेक धडा गिरवत होतो तुझ्याकडं पाहून...
पानाफुलातलं कळणाऱ्या एका
बहिणीच्या सल्ल्यानं अधूनमधून तुझी आवश्यक ती देखभाल करायचो. पुढं या सगळ्याची सवय
झाली, आम्हांला नि तुलाही... आयुष्यातल्या काही गोष्टींप्रमाणं तुलाही गृहित धरलं
गेलं... पण म्हणून तू तुझं फुलणं, बहरणं कध्धीच सोडलं नाहीस... दिवस येत राहिले...
जात राहिले... उजाडलं नि मावळलंदेखील... बहुधा आज तुला माझी खूपच आठवण आलेली
दिसतेय... म्हणून शेवटी तू ही अचानक एन्ट्री घेतलीस... ही एन्ट्री एकदम भारीच
होती. तुझ्या अस्तित्वाची जाणीव पुन्हा एकदा तू ठाशीवपणं करून दिलीस... हे बघsss,
तुझ्याभोवताली साचलेलं तण काढून टाकलंय मी... आता तुला एकदम मस्त वाटेल... हेsss किती वेळ गप्पा मारतोय आपण... चल, आता खरंच पळायला हवं कामाला... उद्या
सकाळी मात्र नक्की भेटूया... बाय... बाय सदाफुली... फिलिंग - सदाफुली...
No comments:
Post a Comment