Saturday, 5 August 2017

एक एक धागा गुंफी


परवा आमच्या एका चर्चेमध्ये बऱ्यापैकी वादावादी झाली. खरंतर `वादावादी` हा थोडा चांगलाच शब्द झाला. जवळपास शाब्दिक हमरीतुमरीच झाली. नाss... नाss... नाss... नाss... नेहमीचाच भांडणतंटा नाही, किंवा कुणाचा `इगो` वगैरे `हर्ट` नाही झाला. पण `ब्रेन स्टॉर्मिग` होतं हे नक्की. मुद्दा अगदी साधासाच होता. की समजा, आपल्याभोवती आपली आपणच काही काल्पनिक वर्तुळं आखायची म्हटली, तर त्यात कोणकोणत्या गोष्टी येतील, त्या लिहायच्या होत्या. मग डायरी-पेन, मोबाईल नोटपॅड, टॅब, रफपेपर असं सरसावलं गेलं. त्यावर क्रमवारीनुसार वर्तुळं लिहिली गेली. काय काय होत त्यात... तर स्वत:, घरचे, नातलग, मित्रमैत्रिणी, सभोवताल, आवडत्या गोष्टी, परिसर, शहर, राज्य, राष्ट्र, जग वगैरेवगैरे. तसं पाहिलं तर ही वर्तुळं तशी कॉमनच! काहींच्या वर्तुळांत मी-माझी, मी-मित्रमंडळी, मी-माझ्या आवडत्या गोष्टी अशा मुद्द्यांचा समावेश होता. यावर चर्चा होणं स्वाभाविकच होतं. पुढ्यात चहा नव्हता, ते सोडून द्या. तरी चर्चा रंगली. मुद्दे ठासून मांडले गेले. योग्य-अयोग्य, प्रत्येकाचा प्राधान्यक्रम, विचारप्रक्रिया आदींचा उहापोह झाला. तो विषय सर्वांसाठी तेवढ्यापुरता संपलादेखील असावा...

`पण`... या `पण`मध्ये कधीकधी किती गंमत असते नाही. हा `पण` बऱ्याच शक्यता निर्माण करतो. सकारात्मक, नकारात्मक तटस्थ वगैरे वगैरे. त्या `पण`मुळंच नेहमीप्रमाणं डोक्यात विचारांचे ढग जमा होऊ लागले... ते तसे होऊ लागले, तर काय होतं ते आपण `फिलिंग...` http://shbdaphulanchi.blogspot.in/2017/07/blog-post.html या `ब्लॉग`मध्ये पाहिलंच. तर ते जमा होत होते. तेव्हा मी चालत होते चर्चगेट स्टेशनच्या दिशेनं. मेट्रो३साठीच्या खोदकामी भुलभुलैयातून कशीबशी काढत होते. वाटेत असताना त्या ढगामुळं मनातच तयार झाला जणू एखादा स्क्रिन. फक्त स्वाईप करायचा...

तर त्या स्क्रिनवर झळकला एक उसनापासना चेहरा. अनेकांप्रमाणं मीही डिपी ठेवला होता एका उसन्या चेहऱ्याचा. तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहेच, पण पुन्हा केव्हातरी. तर ही होते मी. म्हणजे त्या स्क्रिनवरची `मी`. तर लेखातले संदर्भ त्या `मी`ला आणि या लिहिणाऱ्या `मी`ला लपेटून आलेले आणि खरेच असतील असं नाही. असल्यास तो योगायोग समजावा... मग स्वाईप करत राहिले. त्या ``और दिखाओ, और दिखाओ,`` असं जाहिरातीत म्हणणाऱ्या मुलासारखं स्वाईप केलं सरसरपणं. एक के बाद एक दृश्यं येत राहिली.
तर तितक्यात आलं चर्चगेट स्टेशन. काळ-काम-वेगाचं गणित सोडवण्याचा कसोशीनं प्रयत्न करणारी माणसं, मुंग्यांसारखी ये-जा करत होती. लोकल्सची ये-जा चालू होती. एकीत माझं चढणं. ती स्टेशनगणिक थांबणं. माझ्या स्टेशनवर उतरणं. पुन्हा मोठ्या जनसमुदायाचा भाग होणं. घरी परतताना मुंबईबाहेरच्या मैत्रिणीचा फोन येणं. तिच्यासोबतच्या गप्पा. इतर देशी-परदेशी स्थायिक झालेल्या मित्रमैत्रिणींची ख्यालीखुशाली वगैरेवगैरे. घरी पोहचून घरच्यांशी होणारा संवाद. थोडंफार कामकाज. मग सोशलमिडिया चेक करणं. मैत्रीदिनानिमित्तानं ओतप्रोत ओसंडून वाहणारा इनबॉक्स. फोटो वगैरेवगैरे. रक्षबंधनासाठी देश-विदेशातील भावांशी साधलेला स्काईप, इन्स्टाग्राम, व्हॉटस् अँप चॅट, फोन्सच्या माध्यमांतून साधलेला संवाद आणि घराजवळच्यांशी झालेली प्रत्यक्ष भेट. तिकडं ईमेल इनबॉक्समध्ये होते, `पीआर`नी पाठवलेले किंवा ऑनलाईन साईटसच्या मार्केटिंगचे ईमेल्स, अर्थातच स्वातंत्र्यदिनानिमित्तानं होणाऱ्या इव्हेंट किंवा ऑफर्सचे. ये लो भाए, हो गई क्या दुनिया मुठ्ठी में???...

तर लहान मुलांच्या चित्रांच्या पुस्तकात कसं असतं की, हे १ ते १०० अंक जोडा आणि तयार होणार चित्र रंगवा. तसाचा काहीसा आहे का, या `मी`पणाच्या केंद्रबिंदूचा प्रवास... हे आत्ता सांगितलेले बिंदू कनेक्ट केले तर या `मी`पणाचा केवढा थोरला विस्तार होतो आहे पाहा... किती किती मोठा पसारा आहे हा... इवल्याशा केंद्रबिंदूपासून सुरू होतहोत प्रसंगी जगाला कवेत घेऊ शकणारा... या पसाऱ्याचीच मग होते एक रेष! होतो मग एक धागा! ती रेष नि तो धागा असतो विचारांचा, मैत्रीचा, आदराचा, प्रेमाचा. तो होता आधुनिक साधनांच्या वापराचा, विस्ताराचा, संवादाचा... हे  जणू प्रतिबिंब होतं व्यक्तिगणिक वाढणाऱ्या किंवा कमी होणाऱ्या वर्तुळांचं. ही वर्तुळं एकमेकांना छेदणारी होती? की स्वतंत्र होती?... विचारांच्या धाग्यांचं एक टोक सकारात्मकता होतं नि दुसरं टोक होतं मानवता. आता त्या दोन टोकांच्या मधले विचार आणखीन धुंडाळायचे म्हटले तर `विचारांच्या ढगां`ना थोडा विराम घ्यावा लागेल. म्हणून तंद्रीतून सावध होत विचारांचे ढग बाजूला सारले. कल्पनांना दूर लोटून दिलं. `मनाचा स्क्रिन` काही केल्या ऑफ होत नव्हता, तर मग तो `रिस्टार्ट` केला. इतकं होईपर्यंत सकाळ उजाडलीच... पुन्हा कामाला लागणं आलंच ओघानं... ते करताना वाटेत काहीतरी लुडबुडू लागलं... मांजरीच्या पिल्लासारखं सारखं पायात घोटाळू लागलं... हा तोच तो धागा होता मगाचचा... ओssहोss... आता हे एकेक धागे पुन्हा गुंफायचे म्हणजेss... ढग पुन्हा जमा होणारss नि विचार बसरणारss... ब्रेन स्ट्रॉर्मिंगss, आगे बढो, हम तुम्हारे साथ हैंss...





छायाचित्र – इंटरनेटवरून साभार.

No comments:

Post a Comment