पाणी... बाटली...
पाणी...
त्या दिवशी कामानिमित्त पोहचायचं होतं एके
ठिकाणी वेळेत. मग धावतपळत स्टेशन गाठलं. स्टेशनरोडवरच्या वाटेतला चिखल, खड्डे आणि
प्लॅस्टिकचा भस्मासूर जागोजागी आपलं अस्तित्व दाखवून देत होता. ते सारं काही
टिपिकल मध्यमवर्गीय नजरेआड करून चालत राहिले मुकाट स्टेशनची वाट. तिकिट काढलं.
धडधडती गाडी येऊन थडकलीच होती. चटचटा ब्रिजच्या पायऱ्या उतरून, गनिमी कावा साधत,
मुंबईकरांच्या अंगभूत चपळाईनं लक्ष्य गाठलं. गाडी सुटली... गाडी पकडता आल्याचा
आनंद मनाजोगती जागा मिळाल्यावर व्दिगुणित झाला. हुश्शsss करून टेकले. समोरच्या
बाकावर नजर गेली नि कडूजार गोळीनं तोंडभर पसरणारी चव क्षणभर आठवली... आता प्रवासभर
हे सहन करावं लागणार होतं. इतरांप्रमाणं नशीबाला दोष देत जागा बदलायची संधी होती
आणि तशी जागाही होती. पण... पण तिनं तर मला जवळपास खिळवून ठेवल्यासारखं झालं होतं...
पुन्हापुन्हा माझी नजर तिच्याकडंच जात होती. मधल्या स्टेशन्सवर होणारा जुजबी
चढ-उतार आमच्यात कोणताही अडथळा आणत नव्हता. बाकीच्या आमच्या बाकांच्या आगे-मागे,
शेजारी बसत होत्या. हाच क्षण साधला गेला जणू नि आमच्यातल्या काल्पनिक संवादाला
मोकळं रान मिळालं...
प्रश्न – कोण ग तू?
उत्तर – प्लॅस्टिकची बाटली
प्रश्न – कुठून आलीस?
उत्तर – माहिती नाही.
(स्वसंवाद – हे बाकी खरंए. ना तिच्यावर
कोणतं लेबल होतं ना कोणत्या कंपनीचा चटकन दिसेलासा छाप.)
प्रश्न – कोणी तुला इथं ठेवलं?
उत्तर – माहिती नाही.
प्रश्न – तुझ्यात काय आहे?
उत्तर – पाणी... पाणी...
प्रश्न – पण अर्धीच बाटली पाणी...
उत्तर - माहिती नाही.
(स्वसंवाद – हे बाकी खरंए. बाटली रिकामी
आहे की भरलेली हे पाहाणं, हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे.)
त्यानंतर आदळू लागले प्रश्न नि तर्कटलेले
विचार... कारण तिच्याकडं उत्तरं नव्हतीच.
प्रश्न – तुझी मालकीण कोण?
प्रश्न – पाणी अर्धवट का प्यायलं गेलंय?
प्रश्न – बाटली गाडीत का ठेवली?
प्रश्न – पाणी नको असलं, तरी बाटली घेऊन
जायची. झाडांना घालायचं ना?...
प्रश्न – कदाचित पर्समध्ये जागा नसेल नि
बाटलीची अडगळ वाटली असेल?...
प्रश्न – कदाचित घर जवळ असेल, आणखी पाणी
नको असेल?...
प्रश्न – कदाचित ती आळशी असेल?...
प्रश्न – कादाचित तिच्याकडं पाणी भरपूर
असेल?...
ओsssहो... या मुद्द्यावर गाडी अडकलीच... त्याभोवतीच्या
शक्यतांचा वेढाच पडला जणू. की पाणी भरपूर असणारी ती कुठं राहात असावी?, पाणी विकत घेतलं असेल? की घरातलंच भरून घेतलं असेल?, विकत घेतलं असेल तर बाटलीवर लेबल कसं नाही?... कायदा
तर म्हणतो... वगैरे वगैरे. त्या नंतर त्या बाटलीच्या भविष्याचा अंदाज घ्यायला मन कचरू
लागलं. अशा माणशी बाटल्या विसरल्या गेल्या तर... या बाटल्यांची संख्या वाढली तर...
या बाटल्यांचा डोंगरच होईल एक कादाचित... तो पार कसा करणार आणि त्यानंतर तरी पाणी
हाती लागेल का... की सरळ ही बाटली उचलावी आणि स्टेशनवरल्या प्लॅस्टिक बाटली
क्रशरमध्ये टाकावी...
``अगला स्टेशन...`` या गाडीतल्या घोषणेनं भानावर आले. माझं तिच्याकडं पाहात राहाणं
डब्यातल्या काहीजणींच्या लक्षात आलं असावं. कसंनुसं हसून मी काहीच न झाल्याचं
भासवलं. नकळत हात तिला उचलायला लांबवला नि क्षणार्धात तो मागंही आला. टिपिकल
मध्यमवर्गीय दृष्टिकोनाचा अडसर उभा राहिलाच. माझ्या स्टेशनवर मी उतरून गेले... ती
मात्र खोलवर विचारांत दडून बसली... काम संपवून दुसऱ्या गाडीनं घरी परतू लागले.
आसपासच्या बाकांवर सहप्रवासिनी होत्या नि ती नव्हती. मनाशी हुsssश्श म्हणतानाच दिसलं पाणी... माझ्याच बाकावर होतं... पावसाची झड आली असावी
खिडकीतून... ठीकए ना... आपण काय करणार? असं मनात पुटपुटतानाच
जाणवलं, तिचं अस्तित्व!!! माझ्याच पर्समध्ये, समोरचीच्या
बॅगमध्ये, पलीकडच्याच्या सॅकमध्ये, डबाभर, गाडीभर, स्टेशनभर... तिचं अस्तित्व
विस्तारतच गेलं झपाट्यानं... क्षणभरात पुन्हा भास झाला... प्लॅस्टिकच्या बाटलीचा
झाला डोंगर... पाणी आपल्यापासून दुरावतंय फर्लांगभर... वो किस की हैं? मेरी, आपकी, उसकी?...
``अगला स्टेशन...`` या गाडीतल्या घोषणेनं भानावर आले. माझं तिच्याकडं पाहात राहाणं,
डब्यातल्या काहीजणींच्या लक्षात आलं असावं. कसंनुसं हसून मी काहीच न झाल्याचं
भासवलं. नकळत हात ते पाणी पुसायला लांबवला नि क्षणार्धात तो मागंही आला. टिपिकल
मध्यमवर्गीय दृष्टिकोनाचा अडसर उभा राहिलाच. माझ्या स्टेशनवर मी उतरून गेले... आता
घराकडं परतायची लगबग... ती मात्र खोलवर विचारांत दडून बसलेली आहे... पावसाच्या
पाण्याचे सपकारे बसू लागले चेहऱ्यावर... तरी छत्री न उघडता तशीच चालत राहिले...
विचारांच्या सरींवर सरी पडतच होत्या... गाडी, बाटली, पाणी... अन् बाटली, पाणी...
अन् पाणी... पाणी...
(छायाचित्र
– राधिका कुंटे.)
Beautiful Post....
ReplyDeleteLiked it....
thank you.
ReplyDelete