Sunday, 22 January 2017

कल्हई




परवा आठवणीतील गाणी वेबसाईटवरची गाणी वाचत-ऐकत होते. एका पानावर होतं कल्हईवरचं गीत. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं. गीताचे बोल होते भांड्याला कल्हई लावा, भांड्याला कल्हई लावा. तांब्याची पितळेची करून देतो कल्हई... मन थोडंसं भूतकाळात झेपावलं. लहानपणी पाहिलेलं चित्र डोळ्यांसमोर आलं... धगधगीत फुललेले निखारे... जमून आलेली भट्टी... आधी काळवंडलेली भांडीक्षणार्धात चकाचक होतात... ही कमाल असते कल्हईवाल्यांची.

तो कल्हईचा धूर आठवता आठवता चटका बसला तो वर्तमानाचा. सध्या कल्हईवाल्यांना पूर्वीच्या तुलनेनं कमी काम मिळतंय. नेहमीच्या ग्राहकांकडं सहा महिने किंवा वर्षाकाठी कल्हई लावून घेणं सुरु असलं तरीही कदाचित आणखीन काही वर्षांनी कल्हई करणं, ही संकल्पनाच बंद होईल की काय अशी अटकळ बांधली जातेय. अर्थातच कल्हई करण्याचा व्यवसाय बंद पडेल, या विचारानं मन थोडं खंतावलं.

मुंबईत सध्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतके कल्हईवाले उरले आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे पूर्वीइतक्या सर्रासपणं पितळ्याची भांडी आता वापरली जात नाहीत. पितळ्यापेक्षा वापरायला सोप्या नि सुटसुटीत असणाऱ्या स्टिल किंवा अन्य धातूंच्या भांड्यांचा वापर केला जात असल्यानं साहजिकच पितळ्याची भांडी अडगळीत पडली किंवा मोडीत निघाली. केटरिंग क्षेत्रात पूर्वी पितळ्याच्या भांड्यांचा वापर अधिकांशी केला जायचा. तेही आता बंदच झालं आहे. त्यामुळं कल्हई करावी एवढी भांडीच शिल्लक राहिलेली नाहीत किंवा अनेकदा ती गोळा करावी लागतात.

पितळी भांड्यांत स्वयंपाक करकरून विविध प्रकारचे थर चढवलेली भांडी तशीच वापरल्यास ते आरोग्यास घातक ठरतं. म्हणूनच त्यांना कल्हई केली जाते. ही कल्हई कशी केली जाते... तर भांडी प्रथम गॉस्टिक सोड्यानं स्वच्छ करून घेतात. ती घासून गरम पाण्यानं धुवून त्यात नवसागर घालतात. त्यामुळं धूर येऊन त्यात कल्हई वितळवली जाते. मग हातानं ते भांडं स्वच्छ करून घेतलं जातं. दिसायला नि वाचायला सोप्पं दिसलं तरी हे काम वाटतं तेवढं सोप्पं नाहीये. सध्या कल्हईकाम करणाऱ्यांमध्ये काहीजण वडिल-काका किंवा वडिल-भाऊ यांच्या मागं कल्हई करून आपल्या वडिलोपार्जित उद्योग चालू ठेवत आहेत. पण त्यात म्हणावी तशी कमाई होत नाही. वडाळा, दादर, अँण्टॉप हिल परिसरातल्या काही कल्हईवाल्या काकांशी बोलल्यावर कळलं की, पूर्वीसारखा या व्यवसायात राम उरलेला नाही. पूर्वी शंभर आणे धंदा व्हायचा, आता जेमतेम पंचवीस आणेच होतोय. महिन्याला कल्हईतून मिळणारी पुंजी पुरेशी ठरत नाहीये. पुढचं भवितव्य फारसं स्पष्ट दिसत नाहीये... या व्यवसायातल्या परंपरा जपून आणि त्याचं यथायोग्य तऱ्हेनं आधुनिकीकरण करून त्याला काही ऊर्जितावस्था आणता येईल का, यावर विचार होऊन कृती व्हायला हवी... या विचारात असताना खेबुडकर यांचं गीत पुन्हा आठवू लागलं...

भांड्याला कल्हई, लावा भांड्याला कल्हई
तांब्याची पितळेची, करून देतो कल्हई

माझ्या कल्हईचा न्याराच ढंग
देतो भांड्यांना चांदीचा रंग
गल्लोगल्ली हे घेऊन सोंग
माझ्या कामात माझा मी दंग
थोरांची गरिबांची एकच इथे कल्हई

मज बंगल्यात कोणी पुकारी
कधी जातो मी झोपडदारी
कधी रोखीत कधी उधारी
एका मोलाची ही मज सारी
लेखणीची अन्‌ कल्हईची एकच माझी झिलई

कधी स्वप्‍नीं मलाही दिसले
ओठीं भिडले चांदीचे पेले
हाती कथलाचे पुसणे आले
परि त्याचे सोने झाले
कष्टाची मोलाची भाकर हक्काची खावी.





(गीत सौजन्य - आठवणीतील गाणी वेबसाईट. छायाचित्र सौजन्य – इंटरनेट. छायाचित्र – राधिका कुंटे)

Sunday, 8 January 2017

दृष्टिकोन

परवा एका क्लिनिकमध्ये गेले होते. माझा नंबर यायला वेळ होता. मग आपला उगीचच सोशल साईटवर टीपी चालू होता. घड्याळाचे पुढं सरकू लागले, तसा त्या टीपीचाही कंटाळा येऊ लागला. तितक्यात क्लिनिकच्या पायऱ्या चढून त्या तिघी आल्या. पहिली आली झपाझप. पटदिशी रिसेप्शनवर जाऊन तिनं अपॉइंटमेंटची वेळ तिनं सांगितली. नंतर दुसरी आली ती थोडी मध्यमवयीन. त्यापाठोपाठ जराशा थकल्या पावल्यांनी आली तिसरी. तिघी खुर्चीवर बसल्या. तितक्यात माझ्यासमोर बसलेल्या माणसाचा नंबर आला नि तो आत गेला. तेव्हा किंचितशी चुळबुळ झाली त्या तिघींची. मग पसरली काही क्षणांची शांतता...

मला आपलं आठवलं, उगीचच एक कोडं. ``बापलेक दोघंजण भाकऱ्या भाजल्या तीन. त्या समान वाटायच्या कशा... तर त्या वाटायच्या एक एक एक. म्हणजे एकूण तीनजणं होते- बाप-लेक आणि बाप-लेक अशा दोन जोड्या...`` काही क्षणांत भानावर आले. कुठंपण काहीपण आठवतं राव आपल्याला... तितक्यात त्या तरतरीत पहिलीनं हाक मारली तिसरीला ``अरी, ओ नानी...`` आईशप्पथ!!! हा कसला भारी योगायोग म्हणावा... `कोडं` आणि `समोरच्या तिघी` हे समीकरण एकदमच फिट्ट जुळलं म्हणायचं. मग थोडं कान देऊन त्यांचं बोलणं ऐकू लागले.

नानी नातीला काही रिपोर्ट दाखवत होती. त्याबद्दल काही प्रश्न विचारत होती. किती तारखेला रिपोर्ट काढला, पैसे किती लागले वगैरे वगैरे. नात तिला समजावत होती. मध्यमवयीन ती त्यांचा तो संवाद ऐकत होती. तितक्यात एकजण रिसेप्शनशी आला. नानी लगेच सजग झाली. नातीला म्हणाली, ``अग आपला नंबर आहे ना. तो बघ चाललाय.`` नातीनं तिला समजावलं. तो वेगळ्या कामासाठी आलाय वगैरे वगैरे. तो माणूस निघूनही गेला. नानी फार कुतुहलानं इकडंतिकडं बघत होती. कोणकोण कायकाय करतंय, ते न्याहाळत होती. पुन्हा एकदा काही क्षणांच्या शांततेनं हजेरी लावली...

त्यांच्या संवादाला काहीसा कोकणी-हिंदीचा लहेजा होता. नानीनं पुन्हा चुळबुळ सुरू केली. आता अधूनमधून ती माझ्याकडं टक लावून बघू लागली. मध्येच लहान मुलांसारखी नातीला विचारू लागली की, ``हमारा नंबर कब आएगा...`` नातीनं खुसुरफुसुर करत तिला काहीतरी समजावलं. ती जराशी शांत बसली पण पुन्हा तिचे प्रश्न सुरूच झाले. मग नातीनं गंमत केली. आईच्या फोनवरून नानीला फोन लावला. तो उचलण्यात नानीचं लक्ष डायव्हर्ट झालं नि नातीनं फोन कट केला. मग कुणी फोन केला, कसा केला, तुला कळला कसा नाही हे सगळं नानीला समजावण्यात काही वेळ खर्ची झाला. पुन्हा नानीचा प्रश्न हाजीर झालाच की, ``हमारा नंबर कब आएगा...`` तो टाळण्यासाठी धाकट्या मायलेकी नानीला म्हणाल्या, ``तू बस. आम्ही जरा जाऊन येतो.`` आपल्या पर्स नानीकडं सोपवून त्या फ्रेश व्हायला गेल्या. पुन्हा एकदा काही क्षणांच्या शांततेनं हजेरी लावली...

आता नानी थेट माझ्याकडं पाहू लागली. मला उगीच जबाबदारी वाटू लागली तिची. जणू तिला माझ्यावर सोपवून धाकट्या माय-लेकी गेल्या होत्या. नानीच्या डोळ्यांत अद्याप कुतुहल होतंच. तितक्यात ती पर्सेस बाजूच्या खुर्चीवर ठेवून झपाट्यानं आत गेली. आता आली का पंचाईत... कुठं गेली नानी... हे विचार मनात येईस्तोवर नानी आली नि पाठोपाठ त्या दोघींही. मनातल्या मनात सुटकेचा निःश्वास टाकला. नानीनं लहान मुलं आपली चूक लगोलग कबुल करतात तसं त्यांना सांगून टाकालं की मी तुम्हांला आत शोधायला गेले होते... त्यावर धाकट्या माय-लेकींना हसूच आलं. मग किंचितसं दूर उभं राहून त्यांनी आपापसात काही खुसरफुसर केलं. तेही नानी कुतुहलानं बघत होतीच. तितक्यात त्यांचा नंबर लागला एकदाचा. वाटलं आता नानी आत जाईल. पण आत गेल्या त्या धाकट्या दोघीच. नानी बाहेरच. पुन्हा एकदा काही क्षणांच्या शांततेनं हजेरी लावली...


काही वेळानं नानी उठली. फ्रेश व्हायला गेली. ती खुर्चीशी आल्यावर दिसलं की, तिनं तोंडावर पाणी मारलंय. जवळच्या रुमालानं तिनं चेहरा पुसला. डोळे पुसले. चष्म्याची काच पुसली नि तो लावला. मग कुणालासा फोन लावून पलीकडच्याची खुशाली विचारली. अपार कुतुलहानं भोवतालच्या जगाला निरखू लागली. रस्त्यावरची वाहतूक, शेजारपाजारची दुकानं, रिसेप्शनमधले पेशंट, रिसेप्शनिस्ट मुली वगैरे वगैरे. तितक्यात त्या दोघी बाहेर आल्या आणि माझा नंबर लागला. मी आत निघाले. त्या दोघी बाहेर आलेल्या दिसताच नानी चटकन उठलीच. त्या घरी गेल्या असणार. मी आत निघाले... बदलला होता तो भोवतालाकडं पाहण्याचा दृष्टिकोन... `नानी`च्या अपार कुतुहलाचा चष्मा लावणं मला आवडलं होतं म्हणा... पुन्हा एकदा काही क्षणांच्या शांततेनं हजेरी लावली...